Login

Astro With सर्वेश... भाग:११

Information Of Capricorn
नमस्कार मंडळी,

कसे आहात सगळे? एक एक रास पाहत आपण दहाव्या राशीपर्यंत पोहोचलो. आपली आजची रास आहे, राशीचक्रातील दहावी रास, मकर रास.


मित्रांनो, मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. शनी हा शिस्त, जबाबदारी, संयम आणि कर्तव्यबुद्धीचा ग्रह आहे. म्हणून मकर राशीचे लोक अत्यंत व्यवहारवादी, अनुशासनप्रिय, मेहनती आणि वास्तववादी असतात.


आणि ही रास पृथ्वी तत्वाची, स्त्रीस्वभावाची आणि स्थिर रास आहे.

या राशीचे चिन्ह आहे समुद्री शेळा म्हणजेच Sea Goat. हे चित्र एका अर्ध्या शेळीचे आणि अर्ध्या माशाचे मिश्र रूप असते. वरचा भाग शेळीचा आणि खालचा भाग माशाचा असतो. याचा अर्थ असा की ही रास महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि स्थिर विचारांची आहे, पण भावनिक गहिरे पण आहे या राशीमध्ये आहे. ही शेळी अर्धी जमिनीवर आणि अर्धी पाण्यात असते. यामुळे या राशीचे लोक वास्तववादी असूनही भावनाशील आणि महत्त्वाकांक्षी असूनही संयमी असतात.


मकर राशी लोकांचा स्वभाव जरासा गंभीर, आधी सांगितले तसे जरासा संयमी आणि जबाबदार असतो. शनीचा प्रभाव असल्याने हे लोक अत्यंत शिस्तप्रिय, नियोजनबद्ध आणि कष्टाळू असतात.
या लोकांना आयुष्यात यश मिळवायचे असते, पण यासाठी ते shortcut न वापरता हळूहळू, टप्प्याटप्प्याने आणि स्थिरतेने पुढे जातात. त्यांच्या जीवनातील मंत्र असतो
“Slow and steady wins the race.”

हे लोक शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक, तपशीलवार आणि जबाबदारीने करतात.

त्यांना स्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते. बोलण्यात गंभीरता, विचारांमध्ये खोली आणि वागण्यात संयम, ही मकर राशीची ओळख. हे लोक बोलके नसतात, पण एकदा बोलले की प्रत्येक शब्दाला वजन असते.


मकर राशीचे लोक शिस्त, जबाबदारी आणि सातत्याचे प्रतीक असतात. ते कामाला प्राधान्य देतात, आणि अपयश आल्यावरही सहज हार मानत नाहीत.
यश मिळवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतात.
हे लोक आपल्यावर आलेले काम अत्यंत गांभीर्याने घेतात. ते “करायचं तर पूर्णपणे करायचं” या विचाराचे असतात. कोणत्याही क्षेत्रात विश्वास ठेवण्यासारखे, स्थिर लोक. यांच्यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो.

हे लोक कर्तव्यदक्ष आणि वास्तववादी असतात. कुटुंब आणि जबाबदाऱ्या यांना ते जास्त महत्त्व देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक अधिकार आणि स्थैर्य असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात. वेळ, पैसा, काम यांचा योग्य उपयोग कसा करावा हे त्यांना चांगले माहित असते. त्यांना आवडते नियोजन, नियम आणि स्थिरता.


मकर राशीचे लोक ऑफिसमध्ये अतिशय वेळेवर पोहोचतात. त्यांच्या टेबलावर सगळे काही अगदी व्यवस्थित असते. पेन , फायली आपापल्या जागेवर आणि मुख्य म्हणजे त्यांचा मोबाईल नेहमी १००% चार्ज असतो.


मकर राशीचे लोक फारसे भावनांचे प्रदर्शन करत नाहीत. ते आतून खूप संवेदनशील असले तरी बाहेरून ते शांत आणि कठोर भासतात.


प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच. तसेच मकर राशीतही दुर्गुण आढळतात.

मकर राशीचे लोक अतिशय गंभीर असतात. कधी कधी इतके की हास्यविनोद विसरतात. त्यांना भावना व्यक्त करण्यात अडचण येते, त्यामुळे ते थंड आणि अलिप्त वाटतात.


कधी कधी ते इतके कामात गुंततात की कौटुंबिक आयुष्य दुर्लक्षित करतात. ते स्वतःवर आणि इतरांवरही कठोर असतात, त्यामुळे टीकात्मक होण्याची प्रवृत्ती दिसते. त्यांचा हट्टीपणा आणि अहंकार कधी कधी नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतो.

शनीमुळे मकर राशीच्या लोकांना सुरक्षिततेची खूप काळजी वाटते आणि जोखीम घेणे कमी आवडते.
उदाहरणार्थ, समजा रोहित मकर राशीचा आहे. नोकरीत बढती मिळविण्यासाठी त्याला एक नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळते. हा प्रोजेक्ट जरा जोखमीचा असतो, त्यात काही अडचणी पण येण्याची संभावना असते, पण त्यात यश मिळाले तर मोठी पदोन्नती निश्चित होती.

तर मकर राशीच्या रोहितच्या लगेच मनात विचार येतो,
"काही बिघडले तर माझा रेकॉर्ड खराब होईल, मी अपयशी ठरलो तर, माझं डिमोशन पण होऊ शकते."
अश्या विचारामुळे तो संधीचा स्वीकार करत नाही आणि सुरक्षित मार्ग निवडतो. जरा विचार करा, जर हा प्रोजेक्ट त्याने हातात घेतला असता तर कदाचित त्याला मोठे यश मिळाले असते.

याच प्रकारे, मकर राशीचे लोक जोखीम टाळण्यासाठी अनेक संधी गमावतात, कारण त्यांना नेहमी “काही बिघडेल का?” अशी चिंता सतत असते.


आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास मकर राशीचा प्रभाव हाडे, सांधे, त्वचा आणि दात यांच्यावर असतो. त्यामुळे त्यांना हाडांची कमजोरी, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिससारखे आजार होण्याची शक्यता असते. शनीमुळे त्वचेचा कोरडेपणा, एक्झिमा, खाज, केसगळती अशा तक्रारीही उद्भवू शकतात. कामाचा आणि जबाबदारीचा ताण जास्त घेतल्याने मानसिक थकवा, डिप्रेशन किंवा अनिद्रा होण्याची शक्यता वाढते. थंडीच्या वातावरणात सर्दी, खोकला किंवा गळ्याचे विकारही जाणवू शकतात. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, योग-प्राणायाम आणि सूर्यप्रकाशाचा संपर्क राखल्यास या समस्या सहज टाळता येतात.


मकर राशीचे सर्वाधिक जुळणारे जोडीदार वृषभ आणि कन्या राशीचे असतात, कारण या दोन्हीही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. वृषभ रास मकर राशीच्या स्थैर्याला भावनिक उब देते, तर कन्या रास तिच्या व्यवहारकुशलतेला पूरक ठरते. या राशींचे नातं विश्वास, जबाबदारी आणि परस्पर आदरावर आधारित असते


शेवटी थोडक्यात सांगायचे झाल्यास, मकर राशीचे लोक शिस्त, मेहनत आणि जबाबदारीचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. ते बोलके नसले तरी त्यांच्या शांत प्रयत्नांतून ते जग जिंकतात. थोडं हसणं, थोडं मन मोकळं करणं आणि स्वतःवर प्रेम करणं शिकले, तर हे लोक खरोखरच आयुष्यातील “पर्वत शिखर” गाठतात.


तर ही झाली मकर राशीची थोडक्यात माहिती