Login

Astro With सर्वेश... भाग:१३

कुंभ राशीची माहिती
नमस्कार मंडळी,

'Astro with सर्वेश' च्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत.

मंडळी, आज आपण राशीचक्रातल्या अकराव्या राशीबद्दल, , म्हणजेच कुंभ राशीबद्दल जाणून घेणार आहोत.

तर मंडळी, कुंभ राशीचे चित्र पाहून तुम्हाला काय वाटते?

एक घडा किंवा एक घडाभर पाणी ओतणारा मनुष्य. बरोबर?

तर मला सांगा, ते चित्र पाहून तुमच्या डोक्यात काय विचार येतो? फक्त एक घडा किंवा फक्त पाणी ओतणारा मनुष्य? की आणखी काही?

मंडळी, हा घडा आणि त्यातून ओघळणारा पाण्याचा प्रवाहच हा या राशीबद्दल बरीचशी माहिती देतो.

चित्रात दिसणारा हा घडा साधासुधा घडा नाही. तो ज्ञानाने भरलेला आहे, ज्यात अफाट कल्पना आणि विचारांचा साठा आहे आणि मुख्य म्हणजे तो ते साठवून नाही ठेवत, तर बाहेर ओतत आहे. म्हणजेच आपल्या ज्ञानाचा, विचारांचा वापर करून इतरांना मार्गदर्शन करतात.
कुंभ राशीचे लोक असेच करतात. हॅलो आपले न्याय समाजाच्या भल्यासाठी वापरतात.


कुंभ राशीचे तत्व वायू आहे. त्यामुळे बाहेरून ते थोडे थंड आणि अलिप्त दिसले तरी, आतून मात्र संवेदनशील, नीतिपूर्ण आणि मोठ्या विचारांचे असतात.


या राशीचा स्वामी आहे शनी महाराज, म्हणजे न्याय, शिस्त, स्थिरपणा पण आला.

शनीदेव कधीच पक्षपातपणा करत नाहीत. जो कर्म करतो, त्याला त्याचे फळ मिळतेच हे शनीदेवांचे तत्व आहे.
त्यामुळे कुंभ राशीचे लोकही न्यायप्रिय, प्रामाणिक आणि निष्पक्ष विचारांचे असतात. ते चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभे राहतात, मग ती गोष्ट स्वतःच्या माणसांबद्दल का असेना.

उदाहरण सांगायचे झाल्यास, जर एखादा मित्र चुकीचे वागत असेल, तरी कुंभ राशीचा माणूस त्याचे समर्थन करणार नाही, तो योग्य तीच बाजू घेईल.

या राशीचे लोक योजनेने काम करणारे, वेळ पाळणारे, आणि नियमप्रिय असतात. ते कुठलीही गोष्ट घाईघाईत करत नाहीत. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतात.

शनीला “धीम्या गतीचा ग्रह” असे मानले जाते, त्यामुळे त्याचा प्रभाव असलेली कुंभ रास देखील स्थिर आणि स्थायी स्वभावाची असते. ही रास बदलापेक्षा सातत्यावर विश्वास ठेवते. भावनिक चढ-उतारांपेक्षा विचार आणि वास्तवावर जास्त भर देते.


कुंभ राशीची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे हे लोक I.I.P. असतात.
आता तुम्ही म्हणाल I.I.P. म्हणजे काय?

Innovative, Intellectual, Perfectionist

कुंभ राशीचे लोक नेहमी वेगळे काहीतरी करायचे या विचाराने जगतात. ते जुन्या चौकटीत न राहता, नवीन कल्पना, बदल, प्रयोग आणि समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या डोक्यात सतत काहीतरी सर्जनशील विचार सुरू असतो.
त्यामुळे हे लोक वैज्ञानिक, संशोधक, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, लेखक किंवा समाजसुधारक म्हणून चमकतात.

कुंभ राशीचे व्यक्ती प्रत्येक गोष्टीत तर्क शोधतात. ते
भावनांपेक्षा विचारांना महत्त्व देतात. त्यांना चर्चेत भाग घ्यायला, नवीन गोष्टी शिकायला, इतरांना शिकवायला आणि समाजात काहीतरी विचारप्रवर्तक सांगायला आवडते.

मुख्य म्हणजे हे लोक कोणतीही गोष्ट अर्धवट करत नाहीत. काम सुरू केले की ते पूर्णपणे नीट, नियोजनबद्ध आणि शिस्तीत करतात. आपल्या कुठल्याही कामात हे लोक चुका ठेवत नाहीत. कोणतेही काम करताना हे लोक त्यावर खूप अभ्यास करतात.

उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्या राखी मॅडम कुंभ राशीच्या आहेत. आपले लेखन करताना त्या सतत त्या विषयाची पुस्तके मागतात, त्या विषयाबद्दल सखोल जाणून घेतात, इतरांकडून माहिती मिळवतात, त्याला साजेसे चित्रसुद्धा perfect असेच बनवतात.
मला वाटते मी ईरावर त्यांच्या एवढी संशोधक वृतीची लेखिका दुसरी कोणीही पाहिली नाही.

कुंभ वाल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःचे काम तर उत्तम करतातच, पण त्याच बरोबर इतरांचे ही काम उत्तम व्हावे असे वाटते. त्यासाठीही ते प्रयत्न करतात. ते केवळ मजा करण्यासाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने लोकांची मदत करायला सदैव तयार असतात. इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम कुंभ राशीच्या लोकांना बरोबर जमते.

समाजसुधारणा, लोकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आखणे अशा गोष्टी कुंभ राशीच्या व्यक्तींना बरोबर जमतात.

हे लोक स्वतंत्र विचारांचे आणि स्वतंत्र जीवनपद्धती जगणारे असतात.

कुंभ राशीचे लोक सहज मित्र बनवतात आणि लोकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. कुठल्याही व्यक्तीला कुंभ राशीची व्यक्ती परकी भासत नाही.
मित्रांच्या समस्या समजून घेणे, त्यांना सल्ला देणे किंवा आधार देणे, हे ते आपले कर्तव्य मानतात.


कुंभ राशीचा आणखी एक गुण म्हणजे हे लोक Supportive आणि cooperative असतात.

हे लोक कुठल्याही कार्यात किंवा प्रकल्पात पुढाकार घेतात. ते स्वतःच्या कल्पनांमध्ये व्यस्त असतानाही, इतरांच्या यशासाठी मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
टीमवर्क असल्यास ते टीम मध्ये राहूनही काम नीट पार पाडतात.


तर हे झाले कुंभ राशीचे चांगले गुण. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे कुंभ मध्ये सुद्धा थोडेफार दुर्गुण असतातच.

हे लोक भावनांपासून जरा दूर, थोडेसे थंड आणि अलिप्त असतात. त्यामुळे त्यांच्या नात्यांत अंतर येऊ शकते.

जसे की कुठलेही काम त्यांनी हाती घेतल्यास ते त्या कामात आपले शंभर टक्के योगदान देतात, पण याच त्यांच्या कौटुंबिक जीवनात मात्र दुरावा येऊ शकतो.


कुंभ राशीचे लोक विचाराने स्वतंत्र आणि मुक्त स्वभावाचे असतात. त्यांना कोणी "हे असेच करायचे असते" असे सांगितले की, त्यांच्या आतूनच विरोधाची ठिणगी पेटते.
त्यांना नियम, परंपरा किंवा रूढ पद्धती आंधळेपणाने पाळायला आवडत नाही.
ते विचार करतात, “हे असंच का?” आणि “याहून चांगले काही करता येईल का?”

त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा क्रांतिकारी आणि नवविचारी ठरतात, पण काही वेळा हेच त्यांचे दुर्गुण ठरतात.
कारण विरोधाच्या भरात ते इतरांचा सल्ला न ऐकता स्वतःच्या मतावर ठाम राहतात. कधी कधी हा हट्टीपणा त्यांना एकटेही पाडतो, कारण प्रत्येकाला त्यांचा वेगळा विचार समजतोच असे नाही.

हे लोक विचारांत इतके बुडतात की कृतीला उशीरा करतात. त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे ते कधी-कधी व्यवहारापासून सावरत नाहीत.


कुंभ राशीच्या व्यक्तीचे कुंभ राशीच्या व्यक्तीशी चांगले जुळते. त्याचबरोबर त्यांचे मिथुन राशीच्या व्यक्तीशीही उत्तम जुळते. या दोन्ही वायू तत्वाच्या राशी असल्याने, ते एकमेकांना चांगले समजून घेतात. संवाद, विनोदबुद्धी आणि विचारांची देवाणघेवाण यात त्यांना आनंद मिळतो. दोघेही मुक्त विचारांचे असल्यामुळे नाते हलकंफुलके आणि रोमांचक राहते.


तूळ राशी बरोबर सुद्धा कुंभ राशीचे मैत्रीपूर्ण संबंध राहतात. तुळचा प्रेमळ, समतोल राखणारा स्वभाव कुंभवाल्यांना आवडतो. दोघेही तर्क आणि न्यायप्रियतेवर विश्वास ठेवतात. एकत्र आल्यावर हे जोडपे बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहते.

कुंभ राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक ताणाचा परिणाम, त्यांच्या आरोग्यावर लवकर दिसतो. सतत विचार करण्यात गुंतलेले असल्याने त्यांना नर्व्हल ताण, मायग्रेन आणि अनिद्रेचा त्रास जाणवू शकतो. मन शांत न राहिल्याने झोप न लागणे, तणाव वाढणे ही सामान्य समस्या असते. तसेच, ताण-तणावामुळे रक्तदाबाचे चढउतार दिसून येतात. या राशीचा संबंध पायांशी असल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, सूज किंवा वेनचा ताण हे विकार उद्भवू शकतात. काही कुंभ व्यक्तींना श्वसन किंवा ॲलर्जीक त्रास, जसे वारंवार सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी मन शांत ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे अतिशय गरजेचे ठरते.


शेवटी कुंभ राशीच्या लोकांसाठी माझा सल्ला आहे की,
तुमचे मन आकाशासारखे विशाल आणि विचार समुद्रासारखे खोल आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार कृतीत उतरवणे आवश्यक नसते. कधी कधी थोडं शांत बसणे, स्वतःला वेळ देणेही तेवढंच महत्त्वाचे असते. तुमचा innovative आणि स्वतंत्र स्वभाव ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे, पण त्याचसोबत भावनिक नात्यांनाही तितकंच स्थान द्या. आपल्या कल्पनांच्या जगात रममाण होताना वास्तवातल्या माणसांनाही विसरू नका.

कधी कधी तुमचा हट्टीपणा तुम्हालाच त्रास देतो, त्यामुळे इतरांच्या मतांना थोडे स्थान द्या, त्यांच्यांशी संवाद साधा. तुमचे विचारमंथन जग बदलू शकते.
, पण त्यासाठी तुम्ही स्वतः संतुलित आणि शांत राहणे गरजेचे आहे.


तर ही झाली कुंभ राशी विषयी थोडक्यात माहिती.


उद्याच्या भागात आपल्या राशीचक्रातली शेवटची रास.