Login

Astro With सर्वेश.... भाग:१३

मीन राशीची माहिती
नमस्कार मंडळी,
'Astro with सर्वेश' आजच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत.

मंडळी, आतापर्यंत आपण अकरा राशींचा आढावा घेतला. आजची आपली राशी आहे, राशीचक्रातली शेवटची रास, मीन.

सर्वप्रथम आपण मीन राशीचे चिन्ह पाहूया. चित्रात काय दिसते? दोन मासे, पण हे दोन्ही मासे एकाच प्रवाहात राहूनही दोन वेगळ्या दिशेने पोहत आहेत. अर्थातच, मीन राशीच्या व्यक्तींना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांचे विचार दोन दिशांनी धावत असतात. एक भाग त्यांना वास्तवाकडे ओढतो, तर दुसरा भाग स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातो.


मीन राशीचे तत्व आहे जल. म्हणूनच या राशीचे लोक सहज भावनेत वाहतात, कल्पनेत रमतात आणि इतरांचे दु:ख मनापासून समजून घेतात. जसे पाणी कोणत्याही आकारात बसते, तसे हे लोक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात. त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव असते. कुणी दुःखी असेल तर हे लोक स्वतःच व्यथित होतात, आणि कुणी आनंदी असेल तर त्यांच्या आनंदात मिसळतात.

या राशीचा स्वामी आहे गुरु.
गुरु हा ज्ञान, दयाळूपणा, विशालता आणि आध्यात्मिकतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांमध्ये करुणा, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टीकोन नैसर्गिकरीत्या दिसून येतो. हे लोक दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तयार असतात, कारण त्यांच्या मनात "सर्व जीवांत देव आहे" अशी भावना असते.


सहानुभूती आणि दयाळूपणा, हा मीन राशीच्या लोकांचा हा सर्वात सुंदर गुण आहे. हे लोक इतरांच्या वेदना सहज समजून घेतात आणि कोणाचेही दुःख पाहिले की लगेच मदतीला धावून जातात.

उदाहरणार्थ, समजा जर वर्गात एका विद्यार्थ्याने पेन्सिल आणली नाही किंवा तो आणायला विसरला. तर बाकी मुले त्या मुलाची मजा पाहणार, पण मीन राशीचे लोक, लगेच स्वतःची पेन्सल दोन तुकड्यांत तोडून त्याला अर्धी देणार.


कलात्मकता आणि स्वप्नाळूपणा या दोन गोष्टी पण मीन राशीच्या लोकांत आढळतात. त्यांची कल्पनाशक्ती खूप समृद्ध असते आणि त्यांना वास्तवापेक्षा स्वप्नांच्या जगात रमायला आवडतात. संगीत, चित्रकला, लेखन, अभिनय, नृत्य किंवा फोटोग्राफी अशा कलात्मक क्षेत्रांत ते सहज आपली छाप सोडतात.

मीन राशीच्या लोकांच्या स्वभावातील एक अत्यंत सुंदर गुण म्हणजे या लोकांचा आत्मा नेहमी काहीतरी उच्च, दिव्य आणि शाश्वत शोधत असतो. ते केवळ धार्मिक नसतात, तर आध्यात्मिक पण असतात, म्हणजे जीवनाचे खरे सार, आत्मशांती आणि देवत्व या गोष्टींमध्ये त्यांना रस असतो.

लोक खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक परिस्थितीनुसार स्वतःला सहज जुळवून घेतात. त्यांना वाद-विवाद आवडत नाहीत; उलट ते शांती राखण्याचा आणि समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणीही त्यांच्याशी कठोरपणे बोलले तरी, हे लोक राग न धरता त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात.


मीन राशीचा मुख्य दुर्गुण म्हणजे इतरांच्या वागण्यामुळे सहज दुखावून जातात, मनावर खूप ओझे घेतात.
हे लोक अतिशय कोमल असतात. कोणी त्यांना कठोर शब्दात बोलले किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागले नाहीत, तर ते लगेच मनाला लावून घेतात. हे लोक वरून शांत दिसतात, पण आतून त्या गोष्टींचा त्यांच्यावर खोल परिणाम होत असतो. ते राग व्यक्त करत नाहीत, पण सर्व काही मनात साठवून राहतात.

मीन राशीचे लोक मानसिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात. जेव्हा जीवनात अडचणी येतात किंवा तणाव वाढतो, तेव्हा ते थेट संघर्ष करण्याऐवजी आपल्या स्वप्नाळू आणि कल्पनाशील जगात रमतात. एका प्रकारे ते स्वतःलाच आधार देतात.

मीन राशीचे लोक स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवतात, पण त्याच वेळी ते दुसऱ्यांच्या भावनांनाही खूप महत्त्व देतात. त्यामुळे जेव्हा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते सर्व दृष्टीकोन समजून घेण्यात, तसेच ठाम निर्णय घेण्यात वेळ घालवतात.


वर सांगितल्याप्रमाणे मीन राशीचे लोक स्वभावाने स्वप्नाळू आणि कल्पनाशील असतात. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनातील व्यवहारिक पैलूंवर त्यांचे लक्ष कमी असते. आर्थिक निर्णय किंवा वैयक्तिक सुरक्षिततेसंबंधी ठोस पावले उचलण्यात त्यांना कधीकधी उशीर होतो.

या राशीचे लोक मनाने अतिशय संवेदनशील असतात. इतरांच्या दुःखात किंवा स्वतःच्या अपयशात ते खूप बुडतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि डिप्रेशन, उदासीनता किंवा मानसिक ताण येण्याची शक्यता वाढते.

उदाहरण द्यायचे असल्यास, मीन राशीची व्यक्ती परीक्षेत वगैरे नापास झाली किंवा त्यात अपेक्षेप्रमाणे चांगला निकाल आला नाही. तर ते खूप निराश होतात आणि संपूर्ण दिवस आपल्या खोलीत बसून फक्त मनातल्या विचारांत रमतात. मित्रांनी संपर्क साधला तरी त्यांच्याशी बोलायला त्यांना अवघड होते.


मीन राशीतील लोकांना पचन संबंधी तक्रारी, जसे अपचन, आम्लपित्त, गॅस, पेट्रोलिटी इत्यादी. समस्या होऊ शकता. यांना भावनिक ताणामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका उद्भवू शकतो. मीन राशीच्या सदस्यांना स्नायू-दुखी आणि थकवा, शारीरिक कमकुवतपणा आणि सतत थकवा जाणवतो.

कर्क राशीचे मीन राशीशी चांगले जुळते. दोन्ही राशी भावनाशील आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे एकमेकांच्या भावनांचा सहज अनुभव घेऊ शकतात आणि समजूतदारपणे वागतात. घरगुती जीवनात, प्रेम, निष्ठा आणि काळजी या पैलूंमध्ये त्यांची जोड अतिशय सुंदर राहते.


शेवटी एवढेच सांगणार की, मीन राशीचे लोक संवेदनशील, स्वप्नाळू आणि दयाळू असतात. त्यामुळे इतरांच्या भावना समजून घेण्यात ते उत्कृष्ट असतात, पण स्वतःच्या हिताचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनातील निर्णय घेताना व्यवहारिकतेला प्राधान्य द्या, आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेकडे लक्ष द्या.

भावनिकदृष्ट्या स्वतःवर ताण न आणता, सकारात्मक मार्ग शोधा, आव्हानांमध्ये थेट सामना करण्याची तयारी ठेवा.

तर ही झाली मीन राशीची थोडक्यात माहिती.

तुम्हाला हे सदर कसे वाटले ते जरूर कळवा.

याच सदरातला नवा भाग घेऊन लवकरच येणार तोपर्यंत प्रेम असू द्या.