Login

Astro With सर्वेश... भाग:९

वृश्चिक राशिची माहिती
नमस्कार मंडळी,

Astro with सर्वेश च्या आजच्या भागात सर्वांचे स्वागत.

आजची रास आहे वृश्चिक राशी.

वृश्चिक राशीचे चिन्ह आहे विंचू.

विंचूप्रमाणे वृश्चिक राशीचा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून मात्र खूप खोल विचार करणारा असतो, विंचू एक गूढ आणि गुप्तस्वभावी असतो. त्यांच मन कोणी सहज ओळखू शकत नाही. हाच स्वभाव वृश्चिक राशीच्या व्यक्तिंचा असतो. विंचूचा दंश प्राणघातक असतो, त्याचप्रमाणे वृश्चिक राशीचे लोक प्रेम, द्वेष, निष्ठा, राग अशा प्रत्येक भावनेत टोकाची भुमिका घेतात. विंचू जसा शिकार ओळखून हल्ला करतो, तशीच वृश्चिक राशीची व्यक्ती लोकांच्या भावना, खोटेपणा आणि सत्य ओळखण्यात पटाईत असते आणि शेवटी वृश्चिक हे सूडाचे आणि आत्मरक्षणाचे प्रतीक आहे. या राशीचे लोक अन्याय सहन करत नाहीत आणि त्यांना दुखावणाऱ्यांना ते कधीच विसरत नाहीत.

तर आजचा भाग सुरू करण्याआधी एक लघुकथा वाचूया.

अजय ऑफिस मधून घरी येत होता. ऑफिसच्या लिफ्टमध्ये एका बाईचा केस त्याच्या बॅगच्या झिपमध्ये अकडला आणि तुटून तिथेच उरला.

घरी आल्यावर त्याने नेहमीप्रमाणे आपले बॅग बेडरुममधल्या टेबलवर ठेवले. त्याची बायको योगिता वृश्चिक राशीची. तिच्या नजरेस तो केस पडला. तिने तो केस हातात घेतला आणि त्याची लांबी मोजली.
तो केस पाहून तिच्या मनात कितीतरी शंका येऊ लागल्या. जेव्हा अजय बाथरूममध्ये गेला, तेव्हा तिने बेडरूमचे दार बंद केले आणि त्याचे बॅग उघडून, त्यातली एक एक गोष्ट काढून बघितली.

तिने त्याच्या शर्टचा वास घेऊन बघितला. तिला त्याच्या शर्टला एका बाईच्या पर्म्युमसारखा वास आला.
"Yardley Perfume..."
तिने लगेच अजयचा फोन हातात घेऊन. त्याच्या फोनचा पासवर्ड काढला, जो तिला आधीच माहीत होता. तिने त्याचे एक एक मेसेज वाचून बघितले.

"नक्कीच घरी येण्याआधी सगळे काही डिलीट मारले असेल." तिने मनातच म्हटले.

अजय बाथरूम मधून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने योगिताचा बदललेला स्वभाव लगेच ओळखला. त्याला पण तिच्या या स्वभावाची सवय झाली होती.

तो तसाच गप्प राहिला.

" अहो मला Yardley चा Perfume हवा होता आहे. जरा द्याल का?"
" Yardley Perfume. मी कुठे परफ्युम वापरतो?"
" काहीतरीच नक्कीच लपवत असाल."
" तू मला कधी परफ्युम वापरताना पाहिले आहेस का?"
"तसे असेल तर आज तुमच्या शर्टला परफ्युमचा वास कसा येतो? कोण आहे ती? मला सांगा मी तुम्हाला काय कमी करत आहे? जे तुम्ही असे बाहेर शेण खात आहात."

तर चिन्ह आणि लघुकथा वाचून तुम्हाला वृश्चिक राशीचा जरासा स्वभाव जरासा समजलाच असेल.


मंडळी, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती निडर, नेतृत्वगुणाने भरलेल्या, उत्साही आणि जराश्या तापट बनतात.


वृश्चिक राशीचा माणूस एकदा कोणावर प्रेम करायला, मैत्री करायला किंवा विश्वास ठेवायला लागला की तो शेवटपर्यंत निष्ठावंत राहतो. त्याच्यासाठी विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते.

जेव्हा वृश्चिकची व्यक्ती एखादे लक्ष्य ठरवते, तेव्हा ते पूर्ण होईपर्यंत ती हार मानत नाही. अडचणी, विरोध, संकट, काहीही असो, ते आपले काम पूर्ण करतातच.


वृश्चिक राशीचे लोक जे काही करतात ते मनापासून, उत्कटतेने करतात. त्यांची ऊर्जा इतरांनाही प्रेरित करते.


ते बाहेरून शांत आणि कमी बोलके असले तरी त्यांचा मेंदू नेहमी विश्लेषण, निरीक्षण आणि विचार करत असतो. त्यांची अंतर्दृष्टी (insight) अतिशय तीक्ष्ण असते.

वृश्चिक राशीचा माणूस तुमचे गुपित सांगितल्यावर ते आयुष्यभर कुणालाही सांगत नाही. ते स्वतःचे आणि इतरांचे दोघांचे गुप्त जीवन जपतात.


त्यांना स्वतःच्या क्षमतेवर जबरदस्त विश्वास असतो.
ते इतरांच्या मतांनी सहज डळमळत नाहीत. वृश्चिक राशीचे लोक कितीही मोठे संकट आले तरी त्यातून फिनिक्ससारखे परत उठतात.


ते दिखावा करत नाहीत. जिथे चुकीचे आहे, तिथे ते ते उघड बोलतात. त्यांचा स्वभाव थेट आणि खराखुरा असतो. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये स्वतःला आणि इतरांना बदलण्याची, सुधारण्याची ताकद असते. अती शहाणपणा करणाऱ्यांना त्यांची जागा हे लोक दाखवून देतात.

चुकीची वागणारी व्यक्ती यांना आपल्यापासून जरा लांबच ठेवते

हे लोक चांगले शिकून दुसऱ्यांना शिकवतात, म्हणजे हे एक चांगले शिक्षक तसेच चांगले टीकाकार बनतात.

अतिशय गोड बोलणे यांच्यापेक्षा कुठल्याच राशीला जमत नाही. त्यामुळे लोक यांच्यापासून जरा सांभाळून राहतात.


हे झाले वृश्चिक राशीचे काही चांगले गुण. यांच्यात काही दुर्गुण पण असतात.

वृश्चिक राशीचे लोक “माफ करा पण विसरू नका” या वृतीने जगतात. त्यांना जर कोणी फसवले, दुखावले किंवा यांचा अपमान केला, तर ते सूड घेईपर्यंत शांत बसत नाहीत.


हे लोक आपले मन फार क्वचित उघडतात. कधी कधी त्यांचा अति संशय नात्यांमध्ये गैरसमज आणि तणाव निर्माण करतो.


त्यांना सगळे आपल्या मर्जीप्रमाणे चालावे असे वाटते.
नात्यांमध्ये ते कधी कधी possessive आणि dominant होतात, ज्यामुळे जोडीदाराला घुसमट जाणवते.)

जेव्हा वृश्चिक व्यक्ती रागावते, तेव्हा तिचे बोलणे अतिशय टोचणारे असते. ते सत्य बोलतात, पण ते कधी कधी चाकूप्रमाणे धारदार वाटते.


कधी कधी ते इतके अंतर्मुख होतात की लोकांना त्यांच्या भावना समजत नाहीत. ते स्वतःच्या जगात हरवतात आणि इतरांपासून दुरावतात.


वृश्चिक राशीचा व्यक्ती अत्यंत प्रेमळ असतो, पण त्याचे प्रेम मालकीच्या भावनेत बदलले, तर तीव्र ईर्ष्या निर्माण होते. ही ईर्ष्या त्यांना आतून अस्वस्थ करते.


ते गोष्टी काळ्या किंवा पांढऱ्या रंगातच पाहतात, मधला रस्ता त्यांना मान्य नसतो. एकदा कोणाबद्दल मत बनवले, तर ते सहज बदलत नाहीत.


ते आपली कमजोरी कधीच दाखवत नाहीत.
यामुळे इतरांना ते थंड, दूरचे किंवा अहंकारी वाटू शकतात.


वृश्चिक राशीचे लोक बाहेरील जगाशी नव्हे, तर स्वतःच्या आतल्या विचारांशी लढतात. कधी कधी त्यांचा स्वतःचाच मनोविश्व त्यांना अस्वस्थ करते.


या राशीचे कर्क राशींच्या व्यक्तींसोबत चांगले जमते.
दोन्ही राशी जल तत्वाच्या (Water Element) आहेत.
दोघेही भावनिक, प्रेमळ आणि नात्यांमध्ये खोल बांधिलकी ठेवणारे असतात. कर्क राशी वृश्चिकच्या गूढतेला समजून घेते, तर वृश्चिक राशी कर्कच्या भावना जपते. हे जोडपे भावनिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि निष्ठावंत असते.


वृश्चिक राशीचे आणि मिथुन राशीचे जरा पटत नाही. मिथुन राशी बदलत्या स्वभावाची, हसरी आणि हलकीफुलकी असते. वृश्चिक राशी मात्र खोल, गंभीर आणि नात्यांमध्ये पूर्ण समर्पण मागणारी. दोघांमधलं तत्त्वभेद खूप मोठे आहेत. मिथुनला स्वातंत्र्य हवे असते, आणि वृश्चिकला बांधिलकी. हे नाते टिकणे खूपच कठीण असते.

वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य साधारणपणे चांगले असते, पण त्यांच्या तीव्र भावनांमुळे ते संवेदनशील राहतात. त्यांना मुख्यतः जिन्स, लघवी, प्रजनन प्रणाली आणि किडनी-संबंधित समस्या उद्भवू शकतात. ताण, राग किंवा भावनिक अस्थिरता त्यांच्या पचनक्रिया, झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे नियमित व्यायाम, योग, ध्यान, पाणी पिणे आणि हलके सुपाच्य अन्न खूप फायदेशीर ठरते. वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि मानसिक ताण कमी ठेवला तर ते सुदृढ, सक्रिय आणि ताजेतवाने राहतात.

वृश्चिक राशीने जर आपल्या संशयावर आणि रागावर ताबा मिळवला , तर या राशीचे लोक कुठेही यशस्वी होऊ शकतात.

तर हे झाले वृश्चिक राशीचे छोटेसे विश्लेषण.