Login

Astro With सर्वेश भाग:२

Astrological Article
नमस्कार मंडळी,
‘Astro with सर्वेश’च्या दुसऱ्या भागात सर्वांचे मनापासून स्वागत.

पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद लाभला, हे पाहून बरे वाटले.

कालच्या भागात आपण राशीचक्रातील बारा राशी आणि त्यांची चार तत्वे पाहिली. तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, ‘मेष’ या राशीबद्दल.

मेष राशीचे चिन्ह कधी बघितले आहे का?
‘मेंढा’, बरोबर?
पर्वताच्या टोकावर चढणारा, धाडसी आणि जिद्दी असा हा प्राणी. पडला, घसरला, तरीही तो थांबत नाही, कधीही मागे वळत नाही. काहीही झाले तरी स्वतःच्या मतावर ठाम राहतो. हेच आहे या राशीचे वैशिष्ट्य.

काल मी तुम्हाला सांगितलेच आहे, मेष ही अग्नितत्त्वाची राशी आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ आहे. (मंगळ म्हणजे अतिशय उर्जेने भरलेला, स्वभावाने थोडा उग्र, तापट, तडक-भडक, पण उत्साही असा ग्रह.) त्यामुळे ही राशी काय असू शकते याची जरा कल्पनाच करा. निडर, धाडसी, उत्साही, न्यायी, जिद्दी! OMG! या राशीतल्या स्त्रिया तर अगदी ‘सुपर-वुमन’ असतात. त्या दिसायला नाजूक वगैरे नसतात.


याबद्दल अधिक जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.


चेतना ही एक मेष राशीची मुलगी. चार बहिणींची ही थोरली बहीण. मेषची मुलगी म्हणजे अर्थातच एकदम साहसी आणि निडर.
घरात चार बहिणी आणि आई यांची जबाबदारी चेतनाने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
चेतना नोकरी करून घर सांभाळते. घरखर्च, बहिणींच्या शिक्षणाचा खर्च, आईच्या औषधांचा खर्च हे सगळे चेतनाच बघते. घरातली सगळी जी जी so called पुरुषी कामं आहेत ती चेतनाच करते. घरात तिच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही. काहीही करायचे असेल तर चेतनाची परवानगी घ्यावीच लागते. घरात सगळे तिला तसा मानही देतात.
राशीस्वामी मंगळ असल्याने चेतनाला हवा तसा मुलगा मिळायला वेळ लागला आणि आपल्यामुळे आपल्या लहान बहिणींचे लग्नाचे वय उलटून जात आहे, हे लक्षात घेऊन तिने आपल्या आधी तीन बहिणींची योग्य आणि उत्तम स्थळे बघून लग्ने लावून दिली.
पण तिची चौथी बहीण मात्र कोणाच्यातरी प्रेमात पडली आणि चेतनाला व घरच्यांना न सांगता, चेतना आपल्या प्रेमाला विरोध करणार असे समजून पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे चेतनाला खूप मोठा धक्का बसला. ती आजही त्या बहिणीचे तोंड सुद्धा पाहत नाही.
लहान बहिणीने येऊन चेतनाची जर माफी मागितली असती, तर कदाचित चेतनाने तिला मोठ्या मनाने माफही केले असते. (कारण मेषची माणसे मनापासून माफी मागितल्यास माफही करतात.)
पण चेतनाच्या भीतीने ती तसे करू शकली नाही.

तर या गोष्टीतून आपल्याला मेष राशीच्या व्यक्तीचा एकंदरीत स्वभाव कळतो.



अग्नितत्त्व आणि मंगळ स्वामी असलेल्या या राशीच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. पण कधी कधी यांना त्याचा अहंकार सुद्धा वाटू शकतो.

हे लोक पटकन रागावतात, पण अग्निवर पाणी टाकल्यानंतर जसा अग्नी शांत होतो, तसंच यांचंही होते.
जेवढा पटकन राग येतो, तेवढ्याच लवकर तो शांतही होतो.

हे लोक जलद निर्णय घेणारे असतात. आपल्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे पुढे काय होऊ शकते, याचा हे लोक विचार करत नाहीत. त्यामुळे कधी कधी विचार न करता घेतलेले निर्णय उलटे ठरतात.

मेष राशीची माणसे प्रामाणिक, स्पष्टवक्ती आणि मनमोकळी असतात. सांगायचे झाले तर अगदी crystal clear.
जे मनात येईल ते थेट बोलतात. म्हणून कधी कधी लोकांना यांचा राग येतो, पण अशा माणसापासून कोणालाच धोका नसतो, कारण जे मनात असते तेच बाहेर दाखवतात. लपून वार करणे यांना जमत नाही.
खोटेपणा करणारी माणसे यांना अजिबात आवडत नाहीत.


आता आणखी एक लहानसा किस्सा सांगतो.

घरातली सगळी मंडळी कुठेतरी कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होऊन बसलेली असतात.
नवरा, सासू, मुले नाश्ता वगैरे करून बाहेर तयार बसलेले असतात. मेष राशीची सून ‘लोचन’ सगळ्यात शेवटी तयार होऊन येते.

“काय गं सुनबाई, तयार व्हायला इतका वेळ? किती नट्टापट्टा करत बसतेस?”

यावर मेष राशीची सून हे ऐकून गप्प बसणार का?
पहिला प्रश्न कदाचित तिने ऐकून घेतला असता, पण ‘नट्टापट्टा’ असा टोमणा?
एक अग्निवाली स्त्री हे कसे सहन करणार?

“तुम्हाला काय सगळ्या गोष्टी आयत्या मिळतात! चहा-नाश्ता पोटभर केलात ना? तोच नाश्ता तुम्ही किंवा तुमच्या मुलाने बनवला असता, तर मी पण तुमच्याआधी तयार होऊन इथे बसले असते.”

यावरून एक गोष्ट लक्षात आलीच असेल, मेष वाली व्यक्ती सडेतोड बोलायला घाबरत नाहीत.


मेष राशीच्या लोकांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन top class असते.
प्रशासक, मॅनेजर, प्रोजेक्ट हेड, टीम लीडर, राजकारण अशा क्षेत्रांत इतरांना प्रेरित करण्याची त्यांच्यात ताकद असते. यांना नोकरीपेक्षा व्यवसाय करायला आवडतो.

त्यांच्यात धाडस आणि जोखीम घेण्याची वृत्ती असल्याने सैन्य, पोलीस, फायर फायटर, पायलट अशा क्षेत्रांतही हे लोक उत्तम कामगिरी करतात.

व्यवहाराची किंवा हिशोबाची कामे असल्यास ती मेष राशीच्या व्यक्तीकडे द्यावीत.
हे लोक कोणाचाही एक पैसा न खाता ती कामे अगदी प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित करून देणार.
यांचं बोलणे-चालणे-लिहिणे फार जलद असते.

काल पहिल्या भागानंतर मला आपल्या अश्विनी ओगले मॅडमचा कमेंट आला.
त्या म्हणाल्या, “मी मेष राशीची आहे.”

अश्विनी मॅडमचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर मेष राशीची व्यक्ती आपल्याला सहज दिसते.
मॅडम सध्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये एका संघाची कॅप्टन आहे. जरा विचार करा, एक मेष राशीची व्यक्ती तुमचे नेतृत्व करत आहे, तर ती टीम कुठे पोहोचू शकते.

त्यांचे नेतृत्वगुण स्पष्टपणे दिसतात. एका संघाला कसे पुढे न्यायचे हे त्यांना बरोबर माहीत आहे. त्यांचा उत्साह, जोश, जिद्द जबरदस्त आहे.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये संघातर्फे सर्वात उत्तम कामगिरी करणारी पहिली दोन नावे पाहिली, तर त्यात त्यांचे नाव दिसेल. अगदी ‘leading from the front’ म्हणतात ना तसे.

चला पुन्हा आपल्या राशीकडे वळूया.

आतापर्यंत आपण पाहिल्या मेष राशीच्या चांगल्या बाजू.
पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसेच मेष राशीच्या लोकांमध्ये थोडेफार दुर्गुणही असतात.

मेष राशीचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे उतावळेपणा.
यांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात.
‘धीर’ हा शब्द त्यांना आवडतच नाही. त्यांना सगळे ‘आत्ताच’ हवे असते. म्हणून दीर्घकालीन गोष्टीत संयम राखणे यांच्यासाठी कठीण जाते.

उदाहरणार्थ: एखाद्या स्त्रीने आपला ड्रेस शिवायला दिला आहे. टेलरने तिला तारीखही दिलेली असते, तरीही ती त्याला दहा वेळा तरी फोन करून विचारेल, “माझा ड्रेस रेडी झाला का?”

हे लोक खूप जलद निर्णय घेतात, यामुळे काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. यांच्या रोखठोक बोलण्यामुळे कधी कधी भांडणंही होतात.

मेषवाल्यांची रागीट आणि आक्रमक वृत्ती कधी कधी नुकसानाचं कारण बनते. अग्नितत्त्वामुळे त्यांना राग पटकन येतो. कोणी यांचा विरोध केला की हे लोक लगेच तावात येतात. राग ओसरल्यानंतर मात्र त्यांना त्याचा पश्चात्ताप होतो, पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

स्वतःचा अभिमान चांगला असतो, पण तो कधी कधी अहंकारात बदलतो. यामुळे नाती बिघडू शकतात.

स्वामी मंगळ असल्यामुळे हे लोक अधिकार गाजवणारे असतात. कोणतेही कार्य धडाडीने पूर्ण करणे यांना शक्य असते, पण मंगळ बिघडल्यास हेच लोक गर्विष्ठ, अतिउत्साही, भांडखोर बनतात.


तर मेष राशीच्या व्यक्तींचे कोणासोबत चांगले जमते?
अग्नितत्त्व असल्याने यांचे सर्वात जास्त जमते ते वायुतत्त्व असलेल्या राशींबरोबर. कारण अग्नी आणि वायू हे मुळातच घनिष्ठ मित्र. अग्नीला जर वायू मिळाला, तर तो अधिक फैलावत जातो आणि जलतत्त्वाशी यांचे सर्वात कमी जमते.

मेष राशीच्या लोकांनी मेष, सिंह, मिथुन, कुंभ, धनु या राशींच्या लोकांसोबत लग्न केले तर जीवन सुंदर होते.
पण मेष राशीच्या व्यक्तीने शक्यतो कर्क, वृषभ, मकर राशींच्या व्यक्तीशी लग्न करू नये.


या राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, मेष राशीच्या माणसांमध्ये संघर्ष करण्याची प्रवृत्ती असल्याने स्वभावात शांतता नसते, म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती असते. यामुळे यांना प्रामुख्याने दगदगीने होणारे विकार संभवतात. अग्नितत्त्व व राशीस्वामी मंगळ असल्याने प्रामुख्याने पित्ताचे आजार होतात.

या राशीचा अंमल डोक्यावर असतो, त्यामुळे डोक्यावर किंवा चेहऱ्यावर जखमेची खूण असते. डोके दुखणे, डोळे जळजळणे, सनस्ट्रोक, भाजणे, कापणे, अतिरक्तस्त्राव होणे हे त्रास संभवतात. यांना निद्रानाशाचाही त्रास होऊ शकतो. मेष राशीच्या व्यक्तींनी शक्यतो रात्रपाळीचे काम करू नये. स्वभावात साहस असल्याने, गाडी-वाहन वेगात चालवण्याकडे यांचा कल असतो. वाहने सावकाश चालवावीत.


तर मंडळी, ही झाली मेष राशीची basic माहिती.
मेष राशी संबंधित तुमचे काही प्रश्न असल्यास मला नक्की विचारा. मी माझ्या परीने त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.

पुन्हा भेटू astro with सर्वेशच्या पुढच्या भागात, पुढच्या राशीसह, तोपर्यंत प्रेम असू द्या.


पुढची राशी: वृषभ

0

🎭 Series Post

View all