आता मी तुमची सून नाहीये

Sun Nahi
आता मी तुमची सून नाहीये

सुलभा काकू आणि मनीष रामकृपा बंगल्यासमोर येऊन थांबले होते..

काकू मनिषला सांगत होत्या,"तू जरा कोणाला तरी विचार पुन्हा ,रेवा सावंत इथेच ह्या बंगल्यात रहाते का ?"

मनीष लगेच काकुकडे बघतो,आणि त्यांच्या पुढे हात जोडतो..."काकू आता हा चौथा बंगला आहे हो, अजून किती फिरायचे मी तुमच्यासोबत...नेमके माहीत नसेल तर मी तुम्हाला परत त्यात आश्रमात नेऊन सोडतो.."

काकू ,"नाही रे मला तिकडे नको घेऊन जाऊ, मला माहित आहे जरा आठवायला त्रास होत आहे,पण माझ्या सुनेचे हेच घर आहे.."

मनीष डोक्याला हात लावून घेतो आणि म्हणतो ,"असे जवळपास चार घर तुमच्या सुनेचे आहेत म्हणून आपण चौकशी केली पण एकही घर सापडले नाही.."

काकू रडू लागते आणि त्याला म्हणते, "आता म्हतारपण आलंय रे म्हणून नाही तितकेसे आठवणीत रहात, आणि तसे ही तिला पहायला आले होते तेव्हा मी तिच्या घरी आले होते..पण हीच कॉलनी आहे ती..स्टेशन पासून जवळ आहे हे नक्की.."

तितक्यात गेट मधून रेवा बाहेर पडताना दिसते आणि तिच्या शोधत आलेल्या काकुला ती दिसताच आंनद होतो आणि ती लगेच तिच्याकडे पाहून खुश होते ,तिला हाक मारते.."रेवा अग ए रेवा...मी आले बघ तुझ्याशोधात "

रेवा त्यांना बघताच जशी आहे ,जिथे आहे तिथे उभी राहते..आणि त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे करते..तिला त्यांचे इथे तिच्याकडे येणे याचे अप्रूप वाटते..

ती निघणार इतक्यात काकू पुढे येऊन तिचा हात जोरात धरते.."अग ओळख विसरलीस का आता माझी, सासू ना मी तुझी..माझ्या लेकाची बायको ना तू..?"

रेवा त्यांचा जोरात पकडलेला हात झटका देऊन सोडवते..तिला आता त्यांचा तो स्पर्श ही नकोसा होतो..तो रुबाब ही बिना हक्काचा नको वाटतो..कसला आता ह्यांचा माझ्यावर अधिकार..आता ना कोणते ही नाते.. ना मी सून राहिले तरी इतका तोरा ,पुन्हा तीच आठवण झाली..एके काळी अश्याच तोऱ्यात हात पकडून मला ह्या बाईने माझ्या नवऱ्यापासून दूर केले होते, घरातून बाहेर काढले होते..पुन्हा तोंड दाखवायचे नाही हे निक्षून सांगितले होते...आता तुझा नवरा मेला आहे,मग आमच्या घरात तुझे काही अधिकार ना काही हक्क उरले नाहीत..असे भर रात्री हाकलून दिले तेव्हा तो प्रसंग काळजाला चिरून जातो..भीती वाटते ह्या बाईची..पुन्हा कधीच ह्यांच्या दारात जायचे नाही हे ठरले होते...पण आज ही पुन्हा तेच तोडलेले नाते जोडायला का आली असावी..?

रेवा, "तुम्ही कोण, आणि का आलात इथे.."

काकू, "तुझी सासू आहे ग मी ,एक थकलेली सासू जिला आता कोणी आधार राहिलेला नाही ,मग कोणी तरी मला वृद्धाश्रमात नेऊन टाकले...पण मग आठवले तू ही एकटीच राहतेस.. माझी हक्काची कोणी व्यक्ती आहे तर तूच आहेस..मग मी विनंती करून तुझ्या घरचा पत्ता शोधून तुझ्या आश्रयाला आले आहे...मला तुझ्याकडे रहायचे आहे...झाले गेले ते विसरून ,राजेशला आठवून तरी ,नाहीतर त्याने दिलेल्या प्रेमातून तरी हे नाते जप ग.."

रेवा, "मी तुमची सोय माझ्या घरात करू म्हणताय,आता तुम्हाला माझे तुमच्याशी काय नाते आहे हे आठवले..पण खूप उशीर झाला आहे सुलभा बाई..."

काकू, "मी कशी ही राहील तुझ्यासोबत पण मला दूर नको लोटू..पाया पडते...कोणी तरी सुलभाबाई आहे असे समज ,सासू नको तर नको..मुलाच्या प्रेमा खातर नको तर नको..पण तुझी आई असती तर काय केले असते त्या विचारातून तरी घे मला घरात ,मी परत नाही जाणार.."

रेवा, "आहो ,तुम्ही यांना जिथून घेऊन आलात तिथे घेऊन जा..मी यांची जबाबदारी नाही घेऊ शकत.."

मनीष रागावला, आणि रेवाला म्हणाला,"हे काय नाटक आहे तुमच्या दोघींचे..सून आहे तर तुमची जबाबदारी का नाकारत आहात तुम्ही..?"

रेवा,"ही बाई माझी कोणी नाही ,ना सासू ना कोणी ही की जिला मी सांभाळत बसू.."

रेवाचे ठाम मत ऐकून सासूबाई तिचे पाय धरू लागल्या आणि म्हणाल्या मी तुझ्या घरचे काम करेन हो पण नको इतकी निर्दयी होऊ..

रेवा शेवटी तयार झाली..पण ती तिच्या सासूला फार दिवस ठेवणार नव्हती.

सासूबाई काही दिवस रेवाच्या मनात।पुन्हा घर करून, तिच्या मनातील रुसवा राग दूर करू मग ती आपल्याला कायम ठेवून घेईलच ,ती चांगली आहे फार काळ नाही कडू वागणार..

रेवाने थोडी सूट दिली हे दिसताच सासू पुन्हा सासू सारखे वागू लागली..

एकदिवस रेवा झोपली असतांना सासुबाईने आधीसारखेच जोरजोरात रेडिओ चे गाणे लावले आणि तिची झोप मुद्दाम मोडली...तिला झोपेतून उठलेली पाहून तिला जोरात ओरडून स्वतः घाण केलेले घर साफ करायला लावले..तिला पुन्हा त्रास होईल अशी वागण्यास सुरुवात केली..

रेवाला हे लक्षात येताच त्यांना ,हात धरून बाहेर काढले आणि म्हणाली ,"आता तुम्ही माझ्या सासूबाई नाही आहात ,ना मी तुमची सून..ना मी ती रेवा आहे जी चांगले वागेन.. आणि तुम्ही वागवाल तशी वागणार...आता मला तुझ्या बद्दल जरा ही आदर नाही, ना तुझ्या वयाची मला कीव..माया मोहात मला पडण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो कुचकामी ठरणार इतक्या तुम्ही माझ्या नजरेतून उतरला आहात...म्हणून पुन्हा माझ्या आयुष्यात तर येऊन देणार नाहीच पण माझ्या दारात ही येऊ देणार नाही..मी वृद्धाश्रमात फोन केला आहे..ते लोक तुम्हाला परत घेऊन जातील...तुमच्या सारख्या लोकांना शेवटी असेच वाळीत टाकलेले बरे..कारण हीच तुमची फेड.."

सासुबाई पुन्हा पाया पडून माफी मागत होती,पण तोपर्यंत रेवाने दार बंद केले होते.

©®अनुराधा आंधळे पालवे