Login

अतर्क्य भाग ७

स्त्री जीवनात येणारे वळण तसेच उतार चढाव , तिचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न या कथामालिकेत केला गे

अतर्क्य ( भाग -७) 
---------_-------_-------_--------
   जानकी ची रात्र कूस बदलत कशी बशी टळते. एखाद मोठा स्फोट व्हावा अन माणसाने हादरावे तशी जानकीची परिस्थिती झाली होती . वर वर मौन असली तरी तिच्या आतील वादळं काही केल्या शांत होत नव्हती. मामा कडे गावातून दूर असल्याने तिला आणखी काही पाऊल उचलणे शक्य नव्हते . नियतीने ही संधी दिली होती की डाव मांडला होता या विचाराच्या भोवऱ्यात ती नुसती गिरक्या घेत होती. डोक्यात अगदीच मुंग्या आल्या सारख झाल जानकीला म्हणून ती शांत उशी वर डोके ठेवून निजू लागली. खिडकीत वाऱ्याच्या मंद वेगावर रुळणारा परदा त्या बाहेरील निरभ्र आकाश , थंड वातावरण याला निरखत ती डोळे मिटण्याचा अपयशी प्रयत्न करत होती. मध्यरात्र होत होती शहरातील वर्दळ बर्‍यापैकी शांत झाली होती. मात्र हिच्या मनातील वर्दळ तशीच कल्लोळ माजवत होती. डोळ्यांत साठलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आता काही झाल तरी स्वतः साठी उभ राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. हळू हळू करून रात्र सरत होती पण जानकी ला ती रात्र फार मोठी वाटत होती. रडून रडून आता तिचे डोळे सुद्धा थकले होते. रात्री २ वाजता तिला झोप लागते शेवटी. एखाद फूल कोमजलेल जणू तशी ती गळून पडली होती. निरव शांतता , थंड वारा यात ती गाढ झोपी गेली. 
  जानकीची परिस्थिती आपण समजू शकतोच तिला कस वाटत असेल. खरच समाज किती निष्ठूर आहे ना? एखाद्या स्त्री ला मुल न होणे केवढा मोठा गुन्हा आहे. हे विधान हा समाज आपल्याला दाखवून देतोच. कोणीही प्रथमदर्शी पुरुषाला कोणी दोषी ठरवणार नाहीच ; ठरवत ही नाहीत. पण दोष बाईचा असेल हे आपण तोंडाने सहज बोलून जातोच कि नाही . विचारा ना स्वतःलाच आपण नाही का लग्न झाल्यावर काही दिवसांत गोड बातमी नाही का ?अजून अस थेट मुलीला विचारतो. अस माझ्या एका मैत्रीणीच्या बाबतीत ही घडत आहे. नशीब दोष मुलात आहे म्हणून वाचली. 
असू देत आपण कथेकडे वळूयात .
   अशा किती जानकी आपल्या आजूबाजूलाच असतील ना ओ? पण मर्यादा तेव्हा ओलांडली जाते जेव्हा जानकी सोबत कावेरी ची देखील पिळवणूक होते. एकिला  मुल नाही म्हणून तर दूसरी ला मुल व्हावच म्हणून. 
  रात्र सरते मामा मामी सर्वजण जागतात. रोजची काम करायला मामी सुरु करतात आज सर्व लवकर आटोपून आलेल्या वादळाच्या सामोरे पुन्हा जायच असत. जानकी उशीरा झोपल्याने लवकर जाग येत नाही.
 " आई आज ताई उठली नाही ग ? म्हणजे झोपू देत तिला पण सहज विचारल काळजी वाटली म्हणून. रोज उठते नं ती " अमोल आईला .

आई( शारदा मामी):  " तस काही नाही. मीच म्हटल होत तिला नको उठू लवकर , त्यात काल दवाखान्यात बसून बसून दमली ती , थकवा अशक्तपणा अजून आहे ". 

अमोलः " ठिक आहे , लवकर नाश्ता दे निघतो मी". 

अमोल व मामा सकाळी तयार होऊन कॉलेज व मामा आपल्या कामाला जातात. त्यांच्या गेल्यानंतर मामी जानकी जवळ जातात. तिला उठवतात. तिला अंघोळ करून नाश्ता करायला सांगतात. 
   दोघी जणी १०:३० वाजता जवळच्याच एका हॉस्पिटल मधे जातात. डॉक्टरांची भेट घेतात व जानकी यात स्वतःची ओळख लपवते. डॉक्टरांना बहिणीची रिपोर्ट आहे म्हणून सांगते. डॉक्टर देखील सर्व रिपोर्ट ची पडताळणी करून विलासरावांत दोष असल्याचे सांगतात. जानकी अगदी सुन्न झाली होती  हे ऐकून. येथील डॉक्टर ने सुद्धा इलाज शक्य आहे म्हंटले. यावर जानकी एक स्मित हास्य देऊन पेशंट्सना विचारून त्यांना घेऊन येण्याच सांगते व मामी सोबत परत फिरते. 
   येथे गावी सर्व काही सुरळीत सुरु असताना कावेरी एका रात्री गाढ झोपेतून जागी होते . तिला खोलीतून कोणी तरी जाण्याचा भास होतो. काळोखात तिला काही कळेल इतक्यात ती व्यक्ती दिसेनाशी होते. कावेरी घाबरते कारण, लग्न झाल्या पासून आजवर कोणीच अनोळखी इतक्या रात्री आलेल वा गेलल तिने पाहिले नव्हते. बोलणार तरी कशी ती बिचारी मूकी ऐकणार कोण एक जानकी होती घरात तिला समजणारी पण ती देखील आता नाही. सकाळ होते कावेरी कशी बशी रात्र काढते. सकाळी विलासराव जेव्हा शेतातून परत येतात मग  ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. विलासराव " अये मुके , काय म्हणतीस कळत न्हाय मला ,जा इथन"  म्हणत तिला फटकारतो. जेव्हा कावेरी ला जरा धीर येतो मग तिला आठवत जानकीच्या खोलीत एक वही असते ज्यात कधी जानकी सोबत बोलण नाही झाल तर ती मोडक्या तोडक्या चित्रात किंवा लिखीत सांगायची. ही कल्पना जानकी ने तिला दिलेली असते. दुपारी कावेरी कोणी नसल्याची वेळ साधून जानकी च्या खोलीत जाऊन त्या वहीत लिहीत असते. एक १५-२० मिनीटां नंतर तिचा मोठा मुलगा कार्तिक "आई ... आई .... त्यो दूर्वेश त्याला कोणी तरी न्हेल धरून" असे म्हणत येतो . कावेरी धावत बाहेर येते तो इसम तोंडाला फडका बांधून समोर धारदार शस्त्र घेऊन वाड्यात उभा असतो ." हे बघ कावेरे , सांग विलासरावाला अट पूर्ण कर न्हायतर समद्या गावासमोर अब्रु काढीन". कावेरी हात जोडून रडून मुलाची सुटका करून घेते.

-------------
क्रमशः 

लेखिका : शगुफ्ता ईनामदार ( नुरी)

0

🎭 Series Post

View all