Login

अथांग.. भाग १

कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया.


(सदर कथा साधारण २०१३-२०१९ या कालावधी दरम्यान घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित एक काल्पनिक कथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन करण्यासाठी ही कथा लिहण्यात आली आहे. कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


अथांग.. भाग - १

“सानू, अगं आवरलं का नाही तुझं? किती उशीर अगं! कधी पासूनची नटतेस तरी अजून तुझा मेकअप काही संपत नाही. इतका वेळ घेतेस ना, समोरचा कंटाळून जाईल.”

केदारने हॉलमधूनच काहीशा चिडक्या स्वरात सान्वीला आवाज दिला.

“हो, हो. आले, आले. झालं थोडंसंच राहिलंय. किती घाई करतोस अरे!”

आतल्या बाजूने आवाज आला.

“अगं, लवकर जाऊ आणि थोडा वेळ थांबून लगेच परत येऊ. निघायलाच उशीर झाला तर परत घरी यायला उशीर होईल ना! उद्यापासून मला नवीन ऑफिस जॉईन करायचं आहे. लक्षात आहे नं तुझ्या?”

“हो, हो. माझ्या लक्षात आहे. आलेच मी.”

सान्वीने आतल्या खोलीतूनच उत्तर दिलं. इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला.

“बघ, कार आली वाटतं. मी बाहेर जाऊन बघतो. तू पटकन आवरून बाहेर ये.”

असं म्हणून केदार बंगल्याच्या बाहेर आला. समोर दारात पांढऱ्या रंगाची अलिशान लांबलचक लिमोझीन कार उभी होती. ड्राईव्हरने गाडीतून खाली उतरून त्याला अदबीने सलाम केला आणि म्हणाला,

“जनाब, मालिकने आपको अपने परिवारके साथ शाही दावतके लिए आमंत्रित किया है। ये आपका बहुत बडा सन्मान है।हमारे मालिक इतनी जल्दी ऐसेही किसीपे मेहरबान नही होते। आप बहोत खुशनसीब हो और हमारे मालिकके लिए खास भी। जल्दी किजीये जनाब।देर हुई तो वो नाराज होंगे।”

“हाँ जी, वो तैयार हो रही है। बस दो मिनिटमें आ जायेगी।”

केदारने उत्तर दिलं. तसा ड्राईव्हर गाडीकडे वळला आणि गाडीमधून एक प्लास्टिकची बॅग केदारच्या हातात देत म्हणाला,

“उनको ये हिजाब पेहननेके लिए कहिये। हमारी यहाँ की औरते बिना हिजाब घरसे बाहर नही निकलती।”

केदारने मान डोलावली आणि पटकन आत बंगल्यात सान्वीच्या खोलीत आला. बेडरूमचा दरवाजा पुढे ढकलून तो काही बोलणार इतक्यात आरश्यासमोर तयार होत असलेल्या सान्वीला पाहून तो जागीच थबकला. मरून रंगाची डिझाईनर साडी आणि त्यावर सुंदर नक्षीकाम केलेला डीप गळ्याचा व्हेलवेटचा ब्लाऊज, कमरेपर्यंत पाठीवर नागिणीसारखी डोलणारी काळ्याभोर केसांची सैलसर जाड वेणी आणि त्यावर डाव्या बाजूला माळलेली टपोऱ्या गुलाबांची दोन-तीन फुलं, कानात लोंबते हिऱ्यांचे इअरिंग्स, गळ्यात तसाच सुंदर नाजूक डायमंडचा नेकलेस, हातात निळ्या रंगाच्या बांगड्या, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, डोळ्यात काजळ आणि ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक पाहून केदार घायाळ झाला.

“ओह्ह माय गॉड! सो ब्युटीफुल!”

असं म्हणत त्याने सान्वीला जवळ ओढून कवेत घेतलं.

“अरे, सोड ना. काय हे! मेकअप खराब होईल नं माझा.”

असं म्हणत सान्वी त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली.

“जाऊ दे. झाला उशीर तर होऊ दे.”

त्याने मिठी अजून घट्ट केली.

“आपल्याला लवकर घरी परत यायचंय. लक्षात आहे ना उद्या ऑफिस आहे ते?”

ती हसून म्हणाली. केदारचा नाईलाज झाला. मिठी सैल करत तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला,

“ठीक आहे. आता आपल्याला बाहेर जायचंय म्हणून सोडतोय पण घरी आल्यावर बघतोच तुला. मग म्हणू नकोस किती त्रास देतास रे तू!”

तो तिच्याकडे पाहून हसला तशी सान्वी लाजून चूर झाली.

“चल, काहीतरीच तुझं. फारच चावट झाला आहेस तू!”

केदार काही बोलणार इतक्यात सान्वीच्या मोबाईलची रिंग वाजली.

“तू बाहेर जा बरं. मी दार लॉक करून आलेच.”

असं म्हणत तिने त्याला जवळपास खोलीच्या बाहेर ढकललंच.

“हे अंगावर घाल. इथला रिवाज आहे.”

केदार तिच्या हातात ती बॅग देत म्हणाला. केदारच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. तो बाहेर येऊन गाडीत बसला आणि सान्वीची वाट पाहू लागला.

“तेंव्हाही किती सुरेख दिसत होती ती!”

केदार स्वतःशीच पुटपुटला. काही दिवसांपूर्वी त्याचा आणि सान्वीचा संपन्न झालेला विवाहसोहळा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला. सुखाचे ते मोहक क्षण डोळ्यासमोर रुंजी घालू लागले.

केदार परांजपे एका मध्यमवर्गीय कुटुंबातला, आईवडिलांच्या छत्रछायेखाली चांगल्या संस्कारात वाढलेला एकुलता एक मुलगा. केदारचे बाबा बँकेत क्लार्क तर आई सरकारी शाळेत शिक्षिका होती. आईवडील दोघेही नोकरदार असल्यामुळे लहान वयातच स्वभावात आलेला समंजसपणा, जबाबदारीची जाणीव केदारच्या वागण्याबोलण्यात नेहमी दिसायची. एकुलता एक असल्याने आईवडिलांचा जीवाचा तो तुकडा होता. छान लाडाकोडात वाढलेला असूनही केदारने कधीच आईवडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला नव्हता की कधी त्यांना दुखावलेही नव्हते. केदार लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होता. त्यामुळे शाळा कॉलेजमध्येही तो सर्व शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आवडता विद्यार्थी होता. आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांना आपलंसं करणारा, अतिशय प्रेमळ, ‘मम्माज बॉय’ म्हणून शेजारीपाजारी ख्याती असलेला, सर्वांचा तो लाडका मुलगा होता.

पुढे जसजसे दिवस सरत होते; तसतसं शाळा कॉलेज मागे पडत गेलं. केदारने आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एम.बी.ए.(मार्केटिंग) केलं. शेवटच्या वर्षाला असताना कॉलेजच्या कॅम्पसमध्येच पदवी मिळण्याची हमी असणाऱ्या नवयुवा मुलामुलींसाठी नोकरीच्या अनेक सुवर्णसंधी घेऊन आलेल्या मोठ्या नामांकित आयटी कंपनीत त्याचं सिलेक्शनही झालं. केदारला चांगली नोकरी मिळाली. दोन तीन वर्षातच केदारने त्याच्या क्षेत्रात खूप छान प्रगती केली. त्याचं प्रमोशन झालं आणि त्याचबरोबर पगारवाढही. सगळं काही स्थिरस्थावर झालं होतं. आता केदारच्या आईबाबांना केदारच्या लग्नाचे वेध लागले होते. एक दिवस केदारच्या आईने त्या दोघांसमोरच केदारच्या लग्नाचा विषय काढला.

“अहो ऐकलं कां? मी काय म्हणते, आता आपल्या केदारचं शिक्षण पूर्ण झालं. इंजिनियरिंगची पदवी मिळण्याआधीच त्याच्या हातात छान नोकरी होती. आता त्याला नोकरी लागून जवळपास दोन तीन वर्षे झालीत. आता आपला केदार कमावता झालाय. स्वतःच्या पायावर उभा राहिला. आता तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळू शकतो. आता आपल्याला त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. काय म्हणता?”

केदारच्या वडिलांनी मान डोलावली.

“तू बरोबर बोलतेय. आपण आतापासूनच मुली बघायला लागूया. वर्षभरात चांगलं स्थळ आलं की, लग्न करून टाकू. काय मग केदारसाहेब, लग्नाचा बार उडवून टाकायचा का?”

ते मिश्किलपणे केदार आणि त्याच्या आईकडे पाहून म्हणाले.

“बाबा, मी लग्नाला तयार आहे. फक्त अट एकच. मुलगी आपल्या आईसारखी छान आणि सुगरण असावी.”

केदारही चेष्टेत आईकडे पाहून म्हणाला.

“मग केदार, कठीण आहे बाबा तुझं. कारण तुझ्या आईसारखी छान, सुगरण दुसरी कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या आईशिवाय दुसरं कोणाला छान सुगरण म्हणण्याची माझ्यात तरी हिंमत नाही बाबा!”

त्यांचं वाक्य ऐकताच एकदम हास्याचे कारंजे उडाले. दोघेही खो खो करून हसू लागले. केदारची आई त्यांच्याकडे लटक्या रागाने बघून गालातल्या गालात हसत होती. पुढे वधू संशोधन सुरू झालं. सान्वीचं चांगलं स्थळ सांगून आलं. बीएससी झालेली, देखणी, मनमिळाऊ, नाकीडोळी नीटस आणि अतिशय लाघवी मुलगी केदारसह सर्वांना आवडली होती. लग्नाची बोलणी सुरू झाली. दोन्ही घरच्यांना सोयरीक पसंत पडली. मग केदार आणि सान्वी यांनी एक दोनदा एकांतात भेटून एकमेकांची पसंती घरच्यांना सांगून टाकली. दोघांच्याही घरच्यांनी मुलांच्या निर्णयाचा मान ठेवून मोठ्या थाटामाटात त्या दोघांचं लग्न लावून दिलं. केळकरांची सान्वी आता परांजपेच्या घरचा उंबरठा ओलांडून सान्वी केदार परांजपे झाली.

पुढे काही दिवस लग्नानंतरचे सोपस्कार नीट पार पडले. देवदर्शन, सत्यनारायणाची पूजा, देवीचा जागरणगोंधळ साऱ्या विधी पार पडल्या. आता केदारला हनिमूनला जाण्याचे वेध लागले होते. केदारच्या आत्याने लग्नातलं गिफ्ट म्हणून त्यांच्या हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी विमानाची तिकिटं आणि तिथे गेल्यावर हॉटेलचं बुकिंग करून ठेवलं होतं. त्यामुळे आता नवीन जोडी हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी आतुर झाली होती. सान्वीने सासूबाईंच्या मदतीने केदारची आणि तिची बॅग भरली. पासपोर्ट, विमानाची तिकिटं, हॉटेल बुकिंगचे डिटेल्स सारं काही बॅगेत नीट ठेवलं आणि आपल्या आई बाबांचे आशीर्वाद घेऊन केदार आणि सान्वी घरातून बाहेर पडले. सोसायटीच्या आवारातूनच एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली आणि थोड्याच वेळात ते दोघे एअरपोर्टवर पोहचले. दोघांनी चेकइन काउंटरवरच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या आणि ते विमानाच्या दिशेने चालू लागले. विमानात सामानाची बॅग वर ठेवून ते आपापल्या जागी जाऊन बसले. एअर हॉस्टेस सुरक्षिततेसंबधी सूचना देत होती. थोड्याच वेळात विमानाने टेक ऑफ घेतला. सान्वीने केदारच्या खांद्यावर डोकं ठेवलं. केदारने प्रेमाने तिच्या कपाळावर अलगद आपले ओठ टेकवले. सान्वी अजूनच त्याला बिलगून बसली आणि तिने डोळे अलगद मिटून घेतले.

“आता या पुढचा सगळा वेळ फक्त आपल्या दोघांचा. तुझ्यामाझ्यातले मंतरलेले हळवे क्षण मला जगायचे आहेत रे! या रम्य आठवणी कायम जपून ठेवायच्या आहेत.”

सान्वी मनातल्या मनात पुटपुटली. मिलनाच्या कल्पनेनेच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि ती अजूनच शहारली. अधूनमधून एअर हॉस्टेस सर्वांची विचारणा करून जात होती. खाण्यापिण्याची व्यवस्था पाहत होती. इतक्यात सान्वीची नजर पलीकडे बसलेल्या व्यक्तीकडे गेली.

“केदार ते बघ काय?”

सान्वीने घाबरून केदारकडे पाहिलं.

पुढे काय होतं पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया.

🎭 Series Post

View all