Login

आठवणीतली सुगंधी कुपी

लेकीने दिलेली हळवी भेटवस्तू


आठवणीतली सुगंधी कुपी


'आज मीच माझ्या मनाची राणी ग' असं मनाशी बोलत राधा विचार करू लागली काय करावं बरं. आज तिला थोडी कणकण वाटत होती म्हणून तिने सीक लीव्ह टाकली होती. घरात इतर कोणीच नव्हतं. तसं बघायला गेलं तर तिला घरात पूर्ण स्वातंत्र्य होतं. असं नुसतं बसायची कधी तिला सवय नव्हती त्यामुळे वर्तमानपत्र बघून झालं, टीव्ही बघून झाला. आपसुकच तिचे पाय तिच्या कपाटाकडे वळले. तिचं कपाट म्हणजे एक नेत्रसुख होतं. ते नेहमीच व्यवस्थित लावलेलं असे. इतकं की तिच्या सासूबाई ती घरी नसताना कोणी स्त्री पाहुणी आली तर तिचं कपाट उघडून दाखवून तिचं कायम कौतुकच करत असत. तरीसुद्धा ती अधूनमधून त्यातले कपडे, वस्तू काढून पुन्हा पुन्हा न्याहाळत बसायची आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा जगायची हा तिचा छंद होता.

छोट्या छोट्या कितीतरी जुन्या वस्तू आणि जिर्ण कपडे आठवणींसाठी म्हणून तिने जपून ठेवले होते. शाळेत असताना तिचा निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक आला होता तेव्हा तिच्या बाबांनी तिला एक अत्यंत महागाचं पेन बक्षीस दिलं होतं. बाबा जाऊन सुद्धा आता दहा वर्ष झाली होती आणि ते पेनसुद्धा नीट चालत नव्हतं तरीसुद्धा तिने ते जपून ठेवलं होतं. तिने एक मोरपिशी रंगाची साडी काढली त्यावर हळुवार हात फिरवला. ती तिच्या आईने तिला लग्नानंतर दिलेली पहिलीच साडी होती. आता ती काही ठिकाणी विरली होती तरी तिचा स्पर्श तिला खूप सुखावून जात होता. ती आणि उमेश पहिल्यांदा भेटले तेव्हा उमेशने तिला आगळावेगळा बकुळीचा गजरा दिला होता. गजरा सुकला होता पण त्यातल्या प्रेमाच्या आठवणी आणि सुवास अजूनही ताजा होता. बहिणीने दिलेली पर्स, सासूबाईंनी दिलेला सिल्कचा बटवा अशा तिने बऱ्याच गोष्टी जपून ठेवल्या होत्या. एकेक काढून तिने त्या वस्तू न्याहाळल्या आणि पुन्हा नव्याने सर्व आठवणी ती जगली.

नंतर तिच्या हाताला लागला तो एक सुगंधी अत्तराची कुपी असलेला खोका. खोका पण खूप आकर्षक होता. त्यातील कुपीचा आकार तर अत्यंत नयनरम्य होता. ही आठवण म्हणजे तिच्यासाठी मर्मबंधातली ठेव होती. तिचे डोळे पाणावले. तिची लाडकी लेक तनया आठवीत होती तेव्हा तिच्या खाऊच्या पैशातून तिने राधाच्या वाढदिवसाला ही भेट दिली होती. राधा ऑफिसला निघायची तेव्हा खरं तर तनया झोपलेली असायची पण त्या दिवशी ती डोळे चोळत चोळत उठली आणि हात पाठीमागे ठेवूनच आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हळूच आईच्या हातात गिफ्ट दिलं. राधाला खूप गहीवरून आले. तिने ते उघडून बघितलं त्यात एक सुगंधी अत्तर होते. तिने तिला मिठी मारली. ती तनयाला म्हणाली,

"माझी तनु एवढी मोठी झाली मला कळलंच नाही. तुझ्या वाढदिवसाला आम्ही तुला गिफ्ट देता देता तूच आम्हाला गिफ्ट देऊ लागलीस."

'आई तुझी इतकी धावपळ होते तरीसुद्धा तू आमच्या सर्वांसाठीच किती करतेस."

"त्यात काय झालं. मला यात खूप आनंद मिळतो.चल आता ऑफिसला जाते आल्यावर आपण बाहेर जेवायला जाऊ."

तो पूर्ण दिवस राधा अगदी वाऱ्यावरच स्वार होती. वाऱ्याची झुळूक अंगावरून मोरपीस फिरवावी तसं तिला वाटत होतं. ती तनया पण आता नोकरीला लागली होती. पण त्यावेळी तिने दिलेली ही भेट तिच्यासाठी खूपच अनमोल होती. ती डोळे भरून ‌ ती कुपी न्याहाळत होती, तिच्यावरून हळुवार हात फिरवत होती इतक्यात दारावरची बेल वाजली. इतक्या दुपारी कोण आलं असेल असा विचार करत तिने दार उघडलं. पाहते तर दारात तनया उभी होती.

"अगं काय झालं तू लवकर का आलीस? बरं वाटतंय ना तुला."

"मला आजी म्हणाली तू आज घरी आहेस म्हणून मी पण हाफ डे टाकून घरी आले. तुझ्याबरोबर थोड्या गप्पा माराव्याश्या वाटल्या."

"ए बाई काय प्रेमात वगैरे पडली नाहीस ना!"

"चल गं तुझं आपलं काहीतरीच."

ती आत मध्ये आली आणि पाहते तर काय आईने सगळं कपाट उघडून ठेवलं होतं.

"अरे तुला बरं नाही घरी आराम करायचा सोडून हे काय करत बसली आहेस."

"अग माझा आवडता छंद आहे हा आणि माझ्या मनाला खूप उभारी मिळते. सगळ्या वस्तू पुन्हा पाहताना त्या आठवणीत मी हरवून जाते." इतक्यात तनयाने तिच्या हातातील तिने दिलेलं गिफ्ट पाहिलं.

"अगं हे मी तुझ्या वाढदिवसाला मी आठवीत होते तेव्हा दिलं होतं ना. तू अजून रिकामी खोका का जपून ठेवला आहे. कमालच आहे."

"अगं हे गीफ्ट तुझ्या खाऊच्या पैशातून तू मला दिलं होतं. ते माझ्यासाठी प्राणप्रिय आहे. खरं सांगू तू जेव्हा हे मला दिलंस ना तेव्हा मी विचार केला होता की हे वापरायचं नाही. असंच ठेवायचं. नंतर मी विचार केला की अत्तर खराब होऊन जाईल. म्हणून मी ते वापरलं. ते जेव्हा जेव्हा मी फवारलं तेव्हा तेव्हा तूच माझ्याकडे झेपावते असं मला वाटायचं."

"आई तू खरंच खूप भारी आहेस. तुझ्याकडून मला शिकायला मिळालं ते म्हणजे अशा प्रिय आठवणी खूप जपून ठेवायच्या. मी सुद्धा यापुढे असंच सगळं जपून ठेवेन बरं."

"अगं आठवणी या बकुळ फुलापरी जपून ठेवायच्या असतात. बकुळीची फुले कोमेजली तरी त्याचा सुगंध कायम दरवळत असतो तसंच या आठवणी सुद्धा दरवळत राहतात."