अट्टाहास कशासाठी ? भाग १

अट्टाहास कशासाठी ? भाग १
प्रसंग १

आज सकाळपासून वैदेहीची तब्येत जरा सुधारली होती.दोन दिवस झाले तापाने आजारी होती.हर्षदा ने काल तिला दवाखान्यात नेऊन आणलं होतं.हवामानातील बदलांच्या मुळे व्हायरल इन्फेकशन झालं होत.

तर हर्षदा ने सुट्टी घेतली होती.आज सकाळपासून तिच्या तब्येतीत थोडी सुधारणा होती तर तिला वाटतं होत आज पण आईनं सुट्टी घ्यावी.तिच्या सोबत राहावं म्हणूनच ती आपल्या आईच्या कुशीत डोकं घुसवून म्हणाली,

"आई,  तू आज ऑफीसला जाऊ नको ना? "

" आज पण सुट्टी घे ना ? " तिने लाडी गोडी लावली.

हर्षदाने आपल्या मुलीकडे असहाय्य नजरेने पाहिले. तिलाही मुलीला आजारी पाहून खूप वाईट वाटत होते. पण आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती. ती टाळणे शक्य नव्हते.

"बाळा, मला आज ऑफिसला जावचं लागणार आहे. तू घरी आराम कर. मी तुला औषध देऊन जाईन. दुपारी मावशीबाई येतील, त्या तुझ्या सोबत दिवसभर थांबतील."

वैदेहीची डोळे आणखीनच पाण्यानं भरून आले. तिने आईला घट्ट मिठी मारली.

"नाही आई, मला तुझी गरज आहे. तु माझ्या बाजूला बसून रहा."

वैदेही हर्षदा कडे हट्ट करत म्हणाली. हर्षदा म्हणाली,

"बेटा, थोडा वेळच मी ऑफिसला जाऊन येते. मी लवकरच परत येईन."

वैदेहीने डोकं खाली घातले. तिला माहीत होत आईने काल सुट्टी घेतली होती. पण तरीही तिला किती तरी फोन येत होते कामा संबंधातील. आज तिच्या मनात असताना देखील तिला थांबणं शक्य नव्हत. ती आईला समजुन घेत म्हणली.

" आई तुला खूप काम आहे ना ? चालेल जा तू ऑफीसला. मी थांबते मावशी कडे.पण लवकर घरी ये. मी तुझी वाट बघत आहे."

काही वेळाने मेड मावशी आली.हर्षदा ऑफिससाठी निघाली. वैदेही खिडकीतून आईला जाताना पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रूंचा ओलावा होता.

मावशीने वैदेहीला औषध दिले, खेळण्यांनी मन रमावण्याचा करण्याचा प्रयत्न केला. पण वैदेहीचे मन शांत नव्हते. तिला आईची खूप आठवण येत होती.

संध्याकाळी जेव्हा हर्षदा घरी आली तेव्हा वैदेही झोपली होती. हर्षदाने शांतपणे वैदेहीच्या कपाळावर हात फिरवला. तिला वाटले की तिने चुकीचा निर्णय घेतला आहे.

"माफ कर बाळा ," हर्षदाने मनात म्हणाले.

प्रसंग २

अनुराधा चार दिवसांच्या रुग्णालयाच्या प्रवासानंतर ती घरी आली होती. विवेक तिच्या शेजारी बसून होता.

"कसं वाटतंय तुला ? "

"बरं वाटतंय विवेक. पण मला नचिकेतची खूप आठवण येते."

"अरे, तो तुला फोन करेल. काळजी करू नकोस."

"नाही विवेक, मला वाटतं त्याने भारतात परत याव.आपल्या जवळ." अनुराधाने आपली इच्छा व्यक्त केली.

विवेक थोडा विचारात पडला. त्यालाही नचिकेतची खूप येत होती. पण अमेरिकेत त्याला चांगली नोकरी होती आणि त्याच्या कुटुंबालाही तिथे चांगलं वाटत होतं.

"अनुराधा, नचिकेतला तिथे चांगली नोकरी आहे. त्याला भारतात परत यायला सांगणं योग्य नाही." विवेक म्हणाला.

"मला त्याच्या पैशांची काही गरज नाही. मला फक्त तो आपल्या जवळ असावा अशी इच्छा आहे." अनुराधाने आग्रह धरला.

नचिकेतला फोन करण्याचा निर्णय घेतला. फोनवर बोलताना अनुराधाने आपली इच्छा व्यक्त केली.

"नचिकेत, मला तुझी खूप आठवण येते. तू भारतात परत येऊ शकतोस का?"

नचिकेतला आईच्या प्रेमाची जाणीव होती. तो म्हणाला मला इथे चांगली नोकरी आहे. मी तुम्हाला हवे पैसे पाठवू शकतो. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही अमेरिकेत राहायला या.

अनुराधा आणि विवेक दोघांनाही अमेरिकेत जायची इच्छा नव्हती. त्यांना आपल्या देशातच राहणं पसंत होतं.

त्यांना त्याच्याकडून पैसे घेण्यापेक्षा त्याच इथ असणं आवश्यक वाटतं होत.विवेक ने विचारलं तर अनुराधा ने नकार अर्थी मान हलवली.

" आता तो मोठा झाला आहे. त्याने पंख पसरले आहेत. जाऊ दे. उडू दे त्याला. मुक्त आकाशात." विवेक म्हणाला.

" अहो अस काय म्हणता.? त्याने भारतात परत नको यायला ? "

" नाही ग अस नाही. पण बघ ना आपण दोघ जेव्हा नोकरी करत होतो, तेव्हा त्या लहान मुलाला आपली गरज होती. आपल त्याच्या सोबत असण गरजेचं होतं. पण त्यावेळी आपण नोकरी पैसे यालाच प्राधान्य दिलं. नी आज त्याच्या जागी आपण आहोत. आपल्याला त्याच्या पैशाची गरज नाही. गरज आहे त्याच्या सोबतीची. " विवेक म्हणाला

नचिकेत खूप निराश झाला. त्याला वाटत होत भारतात परत जावं. पण त्याला ते शक्य नव्हत. त्याचं बस्तान बसलं होत. ते सगळं सोडून त्याला पुन्हा भारतात परत येऊन नव्याने सूरवात करणं शक्य नव्हत.त्यापेक्षा तो आई वडीलांना त्याच्याकडे अमेरीकेत राहायला आलेलं बरं होत.

पहिल्या प्रसंगात आई तिच्या करिअर साठी मुलीला घरी सोडून निघून गेली. पण तिने मुलीला सर्व सुख सोयी सुविधा पुरवल्या. तिच्या भौतिक गरजांची पूर्तता केली. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिला आर्थिक पाठबळ हवं होतं. ते पाठबळ तिला तिच्या नोकरी मुळे मिळत होत.

त्यामुळे वैदेही लवकरच समजूतदार झाली. आयुष्यात पैसे कमावणं हे सर्वात महत्वाच आहे.बाकीच सगळ काही गौण आहे.पैसा असेल तर जगातील सर्व काही खरेदी करता येत. तो सर्व श्रेष्ठ आहे.हा संस्कार तिच्या वर झाला.

तर दुसरीकडे अनुराधा आणि विवेक दोघही नोकरी करत. त्यामुळे साहजिकच नचिकेत हा पाळणाघरात राहत. मोठा झाल्यावर त्याचे क्लास शाळा इतर ॲक्टिव्हिटी मध्ये तो गुंतून गेला. त्यातून पुढे भरारी घेत अमेरीकेत स्थायिक झाला.

त्यावेळीं त्या कोवळ्या वयात मुलांच्या वर कळत न कळत हा संस्कर रुजला गेला. पैसा कमावणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या युगात सतत पुढं जात राहील पाहिजे. त्यावेळी स्पर्धा करत असताना कुटूंब, मुल, नातेवाईक , मित्र मैत्रिणी यांना साहजिकच दुय्यम स्थान दिलं गेल.