शीर्षक:- अत्तराची कुपी
भाग:-१
"अहो, मला ना बाबांच काही कळतच नाही. आज सकाळपासून ते एकदम शांत झाले आहेत. कोणाशी काही बोलणं नाही की खाणं-पिणंही व्यवस्थित नाही. आपल्याच तंद्रीत आहेत." रूचिका मनोहर यांचा उदास चेहरा आठवत स्वतेजला म्हणाली.
"मग तू विचारलं नाहीस का, काय झालं ते? तब्बेत तर ठीक आहे ना त्यांची?" तो शर्टाचे बटन्स काढून बाह्या दुमडत तिला म्हणाला.
तिने सांगितल्यावर त्यालाही त्यांची काळजी वाटू लागली.
"मी विचारले पण काही नाही म्हणाले. पण काही तरी शोधत असल्यासारखे वाटतं होते." ती पुन्हा त्यांची शोधक नजर आठवत म्हणाली.
"अच्छा, थांब. मी विचारून येतो." असे म्हणत तो त्यांच्या रूमकडे निघाला. त्याच्या पाठोपाठ तीही निघाली. तो ऑफिसमधून आज लवकर आला होता. आल्यावर लगेच तिने त्याच्या कानावर ही गोष्ट सांगितली. त्यांच्या रूमजवळ येईपर्यंत त्याच्या मनात अनेक विचार डोकावून गेले.
रूममध्ये आल्यावर त्याने दारावर टकटक केली. आतून काहीच आवाज आला नाही तेव्हा त्याने "बाबा" असा आवाज दिला. दोन वेळा आवाज दिल्यावरही प्रतिसाद आला नाही. दार उघडेच होते म्हणून ते दोघे त्यांना आवाज देत आत आले.
मनोहर हरवल्यासारखे आराम खुर्चीवर बसले होते. त्यांचा चेहरा उदास वाटत होता. स्वतेज त्यांच्याजवळ येत त्यांच्या कपाळावर हात लावून त्यांना ताप आहे का ते पाहिले. तसे त्यांनी त्याचा कपाळावरचा हात हातात घेत म्हणाले, "अरे मी ठीक आहे रे. काय नाही झाले मला."
"मग चेहरा असा का झालाय तुमचा? कधीपासून आवाज देतोय आम्ही पण तुमचे लक्षच नाही. काही त्रास होत असेल तर सांगा, आपण डाॅक्टरांकडे जाऊ." तो त्यांच्या समोर बेडवर बसत काळजीने म्हणाला.
"हो बाबा, सांगा ना. मी तर सकाळीही तुम्हाला विचारलं होतं तेव्हाही सांगितलेच नाही." रूचिका नाराज होतं त्याच्या बाजूला बसत म्हणाली.
"अरे, म्हणालो ना मी. काहीच नाही झालं. मी ठीक आहे. तुम्ही उगीच काळजी करता." ते दोघांना म्हणाले.
"ठीक आहात तर चेहरा असा का?" स्वतेज म्हणाला.
"अरे, सकाळपासून मी एक वस्तू शोधतोय ; पण ती मिळतच नाही." ते उदास होतं म्हणाले.
स्वतेज व रूचिका एकमेकांकडे पाहतात. ती नजरेने इशारा करत म्हणाली, 'बघा मी म्हणत होते ना'.
तो नजरेने तिला मी पाहतो असे म्हणत त्यांना विचारले, "कोणती वस्तू? "
"अत्तराची कुपी." ते सुस्कारा टाकत म्हणाले.
दोघांनी एकमेकांकडे चमकून पाहिलं. कारण ते एका अत्तराच्या कुपीसाठी एवढे बेचैन आहेत याचे त्यांना आश्चर्य वाटले.
"अहो बाबा, साध्याशा अत्तराची कुपी ना ती मग त्यासाठी इतका का त्रास करून घेता? असेल ना इथेच कुठेतरी. जरी नाही मिळाले तरी त्यात काय दुसरी आणू ना? " रूचिका थोडं हसत म्हणाली.
"हो ना, बाबा. रूची बरोबर म्हणतेय. कशाला त्या अत्तराच्या कुपीसाठी एवढे का अस्वस्थ होता? कशा प्रकारची होती ते सांगा? मी आणून देतो." स्वतेजही रूचिकाची री ओढत म्हणाला.
आता मात्र मनोहर यांना थोडा रागच आला. ते रागीट नजरेने स्वतेजकडे पाहत म्हणाले,"ती साधी कुपी नाही. माझ्या अनुची आठवण आहे. तिचं प्रेम, माया आहे त्यात. रूचिकाचं एक वेळ समजू शकतो रे. तिला त्याबद्दल माहिती नाही. पण तू असे बोलशील वाटलं नव्हतं."
"ओह, ती अत्तराची कुपी का? साॅरी बाबा, मला वाटलं की मागे एकदा मी आणून दिली होती ना, ती वाटली मला. खरंच ओ, ती आईने दिलेली कुपीचे माझ्या लक्षात आले नाही. साॅरी, बाबा." स्वतेज बारीक तोंड करून त्यांची माफी मागितली.
त्यांनी फक्त नकारार्थी मान डोलावली व शांत बसले. पण आता त्यांचे मन उदास झाले व भिंतीवर लावलेल्या त्यांच्या पत्नी अनुराधाच्या फोटोकडे त्यांची नजर गेली. त्यांचे डोळे पाणावले. त्यांचे पाणावलेले डोळे व अनुराधाचा फोटो पाहून स्वतेजलाही गलबलून आले.
त्याने डोळ्यांत आलेले पाणी अलगद पुसत त्यांच्या खांद्यावर हात ठेवत दाटत्या कंठाने म्हणाला,"बाबा, कुठे ठेवली होती ती कुपी, तुम्ही सांगाल का? मी आणि रूचिका दोघे मिळून शोधून काढू."
"मी खूप शोधले रे सगळीकडे ; पण नाही सापडली. इथेच उशीखाली ठेवली होती मी. सकाळपासून अनुची खूप आठवण येत होती म्हणून अंघोळ करून अत्तर लावण्यासाठी बघितले तर ते तिथे नव्हतेच." ते उदासीन स्वरात म्हणाले.
"काळजी करू नका, शोधू आपण." रूचिका म्हणाली.
रूचिकाला आता त्या कुपीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली ; पण त्याआधी ती शोधणे महत्त्वाचे होते. म्हणून नंतर विचारू असा विचार तिने मनात केला.
रूचिकाने एकदा दोनदा पाहिली होती ती कुपी. खूपच सुंदर नक्षीकाम असलेली ती चांदीची छोटीशी पण आकर्षक अशी ती कुपी होती. त्या अत्तराला मोगऱ्याचा सुगंध होता.
स्वतेज, रूचिका आणि मनोहर यांनी सर्व त्यांची रूम, घरातील कोपरा न कोपरा शोधला पण ती कुपी काही सापडली नाही. तिघेही नाराज होऊन बसले.
क्रमशः
सापडेल का ती कुपी?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा