शीर्षक:- अत्तर कुपी
भाग:- २ (अंतिम)
तेव्हाच त्यांची मुलगी रूही शाळेतून घरी आली. सगळे उदास बसलेले पाहून ती त्यांना म्हणाली, " अरे, काय झालं ? तुम्ही सगळे असे का बसले आहात?"
"अगं, आज्जूची एक आवडती वस्तू हरवली आहे. ती शोधूनही सापडली नाही." रूचिका तिला जवळ घेत म्हणाली.
"अच्छा. एक मिनिट हं. मी आलेच." असे म्हणत ती लगबगीने गेली आणि लगेच आली.
"आज्जू ती वस्तू हिच आहे ना." तिने तिच्या हातात असलेली वस्तू मनोहर यांच्या समोर धरत म्हणाली.
तिच्या हातात ती कुपी पाहून मनोहर यांची कळी खुलली.
ती अत्तराची कुपी त्यांची खूप आवडती होती. ती ते कधीच स्वतः पासून दूर ठेवत नव्हते. सतत जवळ बाळगायचे. झोपतानाही ती कुपी त्यांच्या उशाशी असायची. तीच वस्तू आज सकाळपासून त्यांना मिळत नव्हती. म्हणून त्यांचे कशात मन लागत नव्हते. आता मिळाल्यावर त्यांच्याबरोबर, रूचिका व स्वतेज यांनाही हायसे वाटले.
"अगं हो, हिच आहे ती. " तिच्या हातातून ती कुपी घेऊन ते प्रेमाने पाहत त्यावर ओठ टेकवत म्हणाले.
"रूही, हे तुझ्याकडे कसे काय?" ते नंतर प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले.
"सकाळी माझा थोडा होमवर्क राहिला होता. मला समजत नव्हते म्हणून मी तुमच्याकडे आले होते. तुम्ही मला समजावल्यानंतर अंघोळ करायला निघून गेलात. मग मी माझं दप्तर आवरत होते तेव्हा मम्माने हाक मारली म्हणून मी पटपट दप्तर भरत होते तेव्हा चुकून हे पण त्यात टाकले गेले. शाळेत गेल्यावर माझ्या दप्तरातून छान वास येऊ लागला तेव्हा मी पाहिले तेव्हा समजले की चुकून मी तुमची वस्तू घेऊन आले. साॅरी आज्जू, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." रूहीने स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.
"ठीक आहे बेटा, सापडले हे बरे झाले." ते तिच्या डोक्यावर थोपटत हसत म्हणाले.
"बाबा, या कुपीबद्दल सांगा ना मला ऐकायचं आहे. का तुम्ही इतके तिला जपता? " रूचिकाला आता राहावलं नाही तिने उत्सुकतेने विचारले.
"हा, आज्जू, सांगा ना." रूहीही कुतुहलाने त्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.
स्वतेजलाही त्याबद्दल जास्त माहिती नव्हतं म्हणून तोही ते काय सांगतात ते ऐकण्यासाठी आतुर झाला.
ते सांगताना मनोहर भूतकाळात हरवले.
मनोहर व अनुराधा यांचा सुखी संसार होता. ते साधे कारकून म्हणून नोकरी करत होते. आईवडील त्यांच्यासोबत राहत होते. परिस्थिती बेताची होती. तरीही अनुराधाने कधीच तक्रार केली नाही. त्यांचे आईवडील सतत आजारी असायचे. त्यांचा उपचार, घरखर्च यात त्यांची खूप तारांबळ होत असायची. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागायचे. त्यात अनुराधा आई होणार ही बातमी समजली तेव्हा आनंद व्यक्त करावं की खाणार आणखी एक तोंड वाढणार म्हणून चिंता व्यक्त करावी हे त्यांना समजेना. त्याचा विचार नंतर करता येईल. आईवडील होण्याचं आनंददायी स्वप्न पूर्ण होत आहे तर ते आनंदाने स्वीकार करू असा निर्णय दोघांनी घेतला. त्यात अनुराधा आर्थिक हातभार म्हणून लोणची, पापड याचा छोटेखानी उद्योग करीत होती. ज्यात तिला बऱ्यापैंकी यश मिळाले होते.
गोंडस स्वतेजचा जन्म झाल्यावर काही महिने तिने त्या उद्योगाला विराम दिला. त्यातच मनोहरच्या आईवडिलांची देवाज्ञा झाली. त्यातून सावरण्यात वेळ गेला. स्वतेज थोडा मोठा झाल्यावर तिने पुन्हा त्या उद्योगाला सुरूवात केली.
मनोहरचा दोन दिवसांनी वाढदिवस होता. खरं तर त्याला वाढदिवस साजरा करणं आवडत नव्हतं. पण या वेळी अनुराधाने त्याचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला. ते नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, स्वतःसाठी कधी विचार करत नाहीत. जसे असेल तसे राहतात. काटकसरीने वागतात. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा, आवडीला मुरड घालतात. हे तिला माहित होते. म्हणून यावेळी तिने त्यांच्या आवडीची पण कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहिल अशी भेटवस्तू त्यांना द्यायची असे तिने मनोमन ठरवले.
काय आवडते त्यांना हा विचार करत असताना तिला एकदम आठवलं तसे तिने नंतर ती वस्तू आणली.
वाढदिवशी तिने त्यांना कुमकुम तिलक लावून औक्षण करून शुभेच्छा देत आणलेली भेटवस्तू दिली. ती भेट पाहून त्यांचे डोळे आनंदाने विस्फारले.
"खूप छान आहे. थँक्यू. पण इतकी महाग भेट का आणलीस ?" ते ती वस्तू निरखून पाहत म्हणाले.
"तुम्हाला आवडली ना, मग का आणली सम्हणू नका? " ती नाराज होत म्हणाली.
"खूप आवडली गं, पण .." ते बोलता बोलता मध्येच थांबले.
"पण काय? " तिचा सूर आताही नाराजीचा होता.
"अनु, नाराज होऊ नकोस. खरं तर मला अत्तर खूप आवडतो, त्यात मोगरा तर खूपच आवडीचा. मला अशी कुपी हवीही होती. पण सगळं खर्च बघता इतकं महाग घेणं मला परवडणारं नव्हतं. तू आणि स्वतेज आहात ना माझ्या आयुष्यातील मोगऱ्याहूनही सुगंधी अत्तर. ज्याने माझं आयुष्य सुगंधी झालंय." ते तिला प्रेमाने जवळ घेत झोपलेल्या स्वतेजकडे पाहत स्मित करत म्हणाले.
"ते तर आहेच हो. तुम्ही आमच्या इच्छा पूर्ण करता,आवड जपता. मग मीही माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही का? स्वतेजसाठी लाॅकेट आणायला गेल्यावर पाहिलं होतं मी तुम्हाला या अत्तर कुपीकडे कुतूहलाने पाहताना, चौकशी करताना. तेव्हाच मी ठरवलं होतं ही भेट तुम्हाला द्यायची. तेव्हापासूनच थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवत होते. आज घेऊन आले." ती त्यांच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली.
"तुझं लक्ष होत का तेव्हा?" ते जीवणीत हसत तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाले.
"हो, मग. चला लावा आता अत्तर. थांबा मीच लावते." त्यांच्यापासून दूर होऊन ती कुपी हातात घेत त्यांच्या मानेजवळ, मनगटाला व शर्टाला लावत ती म्हणाली.
त्यांनी तो सुगंध श्वासात भरून घेतला. त्यांना खूप छान वाटलं.
"ही कुपी नेहमी जपून ठेवा, माझी आठवण, प्रेमाची भेट म्हणून. मी जेव्हा या जगात नसेल, तेव्हा हिच्या स्वरूपात मी कायम तुमच्याजवळ आहे असे तुम्हाला वाटेल." ती त्यांचा आनंदी चेहरा निरखत म्हणाली.
मनोहर भूतकाळातून बाहेर आले. त्या कुपीला हातात घट्ट धरत आनंदाने त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
रूचिका व स्वतेज यांना आता कळलं की का ते ती कुपी सापडत नव्हती तेव्हा ते इतके बेचैन, अस्वस्थ झाले होते. ती फक्त अत्तर कुपी नव्हती ती त्या दोघांच्या आठवणींची सुगंधी कुपी होती.
समाप्त-
एखादी वस्तू इतरांच्या नजरेत छोटी असते पण त्यात एखाद्याच्या कितीतरी आठवणी, भावना असतात हे नंतर कळते.
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा