Login

गणेशचतुर्थी पूजनातील एकवीस पत्री

This Blog Describs About The Leaves That Are Ro Be Used Durning The Festivel Of Ganesh Chaturthi.
गणपतीला दुर्वा आणि जास्वंद फुले अतिशय प्रिय आहेत हे सर्वांना माहिती आहे, परंतू गणेशाला केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशीच 'एकवीस पत्री' वाहिल्या जातात. या पाठिमागे आपले आयुर्वेद आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी हा अनमोल औषधी खजिना येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी केलेली ही महान तरतूद आहे.
या औषधी एकवीस पत्री कोणत्या ते पाहुया.

१) दुर्वा - दुर्वाला 'हरेळी' देखील म्हणतात. बागेत, शेतात सर्वत्र असतात. एकवीस दुर्वांची जुडी गणेशाला वाहिली जाते. दुर्वांचा रस ताप आणि उष्णतेच्या विकारांवर अत्यंत उपयुक्त असतो.

२) तुळस - प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असते. त्याचे कारण म्हणजे तुळस अनेक आजारांवर उपयुक्त असते. तुळशीच्या अनेक जाती आहेत पण 'राम तुळस' आणि 'कृष्ण तुळस' यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. ताप,सर्दी, खोकला, दमा विकारांवर तुळशीचा रस,काढा अत्यंत उपयोगी असतो.

३)विष्णुकांता( गोकर्ण)- विविध रंगांत उपलब्ध असते पण जांभळट, निळ्या रंगाची फुले औषधी आहेत. 'शंखपुष्पी' हे बुध्दीवर्धन करणारे औषध गोकर्ण फुलांपासून बनवले जाते. फुलांचा चहा देखील औषधी असतो.

४)पारिजातक - प्राजक्त, पारिजात, 'स्वर्गीय फुल', श्रीकृष्णाने रुक्मिणी साठी स्वर्गातून धरतीवर आणलेले फुलझाड. केसरी देठ असलेल्या पांढऱ्या फुलांना मंद सुगंध असतो. याची पाने फुले औषधी गुणांनी युक्त असतात. संधिवातावर याच्या पानांचा लेप प्रभावी ठरतो. पानांचा काढा ताप, सर्दी कणकण यावर औषधी असतो.

५) कण्हेर - कण्हेरीची फुले आणि मुळे औषधी असतात. वातविकरांवर उपयुक्त पण विषारी असल्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने वापर करावा.

६) मधुमालती - मधुमालतीची वेल बागेची शोभा वाढवते. याची गुलाबी- पांढरट फुले गुच्छांनी येतात. त्वचाविकार, सांधेदुखी, जगतावर या वनस्पतीचा उपयोग होतो.

७) मारवा - मंद मंद आल्हाददायक गंध असलेला मारवा जखमा आणि त्वचाविकारांवर उपयुक्त आहे.

८)धोतरा - ही वनस्पती रानात, ओसाड जागेवर कुठेही उगवते. काळा, आणि पांढरा धोतरा असे दोन प्रकार यात असतात. दमा, कफ, संधिवातावर तसेच वेदनाशामक म्हणून उपयुक्त. अत्यंत विषारी तज्ञांच्या मार्गदर्शना शिवाय वापर करु नये.

९)हादगा - हादगा, अगस्ती या फुलांची भाजी बनवतात, फुलांत व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असते.

१०) केवडा - नदीकाठावर, समुद्राच्या किनारी याचे बन असते. लांबलचक काटेरी पातींच्या मधोमध बदामी रंगाचे सुगंधित कणीस उगवते, ही वनस्पती थायरॉइड च्या आजारावर उपयुक्त आहे.

११)जाई - पांढऱी शुभ्र, सुगंधित फुले असलेल्या जाईचा वेल अंगणाची शोभा वाढवतो. उष्णता विकारांवर जाईची पाने उपयुक्त असतात.

१२) आघाडा - पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती माळरानावर, घराच्या आजूबाजूला पहायला मिळते. तोंड आणि दाताच्या विकारांवर उपयुक्त. याची पाने, मुळे बिया औषधी गुणांनी युक्त असतात.

१३) माका - पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती, छोटे पांढरे फुल असते. याच्या पानांपासून केशवर्धक तेल बवतात ते अत्यंत प्रभावी असते याशिवाय काविळ, मूत्रपिंडाच्या आजारावर औषध म्हणून वापर करतात.

१४) डोरली - डोरली म्हणजेच काटे रिंगणी,पानांवर काटे असतात. त्वचारोग तसेच दातांच्या किडीवर याच्या फळाचा धूर घेतला जातो.

१५) रुई - रुई पांढरी आणि जांभळी असते. पांढरी रुई म्हणजे 'मांदार' गणपतीला अत्यंत प्रिय आहे. पाने मधुमेह, सांधेदुखीवर उपयुक्त तसेच याच्या पानांचा चिक ही त्वचारोगावर प्रभावी असतो.

१६) डाळिंब - डाळिंब या फळाची साल,डाळींब दाणे अतिशय औषधी असतात.रक्तवाढीसाठी फळ खातात. तसेच सालीचा उपयोग खोकला, जंतावर करतात.

१७) पिंपळ - पिंपळ वृक्षा म्हणजे 'बोधिवृक्ष'. हवा शुध्द करणारा हा वृक्ष म्हणूनच पुर्वी गावाच्या मधोमध असायचा. रदयाच्या आकाराची पाने, हृदय विकारांवर पानांचा काढा अत्यंत उपयुक्त. फुटलेल्या टाचांवर पानांचा लेप लावतात. या पानांच्या पत्रावळीवर जेवण केले तर त्याचे औषधी गुण मिळतात.

१८) बोर - काटेरी झुडूप, झाड. याच्या बिया, पाने औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. डोळ्यांची जळजळ,ताप विकांरावर उपयुक्त. केशवर्धनासाठी केसांना पानांचा लेप लावतात.

१९) अर्जुन - या वृक्षाच्या सालीपासून अर्जुनारिष्ट हे सिरप बनवतात ते हृदय विकारांवर उपयुक्त असते. हाडांचे आणि अनेक विकारांवर औषधी आहे.

२०) शमी - बारीक बाभळी सारखी पाने असलेले हा काटेरी वृक्ष, त्वचारोग व मुत्रपिंडावर उपयोगी आहे.

२१) देवदार - हिमालय आणि पश्चिम घाटात आढळणारा हा वृक्ष. कफ, सर्दी, संधिवातावर उपयोग केला जातो.
औषधी गुणांनी परिपूर्ण असलेल्या या पत्री म्हणूनच गणेशाला प्रिय आहेत. या केवळ गणेश चतुर्थी दिवशीच (दुर्वा अपवाद) गणेशाला अर्पण केल्या जातात. जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्या अर्पण कराव्या.
वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
अतिशय व्यस्त असताना वेळ काढून लिहिलेला हा लेख, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव