अवहेलना (अंतिम भाग ३)
लेखन - अपर्णा परदेशी
लेखन - अपर्णा परदेशी
एके दिवशी नभय ती मोरपंखी साडी दुकानात घेऊन आला. त्याच्या मनातली गोष्ट त्याने दामोदरला बोलून दाखवली. एका टाकाऊ साडी पासून आकर्षक साडी बनवण्याच्या कल्पनेचे दामोदरला फार कौतुक वाटले.
तो त्याला हवी तशी मदत करायला तयार झाला. असेही दामोदरचे त्यात काहीच नुकसान नव्हते. उलट नभयमुळे जवळजवळ महिनाभर त्याला बराच फायदा झाला होता.
तो त्याला हवी तशी मदत करायला तयार झाला. असेही दामोदरचे त्यात काहीच नुकसान नव्हते. उलट नभयमुळे जवळजवळ महिनाभर त्याला बराच फायदा झाला होता.
दोघांनी मिळून आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्या साडीचे रूपांतर एका नव्या कोऱ्या पाटली पल्लू साडीत करायचे ठरवले. त्यात त्या दोघांचे बरेच कसब लागणार होते. दामोदरच्या सांगण्यावरून नभयने साडीचा जळालेला भाग अर्धा कापून तिथे दुसऱ्या विटकरी रंगाच्या साडीचा अर्धा भाग जोडला. आता दोन रंगाची एक साडी तयार झाली होती. इतर उरलेल्या कापडामधून काही फुलांचे आकार तयार करून त्या साडीच्या पदरावर चिपकवण्यात आले. पदराच्या शेवटी काही बोंडे पण जोडण्यात आली. साडीवर छोटे छोटे गोल गोल आरसे लावण्यात आले. काही ठिकाणी चमकदार खडे चिपकवण्यात आले. साडी आकर्षक दिसावी म्हणून बरीच कलाकुसर करून नभयने ती साडी दामोदरच्या मार्गदर्शनाखाली अगदी नव्या पद्धतीने तयार केली.
दामोदरचा कित्येक वर्षांचा अनुभव आणि नभयच्या मेहनतीचा परिणाम म्हणून ती साडी पूर्वीपेक्षा जास्तच उठावदार दिसत होती. इतकी अप्रतिम साडी तयार झाल्यावर नभय आनंदाने उड्या मारू लागला. दामोदरने देखील अत्यानंदाने त्याची पाठ थोपटली. नभयचे काम झाल्याने त्याने दामोदरचा निरोप घेतला.
नभयला आता दिवाळीचे वेध लागले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो त्याच्या आईला आपल्या हाताने अनोखी भेट देणार होता.
यथावकाश दिवाळी सुरू झाली. त्या एवढ्याशा घरात दोघेही मिळून आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करत होते. नभय वेगळ्याच उत्साहात होता. शारदाने काही पैसे साठवून नभयला शेरवानी घेतली होती. स्वतःसाठी मात्र ठेवणीतली एक बरी दिसणारी साडी तिने काढून ठेवली होती.
लक्ष्मीपूजन करण्याआधी तिने हट्टाने नभयला नवे कपडे घालायला लावले. आता ती वेळ आली होती. शारदा स्वतःसाठी जुनीच साडी काढत असताना नभयने लपवून ठेवलेली साडी तिच्या हातावर ठेवली. नभयच्या कृतीने तिचे मन खट्टू झाले. परंतु नभयच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्याची लकेर होती.
"नभय काय आहे हे?" शारदा थोडासा आवाज चढवत म्हणाली.
"आधी उघडून तर बघ आई." नभय आनंदाने चित्कारला.
"अरे नको ना." शारदा ठाम नकार देत होती.
नभयने स्वतःच पिशवीतून साडी बाहेर काढून घडी मोडली. आपल्या आईच्या अंगावर साडी पसरून तो बघू लागला. ती साडी आईवर उठून दिसत होती. साडीचे बदललेले रूप पाहून शारदा चक्रावली. क्षणभर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
"अरे, ही कोणती साडी? कुठून आणली? त्या साडी सारखीच दिसत आहे." तिने आश्चर्यचकित होऊन विचारले.
"अगं, आई ही तीच साडी आहे. बाकीचं सगळं तुला नंतर सांगतो. आधी ही साडी नेसून दाखव. आणि हो उद्या हीच साडी नेसून तुला कामावर जायचे आहे."
"नाही. आधी तू मला सगळं खरं खरं सांग त्याशिवाय मी ही साडी नेसणार नाही. " शारदाने हट्ट केला.
शारदा अडून बसल्यामुळे नभयने तिला सर्व वृत्तांत सांगितला. शिवाय उद्या रूपलकडे हीच साडी नेसून जायचे वचनही घेतले. त्याच्या मते रूपलला तिच्या वागण्याचा पश्चाताप व्हायला हवा होता.
"बाळा, मला तुझे खरंच फार कौतुक वाटत आहे. माझे संस्कार कुठेच कमी पडले नाहीत. मला दिलेल्या वागणुकीमुळे तुला वाईट वाटणे साहजिकच आहे. परंतु, त्या गोष्टीचा वचपा न काढता तू त्यांनी दिलेल्या टाकाऊ साडीतून वापरण्याजोगी साडी तयार केली. तुझ्या मनात त्यांना अद्दल घडवायचा विचार आला असेल. तरीही तू तुझी चांगली वर्तणूक सोडली नाही याचा मला जास्त अभिमान वाटतोय."
बोलता बोलता शारदा भावूक झाली. आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून नभयच्या देखील डोळ्यांना धारा लागल्या. दोघेही एकमेकांना सांत्वना देत होते. त्यानतंर शारदाने ती साडी नेसून पूजा केली. ते पाहून नभय अत्यानंदाने नभात उडत होता.
दुसऱ्या दिवशी जरा आढेवेढे घेतच नभयच्या आग्रहामुळे शारदा ती साडी नेसून त्या सोसायटीमधे जायला तयार झाली. त्या साडीत शारदा नजर लागावी इतकी सुंदर दिसत होती. शिवाय तिच्या मुलाचा कष्टाळू हात त्यावर फेरला गेला होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सुख समाधानाचे तेज पसरले होते.
शारदाला इतक्या आकर्षक साडी पाहून जो तो आश्चर्याने तोंडात बोटे घालत होता. काही लोक तर मागे वळून वळून तिला पहात होते. तर काहींनी तिला रस्त्यात गाठून तिच्या साडीची चौकशी केली. तिने मात्र कुणालाच खरे कारण सांगितले नाही. तिच्या मुलाने तिच्यासाठी साडी घेतली असे तिने सांगितले.
उडता उडता ही बातमी रूपलपर्यंत येऊन पोहोचली. आपण दिलेल्या साडी बद्दल शारदा सगळ्यांना खोटे सांगत आहे हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. शारदाला चार चौघात अपमानित करण्याच्या हेतूने रुपलने तिला दुसऱ्यांच्या घरी गाठले. ती साडी तिने दिली असल्याचे तिला सर्वांना सांगायचे होते, म्हणून ती तिच्यासोबत अजून दोन-चार बायकांना घेऊन गेली.
शारदाच्या अंगावरची साडी पाहून रुपलचे डोळे विस्फारले गेले. तिने दिलेल्या साडीचा सुरेख कायापालट झाला होता. त्यामुळे तिला जरा जास्तच राग आला. तिने लगेच शारदावर आगपाखड करायला सुरुवात केली. शारदा मुळातच संयमी असल्याने तिने सर्व शांततेत ऐकून घेतले.
"आता का ओठ शिवले तुझे? बोल ना, ही साडी मी तुला सप्रेम भेट दिलेली असताना तू लोकांना खोटं का सांगतेय?" रूपल चिडून जाब विचारू लागली.
सर्व प्रकरण ऐकल्यानंतर बाकीचे लोक रुपलच्या बाजूने बोलत होते तर काही लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. काही लोकांना मात्र शारदाबद्दल सहानुभूती वाटत होती.
शारदाच्या उत्तरासाठी जमलेले सर्वजण वाट बघत होते. त्यामुळे आता बोलणे भाग होते.
ती सौम्य आवाजात म्हणाली," तुम्ही मला जळालेली साडी दिली हे जर मी कुणाला सांगितले असते तर सर्वांसमक्ष तुम्हाला मान खाली घालावी लागली असती. म्हणून मी तुमचे नाव कुणाला सांगितले नाही. पण तरीही तुमची हीच इच्छा असेल तर सांगते. ह्या साडीचे बदललेले रूप माझ्या मुलाची मेहनत आहे."
असे बोलून तिने सर्वकाही सांगायला सुरुवात केली.
संपूर्ण कथन ऐकल्यानंतर रूपलला लाजिरवाणे वाटू लागले. मगाशी शारदाला अपमानित होताना बघणारे लोक आता रुपलला तिच्या कृत्याचे स्पष्टीकरण मागत होते. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले. अजून जास्त अपमान होऊ नये म्हणून तिने शारदाची माफी मागितली.
रूपलला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता.
समाप्त.
©® अपर्णा परदेशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा