Login

अवनी एक प्रवास भाग १३

त्यातल्या दोघा तिघांनी राकेशच्या खांद्यावर हात टाकून त्याचा खांदा जरा जोरात दाबला. रावी तर मस्त मज्जा बघत उभी होती. तिच्यासमोर तिच्या दीला कोणी काहीही बोलेल आणि ती ऐकून घेईल अस कधीच झाल नव्हत. भले नंतर परी तिला कितीही भांडली तरी त्याचा तिला काहीच फरक पडत नव्हता आणि आज तर तिला काहीही करायची गरज पडली नव्हती.
मागील भागात.

"दी.” रावी आता जर चिडून बोलली. “माहिती आहे मी आताची आधुनिक मुलगी आहे. पण मला माझ्या मर्यादा माहिती आहेत.”

“बावळट,” परी तिच्या हातावर चापट मारत बोलली. “तू जो त्याला पर्याय दिला आहे ना त्याबद्दल बोलत आहे मी आणि अशी मुल कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी तात्पुरती लग्नाला तयार देखील होतात.”

आता मात्र रावी शांत बसली.

“शक्यतो त्याच्यापासून लांबच रहा,” परी “त्याच्याशी बोलण देखील बंद कर.”

“तो पापड काय माझ्या अंगाला हात लावेल?” रावी चिडून बोलली.

“तुझी काळजी म्हणून नाही,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “त्याच्या काळजीपोटी बोलत आहे. नाहीतर तो पण त्या केदारसारखा हॉस्पिटलमध्ये पोहोचायचा.”

ते ऐकून रावीचे डोळेच मोठे झाले.

आता पूढे.

“तुला कस समजल तो तिकडे पोहोचला म्हणून?” रावी आश्चर्यचकित होत बोलली.

“म्हणजे तुलाही माहिती होत ना?” परी तिला बारीक डोळे करून बघू लागली.

“मला बाबा बोलला.” रावी तिचं हसू दाबत बोलली.

“त्यांना कस समजल?” परी विचार करत बोलली.

“त्यांच्या डोळ्याखालून जाणार नाही अशी कोणीतीही गोष्ट नाही.” रावी रुबाबात बोलली.

“हम्म ते पण आहे.” परी आता खुदकन हसली.

“बरेच दिवस झाले तुझा तो बॉयफ्रेंड दिसला नाही.” रावी तिच्या भुवया उंचावत विचारू लागली.

“माझा कोणता बॉयफ्रेंड?” परीच्या कपाळावर लगेच आठ्या चढल्या.

“तोच गं,” रावी हलकसं हसत बोलली. “तुझ्या आत्याचा मुलगा, राज.”

तस परीला खूपच हसायला आल. “तो ही तर अमेरिकेला गेला आहे ना, म्हणून सध्या मनाला शांती आहे.”

“म्हणजे त्याला तू मिस करतेस ना?” रावी आता खट्याळ होत चालली.

“मी बोलली माझ्या मनाला शांती आहे आणि विषय तू काढलास मी नाही.” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “चल आता कॉलेजला उशीर होत आहे.”

“ठीक आहे चल.” रावी खुर्चीवरून उठत बोलली.

“आणि एक..” परी पुढे काही बोलणार तोच रावी बोलली.

“त्याच्यापासून लांब राहा.” रावी हलकसं हसत बोलली. “अजून काही?”

तशी परीने हसतच नकारार्थी मान हलवली आणि दोघी कॉलेजकडे निघून गेल्या.

तिकडे ॲकेडेमीमध्ये त्या भावंडांच्या आणि त्यांच्या विद्यार्थाच्या आनंदाला उधाण आल होत. त्या भावंडांचे सर, ज्यांनी ह्या सगळ्यांना खेळासाठी ट्रेनिंग दिली होती. ते परदेशातल्या हेवी वेट स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते आणि हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. गेल दोन वर्ष त्यांनी त्या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि हे मेडल जिंकले होते.
ही भांवड आणि ते सर ह्यांच्या वयात दहा वर्षाच अंतर होत. फक्त त्यांनी शिकवलं म्हणून ते सर झाले होते. आता ते लवकरच भारतात परत येणार होते.

“हेलो दी,” सुजयने लगेच परीला फोन लावला. आजवर ती कधीही त्यांच्या त्या ॲकेडेमीमध्ये गेली नव्हती. फक्त उद्घाटनाच्या दिवशी पंधरा ते वीस मिनिटासाठी ती आली होती. कारण मुळात तिला ह्या गोष्टीत काहीच रस नव्हता. तिच्यामते त्या सगळ्यांनी दुसरा काहीतरी व्यवसाय करायला हवा होता. ते तर विजयने परवानगी दिली म्हणून ही ॲकेडेमी उभी राहिली होती. “आमच्या सरांनी गोंड मेडल जिंकल. आता तरी या गरिबांच्या अकेडेमिला तुझे पाय लाव.”

“आज्जीबात नाही.” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “तुम्ही जिंकले का? नाही ना? माणस जे छंद म्हणून करतात ते तुम्ही व्यवसाय म्हणून निवडल.”

“हो, त्यांचेच छंद आम्हाला पूर्ण करायचे आहेत.” सुजय “एक दिवस असा नक्की येईल की तू स्वतःहून इथे येशील.”

“हम्म स्वप्नच बघ.” परी हसतच बोलली. “चल बाय, मी पोहोचली कॉलेजला.”

मग सुजयने फोन ठेवला. तसे बाकी भावंड सुजयकडे बघू लागली. “नाही म्हणाली, म्हणे तुम्ही कधी जिंकले का?”

तसा बाकीच्यांनी एक उसासा सोडला आणि ज्यांच्या त्यांच्या कामाला लागले. तिकडे परीने देखील तिचं नाक मुरडत तिच्या तासाला निघून गेली.

तर दुसरीकडे राकेश रावीच्या कॉलेजला जाऊन पोहोचला. पण आज रावी आणि परी सोबतच उशिरा कॉलेजला पोहोचल्याने राकेशला रावी काही दिसली नव्हती. कॉलेजची वेळ होऊन गेल्यावर कॉलेजच्या आवारात तो इकडे तिकडे जरा फिरत राहिला आणि त्याच दरम्यान त्या दोघी कॉलेजमध्ये आल्या होत्या. म्हणून त्या काही त्याला दिसल्या नाहीत. मग तो त्या कॉलेजच्या गेटवरच थांबला.

जवळ जवळ कॉलेज सुटायची वेळ झाली होती. राकेश अजूनही त्या कॉलेजच्या गेटवर थांबला होता. त्याला आता येणारे आणि जाणारे बघू लागले होते. कारण तो तर त्या कॉलेजचा विद्यार्थी देखील नव्हता. नक्कीच कोणासाठी तरी तो थांबला असल्याचे बघणाऱ्यांना जाणवत होते.

हळू हळू कॉलेज सुटलेली मुल त्या गेटमधून बाहेर पडू लागली. तसा राकेश सावरून उभा राहीला आणि गेटमधून बाहेर पडणाऱ्या मुलींवर नजर टाकू लागला. अजून बराच वेळ गेला तरीही रावी काही बाहेर आली नव्हती. मग तो जरा वैतागायला लागला.

तर दुसरीकडे रावी कॉलेजच्या कॅन्टीनला बसून आरुष सोबत बोलत होती. विषय तोच जो परीला सांगितला गेला होता. परीने तर तिचं नाक मुरडलं होत. पण रावीला मात्र खूपच आनंद झाला होता. त्यात आरुषची आई लवकरच घरी येणार होती. ती बातमी देखील आरुषला रावीपर्यंत पोहोचवायची होती. ते समजताच रावीचा आनंद भरभरून वाहू लागला होता. मग ती त्या कॅन्टीनलाच बराच वेळ मोबाईलवर बोलत बसली होती. फोनवर मनसोक्त बोलून झाल्यावर ती घरी जायला निघाली.

इकडे राकेश त्या गेटजवळ उभा राहून अस्वस्थपणे येरझारा मारत होता. जस काही वेळाने त्याला रावी दिसली. तसा त्याचा तो अस्वस्थपणा पळून गेला आणि तो उत्साहात आला. रावी तिच्याच तंद्रीत चालत होती. तेवढ्यातच राकेश तिच्या समोर जाऊन उभा राहीला.

असा अचानक कोणीतरी समोर आल्याने रावी पहिले तर चिडलीच. पण समोर राकेशला बघून लगेच शांत देखील झाली. पण चेहऱ्यावरचा राग अजूनही तसाच ठेवला.

“काय आहे?” रावी त्याच्यावर खेकसली. “असा मुलीचा रस्ता अडवण शोभत का तुला?”

“सॉरी ना बाबा.” राकेश मधाळ स्वरात बोलला. “एकदा काय चूक झाली तर अशी वागशील का?”

“तू जे करत होता ती फक्त चूक होती?” रावी त्याच्याकडे रागाने बघत बोलली.

“पण मग तू पण माझ्या मनाचा विचार कर ना.” राकेश

“तू अजूनही त्याच विषयावर आहेस तर.” रावीने नकारार्थी मान हलवली.

“नाही गं.” राकेश विनंतीच्या सुरात बोलला. “प्लीज मला एक संधी दे. पुन्हा अस नाही करणार.”

“मुळात तू जे काही केल आहेस त्याचा तुला काहीच पश्चाताप नाहीये.” रावी “असही दीने मला तुझ्यापासून लांब राहायला सांगितलं आहे. पहिले तर वाटल होत की तू तसा नाहीस. तुझ्याकडून भावनेच्या भरात ते सगळ झाल. त्याचा पश्चाताप झाला तर मी तुला माफ करणार होते. पण तू आताही माझ्या अपेक्षांना सुरुंग लावलास. आता मला माझ्या दीच बोलण पटल. तुझ्यासारखी मुल कधीच सुधारू शकत नाही.”

“खूप बोललीस हं.” राकेश आता रागाला येत बोलला. “मी प्रेमाने बोलतो याचा अर्थ असा नाही की मी काहीच करू शकत नाही.”

तशी रावी तीरस्कारात्मक हसली. “तुझ्याकडे बघून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले होते रे. पण तू पण बाकी मुलांसारखाच निघालास. प्रेम प्रेमाने जिंकता येत अशी धमकी देऊन नाही.”

“अगं,” राकेश लगेच सावरत बोलला. “मला तस म्हणायचं नव्हत. प्लीज मला एक तर संधी दे.”

“ती एकदा नाही बोलली ना तर त्याचा अर्थ नाहीच असा होतो.” परी तिथे तिथे पोहोचली. तिला ज्या ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावलं होत. तिथे ती जायला निघाली होती. तर तिला कॉलेजच्या गेटवर हे दोघ बोलताना दिसले. त्याचा तो बोलण्याचा रोख परीला समजून आला आणि ती त्याला कडक आवाजात बोलली.

“हे बघ,” राकेश जरा चिडून बोलला. “तू आमच्यात बोलू नकोस. तिचं आयुष्य आहे तिला बोलू दे.”

परी सोबत अश्या भाषेत बोललेलं बघून आधीच चिडलेल्या रावीच्या तळपायातली आग मस्तकात गेली. ती काही राकेशला रागात बोलणार तोच तिचं लक्ष आजूबाजूला जमा झालेल्या मुलांवर गेल. जे परीच्या वर्गातले विद्यार्थी होते आणि नुकतेच तिच लेक्चर संपवून घरी जायला निघाले होते. आपल्या लाडक्या शिक्षिकेबद्दल अशी भाषा ऐकून ते लागलीच त्यांच्या जवळ जमा झाले.

अचानक पंधरा सोळा विद्यार्थ्यांचा घोळका आपल्याकडे रागाने बघत आहे बघून राकेशची पाचावर धारण बसली.

तर दुसरीकडे परीईने डोक्यालाच हात लावला. ‘एक रावी कमी होती का आता हे सगळेच जमा झाले.’ ती मनातच बोलली. नंतर आपल्या विद्यार्थ्यांकडे बघून बोलली. “सुटल ना कॉलेज आता घरी जावा. नाहीतरी कधी कॉलेज सुटणार म्हणून माझे कान पिकवतात.” परी उगाच हसवून विषय बदलायला बघत होती.

“ते चाललोच आहोत.” एक विद्यार्थी “ते हा काय बोलला तुम्हाला ते नीट ऐकायला आल नाही जरा म्हणून म्हटलं जरा विचारून घेऊ.”

त्यातल्या दोघा तिघांनी राकेशच्या खांद्यावर हात टाकून त्याचा खांदा जरा जोरात दाबला. रावी तर मस्त मज्जा बघत उभी होती. तिच्यासमोर तिच्या दीला कोणी काहीही बोलेल आणि ती ऐकून घेईल अस कधीच झाल नव्हत. भले नंतर परी तिला कितीही भांडली तरी त्याचा तिला काहीच फरक पडत नव्हता आणि आज तर तिला काहीही करायची गरज पडली नव्हती.

“त.. त.. ते,” राकेश आता जरा घाबरून बोलायला लागला. “ते आमच बोलण चालू होत तर ह्यांना बोललो की आम्ही आधीपासून बोलत आहे तर तुम्ही नंतर बोला.”

“तेव्हाचा बोलण्याचा सूर तर असा नव्हता.” दुसरा विद्यार्थी “सरळ सरळ अरे तुरे करत होता त्यांना.”

वातावरण तापताना बघून परी परत बोलायला लागली. “काही नाही झाल एवढं. तुम्ही चला आता घरी जावा. नाहीतर मी उद्यापासून येणारच नाही.”

“अस काय करता ओ मॅडम.” तिसरी विद्यार्थिनी उगाच तोंड पाडून बोलली.

“जाता की मीच जाऊ?” परी निर्वाणीच्या सुरात बोलली
मग मात्र त्यांचा नाईलाज झाला. पण जाता जाता रावीवर नजर टाकून इशारा करायला ते विसरले नाहीत.

जशी ती मुल गेली तसा राकेशने सुटकेचा श्वास सोडला आणि परत रावीकडे पाहिलं.

“इकडे बघ.” परी आता कडक आवाजात बोलली. “नाहीचा अर्थ नाही असाच होतो. उगाच ती नाही बोलली म्हणून स्वतःचा इगो दुखावून घेऊ नको. कारण अस पुन्हा काही घडलं तर मी नाही, सरळ तिची भावंड भेटतील.”

यापुढे राकेश तर काही बोलला नाही. पण मनात मात्र दोघींना बघून घेईल अशी धमकी द्यायला विसरला नाही.

नंतर परी रावीकडे वळली. “ही गोष्ट तू तुझ्या क्राईम पार्टनरला जर का सांगितलीस आणि मला समजलं की तो पण हॉस्पिटलला पोहोचला. तर बघ मग.”

“मी कधी तुझा शब्द मोडला आहे का?” रावी अगदीच लाडात येत बोलली. “मी कधीच काही सांगत नाही त्यांना.”

“ह्म्म्म चांगलाच माहिती आहे मला.” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “तुमच हे अति प्रेम बघून ना मला कधी कधी धडकी भरते. लवकरच तुमची लग्न उरकून टाकावी लागतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये व्यस्त झाले की मी मोकळी.”

“आधी तुझ होणार आहे हे लक्षात ठेवा मडम.” रावी तिचे हात कमरेवर ठेवत बोलली. “आणि तुझ्यापुढे आम्हाला कोणीच नाहीये.”

“चल घरी,” परी जरा चिडून बोलली. “आली माझ लग्न लावायला.” आणि ती तरातरा पुढे चालायला लागली.

‘अरे दी परत फुगली.” रावी मनातच कपाळाला हात मारत बोलली. मग ती पण तिच्या मागे मागे पटापट चालायला लागली. आता रावी परी पेक्षा उंचीने जरा जास्त असल्याने रावीला परीजवळ पोहोचायला जास्त वेळ लागला नाही. सकाळी त्या दोघी सोबतच आल्या होत्या. आता देखील परी निघालीच होती तर रावी तिला तिच्या त्या लेक्चरच्या ठिकाणी सोडायला चालली.

तिच्या लेक्चरच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रावीने लाडी गोडी लावून तिच्या दीला परत मनवलं होत. नंतर ती तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर मात्र राकेश काही रावीच्या नजरेस पडला नव्हता.
काही दिवसांनी सोनालीने परीला फोन लावून रावीच्या आयुष्यातून राकेशला लांब पाठवल्याबद्दल तिचे आभार मानले. ते ऐकून परी टेन्शनमध्ये आली. कारण ती इतकही काही बोलली नव्हती की राकेशने थेट त्याच रहात शहर बदलाव. म्हणजे ते काम नक्कीच रावीचं.असल्याच तिला वाटू लागल. मग परीने रावीला फोन लावला. पण तिला तर राकेशबद्दल काहीच माहिती नव्हती. मग परीचा संशय तिच्या बाकी भावंडांवर गेला. पण रावीने त्यांनाही काहीच न सांगितल्याचे परीला सांगितले. मग परी विचारात पडली की राकेशला अचानक अशी उपरती कशी झाली? हे काम नक्की कोणाच तेच तिला काही समजत नव्हत. शेवटी तो रावीच्या आयुष्यातून लांब गेला हे महत्वाच समजून तिने बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष केल.

तर दुसरीकडे सुजय त्याच्या बाकी भावंडासोबत त्यांच्या ॲकेडेमीमध्ये बसून आसूरी स्मित झळकावत एकमेकांकडे बघत होते. त्यांच्या ॲकेडेमीमधले काही मुल ही रावीच्या कॉलेजमध्ये शिकायला होती. ज्याने रेसची माहिती आरुषला दिली होती त्यानेच त्या दिवशी जे काही गेटजवळ झाल त्याची माहिती सुजयपर्यंत पोहोचवली होती.

आता त्यांनी काही केलेलं जर परीला माहिती झाल असतं तर परीने नक्कीच त्यासोबतच तिचं बोलणच थांबवलं असत. पण मनाला कोण समजवणार नाही का? मग काय लागला की फोन थेट रावीच्या वडिलांना म्हणजेच रुद्रला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all