Login

अवनी एक प्रवास भाग १९

नंतर मात्र ती रात्र आनंदाच्या पुरात वहात राहिली. त्यांनी त्यांच्या ह्या घराला सरप्राईज तर दिल होत. पण त्यांच्या अजून दोन घरांना त्यांना सरप्राईज द्यायचं होत. ते मात्र उद्या सकाळीच द्यायला जाणार होते. त्यासाठी आता काहीच तास शिल्लक राहिले होते.
मागील भागात.

जेव्हा कधी असा वेळ मिळायचा तेव्हा हे सगळेच बोलण्यासाठीची ही संधी सोडत नव्हते. मग ते आई वडील त्यांच्या ह्या ग्रुपपैकी कोणाचेही असो ते सगळेच एकत्र राहिले होते. त्या सगळ्यांचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी त्यांचे विचार हे जवळपास सारखेच होते.

सुजयने विजयसोबत बोलून आधीच बाईकच्या क्षेत्रात उतरणार असल्याच सांगितल होत. जसा विजयने कारच्या क्षेत्रात नाव कमावलं होत. तर सुजयला बाईकच्या क्षेत्रात नाव कमवायचं होत. अनेक ब्रांडच्या बाइक्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील अस शोरूम त्याला उभ करायचं होत. ह्याने त्याच्या दोन गोष्टी साध्य होणार होत्या. त्याला त्यांच्या अकेडेमिमध्ये पण जाता येणार होत आणि ते शोरूम पण सांभाळता येणार होत. काही वेळाने जशी जेवणाची तयारी झाली तस सगळ्यांनी जेवण आटपून घेतली. नंतर अजून एकत्र बसून त्यांच्या गप्पांचा फड रंगला.

आता पूढे.

ह्या गप्पांमध्ये परीला कोणी मुलगा आवडतो? ह्यावर पण चर्चा झाली होती. परी विजय आणि सायली समोर असतान तिच्या भावंडांवर इतक काही ओरडू शकणार नव्हती. हे तिच्या बंधू मंडळींना चांगलच माहिती असल्याने, ते देखील ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन तिला विचारून विचारून हैराण करून सोडल होत. शेवटी ती खरचं रागाला येऊन त्यांना रोखून बघू लागली. तेव्हा कुठे तो विषय थांबवला गेला होता. पण नंतर ती काही तिथे थांबली नाही आणि सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली.

“किती छळता रे तिला?” सायली हसतच बोलली.

“ती आम्हाला किती छळते? तुला नाही माहिती आत्तु.” रावी नाटकी आवाजात बोलली.

“तुमचे कांड तसे असतात ना,” विजय पण हसतच बोलला. “त्यासाठी ती तशी वागते.”

परीची तिथे तक्रार करून काहीच फायदा नव्हता. हे माहिती असूनही ते उगाच बोलत रहायचे. बऱ्याच उशिरा बाकी मंडळी त्यांच्या घराकडे निघून गेली. उशीर झाला असल्याने रावी आणि मालाला तिथेच थांबायला लावलं होत. परी सोबत राहायला मिळेल म्हणून त्याही लगेच तिथे थांबल्या होत्या.

सायली, विजय आणि सुजय तर त्यांच्या खोलीत कधीच झोपेच्या अधीन गेले होते. पण परी, रावी आणि माला ह्यांच्या परीच्या खोलीत अजूनही गप्पा चालू होत्या. असे प्रश्न जे आईला विचारायला भीती वाटत होती ते प्रश्न त्या दोघी परीला विचारात होत्या. ती देखील बाकी दोघींचं तिच्या परीने उत्तर देत त्यांच्या मनाला समाधान देत होती. नंतर बऱ्याच वेळाने परीला दोघींच्या मध्ये झोपवत तिच्या दोन्ही बाजूला एक एक जणी झोपी गेल्या.

इकडे हे सगळे साखर झोपेत असताना मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईच्या एका घरात मात्र आश्चर्याचा पूर आला होता. मध्यरात्रीची वेळ होती, ते घर देखील झोपेच्या अधीन होत. पण त्या घरातली मोठी मुलगी जी नुकतीच काल संध्याकाळी तिच्या सासरवरून तिच्या माहेरी आलेली होती. ती मात्र जाणून जागी होती. तिने तिच्या माहेरी अचानक यायचं कारण सांगितल नव्हत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून बाकी मंडळी झोपेच्या अधीन झाली होती. ती मात्र तिचा मोबाईल धरून काहीतरी त्यावर करत होती, मधेच एवढ्या रात्री आलेल्या मेसेजला रिप्लाय देखील करत होती. आलेले ते मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर उत्साहाचा नुसताच पूर वहात होता. तो इतका होता की रात्रीची कुंभकर्णाची वेळ आलेली असूनही झोप मात्र तिच्यापासून कोसो लांब होती. त्याला कारणही तसच होत.

शेवटी ज्या मेसेजची ती वाट बघत होती. तो मेसेज तिच्या मोबाईलवर झळकला आणि तिच्या डोळ्यातून आतापासूनच आनंदाश्रू उड्या मारत बाहेर येऊ लागले. ती हळूच बाकी मंडळीचा अंदाज घेत घराच्या दाराजवळ पोहोचली. दाराच्या आतूनच त्या बिल्डींगच्या लिफ्टचा आवाज ऐकायचा प्रयत्न करू लागली. ती त्यांच्या घराच्या बाजूलाच असल्याने त्या लिफ्टचा आवाज त्यांना सहज ऐकू यायचा. जसा तिला लिफ्ट उघडण्याचा आवाज आला तसा तिनेही त्यांच्या घराचा दरवाजा हळूच उघडला.

दारात त्या दोघांना पाहून तिचे डोळे अजूनच वाहायला लागले. गेले पाच वर्ष ते दोघे तिच्या काय? घरात इतरांच्याही डोळ्यांपासून खूप दूर होते. ते आज आल्या आल्या पहिले तिला दिसले. ते दोघेही दारात त्यांच्या आत्याला बघून लागलीच तिच्या मिठीत विसावले. गेले दोन ते तीन दिवस ते दोघे त्यांच्या आत्याच्या संपर्कात होते. घरातल्यांना सरप्राईज द्याव म्हणून त्यांनी त्यांच्या ह्या आत्याला हाताशी धरल होत. एकुलती एक लाडकी आत्या होती, जिच्यामुळे तिच्या ह्या दोन्ही भाच्यांची स्वप्न पूर्ण झाली होती.

आत्याला भेटून झाल्यावर ते दोघेही पहिले त्यांच्या त्यांच्या आईवडिलांच्या खोलीत गेले. तशी ती आजूबाजूलाच होती. काही वेळातच दोघी खोल्यातून आश्चर्याचे सूर आळवले गेले. घरी आलेल्या आपल्या कोकरांना बघून दोन्ही आई आनंदाने रडू लागल्या. आपल्या बाजूच्या खोलीत पण असाच सूर आलेला बघून खोलीत असलेले दोन्ही नवरा बायको लागलीच त्यांच्या खोलीतून बाहेर आले. त्याचा तो गोंधळ ऐकून त्या मुलांचे आजी आजोबा देखील बाहेर आले. त्यांच्या मागे त्या मुलांची बहिण देखील बाहेर आली. ती तर आल्या आल्या तिच्या ह्या दोन्ही मोठ्या भावांच्या अंगावर उडी मारत त्यांच्या मिठीत गेली.

मग काय? तिथल्या आनंदाला जे काही उधाण आल. त्याची सर पैश्याने मोजता येणार नव्हती. आपल्या मुलीच, आपल्या बहिणीच अचानक घरी येण बाकी मंडळीना आता समजल होत. एकीकडे आपल्या घरातल्या चिरंजीवाना आनंदाच्या मिठ्या मिळत होत्या. तर काल अचानकच घरी आलेल्या मुलीला, त्या बहिणीला लटक्या रागातली बोलणी खावी लागत होती. कारण ती देखील त्या दोघांना सामील होत ते येणार असल्याची गोष्ट लपवली होती. ती बोलणी देखील ती हसून स्वीकारत होती.

नंतर मात्र ती रात्र आनंदाच्या पुरात वहातचं राहिली. त्यांनी त्यांच्या ह्या घराला सरप्राईज तर दिल होत. पण त्यांच्या अजून दोन घरांना त्यांना सरप्राईज द्यायचं होत. ते मात्र उद्या सकाळीच द्यायला जाणार होते. त्यासाठी आता काहीच तास शिल्लक राहिले होते.

त्या सगळ्यांना आनंदात पाहून झोपेलाही त्यांचा हेवा वाटला आणि ती तिथून चालली गेली. कॉफी ठेवली गेली, आपली मूल एवढा लांबचा प्रवास करून येताना त्यांना खायला मिळाल नसेल म्हणून अश्या मध्यरात्री खायला देखील बनवायला सूरवात केली गेली. तोपर्यंत ते दोघेही फ्रेश झाले.

चहा नाश्ता करून मग थोड्यावेळासाठी ते सगळेच बेडवर पसरले गेले. त्या दोघांना उद्या लवकर उठून जायचं होत.

दूस-या दिवशी सकाळी सकाळीच दोघा मूलांना थोडासा ओरडा पडला होता. ती काळजी होती जी या रागाच्या रूपाने बाहेर पडत होती. आता तर त्यांच्या आत्याची मूलगी पण तिथे येऊन पोहोचली होती.

परत सकाळचा चहा नाश्ता घेऊन ती दोघी मूल, त्यांची बहिण आणि त्यांच्या आत्याची मूलगी हे चौघे घरातून निघाले.

इकडे विजयच्या घरी सगळेच लवकर उठले. त्यात रावी अजूनही पसरलेली होती. आईचे गूण दूसर काय?

ते सगळेच ज्यांच्या त्यांच्या गडबडीत असताना त्यांच्या घराची बेल वाजली. आता एवढ्या सकाळीच कोण आल म्हणून? मालाच दार उघडायला गेली.

जसा तिने दरवाजा उघडला तस ती पण दोन मिनीट बघत राहीली. दारात त्यांना उभं बघून ते खरचं आले आहेत? हे तिला दोन मिनीट समजून घेण्यातच गेली.

दार उघडण्याचा आवाज येऊन देखील काहीच आवाज आला नाही म्हणून सायली हॉलमध्ये आली. दारात उभ्या असणाऱ्या त्यांना बघून तिलाही खूप आनंद झाला.

“अरे राज, प्रसाद” सायली लगबगीने पूढे आली. “कधी आलात? अगं माला त्यांना घरात तर येऊदे.”

तशी माला भानावर आली आणि ती चिडून दोघांना बघू लागली. दोन दिवसांपूर्वीच तर मालाच राजसोबत बोलण झाल होत. तेव्हा त्याने अजून तीन महिन्यानंतर येणार असल्याचे सांगीतल होत आणि आता समोर बघून तिला आनंद होण्याऐवजी तिला रागच आला. वडिलांचे गूण, दूसर काय?

माला देखील वेट लिफ्टिंग करते हे राज आणि प्रसादाला चांगलच माहीती होत. त्यात ती त्या दोघांपैकी किंचीत उंच आणि शरीरयष्टीने मजबूत होती. त्या दोघांनी जसा मालाचा चिडलेला चेहरा पाहीला तसे ते सावध झाले. ती चिडून त्यांच्यावर धावून जाणार तोच ते दोघेही घरात घुसून पळायला लागले. तर माला त्यांच्या मागे होती.

दारात त्या दोघांच्या मागे त्यांची बहिणी आणि आत्याची मूलगी ह्या दोघीही खूपच हसत होत्या. मग सायलीने त्यांनाही घरात घेतलं.
काही क्षणात ते दोघे मालाच्या तावडीत सापडतील तोच राजला समोर परी दिसली. मग काय? पोहोचले की ते दोघ त्यांच्या ढालीच्यापाठी.

“ओय डार्लिंग वाचव आम्हाला.” राज परीच्या पाठी उभे राहून दम टाकत बोलला. कारण माला परीला बघून थांबली होती.

संकेत आणि प्राजक्ता यांचा मुलगा प्रसाद, राजेश आणि राधिका या दोघांचा मुलगा राज हे दोघेही त्यांच शिक्षण पूर्ण होऊन ते आता भारतात परतले होते.

परी पण दोन क्षण राजला बघत राहीली होती. तिचा तो बेस्ट फ्रेन्ड होता. हा, तिच्यापेक्षा वयाने तो लहान होता. पण दोघांची घट्ट मैत्री होती.

“दी,” माला अजूनही चिडूनच होती. “तो खोट बोलला माझ्याशी. येणार नाही बोलला होता.”

“मग अस सरप्राईज कस दिल असत?” राज चिडवत बोलला.

“तू मलाही सांगीतल नाहीस?” परी कपाळवर आठ्या पाडून बोलली.

“मग आमच्या डार्लिंग चेहऱ्यावर आनंद कसा दिसला असता?” राज त्याच्या नेहमीच्या खट्याळ शैलीत बोलला.

“पहीले तर दी ला डार्लिंग बोलण बंद कर.” माला चिडून बोलली.

“तूला काय प्रॉब्लेम?” राज “ते मी आणि ती बघून घेऊ. ती माझ्या पेक्षा मोठी आहे म्हणून नाहीतर आत्तापर्यंत तिला कधीच घरी घेऊन…”तो बोलता बोलता थांबला.

तशी माला त्याला बारीक डोळे करून बघू लागली. मग तिने मागे पाहीलं तर विजय देखील त्याच आवरून बाहेर आला होता. त्याला बघून मालाच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित आल.

“काका, हा बघा दी बद्दल काय बोलत आहे.” माला तिच्या भुवया उंचावत बोलली.

“काही नाही ओ बाबा.” परीने लगेच राजची बाजू सावरून धरली.
तशी माला परीला आ वासून बघू लागली. कारण आजवर तिने त्यांची अशी बाजू कधीच सावरून धरली नव्हती.

“अरे राज. प्रसाद” विजय दोघांना बघून आनंदाने बोलला. “कधी आलात?”

तसे ते दोघेही विजयच्या जवळ जाऊन त्याच्या पाया पडले. नंतर सायलीच्या देखील पाया पडले. मग ते दोघांच्या मिठीत विसावले. गप्पांना परत उधाण आल. तसा मालाला देखील खूप आनंद झाला होता. पण त्यांनी येणार ते सांगीतल नाही म्हणून जराशी ती फुगली होती. पण राजने त्याच्या शैलीत तिला लागलीच मनवलं होत.

इकडे परीला मात्र टेन्शन आल होत. कारण आता एकीकडे राज आणि दूसरीकडे तिच ही बंधूमंडळी यांच एका गोष्टीवरून कधीच पटलं नव्हतं. राज परीला ती मोठी असून डार्लिंग बोलतो हे त्यांना आवडतचं नव्हतं. पण राज मात्र परी त्याच्या मामाची मूलगी आणि त्यात ती त्याची बेस्ट फ्रेन्ड म्हणून बिनधास्त तिला डार्लिंग बोलायचा.

“वयाने मोठी आहे म्हणून, नाहीतर तिच्याशीच लग्न केल असत.” असा तो उघडं उघडं बोलायचा. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल नितांत आदर होता. ही गोष्ट त्यांच्या सर्व आई वडिलांना माहीती असल्याने त्यांनाही कधीही राजला परीला डार्लिंग बोलण्यावरून अडवलं नव्हतं.
बाहेर चालू असलेला हा मोठा गोंधळून ऐकून रावी आणि सूजय देखील वैतागून बाहेर आले. बाहेर राज आणि प्रसादाला बघून दोघांनाही आनंद झाला.

“अरे, दीचा आशिक कधी आलास?? रावी नेहमीप्रमाणे भावनेच्या भरात खट्याळ होत बोलून गेली.

तसे सुजय आणि माला रावीला आठ्या पडून बघू लागले. तर विजय आणि सायली गोंधळून बघू लागले. प्रसाद आणि त्याच्या बहिणी भुवया उंचावून बघू लागले आणि आपल्या राजच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली.

रावीच बोलण ऐकून परीने देखील कपाळवर हात मारून घेतला.

“मी तर काल मध्यरात्रीच उतरलो होतो,” राज बाकीच्यांकडे दुर्लक्ष करत बोललो. “माझ सोड. तो सारखा तुझ्यापाठी असेलला तुझा आशिक, त्याला हाकललं ना बाबा तिकडून.”

आता मात्र रावीच्या चेहऱ्यावर बारा वाजले. कारण तिने राकेशबद्दल कोणाला काहीही सांगितलं नव्हत. एक तेवढी परीने मात्र दीर्घ श्वास घेतला होता. तिने रावीला त्याच्यापासून लांब राहायला सांगून चूक केली नाही याच समाधान तिला वाटल.

“रावी,” सायली आता जरा चिडून बोलली. “तुझा आशिक कोण? ज्या मुलाला परदेशातून हाकलून दिल तू त्याच्या प्रेमात?..”

“नाही नाही नाही नाही,” सायली पुढे बोलणार तोच रावीने नन्नाचा पाढा वाचून दाखवला. “तो माझ्या मागे होता. मग त्याला म्हटलं अस काही वाटत असेल तुला तर माझ्या घरच्यांसोबत बोल.”

तशी परीला भुवया उंचावून बघू लागली. कारण खरं काय ते तर तिला सगळ माहिती होत ना. मग रावीने ही नजरेनेच परीला आर्जव घातली.

“बोलली होती गं ती मला,” परीने लगेच रावीची बाजू सावरून धरली. “कॉलेजच्या गेटवर पण आला होता तिच्या मागे मागे. तेव्हा त्याला नीट समजावलं होतं.”

“तू आणि नीट समजावलं?” सुजय चिडवत बोलला. “ते तर आऽऽऽ...” सुजय बोलता बोलता थांबला.

मग काय? वळला की मोर्चा सुजयकडे.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all