मागील भागात.
त्या त्यांच्या प्रिन्सिपल सरांच्या केबिनजवळ जाऊन पोहोचल्या. त्या केबिनच्या काचेतून आतमध्ये परीसोबत अजून दोन मुली उभ्या होत्या. त्या दोघी, परी आणि प्रिन्सिपल सर काहीतरी चर्चा करताना दिसले. सध्या जे काही दिसत होत त्यावरून तिथे काही गंभीर नसल्याचं रावीला जाणवलं.
बोलता बोलता परीला रावी लपून बघत असल्याच समजलं. तसा तिने मनातच डोक्याला हात लावला.
“प्लीज ना मॅम,” त्या दोघींपैकी एक मुलगी परीला खूपच विनवण्या करू लागली. “मागच्या वेळेस तूम्ही कॉलेजसाठीच केल होत ना? आताही कॉलेजसाठीच करायचं आहे. असही तूम्हाला थोडीच डान्स करायचा आहे. फक्त बसवून द्यायचा आहे.”
आता परी त्यांच्या प्रिन्सिपल सरांकडे बघू लागली. कारण याचा परिणाम तिच्या लेक्चरवर होणार होता.
आता पूढे.
जेव्हा दिल्लीला परीने तिच्या डान्सने त्यांच्या कॉलेजला बक्षीस जिंकवून दिल होत. त्या ग्रुपपैकी त्या दोघी आता परत परीला त्यांच्या डान्स बसवून देण्याची विनंती करत होत्या. त्यांनी परीला बेभान होऊन नाचताना पाहिलं होत. त्या स्पर्धेत परीने केलेल्या डान्सने सगळ पारड काही क्षणातचं त्यांच्या कॉलेजच्या बाजूने फिरलं होत. इतक की त्यांचा ग्रुप देखील परीच्या डान्सने मागे सारला गेला होता.
तिच्या तेव्हाच्या एनर्जीला मॅच करून डान्स करण त्यांच्या ग्रुपला खूपच अवघड झाल होत. त्यामुळे तिने फक्त डान्स जरी बसवला तरी त्यांचा डान्स मधला क्रमांक कोणीच हिरावून घेऊ शकत नव्हता. याची त्यांना खात्रीच होती. आता ती त्यांच्या कॉलेजची शिक्षिका असल्याने त्या मुलींनी सरळ त्यांच्या प्रिन्सिपल सरांची केबिन गाठली आणि थेट त्यांनाच परीला विनंती करायला लावली.
“मिस अवनी,” प्रिन्सिपल सर “असही आता अन्युअल फंक्शनचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे लेक्चरमध्ये ॲडजस्टमेन्ट करण्यात येईल. त्यामुळे तुमच्या लेक्चरवर इतकाही परिणाम होणार नाही. मला तरी वाटतं तुमच्यातली ही कला सगळयांना समजावी. ज्यांना डान्ससाठी मदत लागेल त्यांना तुम्ही मदत करावी अस मला तरी वाटत.”
“ज्यांना कोणाला नाही फक्त आम्हाला.” ती मुलगी कपाळावर आठ्या पाडून बोलली.
“अस का बोलत आहेस गं?” परी आणि प्रिंसिपल सरांना तिच बोलणं जरा वेगळच वाटल. “शेवटी ते सगळेच आपल्या कॉलेजचेचं मुल आहेत ना?”
“आम्ही त्यांना सांगून पाहिलं होत त्यांना तुमच्याबद्दल,” ती मुलगी “तर सरळ त्यांनी नकार दिला. म्हणे कोणाकडूनही आम्ही बसवणार नाही. त्यांनी त्यांचा कोरिओग्राफर अरेंज केला आहे.”
“मग आता तुम्ही फक्त आमचाच डान्स बसवायचा.” दुसरी मुलगी तोऱ्यात बोलली.
ते ऐकून त्या प्रिन्सिपल सरांना आणि परीला जरा हसूच आल.
“ठीक आहे,” परी हलकेच हसत बोलली. “फक्त तुमचाचं बसवायचा असेल तर भेटेल वेळ मला.”
“ठीक आहे मग,” प्रिन्सिपल सर “बघुयात आपल्या कॉलेजचा कोरीओग्राफर जिंकतो की बाहेरचा?”
“अस काही नाही सर.” परी समजूतीच्या सूरात बोलली. “शेवटी ती एक कला आहे.”
“तेच त्यांना समजावून सागायचं आहे.” ती मुलगी ठसक्यात बोलली. “की आपल्याकडे पण चांगले कलाकार आहेत.”
अजून पुढे काही चर्चा करून त्यांची ती मिटिंग संपली आणि परी त्या केबिनमधून बाहेर आली. तोपर्यंत रावी आणि मनाली त्यांच्या वर्गाकडे पसार झाल्या होत्या.
काही वेळातच परी तिच्या वर्गात लेक्चर घ्यायला आली. पूर्ण लेक्चर तर ती काही बोलली नाही पण शेवटी शेवटी तिने असा काही अभ्यास दिला की रावीच तोंडच पडलं गेल. ते बघून मनाली खळखळून हसली होती.
दोन दिवसांनंतर त्यांच्या डान्स प्रक्टिसला सुरवात होणार होती.
तिकडे राज जसा घरी पोहोचला तस राधिका आणि प्राजक्ता त्याला घेरून बसल्या. राज तर त्या दोघींना बघतच राहिला. त्यांचा तो चेहरा वाचून काहीतरी त्यांच्या हाती लागल आहे. याची कुणकुण त्याला लागली. पण नक्की काय लागल होत? ते त्याला माहिती नव्हत. मग त्याला आठवलं की कदाचित विषय प्रसादचा देखील असू शकतो.पण मग त्या दोघींनी त्याला आधी धरलं असत. नंतर माझे कान धरले असते. मग तो आता गोंधळून गेला आणि त्या दोघींना तो भांबावून बघू लागला.
“काय आहे हे?” राधिकाने तिच्या मोबाईलमधला एक फोटो त्याच्यासमोर धरला.
तो फोटो बघून राजने दीर्घ श्वास घेत एक सुस्कारा सोडला.
“आम्हाला वाटलं नव्हत की तू तिकडे जाऊन कॉलेजला मुली फिरवशील.” प्राजक्ता कडक आवाजात विचारू लागली.
“सिरीअसली?” राजच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. “हा फोटो तुम्हाला माहिती नाही?”
मग त्या दोघी तो फोटो बघत विचार करू लागल्या.
“हा असा मिठीतला फोटो आम्हाला कसा माहिती असेल?” प्राजक्ता
“तो थोडीच तू आम्हाला दाखवशील.” राधिका तिचं तोंड वाकड करत बोलली.
“तो थोडीच तू आम्हाला दाखवशील.” राधिका तिचं तोंड वाकड करत बोलली.
“फक्त फोटो नाही तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं देखील आहे.” राज बारीक तोंड करून बोलला. त्याचा इतका महत्वाचा क्षण त्या दोघी विसरल्या म्हणून त्याला वाईट वाटायला लागल.
“अगं मॉम,” प्रसादने तो फोटो बघून सांगायला सुरवात केली. “तुम्ही त्याची ड्रामाची प्रॅक्टिस पाहिली नव्हती का? त्यावेळेस तो त्याच्या एका मित्राच्या फार्म हाउसवर गेला होता आणि ड्रामा प्रेझेन्टेशनच्या वेळेस त्याने तुम्हाला हट्टाने बोलावलं होत. ह्या फोटोमधल्या मुलीसोबत ओळख पण करून दिली होती ना त्याने.”
आता दोघींच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी राजकडे पाहिलं तर तो नाराज झालेला दिसला. त्या दोघी काही बोलणार तोच राज त्या दोघींच्या समोरून उठून त्याच्या खोलीकडे चालला गेला.
“अरे यार.” प्राजक्ता टेन्शनमध्ये येत बोलली.
“उगाच त्या भावंडांच्या मागे लागलो.” राधिकाही उसासा टाकत बोलली. “आता याला मनवायच म्हणजे...” ती बोलता बोलता थांबली. कारण त्याला मनवण खूपच अवघड गोष्ट होती.
“पहिले त्या कार्ट्यांना बघुयात.” राधिकाने सुजयला फोन लावायला घेतला.
“अगं त्यांना तर ती गोष्टच माहिती नव्हती,” प्राजक्ता तिला समजावत बोलली. “त्यांना दिसला असेल म्हणून त्यांनी पाठवला. त्यांना काय माहिती की आपण त्याला तिकडे जाऊन भेटून आलो होतो ते.”
मग राधिकाने विचार करत तिच्या हातातला फोन खाली ठेवला आणि दुसऱ्याच क्षणाला तिने तो परत उचलला.
“आता काय करत आहेस?” प्राजक्ता
“बघ ना मजा.” राधिकाने हसतच एक फोन लावला. त्यावर थोडाफार बोलली आणि प्राजक्ताकडे बघून एक सुंदर स्मित केल. “आत्ता बाहेर येईल बघ.”
“त्याच्या बेस्ट फ्रेंडला फोन लावलास ना?” प्रसाद ही हलकेच हसत बोलला.
तशी राधिकाने होकारात मान हलवली. पुढच्या काही क्षणातच राज हॉलमध्ये त्याच्या कपाळावर आठ्या घेऊन आला.
“लगेच तिला फोन लावायची गरज आहे का?” राज त्याच तोंड वाकड करत बोलला.
“काय करू मग आता?” राधिका नाटकी आवाजात बोलली. “तू तर आमच लवकर काही ऐकत नाहीस. तिचं तरी लगेच ऐकतो.”
“मी काय म्हणते?” प्राजक्ता उत्साहात येत बोलली. “विजय आणि सायलीच्या गृहप्रवेशाच्या वेळी तू त्यांच्याकडे तुझी मुलगी मागीतली होती ना?” ती राधिकाकडे बघून डोळे मिचकावत बोलली.
“त्याचा काय संबंध इथे?” राज बारीक डोळे करून बघू लागला.
“काय संबंध म्हणजे?” आता मात्र प्राजक्ता जरा गंभीर होऊन बोलली. “विजयकडे परीची घालुयात ना मागणी, तुझ्यासाठी.”
आता राज त्याच्या ह्या मोठ्या काकूला बघून टेन्शनमध्ये आला.
“कशाला माझ्या जखमेवर मीठ चोळत आहात? माहिती आहे ना ती माझ्यापेक्षा मोठी आहे.” राजच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच गडद झाल्या.
“त्याला काय होत?” राधिकहीा गंभीर होत बोलली. “पण तुला सरळ करायची हिम्मत फक्त तिच्यात आहे.”
“मॉम सिरीअसली तू पण?” राजला तर तिथे काय चालू होत तेच समजत नव्हत.
त्याची ती अवस्था बघून त्या दोघी मनातून मात्र खूप हसत होत्या. प्रसाद पण त्याच्या आईला आणि छोट्या काकूला बघून गोंधळात पडला होता. त्याने राजजवळ त्याची आवड सांगितली होती. राजने ती परीला सांगून पूर्ण गावभर मिरवली होती आणि विषय चालू होता राजचा? हे गणितच त्याला समजून येत नव्हत.
“पहिली गोष्ट की यासाठी ती तयार नाहीये,” राज पुरता गंभीर झाला. “आणि तिचा नकार असताना जर तुम्ही आमचं जुळवायला घेतलं तर तिचे ते अतरंगी भावंड काय धुमाकूळ घालतील ना ते तुम्हाला काही वेगळ सांगयची गरज नाही.”
“ते त्यांच्या दी समोर काहीच बोलणार नाहीत.” प्राजक्ता
“ते बोलत नाही गं,,” राज अजूनच गंभीर झाला. “थेट करून मोकळे होतात.”
“तू घाबरतो त्यांना?” राधिका त्याला अजूनच चिडवत बोलली.
“प्रश्न तो नाहीये,” राज समजावण्याच्या सूरात बोलू लागला. “विषय त्यांच्या त्या मोठ्या बहिणीचा आहे, जिने त्यांना शिकवलं. त्यांचे आई वडील बाहेर असताना तिने त्यांना तिच्या लेकारांसारख संभाळल. तुम्हाला काय वाटत? तिच्या मनाविरुद्ध काही झाल तर त्यांच्या त्या दीच तरी ऐकतील का? आणि विषय दादाच्या लग्नाचा आहे. त्याला माला आवडली आहे. पहिले त्याच बघा. त्या मालाला मनवायला परीच कामात येणार आहे. माझा विषय घेऊन बसलात तर माला आम्हाला समोर उभं पण करणार नाही.” राज भडभडा बोलून गेला.
आपल्यावर सरकलेला विषय बघून प्रसाद लागलीच टेन्शनमध्ये आला.
“वहिनीला अस एकेरी नावाने हाक मारशील?” प्राजक्ता हलकेच हसत बोलली.
तसे ते दोघे त्यांच्या आयांना दोन क्षण बघतच राहिले. आपल्या लेकरांची झालेली ती अवस्था बघून त्या दोघी खळखळून हसायला लागल्या. ते बघून दोघांनी त्यांना आलेला घाम पूसायला घेतला.
“आता समजलं की मामा लोक आपल्या मॉमला का घाबरून राहायचे?” राज तिथेच बसून बोलला.
“तरी त्यांना जसे ओरडायचो, मारायचो तस तुम्हाला नाही करत.” प्राजक्ता राधिकाला टाळी देत बोलली.
“आता दादाच बघुयात?” राजने त्याची बत्तीशी दाखवली.
“जायचं का घरी त्यांच्या?” राधिका “तो महेश काही बोलणार नाही.”
“परी पण तेच बोलली,” राज “ते दोघे तुमच्यासमोर काहीच बोलणार नाही. पण माला तर तयार व्हायला पाहिजे ना? ती नाही तयार झाली तर?”
“अस नको बोलूस यार.” प्रसादने त्याच तोंड बारीक केल.
“आता परी बोलली आहे ना की ती मालासोबत बोलेल म्हणून.” प्राजक्ता
“पण मग ते डॅड आणि आज्जी आजोबांना?” प्रसाद “आणि खास करून आत्या..” तो बोलता बोलता थांबला.
“त्याचं टेन्शन तू नको घेउस.” राधिका
यावर अजून थोडी त्यांची चर्चा झाली आणि काही वेळाने ती थांबवण्यात आली. पुढचं काम राधिका करणार होती.
ह्यांची इकडे फक्त चर्चाच चालू होती. तोपर्यंत तिकडे अकॅडेमीमध्ये मालाच्या कानावर ती चर्चा पोहोचली देखील होती. तसा मालाचा चेहरा चिडीला आलेला बाकीच्यांना दिसला. त्यात आदेश आणि सुजय दोघेही जरा प्रसादची बाजू घेत असल्याने ती त्या दोघांवर पण जरा चिडली होती.
आता ते दोघे प्रसादबद्दल चांगल बोलत आहेत बघून आरुष आणि जय हे दोघे देखील मालाला त्याच्याबद्दल विचार करायला सांगत होते. मग तिच्या रागाच्या यादीत हे दोघे देखील उतरले. मग ती त्यांच्यापासून जरा लांब जाऊन बसली. तिच्या डोक्यात एकच होत की एकदातरी ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकाव. त्यासाठी ती त्यांच्या कोचकडून तसा सराव देखील करत होती. त्यांचे ते सर स्वतः नुकतेच गोल्ड मेडल जिंकून आले होते. मग मालाला देखील त्यांच्याच पावलावर पाउल टाकायचे होते. पण हे अस लग्नाचं मधेच आल म्हणून तिचं मन अस्थिर झाल होत.
आता काय कराव? तेच तिला सुचत नव्हत. एकतर ही चर्चा जर तिच्या आईच्या कानावर गेली तर ती उद्याच तिचं लग्न लावून द्यायला मागे पुढे बघणार नाही याची तिला खात्रीच होती.
ती तशीच विचार करत बसलेली असताना तिला परीची आठवण आली. ह्या सगळ्यांतून तिचं तिला चांगल मार्गदर्शन करणार होती. त्यासोबतच तिला त्यांच्या कोच सोबत देखील बोलाव लागणार होत. कारण त्या स्पर्धेची तारीख, सराव आणि लग्न हे सगळ तिला नीट मॅनेज कराव लागणार होत. ती तिच्याच विचारात असताना तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर परीचाचं फोन तिला आला होता.
‘ह्यांना माहिती झाल म्हणजे दीला पण माहिती असेल,’ माला मनातच सुस्कारा सोडत बोलली.
तिने तिचे डोळे एकदा घट्ट मिटून परत उघडले आणि आलेला फोन उचलला.
“कॉफी डेट?” परीचा पहिला प्रश्न ज्यावर माला गोंधळून गेली.
“आता हे काय मधेच?” माला नाराजीच्या सुरात बोलली.
“असच म्हटलं आमच्या वेट लिफ्टर चम्पियनला भेटावं,” परी मंद स्मित करत बोलली. “काय जाणो नंतर एकदा जिंकायला लागली तर मला भेट घेता येईल की नाही?”
“हे अस ब्लॅकमेल करायचं असेल ना तर मी निघून जाईल कुठेतरी.” माला आता चांगलीच चिडून बोलली. “तुला माहिती आहे ना की तुझ्याशिवाय आमच पान पण हलत नाही. तरी उगाच काहीतरी बोलत असतेस. ठीक आहे आली मी दुपारच्या तुमच्या जेवणाच्या वेळेस.” एवढं बोलून तिने फोन ठेऊन देखील दिला.
तिच्या मागे बसलेली तिची ती चार भावंड त्यांनी सध्या तरी तिच्याकडे लक्षच दिल नव्हत. कारण फोन परीचा असल्याचं त्यांना समजून गेल होत.
“मी दिला भेटायला चालली आहे,” ती बसलेल्या जागेवरून उठत बोलली. “सर आले तर त्यांना विचारा मी कधी त्यांना भेटायला येऊ म्हणून.”
“ठीक आहे,” आरुष “करतो तुला फोन. पण मला तरी अस वाटत की तू किमान विचार तरी करावास. आता दी तुला कशासाठी बोलावत असेल? याचा तुला अंदाज तर असेलच.” तो मालाला समजाऊन सांगू लागला.
“ठीक आहे,” माला सुस्कारा सोडत बोलली. “बघते दी काय बोलते. ती तरी माझ मन समजून घेईल.”
“म्हणजे आम्ही समजून घेत नाही ना?” सुजय त्याच तोंड वाकड करत बोलला.
“मुली आणि त्यांची मन समजून घेण हे तुमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.” माला त्यांना चिडवत बोलली.
तसे ते पण मालाला आठ्या पाडून बघू लागले.
“पण खूप गोड आहेत माझे बंधू.” माला एक गोड स्मित करून तिथून निघून गेली.
ते ऐकून तिची ती बंधू मंडळी मनापासून हसली. त्यांच्यात अशी गंभीर भांडण कधी झालीच नव्हती. जे काही आहे थोड रागावून, चिडून, बोलून पण मन मोकळ करून ती सुटून जायची. नाहीतर शेवटचा उपाय म्हणजे त्यांची लाडकी दी असायचीच. मग ते देखील तिथे त्यांच्या कामाला लागले.
तिकडे रावी आणि मनाली त्यांच्या कॉलेजच्या कॅन्टीनला डोक्याला हात लावून बसल्या होत्या.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा