मागील भागात.
मग ते दोघेही तिच्या नेहमीच्या दुकानात पोहोचले आणि माला तिचं नेहमीच सामान घ्यायला लागली.
पण आज तिचं नेहमीच न्युट्रिशनचा सामान तिथे नव्हत. मग ती त्याच्या पर्यायी सामान बघू लागली. तिथे ठेवलेलं जे योग्य वाटल ते तिने घ्यायला हात पुढे केला. पण प्रसादने तिला अडवलं आणि दुसर सामान तिच्या पुढ्यात धरलं. आता ती प्रसादला आठ्या पाडून बघू लागली. तिच्या कामात अस अडवलेलं तिला आवडत नव्हत.
तिचा तो आठ्या पडलेला चेहरा बघून प्रसादने तिला ते सामान आणि तिच्यासाठी योग्य असणार डायेट तिला समजवायला सुरवात केली. त्याच ते अगदीच प्रोफेशनल बोलण ऐकून मालाचे डोळे विस्फारले गेले. कारण तिच्या दृष्टीने तो फक्त खादाड होता आणि त्याच डायेटबद्दल बोलण ऐकून ती चकितच झाली होती. त्याने तिला त्या गोष्टी देखील सांगितल्या होत्या ज्या तिलाही माहिती नव्हत्या. पण तिच्या सरावासाठी, उर्जेसाठी उपयुक्त होत्या.
मग ती त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला विविध प्रश्न विचारू लागली. त्याचेही त्याने त्याला माहिती असलेले उत्तर दिले. आता मात्र ती त्याच्यावर चांगलीच प्रभावित झाली. तिच्या पोटात गुड गुड व्हायला सुरवात झाली. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी ऐकून तिला आजकाल बऱ्याच वेळा व्हायचं. आता तिला काही सुचेनास झाल आणि तिने पटकन त्याचा हात पकडून घेतला.
असा अचानक हात पकडून घेतल्याने प्रसाद पण स्तब्ध झाला.
आता पूढे.
“इतका चांगला नको वागूस रे,” माला टेन्शनमध्ये येत बोलली. “काहीतरी चुका पण दाखव. नाहीतर तुझा विचार करून वेडी होईल मी.”
एवढं बोलून तिने त्याचा हात सोडला आणि पैसे भरायला त्या दुकानाच्या कॅश काउन्टरला गेली. तर प्रसाद अजूनही स्तब्ध होऊन माला काय बोलून गेली? याचा विचार करत राहीला. नंतर जस ती लांब गेल्याची जाणीव झाली तसा तो भानावर आला आणि पटकन तिच्याकडे चालला गेला.
“मग मी होकार समजू?” प्रसाद भावनेच्या भरात विचारून मोकळा झाला.
“कशासाठी?” माला पैसे देता देता गोंधळून विचारू लागली.
मग प्रसादला घाई केली का? अस वाटून गेल आणि त्याने तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली. तशी माला पण गालातच हसली. मग ते दोघेही तिथून बाहेर पडले.
“मी अजूनही तुझ्या त्या प्रश्नाची वाट बघत आहे.” बाईक चालू करत प्रसादला बघून माला बोलली.
प्रसाद परत जाणीवेच्या पलीकडे गेला आणि तिलाच बघत राहीला. त्याला परत अस तिच्याकडे बघताना पाहून मालाने हसतच नकारार्थी मान हलवली.
“तू जर फक्त असाच बघत राहिलास ना,” माला हलकेच हसत बोलली. “तर दुसरचं कोणीतरी येऊन मला मागणी घालून घेऊन जायचा.” एवढं बोलून ती तिथून निघून गेली.
“काय बोलली ही?” प्रसादच्या कपाळवर आलेच आठ्या आल्या. "दुसरा कोणीतरी? आता बघचं.” त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि सरळ राजला फोन लावला.
इकडे आरुष त्याच्या घराजवळ जाऊन पोहोचला. त्यांच्या घराच्या बाहेर बऱ्याच गाड्यांचा ताफा उभा होता. त्यावरून त्याला समजलं की त्याचे आजोबा म्हणजेच मोहिते साहेब तिथे येऊन पोहोचले होते. आता ते कशाला आले होते? याची कल्पना त्याला आधीच आली होती. त्याने घराबाहेर राहून लगेच परीला फोन लावायला घेतला.
“मी तुमच्या घरीच आहे.” परीने आलेला फोन उचलून सरळ बोलायला लागली. “ये घरात.”
यानंतर आरुषला घरातल्या माणसांचा हसण्याचा आवाज देखील आला होता. बाहेर उभ्या असलेल्या गाड्या बघून तो नक्कीच त्यांच्या दीला फोन लावणार ही गोष्ट तर घरच्यांना माहिती होती. म्हणून मोहिते साहेबांनी त्यांच्या लेकीच्या घरी जायच्या आधीच परीला फोन लावून बोलावून घेतलं होत. आजच ते दिल्लीवरून इथे परत आले होते. ते घरी न जाता पहिले त्यांच्या लेकीला भेटायला आले होते आणि इथे यायचं खरं कारण म्हणजे आरुषची भेट.
दोघ बाप लेक बऱ्याच महिन्यानंतर भेटत होते. तिच्याही आईची सोबत सुटली होती. त्यामुळेच मोहिते साहेब नुसतेच फिरतीवर असयाचे. त्यांची जास्तीत जास्त कामे आता दिल्लीवरूनच होत असल्याने इथे यायला त्यांना वेळच मिळायचा नाही. शेवटी ते आता केंद्रीय मंत्री झाले होते आणि आता इथला कारभार हे नंदू काका बघत होते. त्यांनी आजही त्यांच्या साहेबांची सोबत सोडली नव्हती.
आज बाबा घरी येणार म्हणून ती त्यांच्या ऑफिसमधून लवकरच घरी आली होती. तर सायली आणि विजय संध्याकाळी तिथे येणार होते.
घरी आल्या आल्या आराध्याचे डोळे भरून आले होते. ती पटकन तिच्या वडिलांच्या कुशीत जाऊन विसावली. आईच्या आठवणींनी आणि बऱ्याच दिवसांच्या भेटीने ते डोळे सारखे वाहत होते. ह्या दोघांना वेळ मिळावा म्हणूनच सायलीने आराध्याला पुढे पाठवलं होत.
“कशी आहेस बाळा?” मोहिते साहेबांनी भरल्या आवाजाने विचारले.
“कशी दिसते?” आराध्या तिचे ओलावलेले डोळे पुसत बोलली.
तश्याच त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. आराध्याने त्यांना कॉफी आणि नाश्ता बनवून दिला आणि परत त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली. त्यांनी सायलीबद्दल पण तिला विचारलं. तर ती संध्याकाळी येत असल्याचे त्यांना सांगितले.
“पण मला लगेच निघायचं आहे.” मोहिते साहेब त्यांच घड्याळ बघत बोलले.
“ते मला नका सांगू,” आराध्या “नंतर ती चिडली तर मग बघा. तिने आधीच तुम्हाला थांबायला लावल आहे. मला पुढे पाठवून बाकीची काम ती आटपून येणार आहे. ते जर गेले तर बघ अशी धमकी मला दिली आहे. नाहीतर ती बिर्याणी आताही नाचू शकते.”
आराध्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून ते खळखळून हसले. काही वेळातच परी तिथे जाऊन पोहोचली.
“अरे आमचं कोकरू आल.” मोहिते साहेबांनी जवळ आलेल्या परीला लगेच त्यांच्या कुशीत घेतलं.
नातीला आलेलं बघून लेकीची मिठी सोडली म्हणून लेकीचे गाल फुगले गेले. ते परीने पाहिलं.
“इतका वेळ घेतलं ना तुला कुशीत,” परी आराध्याला चिडवत बोलू लागली. “मग आता माझी पाळी.”
“आता तुझा लेक पण लग्नाच्या वयाचा झाला तरी तुझ अस जळण सुटल नाही.” मोहिते साहेब देखील हसतच बोलले.
यावर आराध्याने तिचं तोंड वाकड केल. आधी ती एकटी होती तर वडिलांचं प्रेम ती कोणाबरोबर शेअर करत नव्हती आणि आता तर नातवांची रीघ आहे म्हटल्यावर तिचा नंबर मागे राहील हे तिला माहिती होत. पण लटका राग दाखवणे हा तर मुलीचा जन्मसिद्ध हक्कच असतो ना. तो आराध्या बरोबर गाजवत होती.
ह्या तिघांच्या गप्पा चालू असतानाच परीचा मोबाईल वाजला. त्यावर आरुष नाव पाहिलं आणि तिने तो उचलला. जस तिने त्याला थेट घरात यायला लावलं तसे बाकी दोघ बाप लेक खळखळून हसले होते.
इकडे फोन ठेवल्यावर आरुषने एक दीर्घ श्वास घेतला आणि घरात जायला निघाला. जाता जाता काय बोलयचं? याचा विचार करू लागला. परीला तर आधीच बोलावून घेतलं होत. म्हणजे तिला आधीच त्यांच्या बाजूने वळवून घेत गेल असेल याची त्याला कल्पना होतीच.
पुढच्या दोन मिनिटात तो घरात जाऊन पोहोचला. आत गेल्यावर तो आधी त्याच्या आजोबांच्या पाया पडला. तस मोहिते साहेबांनी त्याला उभं करून लगेच त्यांच्या मिठीत घेतलं. आता तो पण त्यांच्या आजोबांपेक्षा उंच होता. त्याला ते अभिमानाने बघू लागले.
आजवर त्याने त्याच्या आजोबांच्या नावाचा कधीच फायदा घेतला नव्हता. जे काही मिळवलं होत ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलं होत. मग ते कोणावर झालेला अन्याय असुदे तो स्वतः जाऊन तो प्रोब्लेम सोडवत होता. त्याच्या सोबत त्याची बंधू मंडळी होतीच. त्यामुळे जर कधी वातावरण तापायला लागलचं तर ह्यांना बघून समोरचे जरा विचारच करायचे.
ॲकेडेमीसाठी दिलेले पैसे सुद्धा त्याने त्यातून कमावून त्याच्या आजोबांना परत केले होते. त्यावेळेस त्याच्या ह्या आजोबांनी ती रक्कम त्यांच्या बायकोच्या नावे चालू केलेल्या एक सामाजिक संस्थेच्या खात्यावर पाठवायला लावली.
ही सगळी चित्रे त्यांच्या डोळ्यासमोरून सरसर झळकली गेली. आपला वारसा चालवण्यासाठी आपला नातू आता खंबीर आहे याची त्यांना खात्री वाटली. त्याला औपचारिक रित्या राजकारणात उतरवायच्या निश्चयाने ते आता तिथे आले होते.
आजोबांना भेटून झाल्यावर आरुष त्याच्या खोलीत फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत हॉलमध्ये ह्या तिघांच्या परत गप्पा चालू झाल्या. मोहिते साहेब तर परीलाच आरुषसोबत बोलायला सांगत होते. मागच्या वेळेस त्यांनी विजयला बोलायला लावलं होत. त्यावेळेस त्याने थोडा वेळ पाहीजे म्हणून टाळल होत. पण तो त्याच्या दीचा शब्द कधीच टाळणार नाही याची त्यांना खात्री होती.
“पण आजोबा हा त्याच्या करियरचा विषय आहे,” परी “त्याला मावशी आणि काका समजावतीलच ना. वरून त्याची पण इच्छा हवी ना.”
“त्यांच जर ऐकत असता,” मोहिते साहेब “तर तो आता किमान नगरसेवक तरी झाला असता. त्याने तुझ्या बापाचं पण नाही ऐकलं. फक्त टाळाटाळ करत आहे.”
“त्याला आवड नाही अश्यातली गोष्ट नाहीये,” परी “त्याच्या नजरेत काही चुकीच दिसलं की तो ते सुधारल्याशिवाय त्याचा पाठपुरावा सोडतच नाही. फक्त त्याला थोडा वेळ हवा आहे.”
“अजून किती वेळ पाहिजे त्याला?” आराध्या कपाळवर आठ्या आणत बोलली. “असाही त्या ॲकेडेमीमधून किती कमवतात ते?”
“मावशी तू पाहिली नाहीस का त्यांची अकेडेमी?” परी “आजोबांनी दिलेले पैसे त्यांनी परत देखील केले. आता एकेकाचे पैसे ते परत करणार आहेत.”
“इतकी चालते ती?” आराध्याला आश्चर्यचं वाटल. कारण तिला ती ॲकेडेमी म्हणजे फक्त त्यांचा छंद एवढचं माहिती होत.
“हो मग,” परी अभिमानाने बोलली. नंतर मोहिते साहेबांकडे वळली. “आणि तो तुमच्यासोबत पण येईल.”
“म्हणून तर तुला बोलावलं आहे.” आराध्या आता परीला चिडवत बोलली. “फक्त त्याला मनवायला.
“आजोबा कुठून तरी जळण्याचा वास येत आहे ना?” परी जरा खट्याळ झाली.
परीच वाक्य ऐकून आराध्याचे डोळेच विस्फारले गेले. “काय बोलली? जळायचा वास येतो?” आता आराध्या बसल्या जागेवरून उठली आणि परीकडे जाऊ लागली. “म्हणजे मी जळते?” जस जशी आराध्या पुढे येत होती तस तशी परी मागे मागे जात होती. परी हसत होती तर आराध्या उगाच रागाच नाटक करत तिला मारायला बघत होती.
“मी तर अस नाही बोलले.” परी मोहिते साहेबांच्या मागे लपत बोलली. “तुझ तूच ठरवलं. त्याला मी तरी काय करणार ना?”
“तुला रावीची हवा लागली आहे का?” आराध्या कपाळावर आठ्या पाडून परीला बघू लागली. कारण परीला आजवर फक्त शांततेत बोलताना पाहिलं होत. अगदी समंजसपणे वागताना पाहिलं होत. हे तिचं मधेच खट्याळ होण कधी कधी परीचा स्वभाव कसा आहे? हा प्रश्न सोडून जात होता.
“नाहीतर,” परी “बरेच दिवस झाले तिची पण भेट झाली नाही.”
आता आरुष पण फ्रेश होऊन हॉलमध्ये आला.
“आता बोल,” मोहिते साहेबांनी थेट मुख्य मुद्याला हात घातला. “किती वेळ पाहिजे तुला?”
“तुम्ही दी ला बोलावलं म्हणजे तुम्ही तुमचं तुमचं ठरवणार माहिती आहे मला. आम्ही तिच्या शब्दाबाहेर आम्ही जात नाही याचा फायदा घेता.” आरुष त्याच तोंड वाकड करत बोलला.
“आता तुम्ही सरळ सांगून ऐकत नाही ना त्याला आम्ही तरी काय करणार?” आराध्याने देखील लगेच टोमणा मारला.
“तिचं मला आता बोलली की तुला वेळ हवा आहे,” मोहिते साहेब “म्हणून तर तुला विचारात आहे की किती वेळ पाहिजे?”
तसा आरुषचा चेहरा खुलला. “लव्ह यु दी.” परीच्या गळ्यात पडत तो बोलला. “तुम्ही पण तिचचं ऐकता हे पण माहिती आहे आम्हाला. म्हणून तर आम्ही पण तिलाच पुढे करतो.” आता तो हसतच बोलला.
तश्या परीच्या कपाळवर आठ्या चढल्या. “म्हणून मला पुढे करता? म्हणजे त्यांचा मी ओरडा खाईल आणि तुम्ही तुमच्या मनासारखं करायला मोकळे ना?”
तस आरुषने त्याच तोंड बारीक केल.
“सहा महिन्यांनी तो येईल तुमच्यासोबत.” परी आरुषकडे बघत बोलली. “आता पुढच्या काही महिन्यात त्यांच्या स्पर्धा सुरु होणार आहेत.”
“दी यार.” आरुष
“आता ते माझ ऐकतात मग मी पण त्याचं ऐकायला पाहिजे ना?” परी त्याला चिडवत बोलली.
तसे मोहिते साहेब आणि आराध्या दोघेही हसायला लागले.
“आपण तर तिचं ऐकतो,” आता आरुष बोलायला लागला. “पण ती कुठे आपल ऐकते?”
आरुषच्या वाक्यावर परी त्याला गोंधळून बघायला लागली.
“म्हणजे रे?” आराध्या
“तिला कोरीओग्राफर व्हायचं होत,” आरुष परीकडे बघत बोलला. “पण मावशी आणि काकांना शिक्षकी पेशा आवडतो म्हणून ती टीचर झाली.”
आता परीच्या कपाळवर परत आठ्या चढल्या. तर दोघे बाप लेक परीकडे गोंधळून बघू लागले.
“बदला घेत आहेस?” परी आता खरोखर गंभीर होऊन आरुषला विचारू लागली.
“हो,” आरुष पण तितक्याच तोऱ्यात बोलला. “जेव्हा जेव्हा विषय तुझ्यासाठीचा असेल त्यासाठी मी काहीही करू शकतो.”
तसे परीचे डोळे घट्ट मिटले गेले. आधीच तर विजय आणि सायलीला तिने कसतरी मनवलं होत. आता ह्यांना मनवण म्हणजे हा विचार करूनच तिला टेन्शन आल.
“बेटा, आरुष खरं बोलत आहे?” मोहिते साहेबांनी प्रेमाने विचारलं.
“अरे मागच्या वर्षी तो डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो पहिला नव्हता का?” आरुष “आमच्या कॉलेजने दिल्लीच्या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली होती.”
“अच्छा ती परी होती?” आराध्याचे डोळे परत मोठे झाले.
पण परी कुठे काय बोलत होती. ती तर तिच्या या लहान्या भावला रोखून बघत राहिली होती.
“अगं आताही ती तिच्या कॉलेजच्या मुलींचा डान्स बसवत आहे.” आरुषने माहिती पुरवली. “एवढा भारी डान्स करते ना की आज आम्हाला आमच्या कामात लक्ष लागत नव्हत.”
“तू आधी का नाही सांगितल मग?” मोहिते साहेब
मग परीने विजयजवळ वाजवलेली कॅसेट परत इथे वाजवली.
“तू पण नाही काहीही चिचार करत बसते.” आराध्या जरा चिडून बोलली. “मग आम्ही पण विचार केला पाहिजे ना की आमची मुल आमच्यापेक्षा तुझ जास्त ऐकतात. तुझ्याजवळ जास्त राहतात”
“अस काही नाही हं मावशी.” परी बारीक तोंड करून बोलली.
“तसचं आहे,” आराध्या “म्हणून तर बाबांनी तुला पण इथे बोलावलं.”
आता मात्र परीचे डोळे भरून आले.
“अगं दी.” आरुष लागलीच तिच्याजवळ आला. “तिचं नको मनावर घेउस. ती मस्करी करत आहे फक्त.”
बोलता बोलता आरुषने आराध्याकडे बघून ‘काय केल?’ असा हलकेच इशारा केला.
तरीही तिचे डोळे वाहायचे थांबले नाहीत. “म... मी जाते.” ती उठून उभी राहिली.
“बस गप्प,” मोहिते साहेबांनी तिच्या हाताला धरून बसवलं. “चालली लगेच. तू काय तुझ्या मावश्यांना आज भेटलीस का? त्यांना ओळखत नाहीस? किती नौटंकी भरली आहे त्यांच्यात. तुला तर चांगलच माहिती आहे ना.”
“पण माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही.” परी तिचे डोळे पुसत बोलली.
आता ती अगदीच लहान मुलीसारखी निरागस दिसत होती. मग काय वितळले की आजूबाजूचे. तेवढ्यातच विजय आणि सायली पण तिथे येऊन पोहोचले.
विजयला आलेलं बघून आराध्याच टेन्शन वाढल. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच मन लगेच अस्वस्थ व्हायचं.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा