Login

अवनी एक प्रवास भाग ४३

मग तुषारला वाटल की त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावना सांगाव्यात. कारण ते नक्कीच तुषारला चांगल मार्गदर्शन करणार होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडीशी हिम्मत एकवटून सांगायला सुरवात केली. पहिले तर त्याने तेजश्रीच्या कॉलेजची टीचर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा व्हायरल झालेला डान्स बद्दल सांगितलं. म्हणजे तिच्या कौतुकाचे मनोरे बांधायला घेतले.
मागील भागात.

राज त्याच्या मामाच्या घरी आला तो थेट परीच्या खोलीत जाऊन बसला. त्याच्या डोळ्यातली काळजी फक्त बाहेर यायची बाकी होती. त्याला कालचा विषय काढायचा होता. पण घरात अजूनही सायली होती. काही वेळाने रावी पण इथे येणार होती. ती यायच्या आत राजला सगळ काही जाणून घ्यायचं होत. त्यामुळे त्याने तो रावी येईपर्यंत थांबेल अस सांगून सायलीला तिच्या ऑफिसला जायला लावलं.

सायलीला देखील त्याच म्हणणं पटल आणि तिने तिचं आवरलं आणि ऑफिसला जायला निघाली.

“हे बघ,” सायली राजकडे बघून बोलली. “तिला किचनमध्ये जायला बंदी आहे. तिला काय हवं असेल तर तू आणून दे. नाहीतर ती बोलण्यात पटाईत आहे ते तर तुला चांगलच माहिती आहे.”

तस राजने त्याच्या नेहमीच्या शैलीत “जो हुकुम मेरे आका.” अस बोलत सांगितले.

परीच्या कपाळवरच्या आठ्या आज काही कमी व्हायचं नावच घेत नव्हत्या. सायलीने परीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले.
“काळजी घे रे बाळा.”

तसे परीचे डोळे लगेच भरून आले.

सायली घराबाहेर पडली.तसा राज पाण्याची एक बाटली घेऊन परीजवळ येऊन बसला. पण परी कुठे काही बोलत होती? मग राजनेच त्याची शपथ घालून तिला काय झालं? ते सांगायला लावलं. तस तिने त्याला सांगायला सुरवात केली.

आता पूढे.

“कॉलेज संपवून मी घरी यायला निघाली होती. तेवढ्यातच एक लहान मुलगी रस्ता चुकली म्हणून माझ्या मागे मागे यायला लागली. तिच्या बोलण्याची भाषा पण इथली नव्हती. मग मला तिचं बोलण खरं वाटल आणि मी तिने सांगितलेल्या भागाकडे तिला घेऊन जाऊ लागले. पण नंतर लक्षात आल की ती जो भाग सांगत होती तो मुळात इथला नव्हता. मग मी तिला सरळ पोलीस स्टेशनला जाऊयात अस सांगितल तर ती मुलगी पळून गेली. मी माझी स्कुटी लगेच चालू करून पुढे जाणार तोच एक गाडी येऊन माझ्या स्कुटीला धडकली. मी आणि स्कुटी रस्त्यावरून खाली पडलो. मी उठून पाहिलं तर तीन चार माणस माझ्याजवळ येऊन मला पकडायचा प्रयत्न करू लागले. कशीतरी त्यांना धक्का मारून मी रस्ता दिसेल तिकडे धावू लागले. पुढे जातच होती की मला तो दगड दिसला आणि मी सरळ त्याच्याजवळ गेली. त्यानेच मला वाचवल.”

परीच्या तोंडातून दगडाने मला वाचवलं हे ऐकून राज गोंधळून गेला. “म्हणजे तू दगडाच्या पाठी लपलीस?”

तशी परीने जीभ चावली. “अरे दगड म्हणजे ते रे, बंधू मंडळींचे टीचर."

“अच्छा ते होय.” राज हलकेच हसत बोलला. “चांगल नाव ठेवलस.”

तशी परी पण हसली. “पण प्लीज हे कोणालाच सांगू नकोस.”

“नाही सांगणार.” राज “पण ह्यापुढे तू एकटीच कुठेही जायचं नाही.”

“आता तू तरी बाकीच्यांसारख नको वागूस.” परीच्या कपाळवर लगेच आठ्या चढल्या. “एकतर इथे बसून बसून खूप बोर झाल आहे.”

“ओके डार्लिंग.” राज त्याच्या खास शैलीत बोलला.

“आता हे अस डार्लिंग बोलण बंद कर.” परी त्याचे केस विस्कटत बोलली. “तुझ्या येणाऱ्या बायकोला नाही आवडणार ते.”

“तिला तर मी आधीच सांगेल की माझी पहिली डार्लिंग तूच असणार.” राज खट्याळ होत बोलला.

“गप रे.” परी त्याला शेजारीची उशी मारत बोलली.

ह्या दोघांच्या घरात गप्पा चालू असताना त्याच घराच्या हॉलमधून एक फोन आरुषला लावला गेला.

“तुझी शंका बरोबर होती. दी फक्त पडली नाहीये.” रावी तिच्या आवाजावर नियंत्रण ठेवत बोलली. “बरचं काही झाल आहे. ते आपण भेटलो की बोलू.”

रावी कधीच तिथे येऊन पोहोचली होती. सायलीने फक्त दार ओढून घेतलं होत. ते लॉक नव्हत म्हणून ती सरळ घरात घुसली होती. ती पण परीच्या खोलीत जाणार तोच तिच्या कानावर राजचा आवाज पडला. जो तिला शपथ देऊन काहीतरी सांगायला लावत होता. मग काय? लावला की कान रावीने परीच्या दाराला. परीच्या तोंडातून सर्व काही ऐकून रावीला पण धक्काच बसला आणि तिने आरुषला फोन लावला.
आरुषसोबत बोलून झाल्यावर रावी तिच्या नेहमीच्या अवतारात परीच्या खोलीत आली. तिला अस अचानक आलेलं बघून राज आणि परीने त्याचं बोलण लागलीच थांबवलं.

“तू कशी आलीस?” परी जरा दचकूनच विचारू लागली. कारण तिच्या मते तर दार बंद होती.

“कशी आली म्हणजे?” रावी तिचे खांदे उडवत बोलली. “हे काय चालत आली.”

“हो का?” राज मध्येच बोलला. “मला वाटल की तू हातांवर चालत येतेस.” नेहमीप्रमाणे त्याने रावीची छेड काढलीच.

यावर रावी चिडून त्याला हसून दाखवू लागली.

“अगं दार बंद नव्हत का?” परी

“ते बंद असत तर मी दार वाजवल नसत का?” रावीचा सूर आता जरा वेगळा लागला गेला.

“अशी काय बोलत आहेस?” परी बारीक डोळे करून बघू लागली.

मग रावीने लागलीच स्वतःला सावरल. “मग काहीही काय विचारतेस? मी घरात आली म्हणजे दार उघडच असेल ना.”

“हम्म ते पण बरोबर आहे.” परी विचार करत बोलली.

रावी आली तसा राज त्याच्या कामावर जायला निघाला.

“अरे चहा तर घेऊन जा.” उठलेल्या राजजडे बघत परी बोलली.

“तुला काम करायला मनाई आहे.” राज हलकंच स्मित करत बोलला.

“ही रावी बनवेल की.” परी रावीकडे बघत बोलली. तस तिला रावीचा वाकडा झालेला चेहरा दिसला.

“आता वेगळ काही सांगायची गरज नाही.” राज चिडवण्याच्या सुरात हसून बोलला.

तशी रावी त्याच्याकडे आठ्या पाडून बघू लागली.

“बनवेल की ती.” परी पण कडक आवजात बोलली.

ते ऐकून रावीला टेन्शन आल.

“नको गं.” राज “मला उशीर होत आहे. असही मला काही हवं असत तर मी स्वतः घेतलं असत. मला कोणाकडून घ्यायची गरज नाही.” जाता जाता त्याने टोमणा मारलाच.

तो टोमणा ऐकून रावी त्याला चिडून बघू लागली. ती काही बोलायला जाणार तोच राज तिच्याजवळ जाऊन हळूच बोलला.

“बाईक्स मध्ये तुला खूप आवड आहे ना?” राज “बाईक रेस आणि ती रेस खेळणाऱ्या रायडरमध्ये.”

आता रावीचे डोळे मोठे झाले. ‘ह्याला कस समजलं?’ ती मनातच विचार करू लागली.

नेहमी उत्तरला प्रतिउत्तर देणारी रावी आज चक्क राजसमोर शांत बसली. हे परीला पचल नाही. तिला थेट राजवर शंका आली. त्यानेच काहीतरी रावीची नस पडकली असल्याची तिला खात्री झाली. जसा राज खोलीतून बाहेर पडला. तस परीने तिला घराच दार लावायला सांगितलं.

रावीला वाटलं की परीला काहीच समजलं नसेल. पण ती तर तिच्या ह्या बंधू मंडळींच्या चेहऱ्यावरच्या नस आणि नस सहज वाचू शकत होती. ती आता फक्त रावीच्या घरात येण्याची वाट बघू लागली.

तिकडे दरवाजाजवळ रावीने कोणाजवळ काहीही न सांगण्याची राजला जवळ जवळ धमकीच दिली. ज्याचा राजवर काहीही परिणाम झाला नाही. त्या उलट त्यानेच रावीला त्याच्या शब्दात पकडून घेतलं. तिचं ते सगळ बोलण त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं होत. यावर रावीने त्याच्या तोंडावरच घराच दार आपटलं आणि बडबड करतच परीच्या खोलीत आली.

“आता काय केल?” परीने थेट मुद्याला हात घातला. “जे राजसमोर तू चक्क गप्प बसलीस.”

“काय आहे यार?” रावी वैतागून गेली. “एकीकडे तो ब्लॅकमेल करतोय आणि तू पण सुरु झालीस.”

“आता तुझे कारनामे तसेच असतात ना,” परी पण चिडून बोलली. “आता काय केल आहेस तू?”

“काही नाही.” रावी तिचे गाल फुगवून परीच्या बाजूला बसली. "रेस खेळायला भेटत नाही म्हणून फक्त बघायला गेली होती. तर तिथे सुजय दादा पण आलेला होता.”

यावर परीचे डोळे विस्फारले गेले. “सुजय बघायला आला नव्हता ना.”
तशी रावीने नकारार्थी मान हलवली. “ते तुझ्या राजने पाहिलं आणि तेच तो धरून बसला आहे."

“किती वेळा सांगितल आहे,” परी आता चांगलीच चिडली. “नाही सांगितलं तरी तेच करायचं असत तुम्हाला. त्याला बोलली जरा धीर धर पण नाहीच. नंतर याला परवानगी मिळाली नाही ना तर मला नाही सांगायचं. लाव तर फोन त्याला.”

पण रावी कुठे फोन लावत होती. कारण त्यांची बंधू मंडळी तर सकाळीच तुषारला भेटायच्या तयारीत गेली होती. सुजय तर सकाळीच परी पडली तिथली सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बघायला गेला होता. जसा त्याला आरुषचा फोन गेला तसा तो थेट त्याच्याजवळ जाऊन पोहोचला होता. तिथून ते तुषारच्या जिमकडे जायला निघाले होते.

रावीला फक्त उभी राहिलेली बघून परीने परत तिला आवाज दिला. "अगं लक्ष कुठे आहे तुझ?? सुजयला फोन लाव. एकतर सकाळीच कुठे गेला आहे काय माहित?”

“ह.. हो.. लावते.” रावी हळूच तिचा मोबाईल काढू लागली आणि त्यावर सुजयचा नंबर शोधू लागली.

तिचं ते वागण बघून परीने तिच्या मोबाईलवर नजर टाकली जो तिच्याच बाजूला पहुडलेला होता. रावीची ती नाटक चालू असेपर्यंत परीने फोन लावला देखील होता.

“दी त्याचा फोन लागत नाही...” रावी बोलता बोलता थांबली कारण तिने फोनवर सुजयला ओरडायला सुरवात केली होती.

“झाल आता काही खरं नाही.” रावी हळूच सुस्कारा सोडत बोलली. कारण त्याच्यावर ओरडून झाल्यावर ती रावीवर पण ओरडणार होती.

सुजय जसा आरुष, जय, आदेश यांना येऊन भेटला तसे ते सगळेच तुषारच्या जिमकडे जायला निघाले होते. ते इथे पोहोचलेच होते की सुजयला परीचा फोन आला. पहिले तर त्यांना वाटल की ते तुषारकडे आल्याचे तिला समजले म्हणून फोन करत आहे. पण जस तिने त्या रेसबद्दल ओरडायला सुरवात केली तस सुजयने सर्वांकडे बघत एक सुस्कारा सोडला. त्याने नेहमीप्रमाणे त्याच्या दीचा सगळा ओरडा गपचूप खाल्ला. असही त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता.

परीच फोनवर बोलण झाल्यावर ते तुषारच्या जिममध्ये गेले.
आज परी काही दिसणार नाही म्हणून तुषार जरा नाराज होता. त्याच्या नाराजीच खरं कारण फक्त तेजश्रीला माहिती होत. पण ती कोणाला सांगू देखील शकत नव्हती.

तुषार आज त्याच शांततेतच आवरत होता. नेहमी सकाळीच दोघा भावा बहिणीचा उंदरा मांजराचा खेळ बघायची सवय असेलेल घर आज तुषारकडे बघतच राहील होत. परत तेजश्रीने त्याला ब्लॅकमेल केल तर नाही? अशी शंका घरातल्यांना येऊ लागली. त्यांच्या आईने तर तेजश्रीला कडक आवाजात विचारले देखील होते की तिने काही केल तर नाही ना. यावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली. पुढच्या काही दिवसात त्यांना गावाला पण जायचं होत. तेजश्रीसाठी आलेलं स्थळ त्यांना स्वतः बघून त्यावर घरातल्या सर्वांसोबत चर्चा करायची होती. आता तुषारच अस शांत होऊन वागण त्यांना टेन्शनमध्ये टाकत होत.

“तुषार इकडे ये.” तुषारच्या वडिलांनी त्याला जवळ बोलावलं.

तसा तुषार पटकन त्याच्या वडिलांजवळ आला. “बोला बाबा. जरा पटकन बोला मला जिममध्ये जायचं आहे.”

“आज काय झाल?” तुषारचे वडील “जे एवढा शांत आहेस.”

मग तुषार जरा विचारात पडला. मग त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच्या वडिलांना घेऊन सरळ घराच्या बाहेर त्यांच्या बिल्डींगच्या खाली आला. त्या बिल्डींगच्या समोर असलेल्या बिल्डींगच्याच गार्डन मध्ये ते दोघे जाऊन बसले.

काही काळ शांत बसल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना जे काही काल झाल ते सगळ सांगून दिल. ते ऐकून त्यांनाही जरा धक्काच बसला. त्या मुलीला वाचवल्याबद्दल त्यांनी तुषारच कौतुक देखील केल.
मग तुषारला वाटल की त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावना सांगाव्यात. कारण ते नक्कीच तुषारला चांगल मार्गदर्शन करणार होते.

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडीशी हिम्मत एकवटून सांगायला सुरवात केली. पहिले तर त्याने तेजश्रीच्या कॉलेजची टीचर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा व्हायरल झालेला डान्स बद्दल सांगितलं. म्हणजे तिच्या कौतुकाचे मनोरे बांधायला घेतले.

तुषारच तिच्याबद्दल अस भरभरून बोलण बघून त्यांना त्यांच्या लेकाच्या मनाची जाणीव व्हायला सुरवात झाली. त्यांनी त्यांच्या लेकाला आधी पूर्ण बोलू दिल.

तिच्याबद्दल बोलून झाल्यावर त्याने ती दत्तक मुलगी असल्याचे सांगितले आणि त्याच्या वडिलांकडे बघू लागला.

“आणि ती तुला आवडते,” त्याचे वडील मंद स्मित करत बोलले. “बरोबर ना?”

तसा तुषारने परत एक दीर्घ श्वास घेतला आणि होकारात मान हलवली.

“तिचं काय म्हणण आहे?” तुषारचे वडील

“काही नाही,” तुषार त्याचे दोन्ही तळहात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवत बोलला. “जेव्हा पण भेटते तेव्हा नुसती भांडत असते.”

आता त्याच्या वडिलांच्या कपाळवर आठ्या आल्या.

“त्या दिवशी गाडीच्या शोरूममध्ये नाही का ती मुलगी माझ्याशी भांडत होती.” तुषार त्यांना आठवून द्यायचा प्रयत्न करू लागला. “आणि आईने मला बोलावलं होत.”

“अच्छा ती होय.” तुषारचे वडील “पण ती तर तुझ्याशी भांडत असते तर मग तुला आवडून फायदा काय? कारण ती तर नकारच देणार ना.”

“ती लांबची गोष्ट आहे,” तुषार “पण पहिले तिला ज्यांनी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा पण ना करू शकतात ना?”

“आता त्या वेळेला तू तिथे होतास,” तुषारचे वडील “पण नेहमी तर तू तिच्यासोबत असू शकणार नाहीस. बरं मग तिच्या घरच्यांना कोणाला सांगितलस का?”

“हो तिच्या वडिलांच्या कानावर घातलं आहे.” तुषार “पण ह्याच भीतीने मला ती आवडत असल्याचे समजले. नाहीतर मी पण तिच्याशी नुसताच भांडत होतो.”

“ठीक आहे.” तुषारचे वडील “आधी तुझ्या बहिणीच होऊदे,” तुषारचे वडील जरा विचार करत बोलले. “मग बघू. तोपर्यंत तिच्या मागचं टेन्शन पण जायला पाहिजे.”

“त्याच टेन्शन तुम्ही घेऊ नका.” तुषार हलकेच हसत बोलला. “तुम्ही तिच्या बंधू मंडळींना ओळखत नाही. खूप वेडे आहेत ते त्यांच्या दी साठी.”

“तू कसा काय ओळखतो तिच्या भावांना?” तुषारचे वडील गोंधळून विचारू लागले.

“तेच ते माझे स्टुडन्ट,” तुषार “ज्यांची स्टेट लेव्हल स्पर्धेत चांगली कामगीरी होऊन देखील राजकारणामुळे नॅशनल लेव्हलला त्यांची निवड झाली नव्हती. त्यानंतर मोहिते साहेबांनी जो वादळ उठवलं ते तर तुम्हाला चांगलच माहिती आहे.”

“ती त्यांची मोठी बहिण आहे?” आता तुषारच्या वडिलांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण ते पण त्यांच्या मुलांच्या त्या विद्यार्थ्यांना चांगलेच ओळखत होते. “ठीक आहे. नंतर बघुयात. एकतर तू एकुलता एक आहे आम्हाला त्यामुळे सध्या मी काहीच रिस्क घेऊ शकत नाही. उगीच तिच्यामुळे तुलाही काही झाल म्हणजे?”

“काही नाही होणार मला.” तुषार “पण मला तिचं आवडली आहे आणि करेल लग्न तर तिच्याशीच.”

“असा वेडा हट्ट चांगला नाही रे,” तुषारचे वडील त्याला समजावत बोलले. “आणि तिच्या घरचे नाही ऐकले तर काय करशील?”

“ते पुढंच पुढे बघू,” तुषार “पण तुम्ही आई आणि आज्जीला तयार करायची तयारी करा.”

“म्हणजे मी तयार आहे अस तुला वाटत का?” तुषारचे वडील त्याच्याकडे बारीक डोळे करून बोलले.

“तयार नसते तर इतका वेळ माझ्याशी प्रेमाने बोललेच नसते,” तुषार हलकेच हसत बोलला. “सरळ आईला सांगून माझी धुलाई केली असती.”

तस त्याचे वडील खळखळून हसले. “ठीक आहे. आधी तेजूच निस्तरू. मग बघुयात.”

मग दोघेही परत घरी आले. ते दोघे असे अचानक कुठे गेले गेले म्हणून तुषारच्या आईने दोघांना जरा दटावलं आणि त्यांना चहा नाश्ता आणून दिला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all