Login

अवनी एक प्रवास भाग ४६

आता उत्तम आणि चांगले खेळणारे खेळाडू आपल्या टीममध्ये सामील झाल्याने बऱ्याच क्लासरुमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूपच उंचावला. त्याला अपवाद होता तो रावीच्या वर्गाचा. त्यात असा एकही बाहेर जाणा खेळाडू नसल्याने मनालीच्या टीम मधल्या एक दोन मुलींनी सरळ माघार घेतली होती. त्यात काही मुलींनी समोरच्या टीममध्ये चांगले खेळाडू बघून मनालीला देखील मागे हटण्याचा सल्ला दिला होता.
मागील भागात.

“काय सांगते मी?” रावी

“हो माझी आई,” परी वैतागून बोलली. “जाऊयात. आता हॉलमध्ये जाऊयात?”

“आई मी नाही,” रावी तिचे दात दाखवत बोलली. “मी तर तुझी लाडकी बेबी आहे ना.”

“आता हे काय नवीन?” परी खुदकन हसत बोलली.

“मग,” रावी परीचा दुसरा हात पकडून लाडात येत बोलली. “मोठ्या बहिणीच पाहिलं मुल हे तिची लहान बहिणच असते.”

“बरं.” परी पण तिच्या गालावरून पेमाने हात फिरवून बोलली. “चल आता.” मग त्या दोघी परत हॉलमधे आल्या.

परीला अस हसत येताना बघून तुषारच्या जीवात जीव आला होता. संध्याकाळ होत आली. मग तेजश्रीने निघायची तयारी केली. तिच्या पाठी तिचा ग्रुपने देखील त्यांच्या मॅमला लवकर यायला सांगितलं. नंतर सर्वात शेवटी तुषार उठला आणि त्याला परीसोबत बोलायची संधी मिळाली. त्यानेही पुन्हा परीला डॉक्टरकडे जायची आठवण करून दिली आणि तिला काळजी घ्यायला सांगत घरातून बाहेर पडला.

आताची तुषारची काळजी बघून तिचं मन पुन्हा तिच्या हातातून सुटू लागलं. जणू काही ते स्वतःच तिला चिडवत होत.

आता पूढे.

तुषारचे ते बोलके डोळे बघून रावीला आता तिच्या ह्या सरांवर दाट संशय येऊ लागला. पण मग तिने नंतर विचार केला की त्यांच्या ह्या सरांमध्ये काय कमी आहे? कमावते आहेत, संस्कारी आहेत. दिसायला पण हँडसम आहेत.

रावी तिच्या ह्या विचारात असताना स्वतःच कधी गालात हसायला लागली हे तिलाही समजलं नव्हत. तिला अस हसताना बघून परीने तिला हाताला धरत तिच्या विचारातून बाहेर आणल.

तस रावीने तिच्या दीवर एक नजर टाकली आणि स्वतःच्या कल्पनेत परी आणि तुषारची जोडी देखील उभी केली. मग काय? तिच्या डोक्यातले किडे लागले वळवळायला. तिच्या डोक्यात विविध कल्पना फेर धरू लागल्या.

“अगं चल,” परीने तिच्या हाताला जोरात हिसका दिला. तेव्हा कुठे ती तिच्या विविध रंगाच्या कल्पनेतून खाली उतरून आली.

तिने पाहिलं तर आलेले ते सगळेच निघून गेले होते. परीने त्यांना दारातूनच निरोप दिला होता. तर रावी परीकडे बघून नुसतीच गालात हसत उभी राहिली होती. शेवटी वैतागून परीने तिच्या हाताला जरा ओढलं होत. मग त्या दोघी घरात जाऊन बसल्या.

इकडे खाली उतरून आलेली मंडळी इथूनच एकमेकांचा निरोप घ्यायला लागली. कारण त्यांचे जायचे रस्ते जरा वेगवेगळे होते.
तुषार सोबत तेजश्री आणि सुजाता बसल्या. तर बाकी आपपल्या मार्गाने निघून गेले. त्यांना गेल्यावर बघून तुषारने आठ्या पाडून तेजश्रीकडे पाहिलं. ज्याची कल्पना तेजश्रीला होतीच. कारण त्याला परीसोबत बोलायचं होत जे तेजश्रीसोबत आलेल्या ग्रुपमुळे त्याला जमल नव्हत.

“सॉरी ना दादू.” तेजश्री लाडात येऊन बोलली. “निघताना त्या सगळ्याच अचानक समोर येऊन प्रॅक्टिससाठी चालायला सांगत होत्या. शेवटी मॅमकडे जात असल्याच त्यांना सांगाव लागल. पण मला काय माहित की त्या पण लगेच सोबतच येतील.”

यावर तुषारने फक्त दीर्घ श्वास सोडला. कारण त्यांच्यासोबत सुजाता होती आणि तुषारला वाटल होत की तिला काहीच माहिती नव्हत. म्हणून तो आता तेजश्रीला घरी जाऊन भांडणार होता.

तेजश्रीने मागे वळून सुजाताकडे पाहिलं तर तिचा पण चेहरा उतरलेला होता. तसे तेजश्रीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. दोघांच्या पडलेल्या तोंडाच्या मध्ये ती बसली होती आणि त्यावर ती काहीच करू शकत नव्हती.

इकडे हे सगळे त्यांच्याच धुंदीत असताना तिकडे विजयने त्या आश्रमात एकाचा गळा खूपच जोरात आवळून धरला होता.
ज्या माणसाने विजयने सही करून पाठवल्याची माहिती दुसरीकडे दिली होती. तो माणूस सापडल्याचे आश्रमच्या अधीक्षकाने दुपार नंतर विजयला कळवून दिले होते. आश्रमाच्या एका गुप्त सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो माणूस दिसूनही आला होता. त्या माणसाने त्याचा चेहरा दिसू नये म्हणून बाकी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. पण हा जो गुप्त कॅमेरा लावला होता त्यात तो स्पष्ट दिसला होता.

विजय येईपर्यंत त्या अधीक्षकाने त्याला काहीही सांगितलं नव्हत. पण जसा विजय त्या आश्रमात पोहचला तस त्या माणसाला बोलावून पहिले तर प्रेमाने सरळ भाषेत विचारलं. पण तो त्याच्यावरचा तो आरोप फेटाळू लागला. ते बघुन अधीक्षकाने त्या कॅमेराची व्हिडीओ चालू केली. तो व्हिडीओ बघून त्याच्या चेहऱ्यावर घाम जमा होऊ लागला.

जरा त्याची ततपप झाली तसा विजयने आवरून धरलेला राग उफाळून वर आला. तो रागातच उठला आणि सरळ जाऊन त्या माणसाची गचांडी पकडली.

विजय एक माणूस म्हणून खूपच शांत होता पण ह्यावेळेस त्याच्यातला फक्त बाप दिसत होता. ज्याच्या लेकीला त्या माणसामुळे त्रास झाला होता. त्याने त्या माणसाची गचांडी इतकी जोरात आवळून धरली होती की त्या माणसाचे डोळे आता पांढरे पडायला लागले होते.

पहिले तर त्या अधीक्षकाने विजयला काही अडवलं नव्हत. कारण परी त्यांच्या आश्रमातली खूपच लाडकी मुलगी होती. त्यात ती देखील तिथे शिकवायला येत होती. पण नंतर नंतर जस त्या माणसाचे डोळे पांढरे पडून त्याची जीभ बाहेर यायला लागली तेव्हा ते अधीक्षक पुढे येऊन विजयला अडवायला लागले.

पण विजय काही ऐकायला मागतच नव्हता. शेवटी त्या अधीक्षकांनी त्याला परीची शपथ घातली तेव्हा कुठे विजयने त्याची पकडलेली मान सोडली. नंतर लागलीच त्याची कॉलर पकडली आणि बोलू लागला.

“ज्याने हे काम करायाला सांगितल त्याच नाव, पत्ता आणि पुढे कधी जेव्हा काही काम सांगतील तेव्हा सर्वात पहिले मला येऊन सांगायचं. नाहीतर आता फक्त मी आलो आहे. परत जर तू अस काही केलस तर परीच्या बंधू मंडळीना पाठवेल.”

“सॉरी,” तो माणूस त्याचा गळा पकडून बोलला. कारण तो खूपच दुखायला लागला होता. “त्यांनी नाव तर नाही सांगितलं. पण ते पैसे दिले होते म्हणून सरांनी आणलेल्या कागदांचा फोटो त्यांना दिला. आता ते परीच्या बाबतीत होत ते मला माहिती नव्हत. नाहीतर आधी मी सुजयला सांगितल असत.”

“सुजयला?” विजय गोंधळून गेला.

“ते आश्रमात परी आल्यावर तिची काळजी घेण्यासाठी त्याने मला सांगितल आहे.” तो माणूस बारीक आवाजात बोलला. “ते मागे एकदा काही माणस इथे रात्रीची आली होती, परीची माहिती विचारायला. तेव्हा मी त्यांना इथून हाकलून दिल होत. पण नंतर जस परीचा नंबर दिला म्हणून त्या दूस-या एका मॅनेजरला सुजय आणि बाकी जणांनी मिळून...” तो बोलता बोलता थांबला. कारण पुढे त्याच काय झाल असेल हे त्याला वेगळ सांगायची गरज भासली नाही.

“म्हणून तो इथली नोकरी सोडून गेला?” अधीक्षकाने डोळे विस्फारून विचारलं.

“गेला नाही जाणार आहे.” तो माणूस “एकदा का हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज मिळाला का. तो इथे नाही म्हणून वाटत त्यांनी मला फक्त फोटो काढून पाठवायचे लाखभर रुपये दिले.”

“मग आधी सांगता येत नाही?” विजय चिडून बोलला.

“तुम्ही मला बोलायची संधी कुठे दिली?” तो माणूस बारीक आवाजात बोलला. “मी बोलेपर्यंत तुम्ही माझ्या गळ्याशी पण पोहोचला होता.” तस विजयने त्याला पाणी दिल.

त्याने दोन घोट पाणी पिल. “आता तुमचा परीवर किती जीव आहे ते मला माहिती आहे. मग तेव्हा जरी काही बोललो असतो तरी फायदा नव्हता.”

“अम्म सॉरी.” विजय आता शांतपणे बोलला. “ते रागात असल्यामुळे ताबा सुटला.”

“अहो तुम्ही थांबले तरी.” तो माणूस “तुमची मुल एक सेकंद पण थांबत नाहीत. तिथे पोलीस आले होते यांनी आरुषला बघून उलट त्या मॅनेजरलाच दम दिला.”

आता मात्र विजयला हलकसं हसू आल.

मग विजय तिथे थोड्याफार गप्पा मारल्या आणि घराकडे निघून आला.

इकडे रावीच्या कॉलेजमध्ये आता स्पोर्ट्स पण चालू झाले होते. त्यामुळे कॉलेजमधले लेक्चर सध्या तरी बंद झाले होते. पण स्पोर्ट्सचे काम असल्याने परीला कॉलेजला जाव लागत होत. दोन दिवस तिने घरात आराम केला आणि नंतर लगेच कॉलेजला जॉईन झाली. ह्या वेळेस रावी स्वतः तिला घ्यायला आली होती. परीची स्कुटी दुरुस्त होऊन अजून तरी आली नव्हती. जरी ती दुरुस्त होऊन येणार होती तरी परीला आता एकटीला कोणीही सोडणार नव्हते. तिला तशी सक्त ताकीदच विजयकडून मिळाली होती.

आता स्पर्धा म्हटली की डावपेच आलेच. कॉलेजतर्फे स्टेट आणि आंतरमहाविद्यालीन स्पर्धेत खेळायला जाणारे विद्यार्थी आता त्यांच्या क्लासच्या टीममध्ये येऊन सामील झाले. त्यांना आलेल्या अनुभवाने ती त्यांची क्लासची टीम तयार करू लागले.

आता उत्तम आणि चांगले खेळणारे खेळाडू आपल्या टीममध्ये सामील झाल्याने बऱ्याच क्लासरुमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूपच उंचावला. त्याला अपवाद होता तो रावीच्या वर्गाचा. त्यात असा एकही बाहेर जाणारा खेळाडू नसल्याने मनालीच्या टीम मधल्या एक दोन मुलींनी सरळ माघार घेतली होती. त्यात काही मुलींनी समोरच्या टीममध्ये चांगले खेळाडू बघून मनालीला देखील मागे हटण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे नाईलाजाने रावीला पण खेळांसाठी नाव द्याव लागल होत. म्हणजे मनालीने तिला न विचारता तिचं नाव दिल होत आणि नंतर तिला सांगितलं होत.

ह्यात एक गोष्ट चांगली होती की तिची बाकीची टीम तिच्यासोबत उभी होती. कारण मनाली कोण आणि काय होती? हे त्यांना चांगलंच माहिती होत. तिचा खेळ देखील उत्तम होता. कारण मागचे दोन वर्ष मनाली तिच्या टीमला जिंकवत आली होती. ह्या वर्षी तरी आपली टीम जिंकावी ह्या उद्देशाने ते सगळे खेळाडू त्यांच्या त्यांच्या टीमकडून उतरणार होते.

नेहमी रेसची माहिती गोळा करणे आणि संधी भेटली की बाईकच्या रेसला जाणे इतकच माहिती असलेल्या रावीला खो खो या खेळाचा क देखील माहिती नव्हता. त्यात मनालीने तिला न विचारता नाव दिल्याने रावी चांगलीच चिडीला आली होती. पण मनालीने तिला तिच्या मैत्रीची शपथ घालून खेळायला तयार केल होत.

सरावाचे दिवस संपून खेळला सुरवात झाली.

आता रावीचा खेळ बघायला तिची बंधू मंडळी येणार नाही अस कधी होणार होत का? त्यात ती अशी पहिल्यांदाच खेळत होती. मग तर त्याचं येण हे तर शास्त्रच होत. परी देखील रावीला खेळताना बघायला तिथे उभी होती.

पहिल्या काही मॅच मनालीची टीम सहज जिंकल्या. पण नंतर स्टेट लेव्हलचे खेळाडू असणाऱ्या टीमसोबत त्यांची मॅच लागली. आता मनाली त्यांच्याविरुद्ध कशी खेळते? हे सगळ कॉलेज बघायला हजर झाल होत.

आता कॉलेजमधली मुलगी किती काळ आपल्यासमोर टिकेल या तोऱ्यात त्यांनी खेळायला सुरवात केली. पण ह्या मॅचमध्ये मनालीने तिची खेळ खेळायची पद्धतच बदलली जी समोरच्या टीमला समजूनच आली नाही आणि बचावला उतरलेले ते दोन खेळाडू मॅच सुरु झाल्याच्या पाच पाच सेकंदाच्या अंतरावर बाद झाले. त्यांनाही समजल नाही की कधी मनाली आली आणि त्यांना स्पर्श करून गेली.

मनालीचा तो आवेश बघून तिची टीमसुद्धा जोशात खेळायला लागली. मनाली आणि तिच्या टीमला हलक्यात घेतलं असल्याच आता त्या स्टेट लेव्हल खेळणाऱ्या खेळाडूंना जाणवलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मनालीने त्या दहा मिनिटाच्या कालावधीत तिच्या टीमचा स्कोर चांगलंच वाढवून ठेवला होता. नंतर बचावाच्या वेळी देखील मनालीने त्यांना चांगलच तंगवून ठेवलं होत.

रावीच्या वेळेस तिला अस पहिल्यांदाच खेळताना बघून तिच्यावर जरा कमेंट्स देखील पडल्या होत्या. रावीने तीन चार वेळा त्याकडे दुर्लक्ष केल. पण नंतर मात्र तिच्या डोक्यात तिडीक गेली आणि तिने तिचं धावणार डोक शांत केल. तिला फक्त बचाव करायचा होता. नुसतच धावून काही उपयोग नव्हता. जे तिने समोरच्या टीमचा बचाव पाहिला असल्याने मग तिला जरा कल्पना आली. ती अशी एक जागा निवडायची जिथे त्या टीमचे धावून धावून दमलेले खेळाडू बसायचे. तिथे तिला समोरच्या टीमला चकवा द्यायला सोप जाऊ लागल. मग आधी नुसतीच धावणारी रावी आता फक्त तिच्या शरीराची माफक हालचाल करत त्या टीमच्या खेळाडूंना चांगलच चकवा देऊ लागली.

स्टेट लेव्हलचे खेळाडू असल्याचा विश्वास आता डळमळला गेला. मनालीची टीम जिंकली गेली. परी तर पहिले रावीला जाऊन भेटली आणि तिचे गाल ओढून तिचे अभिनंदन केल. कारण तिला मनालीचा खेळ तर माहिती होताच. तिच्या मागे तिची बंधू मंडळी होतीच.

नंतरच्या दोन्ही मॅच अतीटतीने मनाली आणि तिच्या टीमने जिंकली होती. आता उद्या सर्वात शेवटी अंतिम सामना खेळवला जाणार होता.
मनालीचा खेळ तिच्या घरापर्यंत पण जाऊन पोहोचला होता. तिने मोठमोठ्या खेळाडूंना हरवलं ते ऐकून आज तिचे आई वडील देखील आले होते.

आता माघार घेतलेल्या त्या दोन मुली टीममध्ये येऊ बघत होत्या. पण मनालीने सरळ त्यांना नकार दिला.

आजचा हा खेळ नुसताच खेळ नव्हता तर स्टेट लेव्हलचे खेळाडू आणि कॉलेजमधले खेळाडू असा झाला होता. कारण ह्या अंतिम सामन्यात समोरच्या टीममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू हे बाहेर स्पर्धेत खेळणारे होते. आता प्रश्न त्यांच्या खेळावर आलेला होता. बाहेरच्या स्पर्धेत इतके चांगले खेळणारे खेळाडू त्यांच्या वर्गाच्या टीमला साध जिंकवू देत नाही? हा विचारचा त्यांना सहन होत नव्हता. मागील दोन वर्ष मनाली कशी काय तिच्या टीमला जिंकवून देत होती हे त्यांना आता जरा समजायला लागल होत.

अंतिम सामन्याचा खेळ चालू झाला. आज तर मनाली दुप्पट आवेशात खेळत होती. जणू काही तिला मागे हटायचा सल्ला दिलेल्यांना, तिच्यावर हसणाऱ्याना ती सडेतोड उत्तर देत होती.

हा सामना खूपच अतीटतीचा चालू होता. कधी पारड मनालीच्या टीमकडे तर कधी विरुद्ध बाजूच्या टीमकडे जायचं.

तिचा आताचा चाललेला खेळ आणि तिच्या नावाने दुमदुमत असणार ते कॉलेज बघून मनालीच्या आई वडिलांना आता जरा वाईट वाटायला लागल होत. ती तिच्या शाळेत असताना शाळेकडून बऱ्याच वेळा बाहेर जाऊन जिंकून आलेली होती. पण तिचं स्पर्धा लांब असली की तिला ते पाठवतच नव्हते. तेव्हा तर तिला खेळू दिल असत तर कदाचित ती आज खूपच पुढे गेली असती याची जाणीव त्यांना आता झाली होती.

डोळे फाडून मनालीचा खेळ बघणाऱ्यामध्ये रावीची ती बंधू मंडळी पण होती. त्यात मनालीने खेळाडू बाद करण्यासाठी मारलेले सूर कधी त्यातल्या एकाचा हृदयाचा ठाव घेऊ गेले जे त्यालाही समजलं नव्हत. तो त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप देखील करत नव्हता. न जाणो तिचा खेळ खेळताना तिची एखादी अदा त्या उघडझाप केल्यामुळे बघता येणार नाही.

आता त्यांचा खेळ अंतिम क्षणाकडे पोहोचला होता. मनालीला जिंकण्यासाठी एक खेळाडू बाद करायचा होता. घड्याळाचा काटा अंतिम क्षणाकडे पळत होता आणि मनाली त्या एका खेळाडूच्या मागे पळत होती. दोन्ही जवळ जवळ येत होते. एका सेकंदाला मनालीने एक जोरात सूर मारला आणि समोर धावणाऱ्या खेळाडूच्या पायाचा वेध घेतला आणि दुसरीकडे वेळ संपल्याची घंटा वाजली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all