मागील भागात.
रावी आणि मनालीचे जसे लेक्चर संपले तश्या त्या दोघी लागलीच डान्सची प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. रावीला तिच्या दीचा डान्स बघण्याची संधी सोडायची नव्हती. त्या दोघी धावतच डान्सची प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या बघतच राहिल्या. कारण त्या वर्गाच दार तर लावून घेतलं होत. त्या वर्गाच्या उघड्या असलेल्या खिडकीत मुला आणि मुलींची तुफान गर्दी होती. ते बघून दोघींनी एकमेकींकडे पाहिलं.
आता काय करायचं? म्हणून दोघी विचारात पडल्या. परी तर काही आता फोन उचलणार नव्हती आणि त्यांच्याकडे तेजश्रीचा नंबर देखील नव्हता. मग काय? बसल्या की त्या दोघी तोंड पाडून.
त्यांना बसून थोडा वेळ झाला ही नसेल तोच त्या वर्गाचा दरवाजा उघडला गेला. तश्या त्या दोघी पटकन उठल्या आणि दरवाजाजवळ जाऊ लागल्या. पण त्याचं नशीब इतक खराब होत की त्यांची आजची डान्सची प्रॅक्टिस संपली होती आणि परी वर्गातून बाहेर पडत होती.
“काय गं दी.” रावी लगेच परीजवळ जात बोलली.
तिच्या अस तोंड पाडून बोलण्यावर परीने तिच्यावर डोळे वटारले. तस तिने अजूनच तोड वाकड केल आणि तिथून जाऊ लागली.
आता पूढे.
“अगं थांब,” मनालीने तिला थांबवून पाहिले. पण ती काही थांबली नाही बघून ती तिच्या मागे मागे जाऊ लागली. “माझ्या घरी फोन करायचा आहे विसरलीस का?”
मनालीच्या आवजाने रावी लागलीच थांबली. ती तर थांबली होती पण परी मात्र घाईघाईत तिच्या बाजूने पुढे निघून गेली. थांबलेली रावी पटापट जाणाऱ्या परीला बघत राहिली. नेहमी तोंड पाडलं की मनवायला येणारी परी आज तिच्याकडे दुर्लक्ष करून एवढ्या घाईत कुठे चालली? हा विचार रावी करत राहिली.
ती त्याच विचारात असेपर्यंत मनाली रावीजवळ येऊन पोहोचली. “चल, तुझ्या दादाचा फोन आला.”
मनालीने रावीच्या हाताला पकडून तिला तिच्या विचारांच्या बाहेर आणलं.
“पण दी एवढ्या घाईत कुठे गेली?” रावी मनालीकडे बघत बोलली. “तिला एकटीला जायला मनाई आहे ना? तरी माझ्याकडे न बघता पटकन निघून गेली? दीला स्कुटी मिळाली तर नाही ना?”
“एवढचं आहे तर फोन लाव आणि विचार.” मनाली
“अरे हा.” एवढ बोलून रावीने तिचा मोबाईल काढला आणि त्यावर परीचा नंबर काढून फोन लावला.
परी घाईघाईत तिच्या स्कुटीजवळ चालली होती. जी कालच घरी दुरुस्त होऊन आली होती. तिच्या डान्सची प्रॅक्टिस जशी संपली तस तुषारचा तिला डेटची आठवण करून देणारा मेसेज आला होता. तो तिने पाहिला आणि कोणी तिला बघण्याच्या आत ती कॉलेजमधून निघाली होती.
ती तिच्या स्कुटीजवळ पोहोचतच होती की तिचा मोबाईल वाजला. त्यावर रावीच नाव वाचून तिने एक सुस्कारा सोडला. पण तो उचलावा तर लागणार होता म्हणून तिने तो उचलला.
“मी आलीच तासाभरात,” तिला काही न बोलू देता परी बोलली. “लगेच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. असही माझ्या स्कुटीला जीपीएस सिस्टीम लावलीच आहे आता एखादा कॅमेरा पण लावा. बस खुश.”
एवढं बोलून तिने फोन ठेवून देखील दिला.
एवढं बोलून तिने फोन ठेवून देखील दिला.
“अरे मला तर बोलू...” हे देखील रावीला परीने बोलू दिल नव्हत. “अरे यार, काय झाल दीला?”
“काय झाल?” मनाली
“बघ ना,” रावी “मी फोन लावला आणि मलाच बोलू दिल नाही. आलीच तासाभरात बोलून फोन ठेवून दिला.”
“मग येतील त्या तासाभरात.” मनाली “पहिले माझ्या घरी बोलूयात ना. प्लीज.”
“अरे हो,” रावी लागलीच खट्याळ झाली. “कोणालातरी भेटायला जायचं आहे नाही का?”
तशी मनालीच्या गालावर लाली पसरली.
“अरे वा !” रावी मनालीचे गाल बघत बोलली. “ब्लशिंग?”
“जा ना आधी फोन लाव.” मनाली तिचा मोबाईल रावी समोर धरत बोलली.
रावीने मनालीकडे बघतच तिच्या आईला फोन लावला. दोन ते तीन रिंगमध्ये तो फोन उचलला गेला.
“काय ओ मावशी?’ रावी “तुम्ही माझ्या मनुला माझ्यासोबत पण नाही पाठवणार?”
“पण तुझी मनु तर आम्हाला तशी काही बोललीच नाही.” मनालीची आई पण रावीचा सूर धरून बोलू लागल्या. “नाहीतर माझी इतकी हिम्मत की तुझ्यासोबत पाठवायला मनाई करू?”
“काय ओ मावशी?” रावी नाटकी आवाजात बोलली. “गरीबाची मस्करी करताय.”
“सुरवात कोणी केली?” मनालीची आई “आठवत का? जेव्हा तुझी आणि तिची मैत्री झाली होती तेव्हा पहिल्यांदाच नाही बोलली तर घरी येऊन माझ्यासमोर तिला उचलून घेऊन गेली होतीस?” आता मात्र त्या हसू लागल्या.
ते ऐकून रावी पण खुदकन हसली. “उचलून काय ओ? मी काय तिचा बॉयफ्रेंड आहे उचलून न्यायला? तुम्हाला विचारून घेऊन गेली होती.”
“त्याला विचारण नाही ब्लॅकमेल करण म्हणतात.” मनालीची आई
“सॉरी ना आता.” रावी “किती दिवस ते ऐकून दाखवणार?”
“बरं,” मनालीची आई “आता कुठे दौरा?”
“जास्त लांब नाही,” रावी “आम्ही म्हणजे आम्ही बंधू मंडळी जिथे जातो त्या कॅफेमध्ये जाणार आणि तासाभरात परत येणार.”
“अच्छा,” मनालीची आई “तरीच तुला फोन करायला लावला. शहराबाहेर जे जायचं आहे.”
“जाऊद्या ना आता.” रावी हट्ट करत बोलली. “एकदा का लग्न झाल की विचारायची गरजच रहाणार नाही.” रावी भावनेच्या भरात बोलून गेली.
रावीच बोलण ऐकून मनालीच तोंड उघड पडल तर तिची आई तिकडे गोंधळून गेली.
“म्हणजे?” मनालीची आई गोंधळून विचारू लागली.
इकडे रावीने पण तिची जीभ चावली. “म्हणजे तिचं लग्न झाल की मी माझ्या जीजूंना विचारेल ना. तेव्हा तुम्हाला त्रास नाही देणार.”
“हे भगवान,” मनालीच्या आईने कपाळाला हात लावला. “तुम्ही ना कोणलाही सुखाने जगू देऊ नका.”
“आता मी तुमच्या लेकीला घेऊन जात आहे.” रावी जणू काही ऑर्डर सोडत बोलली.
“मग मला विचातेस कशाला?” मनालीची आई
“उद्या तुम्ही अस नको बोलायला की तुम्हाला विचारलं नाही.” रावी तोऱ्यात बोलली.
“वाह,” मनालीची आई “तुला कोपऱ्यापासून दंडवत.”
तशी रावी हसू लागली. “सोडेल तिला तासाभरात घरी. नका काळजी करू.”
“तू असताना तरी मला तिची काळजी नसते.” मनालीची आई आता जरा भावूक झाली.
“चल ठेऊ मग?” रावी
जस मनालीच्या आईने होकार दिला तसा रावीने फोन ठेवला आणि मनालीकडे बघू लागली.
“तुझ्यामुळे मी एका दिवशी खूप मार खाणार आहे.” मनाली तिचा फोन घेत बोलली.
“अरे,” रावी “मी तर तुला मदत करत होती ना?"
“ही अशी?” मनाली “काय बोलली आईला? की तिचं लग्न झाल्यावर विचारायची गरज पडणार नाही?”
“सॉरी ना बेबी.” रावीने हलकेसे कान पकडले. “चला आता तुमच्या हमसफरकडे तुला नीट पोहोचवायच आहे.”
“येडपट,” मनालीने पुन्हा रावीच तोंड दाबल. कारण ती पुन्हा मोठ्याने बोलली होती. “हळू बोल ना.”
मग काय? रावीने परत तिची जीभ चावली आणि दोघी कॉलेजमधून बाहेर पडल्या. रावीने मनालीला तिच्या बाईकवर घेतलं आणि त्यांच्या त्या नेहमीच्या कॅफेकडे जायला निघाल्या. त्या रस्त्यातच होत्या तोपर्यंत आरुषचा दोन वेळा फोन येऊन गेला होता.
आता रावी बाईक चालवत असेल म्हणून त्याने मनालीच्या फोनवर फोन लावला. ते बघून रावीने लगेच संधी साधली आणि ‘आता बहिणीची गरज नाही.’ अस आरुषला सुनावू लागली. आरुष तर तिला चांगलाच ओळखत होता. त्यामुळे तिची ती मस्करी त्याने काही मनावर घेतली नाही. उलट तिलाच त्याने ‘मनालीला वहिनी बोल्याची सवय कर.’ अस बोलत चिडवायला सुरवात केली.
मनालीने रावीच्या सांगण्यावरून फोन स्पीकर वर ठेवला असल्याने आरुषच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकून तिचे गाल लगेच गुलाबी झाले होते. चेहऱ्यावर लाजेची छटा पसरायला सुरवात झाली होती. तरी रावी बाईक चालवत असल्याने तिला काही मनालीचा चेहरा दिसत नव्हता. नाहीतर तिने आत्तापासूनच मनालीला चिडवायला सुरवात केली असती. नंतर मात्र तिने फोन ठेवायला लावला आणि बाईक चालवण्याकडे लक्ष देऊ लागली.
मनालीची तर इच्छा नव्हती फोन ठेवायची पण आता काही वेळातच ते समोरासमोर भेटणार होते आणि रावी देखील आता सोबत होती. त्यामुळे तिने ‘थोड्यावेळात पोहोचू.’ अस सांगून फोन ठेवून दिला.
डान्सची प्रॅक्टिस संपल्यावर तेजश्रीने तुषारला फोन लावला. अर्थात तो सुजाताने लावायला सांगितला होता. तिला आता धीर धरवला जात नव्हता. असही त्याला घ्यायला यायला बोलावयाच होत. म्हणून तेजश्रीने देखील लगेच लावायला घेतला.
पण आज दोघींची फजिती झाली. कारण तुषारने आज तो कामात असल्याच सांगत त्यांच्या कॉलेजला यायला नकार दिला.
“तेजू जर ह्या वेळेस मला जायला जमल नाही ना तर बघ. “सुजाता आता चिडून बोलली.
“हे बघ सुजाता,” तेजश्री आता समजुतीच्या सुरात बोलली. “मी आधी पण दादासोबत ह्या विषयावर बोलली आहे. त्याच्यामते तू त्याचा नाद सोडलेलाचं बरा. तो नाही तयार होणार.”
“ते मी माझ बघून घेईल.” सुजाता परत हट्टाला आली. “पहिले मला भेटू तर दे.’
“ठीक आहे भेट तू,” तेजश्री “पण उगाच आस नको लावून ठेऊ. म्हणजे नंतर तुला काही त्रास..” ती बोलता बोलता थांबली. कारण सुजाता तिला रोखून बघायला लागली होती.
“सुजाता यार,” तेजश्रीला समजतच नव्हत की तिला कस समजावून सांगाव? “त्याची चॉईस खूप वेगळी आहे. तू नाही बसणार त्यात..”
“तुला काय माहित त्याची चोइस?” सुजाता
“बोलली ना,” तेजश्री “दादा सोबत बोलली आहे म्हणून. दादा तर त्यांना खूप जवळून ओळखतो.”
“पण एकदा बोलून बघायला काय हरकत आहे?” सुजाता केविलवाण्या आवजात बोलली.
“बघ बाबा.” तेजश्रीने देखील तिला समजावण्याचा हट्ट सोडला. “मी सांगायचं काम केल.”
“बघू.” सुजाता आज खरोखर तेजश्रीवर चिडली आणि तिथून चालली गेली.
“अगं.” तेजश्रीने सुजाताला आवाज देऊन पाहिला. पण ती काही थांबली नाही.
शेवटी तेजश्रीने एक सुस्कारा सोडला आणि घरी जायला निघाली. तुषार देखील त्यांच्या कॅफेमध्ये जाऊन पोहोचला होता आणि परीची वाट बघत बसला.
परी देखील काही वेळातच त्या कॅफेजवळ जाऊन पोहोचली. ‘आजचा दिवसच ह्या दगडाला सहन करायचं आहे.’ परी मनातच स्वतःला समजावून सांगू लागली. ‘नंतर त्यांच तोंड पण बघायचं नाही.’ ती मनातच बडबड करत चालली होती.
ती कॅफेच्या दरवाजाजवळ पोहोचलीच होती की ती जाऊन कशाला तरी धडकली. जशी ती धडकली तस तिला कळून चुकल की ती परत त्यालाच जाऊन धडकली होती. कारण त्यांची पहिली भेट ही अशीच धडकून झाली होती आणि ती धडक परी विसरूच शकत नव्हती.
“आउच.” परी स्वतःच्या कपाळाला हात लावून बोलली. “अस कोण मधेच येऊन उभ रहात?” परी वर न बघतच बोलली.
“तूला कस समजल की मीच आहे ते.” तुषार
“दगडाचा फटका लगेच समजतो.” परीने आत्ताशी वर पाहिलं.
तिची ही वर डोळे करून बघायची अदा तर तुषारला वेड करत होती. तो तिथेच तिच्या त्या खोल आणि मोठ्या डोळ्यात हरवला.
त्याची ती डोळ्यात रोखलेली नजर बघून परी अस्वस्थ होऊ लागली. तिच्या डोळ्यासमोर परत व्हिडीओ रेकोर्डिंगमधला तुषार उभा राहीला.
“चलायचं ना?” परीने त्याला भानावर आणले. “मला उशीर होईल.”
“अं?” तुषार लगेच सावरत बोलला. “हो चल.”
मग ते दोघेही आत जाऊन बसले.
“तुला आवडेल तर ऑर्डर कर.” तुषार परीकडे बघत बोलला.
“मला?” परी गोंधळून गेली. “माझ अस काही नाही. तुम्हीच मागवा.”
“काही नाही म्हणजे?” तुषार “तुझी पण काहीतरी आवड असेल ना?”
“माझी आवड?” परी “कधी त्याचा विचारच केला नाही. माझ्या कुटुंबाच्या विचारापुढे मला काहीच दिसत नाही.”
“मग तुझ्या बाबांनी पण कधी काही विचारलं नाही का?” तुषार
“त्यांनी तर मी न मागता सगळ काही माझ्या पुढ्यात आणून ठेवलं होत.” परीचे डोळे जरा ओलावले.
आता परीच्या डोळ्यात तुषारला अभिमान दिसला.
“असही त्यांनी मला एवढं सुंदर आयुष्य दिल आहे,” परी पुढे बोलू लागली. “त्यात माझ्या आवडी कुठे विरून गेल्या ते मलाच समजल नाही.” ती तिच्या बदलेल्या आयुष्याच्या विचारात हरवली.
“अगदी तुझा डान्स पण ना.” तुषार
तशी विचारात असलेली परी तिच्या त्या विचारांच्या बाहेर आली. “ते पण तुमच्यामुळेच बाहेर पडल.” परी कपाळवर आठ्या पाडत बोलली.
“मी काय केल?” तुषार गोंधळून गेला.
“तो मास्कवाला आमचा फोटो तुम्हीच काढला होता ना तो?” परी
“म्हणजे तू मला ओळ्खलं होतस ना?” तुषार
“हो,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “तेव्हा कोणी त्याबद्दल विचारू नये म्हणून मी ओळख दाखवली नाही.”
यावर तुषारने फक्त नकारार्थी मान हलवली आणि मेनू कार्ड बघू लागला. तुषारला मेनू कार्ड बघताना पाहून तिथला वेटर गोंधळात पडला. कारण त्याने तिथे आल्यावर कधीही मेनू कार्ड पाहिलं नव्हत. आता त्या वेटरला तरी काय माहिती की तो कशातही मेनूकार्ड बघत होता? पण तिला काय ऑर्डर करावं तेच त्याला सुचत नव्हत.
तुषारचा तो गोंधळ परीला समजून आला. आपल्यामुळे कोणाला इतका त्रास नको म्हणून तिने बोलायला सुरवात केली.
“ऐका ना,” परी हळूच बोलली. उगाच त्याला वाईट वाटू नये म्हणून. “मला कॉल्ड कॉफी चालेल. ती लवकर देखील संपेल.”
“इतकी बोर आहे का माझी कंपनी जे तुला लवकर संपवून लवकर जायचं आहे?” तुषार मेनूकार्डवर असलेली नजर वर करत बोलला.
“तस नाही,” परी “माझ्यामुळे उगाच तुमच्या डोक्याला त्रास नको.”
आता तुषार तिला बघतच राहीला. “मला जेव्हा पण भेटतेस तेव्हा भांडतच असतेस आणि आता त्रास नको पण बोलत आहेस?” त्याने त्याच्या मनातली शंका विचारली.
“मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला,” परी “भले तो शत्रू का असेना?”
तिच्या ह्या विचारांना ऐकून तुषार परत तिच्यात हरवला आणि त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने तिचा डान्स दिल्लीला पहिला होता. मग त्याला लागलीच त्याने चोरून ऐकलेलं बोलण आठवलं. ते आठवताच तुषारच्या चेहऱ्यावर चमक आलील आणि त्याने वेटरला बोलवलं. परीला ऐकूही जाणार नाही अश्या आवाजात त्याने वेटरला ऑर्डर दिली.
‘हे इतक्या बारीक आवाजात का बोलत आहेत?’ परी मनातच विचार करत बोलली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा