Login

अवनी एक प्रवास भाग ६१

त्याला अस व्हिडीओ मध्ये मग्न झालेलं बघून तेजश्रीला खूपच भरून आल. तिच्या ह्या दादाचा त्यांच्या मॅममध्ये किती जीव अडकला आहे ते तिला चांगलच ठावूक होत? आता आई बाबांचं बोलण ऐकून सध्यातरी तिच्या दादाच्या प्रेमाची गाडी पुढे सरकण शक्य होताना दिसत नव्हत. पण ती देखील तिच्या दादाच्या सावलीत वाढलेली होती. अस सहज थोडीच माघार घेणार होती. आता तर काही करून दादाच्या आयुष्यात त्याच्या प्रेमाला आणायचं तिने मनातच ठरवलं.
मागील भागात.

तेजश्री किचनच्या दिशेने निघून गेली. ती गेल्यावर तिच्या आईने परत तिच्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यांनी तिला बाजूला बसवलं आणि परीबद्द्ल तिला सांगून दिल. आज ना उद्या तिला बाहेरून समजण्यापेक्षा स्वतःहून सांगितलेलं त्यांना बरोबर वाटल.

परीबद्द्ल ऐकून तुषारची आई टेन्शनमध्ये आली. अपेक्षेप्रमाणे तिने नकार घंटा वाजवायला सुरवात केली. तिच्या मते तुषार एवढा चांगला मुलगा आहे तर त्याला मिळणारी मुलगी पण तिला खानदानी हवी होती. त्यात तिला किडनॅप करण्याचा झालेला प्रयत्न ऐकून तर ती अजूनच घाबरून गेली होती. तिच्यामुळे तुषारच्या जीवाला पण धोका होऊ शकतो ही काळजी तिच्या डोक्यात थैमान घालू लागली. आता स्वतःच्या पोटच्या मुलाच्या जीवाला असणारा धोका ऐकून कोणीतीही आई घाबरणारच की. आता तुषारच्या आईच तेच झाल. ती पुरती बिथरली गेली.

तुषारच्या वडिलांनी तुषारची बाजू पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला पण तुषारची आई काही ऐकायला तयार झाली नाही. उलट त्याने जे तिच्या मनाप्रमाणे लग्न नाही केल तर आयुष्यभर त्याच तोंड बघणार नाही अशी त्याला धमकी द्यायला लावली.

पण तुषारच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून ते काही तुषारला अस काही बोलणार नाहीत अस तुषारच्या आईला वाटून गेल. तशी ती उठली आणि सरळ तुषारच्या खोलीकडे जाऊ लागली.

आता पूढे.

“थांब,” तुषारचे वडील गरजले. तशी पुढे जाणारी त्यांची बायको जागीच थांबली. कारण तुषारच्या वडिलांचा सूर अगदीच निर्णायक लागला होता. ज्याला तुषारची आई कधीच ओलांडत नव्हती. “तुला तुझ्या लेकावर विश्वास नाही का?”

“मला फक्त त्याच्या जीवाची काळजी आहे.” तुषारची आई “एका आईला एवढा तरी हक्क असतोच ना.”

“असतो ना, “तुषारचे वडील जरा नरमाईने बोलले. “पण तू मागचा पुढचा काहीच विचार न करता सरळ तोंड बघणार नाही अशी त्याला बोलायला निघाली होतीस. अश्याने तू त्याला स्वतःपासून लांब करशील. तो खूपच गुंतला आहे तिच्यात.”

“तो मला सोडून कुठेच जाणार नाही.” तुषारची आई चिडून बोलली.

“बरोबर आहे,” तुषारचे वडील “तुला सोडून तो कधीही आणि कुठेही जाणार नाही. पण मग तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील करणार नाही. माझ त्याला सगळं समजावून झाल आहे. सध्या फक्त त्याच्या कलाने घेऊयात. पुढच पुढे बघुयात.”

“फक्त त्याला काही होऊद्या,” तुषारची आई अजूनच चिडून बोलली. “तुम्हालाही बघते आणि त्या मुलीला पण बघते. अजून घरात आली पण नाही की लगेच आईला तिच्या मुलापासून लांब करायला लागली."

“तुला खरचं अस वाटत की त्या मुलीला आई वडिलांची किंमत माहिती नसेल?” तुषारचे वडील

“अश्या मुली पैश्यांसाठी काहीही करू शकतात.” तुषारची आई

“पैश्यांसाठी?” तुषारचे वडील हलकेसे हसले. “तिने मनात आणलं ना तर तिचे वडील जगातली बेस्ट आणि महागातली लक्झरी गाडी दारात उभी करतील. तिला डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सोन्याने मढवतील. पण तिनेच कधी तिच्या वडिलांच्या त्या संपत्तीचा असा वापर केला नाही.”

“हे सगळ तुमच्या लेकानेच सांगितलं असेल ना?” तुषारची आई तिरस्काराने बोलली.

“तो कशाला सांगेल?” तुषारचे वडील “पूर्ण कॉलेजला ते माहिती आहे.”

“म्हणजे तुम्हीच सगळ ठरवलं आहे.” तुषारची आई “मग मला कशाला काही विचारता? मला काही सांगू पण नका आणि जे करायचं आहे ते करा.” एवढं बोलून तुषारची आई तिच्या खोलीकडे जायला निघाली.

“तुला विचारयचं आहे म्हणून तर त्याने तिलाही अजून काही विचारलं नाहीये.” तुषारचे वडील

तशी जाणारी तुषारची आई परत थांबली. “म्हणजे?”

“तो आधी तुला कॅनव्हींस करणार आहे मगच तिला विचारणार आहे,” तुषारचे वडील “जर तू नाहीच म्हटली तर तो तिला काहीच न विचारता तसाच रहाणार आहे.”

“म्हणजे सरळ सरळ ब्लॅकमेलच करत आहे ना तो,” तुषारची आई “तिच्याशी लग्न करून नाही दिल तर कोणाशीच करणार नाही. म्हणजे आपण तर त्याला अस बघूच शकत नाही आणि नंतर लग्नाला परवानगी देऊन टाकू. असचं ना?”

“तुझ्या त्या चुलत भावाची परिस्थिती काय झाली होती माहिती आहे ना?” तुषारचे वडील शांतपणे बोलले.

“मला तेच व्हायला नको आहे.” तुषारची आई

“ते पण तुझ्या बाबांच्या हट्टीपणामुळे झाल होत,” तुषारचे वडील कडक आवाजात बोलले. “मी पण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी नाही ऐकलं आणि त्याच्या मनाविरूढ त्याच लग्न लावून दिल. झाले ना तीन चार आयुष्य उध्वस्त.”

“माझ्या बाबांना मध्ये आणू नका,” तुषारची खूपच रागात बोलली. “त्यांच माझ्या भावाने ऐकलं असत तर त्या दोघांनी सुखाचा संसार केला असता.”

“सुखाचा?” तुषारचे वडील तिरकस हसले. “तुझ्या बाबांनी आणि काकांनी त्याच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न तरी केला का? किंवा त्याला समजावण्याचा? नाही. जस त्यांना त्याच्या त्या मुलीबद्दल समजलं तस तुम्ही पण त्याच्या नकळत दुसरी मुलगी पाहिली आणि त्यालाच जीव द्यायची धमकी देऊन ऐन वेळेस लग्नाला उभ केलत.”

आता तुषारची आई तुषारच्या वडिलांकडे भरल्या डोळ्यांनी बघू लागली.

“म्हणून सांगतो एकदा आपल्या मुलासोबत बोलून बघं.” तुषारच्या वडिलांनी त्यांच्या बायकोच्या खांद्यावर त्यांचे हात ठेवले. “आपला मुलगा खूप धैर्यवान आहे. तो काही असा टोकच पाउल कधीच उचलणार नाही. उलट त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची हिम्मत ठेवतो. प्रत्येक संकटाला तोंड द्यायची धमक ठेवतो. तो कधीच आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. भले त्याला एकट्याला आयुष्य का काढावं लागेना? फक्त एकदा त्याच्या मनाचा विचार करून त्याच्याशी बोलून घे. त्याने आताच तर इतक काही भरभरून दिल आहे. इतक की थेट परदेशात जाऊन आपल नाव कोरून आलेला आहे. आपण त्याच्यासाठी आता इतक तर करूच शकतो ना?”

आता तुषारची आई शांत झाली. तिने तिचे डोळे पुसले. “चला जेवायला बसुयात. त्याला भूक लागली आहे ना.”

“तुझ्या लेकाला भूक लागली ते आठवलं आणि मला लागली आहे त्याच काय?” तुषारचे वडील साध्याच वातावरण हलक करण्याच्या उद्देशाने बोलले.

“आता एवढ मोठ लेक्चर दिलत तर मी तुम्हाला थोडीच उपाशी ठेवणार आहे?” तुषारची आई नंतर जरा पुढे झाली आणि बोलली.
“पडद्याआड लपून आमच बोलण ऐकून झाल असेल तर तुझ्या दादाला बोलावून आण.”

तसे तुषारचे वडील त्या पडद्याकडे बघू लागले. तर तिथे तेजश्री उभी होती जी कधीची त्यांच बोलण ऐकत उभी होती. आईचा आवाज आला तसा ती तुषारच्या खोलीकडे निघून गेली.

हॉलमध्ये वातवरण गरम झाल असताना तुषार त्याच्या खोलीत मात्र परीचा मागच्या वर्षीचा डान्स बघण्यात मग्न झाला होता. आता परीचा डान्स त्याला बघायला मिळण अशक्यच होत. म्हणून आता जी व्हिडीओ त्याच्याकडे होती तिचं व्हिडीओ बघून तो त्याच्या मनाच समाधान करत होता.

त्याला अस व्हिडीओ मध्ये मग्न झालेलं बघून तेजश्रीला खूपच भरून आल. तिच्या ह्या दादाचा त्यांच्या मॅममध्ये किती जीव अडकला आहे ते तिला चांगलच ठावूक होत? आता आई बाबांचं बोलण ऐकून सध्यातरी तिच्या दादाच्या प्रेमाची गाडी पुढे सरकण शक्य होताना दिसत नव्हत. पण ती देखील तिच्या दादाच्या सावलीत वाढलेली होती. अशी सहज थोडीच माघार घेणार होती. आता तर काही करून दादाच्या आयुष्यात त्याच्या प्रेमाला आणायचं तिने मनातच ठरवलं.
तिने तुषारला जेवणासाठी यायला सांगितलं आणि ते दोघेही जेवणासाठी हॉलकडे निघून आले.

तिकडे रावी आणि मनाली देखील परीच्या घरी जाऊन पोहोचल्या. तोपर्यंत सायली पण घरी येऊन पोहोचली होती. परी घराचं बरचस काम उरकून घेत असल्याने सायलीवर इतका काही कामाचा ताण येत नव्हता. बाकी झाडू मारायला, कपडे धुवायला, भांडी घासायला आणि लागलीच गरज तर स्वयंपाकात मदत करायला मावशी तर येत होत्या.

आज रावी आणि मनाली घरी येत असल्याचे सायलीला समजलं. आता रावीच ठीक होत पण मनाली मात्र पहिल्यांदाच तिथे येणार होती. त्यामुळे सायली जरा विचारात पडली. तिने परीला मनालीच्या येण्याच कारण विचारलं. तिलाही काही माहिती नसल्याचं परीने सायलीला सांगितलं.

नंतर परीने जरा विचार केला आणि आरुषच्या मनात मनालीबद्दल असलेल्या भावना सायलीला सांगून दाखवल्या. आरुष आणि मनालीबद्दल ऐकून सायलीचे डोळेच मोठे झाले. परीला वाटल की सायलीला आंनद होईल. पण तिचा चेहरा तर गंभीर झाला होता.
सायलीचा तो टेन्शनमधला चेहरा बघून परी पण टेन्शनमध्ये आली. तिने त्यांच्याबद्दल सांगायला घाई तर केली नाही ना? अस तिला वाटून गेल.

“काय झाल आई?” परीने हळूच सायलीला विचारले. “तुला नाही आवडली का ती मुलगी?”

“तस नाही गं,” सायलीच्या डोळ्यात हलकेच अश्रू आले. “नशिबाचे खेळ किती अनप्रेडीक्टेबल असतात ना. त्याचा विचार करत होती.”

सायलीच हे वाक्य परीच्या डोक्यावरून गेल. आरुष आणि मनालीच्या नात्याचा आणि त्या नशिबाचा काय संबंध आहे? हा विचार ती करू लागली. पण काहीच न समजल्याने तिचा गोंधळ उडाला होता.

“म्हणजे नक्की काय बोलायचं आहे आई?” परी

परीच्या आवाजाने सायली तिच्या विचारांच्या बाहेर आली आणि परीकडे बघू लागली. “एवढंच की मनालीला कधीच अंतर देऊ नकोस.”

“म्हणजे?” परीचा गोंधळ अजूनच वाढला. “आजवर तर कधी अस सांगितलं नाहीस मग आजच का?”

“वेळ आली की ते पण सांगेल,” सायली परत खोल विचारात हरवली. “आता आरुषच्या होणाऱ्या आणि आता येणाऱ्या बायकोच्या स्वागताची तयारी करूयात?” आता सायली जरा मिश्कील झाली.

“लगेच नको,” परीने तो विषय सोडून दिला. कारण तिने आजवर कधीही तिच्या ह्या आई वडिलांना त्यांच्या कृतीबद्दल काही विचारले नव्हते. तेवढा तिचा त्यांच्यावर विश्वास होता. “ती घाबरून जायची. आधी त्याला सांगू दे. मग करूयात की धुमधडाक्यात..”

“बरं मॅडम,” सायली परत त्याच सुरात बोलली. “जशी आपली आज्ञा.”

“इव्ह,” परीने तिचं तोंड वाकड केल. “अस काय गं आई?”

“मग काय करू?” सायली उगाच उसासा टाकत बोलली. “आमची लेक तुझ जास्त ऐकतात ना.”

“परत तेच.” परीने तिचे गाल फुगवले.

“गंमत केली गं.” सायली “चल हॉलमध्ये. सगळ झालच आहे ना?”

“हो झाल आहे सगळ.” परी

मग त्या दोघी माय लेकी हॉलमध्ये येऊन बसल्या. सायलीने विजयला फोन लावून त्याला येताना आईसक्रीम घेऊन यायला सांगितलं.

“एक मिनिट,” सायलीने फोन ठेवून कपाळवर आठ्या आणून परीकडे पाहिलं. “आपल्या घरातलं ते दुसर रत्न कुठे आहे?”

“त... तो ना,” परी जरा चाचारली. “तो त्याच्या मित्रांना भेटून मग येणार आहे.”

“तू अशी चाचारली म्हणजे त्याने नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवला आहे.” सायली जरा चिडून बोलली.

“तस नाही आई,” परी उसासा टाकत बोलली. “ते चौघे बंधू मंडळी मालासाठी गिफ्ट घ्यायला गेले आहेत.”

“आणि काय गिफ्ट घेणार आहेत ते?” सायलीने बारीक डोळे करून विचारलं.

“अजून काय?” परी “तिला ना नटण्याची आवड आणि नाही कपड्यांची. ती त्यांच्यासोबतच वाढली आहे तर तिची आवड पण तशीच असेल ना तिच्या बंधूमंडळींसारखी.”

“नीट स्पष्ट बोल परी.” सायली वैतागून बोलली.

“तेच ते प्ले स्टेशन.” परी

“पण ते तर होत ना तिच्याकडे.” सायली

“ते खराब झाल ना.” परी “मग प्रणाली मावशी तिला काय ते घेऊन देत नव्हती. आधीच म्हणे फक्त धूळ खाऊनच खराब केल. मग नवीन पण तसाच खराब करेल म्हणून.”

“बरोबर आहे ना तिचं.” सायली चिडून बोलली. “आहेत पैसे म्हणून असे उधळायचे का?”

“म्हणून तर ते गिफ्ट देत आहेत,” परी “म्हणजे मावशीला बोलायला चान्सच नाही रहाणार.”

आता सायली तिच्याकडे रोखून बघू लागली.

“अस त्यांच म्हणण आहे.” परीने लगेच स्वतःची चूक सुधारली.

सायली पुढे काही बोलणार तोच त्यांच्या घराच दार वाजल. तस परीने उठून दार उघडल. दारात रावी तिची बत्तीशी दाखवत उभी होती. तर मनाली तिच्यापाठी बावरून लपून राहिली होती. एकतर ती आज पहिल्यांदाच तिथे आली होती. त्यात तिथे त्यांची मॅम राहत होती. इथे पोहोचेपर्यंत तिला काहीच वाटल नव्हत. पण जस दार उघडलं गेल ती जरा टेन्शनमध्ये आली. ती तिच्या विचारात इतकी गुंग होती की रावी घरात जाऊन बसलेली तिला समजलीच नाही. ती नुसतीच दारात उभी रहून नख खात होती.

“अगं घरात चल.” परीने तिला आवाज दिला.

परीचा आवाज ऐकून मनाली तिच्या विचारातून बाहेर आली. स्वतःला तिथे एकटी उभी बघून ती जरा ओशाळली आणि तिने परीला उगाच हसून दाखवले. घरात आल्यावर तिने रावीकडे डोळे वटारून पाहिलं. तिला दारात एकटी जे सोडून आली होती.

“काय उभीच रहाणार आहेस का?” सायलीने तिला रावीकडे फक्त उभ राहून रावीकडे बघत असल्याच पाहून तिला विचारलं.

“न.. नाही,” मनाली अजूनच बावरून गेली. “बसते की.”

“कशाला घाबरवता रे माझ्या व...” रावी पुढे काही बोलणार तोच मनालीने तिला चिमटा काढला.

ते बघून रावी ओरडायचं सोडून हसू लागली.

“तुम्ही ना कठीण आहात,” सायलीने रावीकडे बघून तिचे डोळे फिरवले. आत्ताच परीने मनालीबद्दल सांगून दिल्याने रावीचा तो न बोललेला शब्द सायलीला समजून गेला होता. मग तिने परीकडे पाहिलं. “सुजय कुठे पोहोचला ते बघ. ते चौघ त्या पार्टीतून निघाले का नाही ते विचार तर त्याला.” सायलीची एक नजर मनालीवरच होती.

तर सायलीच बोलण ऐकून परी आणि रावी दोघी गोंधळून गेल्या. तर मनालीच्या कपाळवर आठ्या आल्या.

“परी मनालीला पाणी तर दे,” सायलीने परत बोलायला सुरवात केली. “रावी तू चल तर किचनमध्ये.”

आता त्या दोघी एकमेकींकडे गोंधळून बघू लागल्या. तस सायलीने त्या दोघींना डोळ्यानीच दटावलं. मनाली तर ती एकटी होण्याची वाटच बघत होती. जश्या ता तिघी किचनकडे गेल्या तस मनालीने तिचा मोबाईल काढून आरुषला फोन लावायला घेतला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0

🎭 Series Post

View all