Login

अवंतिका (भाग:-३ अंतिम)

कपडे व प्रोफेशनवरून माणसाला जज करू नये हे सांगणाऱ्या माॅडेल अवंतिकाची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- अवंतिका

भाग:- ३ (अंतिम)

"तू गप्प बस. एवढी मोठी नाही झालीस मला शहाणपणा शिकवायला. जा हिला घेऊन इथून." माधुरी जवळ जवळ निलिमावर खेकसत म्हणाली.

निलिमा काही बोलणार तोच प्रतापने नकारार्थी मान डोलावत डोळ्यांनी इशारा करत तिला अवंतिकाला तिच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितले.

ती निघून गेल्यावर ते माधुरीला समजून सांगू लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर तिचा राग शांत झाला.

अवंतिकाने बऱ्याच वेळा जाब विचारण्यासाठी समीरला कॉल केला पण त्याने तिचा काॅल उचलला नाही.

दोन तीन दिवस तनावातच निघून गेले. रोज अवंतिका बद्दल काही बाही बोलणाऱ्याचे फोन काॅलने प्रताप आणि माधुरी वैतागून गेले. बोलणाऱ्यांच्या तोंडाला कोण हात लावणार यांचा विचार करून ते शांत राहिले.

प्रतापने विनितशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला म्हणाला,"आग जवळ आल्यावर लोणी वितळणारच. हे बघ तुझी मुलीची बाजू आहे. माझ्या मुलाचे काही नाही बिघडणार. तू तुझ्या मुलीचा विचार कर."

त्याने प्रतापचे बोलणे न ऐकताच काॅल कट करून टाकला.

त्याच्या अशा बोलण्यावर प्रतापला खूप संताप झाला. ते स्वतः वरच चिडत हताश होत माधुरीला म्हणाले," सगळीकडून कोंडी झाली. माझा गर्व, अभिमान असलेल्या पोरीवर लांछन लावलेत. कधी तरी सत्य बाहेर येईलच."

"सत्य येईल तेव्हा येईल. पण आता तर इज्जत गेलीच ना. काय करायचे आता?" माधुरी तोंड ओंजळीत घेऊन रडू लागली.

दोघांचे बोलणे ऐकून अवंतिकाला खूप वाईट वाटले. तिच्याही डोळ्यांत पाणी आले.

"पप्पा, तुम्ही मला तुमचा गर्व, अभिमान मानता. त्याला असे मी बदनाम नाही होऊ देणार. काही तरी मार्ग मिळेलच. तेव्हा सर्वांना पटवून देईन मी कशी आहे ते?" ती मनात विचार करत म्हणाली.

असेच आणखी आठ दिवस गेले. कामिनी पुन्हा घरी आली. माधुरीचा पडलेला चेहरा पाहून तिला म्हणाली,"तुझ्याकडे बघून वाईट वाटतेय गं. पोरीची जात लय वाईट बघ. एकदा डाग लागला की लय कठीण असतं. अशाने अवंतिकाचे लग्न होणे कठीण आहे. अगं बाई, मी तर सांगायचे विसरलेच की त्या समीरचे लग्न आहे बघ‌ आज. तुम्हाला सांगितले नाही का?"

माधुरी काही न बोलता नकारार्थी मान डोलावली.

"बरं जाऊ दे ते. तू काळजी घे. मी जाऊन येते लग्नाला." कामिनी तिला बोलून निघून गेली.

तिचे बोलणे अवंतिकाने ऐकले आणि मनात काहीतरी ठरवत काही वेळाने ती घराबाहेर पडली. तिला घराबाहेर पडलेलं बाहेर पडलेल पाहून तिच्या काळजीने प्रताप, माधुरी आणि निलिमा तिच्यामागे गेले.

अवंतिका थेट समीरच्या लग्न मंडपात त्याच्या समोर येत म्हणाली,"अरे, हे काय समीर? मौजमजा माझ्यासोबत आणि लग्न दुसऱ्या सोबत. धिस इज नॉट फेअर हं."

"ए तू ऽऽ तू इथे काय करतेस? आणि काहीही काय बोलतेस?" आधी धक्का बसल्यागत व दात ओठ खात उठून उभे  राहत समीर म्हणाला.

"अरे, काहीही नाही रे. त्या दिवशी जे आपल्यात जे सगळं काही झालं असं तूच सर्वांना सांगितलेस, तेच मी आता सांगतेय. तुझ्या होणाऱ्या बायकोलाही कळू दे ना, आपल्यात सगळं काही." ती न घाबरता सगळं काही या शब्दावर जोर देत म्हणाली.

नवरीचे वडील तावातावाने पुढे येत म्हणाले," हे सर्व काय चालू आहे, विनितराव? हे जर खरे असेल तर हे लग्न मोडले म्हणून समजा."

"अहो मामा, थांबा. तुम्ही हिचे काही ऐकू नका. ती खोटे बोलतेय. त्या दिवशी आमच्या काहीच झाले नव्हते. मी तिला जवळ घेत होतो तर हिने माझ्या कानाखाली मारली आणि पळून गेली. मग मीच .." बोलण्याच्या ओघात समीरने घडलेले सगळे सांगितले. आपण खरे बोलून गेलो हे जाणून तो बोलता थांबला. आपण माती खाली याची जाणीव होऊन तो मान खाली घालून उभा राहिला.

त्याच्या तोंडातून सत्य बाहेर पडल्यावर जमलेले लोक त्याच्याकडे रागात पाहत आपापासत कुजबुजू लागली.

इकडे अवंतिकाच्या चेहऱ्यावर मात्र विजयी हसू पसरले. तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू होतं.

"कसं असतं ना रे, समीर? दुसऱ्यावर चिखल फेकताना किती आसुरी आनंद मिळतो. पण हाच चिखल स्वतःवर उडाले की घाण वाटते ना. वाईट वाटते. काहीही नसताना तू माझ्यावर चिखलफेक केलीस. मला बदनाम केलेस. काय मिळाले रे तुला असं करून. मी तुला मित्र समजून बोलले, आलिंगन दिले. त्यात गैर काय आहे? आणि राहिले मी माॅडल असण्याचा प्रश्न? मी छोटे कपडे घालते ते फक्त माॅडेलिंग, फोटोशूट करण्यापुरतं. तो माझ्या प्रोफेशनचा एक भाग म्हणून घालते. मला माझी मर्यादा, संस्कार माहिती आहेत. ते मी कधी तोडले नाही. बघणाऱ्यांचा दृष्टीकोन बाद असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. अनीवेज सत्य तुमच्या सर्वांसमोर आलं आहे आता. तर तुम्हाला सर्वांना कळलंच असेल त्या दिवशी काय झालं होतं ते. खरं खोटं जाणून न घेता कोणा एका व्यक्तीच्या बोलण्याने एखाद्या मुलीच्या अब्रूच्या बातम्या पसरवून तिला आणि तिच्या परिवारला किती मानसिक त्रास होतो हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळेल? प्लीज अशा बातम्या कोणा मुलीबाबतीत पसरवू नका. प्रत्येक मुलगी अवंतिका नसते. आज मी इथे उभी आहे ते माझ्या पप्पांच्या आणि बहिणीच्या माझ्यावरील विश्वासाने." अवंतिका प्रताप व निलिमा यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

कामिनीला कळले कि ती नेहमी तिच्या माॅडेल असल्याबद्दल बोलत होती. अवंतिकाचा टोमणा ऐकून तिने ओशाळून मान खाली घातली.

प्रताप अभिमानाने अवंतिकाकडे पाहू लागले.

माधुरी तिच्याजवळ जात डोक्यावरून हात फिरवत दाटक्या स्वरात म्हणाली,"मला माफ कर, अवु. मलाही विश्वास वाटतं होता बाळा, पण काय करू आईचं काळीज आहे गं माझं. पण माझी हरीण आज वाघीण झाली याचा अभिमान व आनंद वाटतो मला. "

"मम्मी," म्हणत तिला बिलगुन अवंतिकाने आसवांना वाट मोकळी करून दिली.

विनित व समीरने प्रताप आणि अवंतिका यांची माफी मागितली.

विनयभंग व बदनाम करण्याच्या आरोपाखाली समीरवर केस दाखल करण्यात आली.

अवंतिका तिच्या उरलेल्या सुट्ट्या आपल्या परिवारासोबत आनंदाने घालवून पुन्हा तिच्या माॅडेलिंगच्या क्षेत्रात रमून गेली.

समाप्त -

फक्त ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून एखाद्याला बदनाम करू नये. त्याचा नाहक त्रास पिडिताबरोबर त्याच्या परिवाराला होतो. माॅडेलिंग किंवा ॲक्टिंग करणाऱ्या मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ती एक स्त्री आहे तिचा आदर करावा.

जयश्री शिंदे
टीम सुप्रिया

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्र, स्थान व घटना यांचा वास्तवाशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all