Login

अवंतिका (भाग:-१)

कपडे व प्रोफेशनवरून माणसाला जज करू नये हे सांगणाऱ्या मॉडेल अवंतिकाची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- अवंतिका

भाग:- १

"अगं मधु, तुला काही कळलं का? " शेजारची कामिनी माधुरीला म्हणाली.

"काय आणि कशाबद्दल म्हणतेस तू?" माधुरी किचनमधून बाहेर येत कपाळावर आठ्या पाडत म्हणाली.

"घ्या आता, सगळ्या गावाला खबर कळली आणि तू म्हणतेस तुला काहीच माहिती नाही? असं कसं बरं?" कामिनी डोळे मोठे करत हनवुटीवर हात ठेवत म्हणाली.

माधुरीने तिचे ओठ बाहेर काढत माहिती नाही या अर्थाने नकारार्थी मान डोलावली.

"अगं, तुमच्या अवंतिकाबद्दल गावात काय बातमी पसरली याची खबर कशी काय नाही तुम्हाला? " कामिनी डोळे मोठे करून  हातवारे करत म्हणाली.

अवंतिकाचं नाव घेताच तिथेच पुस्तक वाचत बसणारी तिची छोटी बहीण निलिमाने कान टवकारले.

"आमच्या अवुबद्दल?" माधुरीने  अविश्वासाने भुवया आकसून विचारले.

"हो, तरी मी तुम्हाला सांगत होते की पोरीला शहरात पाठवू नका. तुम्ही ऐकलं नाही आणि आता बघा." कामिनी काय ते न सांगता दुसरेच काही बाही बडबडू लागली.

"ओ काकू, काय ते सांगा की पटकन? उगीच बाकीचं बोलून कशाला वेळ वाया घालवता?" निलिमा थोडी चिडत म्हणाली.

त्यावर माधुरीने तिला डोळे दाखवून शांत राहायला सांगितले.

"कामिनी, काय ते स्पष्ट शब्दांत सांग बरं?" माधुरीने तिला शांतपणे विचारले.

"अगं, तो जोश्यांचा समीर आहे ना, त्याच्याबरोबर अवंतिकाचं नाव जोडलं आणि तो सगळ्यां‌ गावभर दवंडी पिटतो की त्या दोघांमध्ये सगळं काही झालंय." कामिनी चेहऱ्यावर विचित्र हावभाव करत सांगत होती.

माधुरी क्षणभर जागेवरच थिजली. आपण काय ऐकले याचा तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही.

"काय गं? कळतंय ना मी काय सांगतेय ते? सगळं म्हणजे ते सगळं?" कामिनी डोळे मोठे करून भुवया उंचावत म्हणाली.

"ओ काकू, काहीही काय बोलताय? माझी दी तशी नाहीये. उगीच तुम्ही भलते सलते काहीही काय सांगताय, मम्मीला?" निलिमा टेबलावर पुस्तक आपटत चिडत म्हणाली.

"निलू, तू तुझ्या रूममध्ये जा. मी बोलते तिच्याशी." माधुरी निलिमाला दटावत तेथून जायला सांगितले.

ती रागात एक नजर कामिनीवर टाकत हाताची मूठ आवळत पाय आपटत निघून गेली.

जाणाऱ्या निलिमाकडे पाहत कामिनीने नाक मुरडले.

"हे बघ कामिनी, अवुबद्दल कोण काय सांगतय हे मला नाही माहिती? ती तसं काही करणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. तो समीर काय म्हणतो, का म्हणतो? हे त्यालाच माहिती? माहिती सांगण्यासाठी धन्यवाद. तू जाऊ शकतेस." माधुरी स्पष्ट शब्दांत तिला सुनावत म्हणाली.

"असं कसं म्हणतेस तू मधु? तो मुलगा उगाच का खोटे बोलेल? मी माझ्या या कानांनी ऐकले तो त्याच्या मित्रांना अवंतिका आणि त्याच्या भेटीचे किस्से रंगवून रंगवून सांगत होता. बघ बाई पोरीला मोकळीक दिलीस त्याचेच परिणाम आहेत हे." माधुरीने जायला सांगूनही न जाता कामिनी तिला म्हणाली.

"मी विचारते तिला." माधुरी तिला म्हणाली. तेव्हा कुठे ती जात म्हणाली," मोकळीक देऊन तुम्ही तिला शहरात पाठवलंत, वरतून ते काय बाई माॅडेलिंग की फाॅडेलिंग करू दिलंत.‌ हुं, बघा आता काय करताय?"

तिच्या बोलण्याने माधुरीचा अवंतिकाबद्दलचा विश्वास डळमळीत होऊ लागला.

तिला दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आठवली.

"वाह! दी, एकदम टवका दिसतेस. उम्माह!" फ्लायिंग किस देत मॉडेलिंगसाठी फोटोशूट करत असलेल्या अवंतिकाच्या सौंदर्यांचे कौतुक करत उल्हासून निलिमा म्हणाली.

त्यावर ती तिचा फ्लाईंग किस स्वीकारत दूरनच तिला हसून थॅंक्यू म्हंटले.

अवंतिकाचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट चालू होते. ते उत्तम रीतीने पार पडल्याने सर्वांनी तिचे कौतुक केले. एका मॅगेजिनच्या कव्हर पेजसाठी ते फोटोशूट होते.

तिचे काम पूर्ण झाल्यानंतर निलिमाजवळ येत तिने तिला आलिंगन दिले.

"कसे वाटले गं माझे फोटोशूट?" तिने तिला हसत विचारले.

"लय भारी, दी. इतके दिवस मॅगेजिनच्या कव्हरवर तुझे फोटो पाहत होते, आज प्रत्यक्षात तुझे फोटो काढताना पाहून मजा आली. माझी सुट्टी मस्त गेली. चल आता आवर पटकन, आपल्याला गावी जायचं आहे ना. मम्मी पप्पा आपली वाट पाहत असतील." निलिमा तिला मिठी मारत हसत म्हणाली.

"हो गं जाऊ या. असंही मलाही थोडा ब्रेक घ्यायचा होता. आता अनायसे एका महिन्याभराची सुट्टी मिळत आहे तर मस्त एंजॉय करणार मी तुमच्या सगळ्यांसोबत." ती स्वतःचे कपडे बॅगेत भरत म्हणाली.

"हो, दी. म्हणून तर मी आले ना तुला न्यायला." निलिमा तिच्या गळ्यात पडत लाडिकपणे म्हणाली.

"हो गं, आजीबाई." अवंतिका तिचे नाक चिमटीत पकडून हसत म्हणाली.

"दी, तुझे काम दिसते तेवढे सोपे नाही. खूप मेहनत करावी लागते तुला." निलिमा तिला बॅग भरण्यात मदत करत म्हणाली.

"हम्म, तू आता बघितलेस ना एका फोटोसाठी किती शाॅट्स द्यावे ते? पप्पांनी मम्मीचा विरोध पत्करून मला पाठिंबा दिला म्हणून मी आज इथपर्यंत पोहचले. अजून बराच पल्ला गाठायचा आहे मला. टाॅपची माॅडेल बनायचं आहे मला." ती तिचं आवरत म्हणाली.

"हो, दी. मम्मीला हे आवडत नाही पण पप्पांनी तिला समजावल्यावर ती एकदाची तयार झाली.‌ टाॅपची माॅडेल तर तू आताही आहेसच की." निलिमा तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली.

अवंतिकाने हसत होकारार्थी मान डोलावली.

दोघीही गावी आल्या. गावात आल्यावर आईने तिचे छान स्वागत केले. ती तब्बल दोन वर्षांनी घरी आली होती. तिची आई माधुरी आधी नाराज होती. पण आता तिची नाराजी थोड्या प्रमाणात कमी झाली होती.

रात्री ती तिचे बाबा प्रताप यांच्याबरोबर गप्पा मारत होती.

"काय मग बेटा, तू खुश आहेस ना तुझ्या कामात? कसे चालले तुझे काम?" प्रतापने तिला जवळ घेत विचारले.

"खूप मस्त, पप्पा. थॅंक्यू सो मच, पप्पा. तुमच्यामुळे हे शक्य झालं." ती त्यांना बिलगत म्हणाली.

"तुला त्यात आनंद मिळतो ना. झालं तर मग." ते मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

"हुं, एक मिनिट, पप्पा. तुम्हाला काही तरी दाखवायचं आहे." असे म्हणत तिने दोन- तीन मॅगेजिनच्या कव्हरवरील तिचे फोटो दाखवले.

"वाह! मस्तच गं." ते बोटांचा मोर करून आनंदाने म्हणाले.

निलिमाने त्यास दुजोरा दिला.

तेवढ्यात माधुरी तिथे आली. तिला पाहून अवंतिकाने ते मॅगेजिन लगबगीने लपवून ठेवलं. तरीही ते माधुरीच्या नजरेस पडले.

क्रमशः

ते फोटो पाहिल्यावर काय असेल माधुरीची प्रतिक्रिया?

जयश्री शिंदे
टीम सुप्रिया

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्र, स्थान व घटना यांचा वास्तवाशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all