Login

अवि.. एक प्रेम कथा (भाग ९)

"अगं मी कुठे बोललो की त्यांच्यात काही आहे? मी म्हंटल असेल तर वाईट काय आहे त्यात? असेल तर सांगेल तो आपल्याला." चिराग विद्याची गंमत बघत होता.


मागील भागात आपण बघितले…


"हो. ट्रेलर मिळालं मला." अजय डोके दाबत बोलला. टेन्शनमुळे त्याचे डोके दुखायला लागले होते.


"चला माझं आणि साक्षीचे प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला दोघांना ऑफ आहे. तुम्ही बसा. आम्ही येतो जाऊन." चिराग बोलला. साक्षी आणि चिराग तिथून निघून गेले.

"बोल तिला आता." चिराग जाताना हळूच अजयला बोलला.


आता पुढे…


आता अजय आणि विद्या दोघेच होते. अजय विद्याला बघत होता. आज त्याचे डोळे तिला वेगळेच जाणवत होते. विद्याने गंमत केली माहीत झाले होते, तरी त्याच्या हृदयाचे ठोके अजूनही वाढलेले होते.


"असा काय बघतो आहेस?" विद्या अजयच्या डोळ्यात बघून बोलली. आज पहिल्या वेळेस ती अशी खोल त्याच्या डोळ्यात बघत होती. अजय काहीच बोलत नव्हता. दोघे एकटक एकमेकांना बघत होते. तितक्यात अजयला मागून कोणीतरी आवाज दिला.


"अजय."

"अरे तू? कशी आहेस?" अजय तिला बघून बोलला.


"मी मस्त. हाय विद्या कशी आहेस?" तिने म्हणजे पायलने विचारले. पायल म्हणजे विद्या आणि अजयची ज्युनियर. ती सुद्धा त्याच शाळेत होती ज्यात विद्या आणि अजय शिकले, आता कॉलेज देखील एकच होते. त्यामुळे ती दोघांना भेटत असे. पण मागच्या काही दिवसात तिचे अजयला भेटणे वाढले होते. विद्या आणि अजय सोबत असले की, पायल त्यांच्याशी जास्तं बोलत नसे. पण अजय एकटा असला की, मात्र ती त्याच्याशी गप्पा मारत असे. सुरुवातीला विद्याला काही वाटले नाही. पण हळूहळू पायल आणि अजय जास्तं वेळ सोबत घालवू लागले.


"विद्या मी येतोच." म्हणत ह्यावेळी अजय पायल सोबत दुसरीकडे जाऊन उभा राहिला.
विद्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि लायब्ररीत निघून गेली.

त्यानंतर बऱ्याचदा अजयने विद्याला सांगण्याचा प्रयत्न केला. कितीदा तिला इशारे दिले की, तो तिच्यावर प्रेम करतो. पण तिने सगळं गमतीवर नेले. तिला कळतच नव्हते की ,अजय खरंच तिच्यावर प्रेम करतो.


काही दिवसांनी…

"चिराग, ह्या पायल आणि अजयमध्ये काही सुरू आहे का?" एक दिवस विद्याने समोर एका बाजूला उभ्या असलेल्या पायल आणि अजयकडे बघून विचारले.


"माहीत नाही गं. पण असेल तर चांगलंच आहे ना? त्याला कुठे गर्लफ्रेंड आहे? आपलं शेवटचं वर्ष पण संपत आलं कॉलेजचं, तरी तो एकटाच आहे." चिराग


"तुला तरी कुठे आहे रे गर्लफ्रेंड?" विद्या डोळे बारीक करत बोलली.


"अरे मला नाही, म्हणून त्याला नको असं काही आहे का?" चिरागने विचारले.


"नाही तसं काही नाही. असेल तर मला काय त्यात? ठिक आहे. चांगलं आहे. पण मला ती आवडत नाही." विद्या जरा रागात बोलली.

"तुझ्या आवडीचा काय संबंध येतो? त्याला आवडली म्हणजे झालं." चिराग विद्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होता.


"हो. ते पण आहे. पण त्याने मला का नाही सांगितलं?" विद्या नाराज होत बोलली.


"अगं मी कुठे बोललो की त्यांच्यात काही आहे? मी म्हंटल असेल तर वाईट काय आहे त्यात? असेल तर सांगेल तो आपल्याला." चिराग विद्याची गंमत बघत होता.


असेच काही दिवस गेले. विद्याला पायल दिसली की, जरा जास्तच राग येत होता. त्यात अजय तिच्यासोबत जास्त राहत होता त्याचा त्रास विद्याला होत होता. वरून काही दाखवत नव्हती ती, पण मनातून नाराज होती.


एक दिवस विद्या एकटीच वर्गात अभ्यास करत बसली होती. तितक्यात अजय तिला शोधत वर्गात आला.


"काय गं इथे बसली आहेस तू? मी सगळीकडे बघून आलो तुला." अजय तिच्या बाजूला बसत बोलला.


विद्या काहीच बोलली नाही. तिने त्याच्याकडे बघितले देखील नाही. तिच्या कडे बघून अजयला समजले होते की,
काहीतरी झाले आहे.


"ओय, तुझ्याशी बोलतो आहे मी." अजय तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवत बोलला.


"ओह, माझ्याशी बोलतो आहेस? मला वाटलं पायल आहे की काय इथे!" विद्या, अजयला न बघताच बोलत होती.


"विद्या इथे तुझ्याशिवाय कोणीच नाही." अजय विद्याच्या मनःस्थितीचा अंदाज घेत होता.


एकंदरीत ती रागात होती हे जाणवत होते.

"अच्छा. माझी आठवण कशी काय आली?" विद्या अजून देखील पुस्तकात बघत होती.


"अगं डेज सुरू होणार आहेत नुकतीच नोटीस वाचून आलो. म्हणून तुला सांगायला आलो." अजय हसून बोलला.


"मला वाचता येतं. तू पायलला जाऊन सांग हे. मला सांगायची गरज नाही." विद्या रागात बोलली.


"अगं काहीतरी प्लॅन करू तेव्हा. हे शेवटचं वर्ष आहे आपलं." अजय.


"प्लॅन करायला सगळे जागेवर हवेत ना? हल्ली तुला वेळ कुठे आहे आमच्या साठी?" विद्या.


"तुला झालं काय आहे? अशी का बोलते आहेस?" अजय तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत बोलला.


"काही नाही." तिच्या डोळ्यात पाणी होते. जे तिने प्रयत्नांनी रोखून ठेवले होते. हे त्याला स्पष्ट जाणवत होते.
तिच्या डोळ्यात पाणी म्हणजे त्याचा जीव कासावीस होणार नाही असे होईल का?


"ए काय झालं?" अजय.


"तू सांगत नाही ना माल?" विद्या अजून देखील आसू रोखून होती.


"काय?"

"हेच की तुला पायल आवडते!"

"अगं मला खरंच ती नाही आवडत. तिला माझ्याशी बोलायला छान वाटतं म्हणून माझ्या सोबत असते जास्तं ती." अजय हसून बोलला.


"खोटं नको बोलू तू. खरं सांग मला." विद्या.


"विद्या मी आधी पण सांगितलं आहे तुला की, ती माझी मैत्रीण आहे. आमच्यात काही नाही बाकी. पण मला एक सांग तुला कसलं वाईट वाटतं आहे? मी तिच्या सोबत असतो ह्याचं की, मी तुला सांगत नाही ह्याचं?" अजयने विषय वळवला.

त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाचे उत्तर विद्याकडे नव्हते. तिने एकदम त्याच्याकडे बघितले डोळ्यातील मोत्यांचे दोन थेंब तिच्या गालांवर ओघळले. अजयने ते अलगत ओंझळीत झेलले.


"विद्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग मी तुला सांगेल मला कोण आवडत. हे अश्रू खूप किमती आहेत. ते असे वाया नको घालवूस. चल आता खाली. सगळे वाट बघत आहेत." अजय बोलताना उठला.


मिळेल का अजयला त्याच्या प्रश्नाचे उत्तर?
वाचत रहा अवि.. एक प्रेम कथा