Login

अविस्मृती भाग १

अविस्मृती भाग १
अविसमृती भाग १

" अवनी, अगं साडेआठ झाले. चहाचा कप तिथेच गार झालाय तुझा आणि तुझी कसली तरी मीटिंग सुरू आहे अजून ? " मृणालिनी बाईंनी किचनमधूनच आवाज दिला.

अवनीने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर न हटवता उत्तर दिलं,

" हो आई, आलेच ! युएस क्लायंटची मीटिंग आहे, हा कोड फिक्स केल्याशिवाय मला लॉग-ऑफ करता येणार नाही. तुम्ही घ्या चहा, मी नंतर गरम करून घेईन."

मृणालिनीबाई हातातील विणकामाची सुई बाजूला ठेवून हळूच अवनीच्या खोलीच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या. निळ्या प्रकाशात चमकणारा अवनीचा चेहरा, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं आणि तिचा तो चिडचिडा झालेला चेहरा बघून त्यांना वाईट वाटलं.

अवनी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत सीनियर डेव्हलपर होती. पगार मोठा होता, पण बदल्यात तिची शांतता आणि तिची आवड कुठेतरी हरवून गेली होती.

" घे गं थोडा चहा, डोकं शांत होईल. "

मृणालिनीबाईंनी प्रेमाने कप तिच्या टेबलवर ठेवला.
अवनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉप बंद केला.

" आय हेट धिस जॉब, आई ! रोज तेच तेच कोडिंग, तेच तेच बग्स. मला कधी कधी वाटतं, मी हे सगळं सोडून द्यावं आणि शांतपणे काहीतरी वेगळं करावं."

तिची नजर अचानक मृणालिनीबाईंच्या हातात असलेल्या त्या सुंदर विणलेल्या कापडी पिशवीवर गेली.

" आई, हे काय आहे ? किती सुंदर डिझाइन आहे हे ! "

अवनीने ती पिशवी हातात घेतली. ती पिशवी जुन्या कॉटनच्या साड्यांपासून विणलेली होती, पण त्यावर मृणालिनीबाईंनी हाताने केलेलं मॅक्रम काम आणि त्यासोबत जोडलेली काही काचेची नक्षी इतकी उठावदार होती की ती एखाद्या ब्रँडेड हँडबॅगपेक्षाही महागडी वाटत होती. मृणालिनीबाई काहीशा संकोचत म्हणाल्या,

"अगं काही नाही, तुझी ती जुनी निळी साडी टाकायला काढली होतीस ना, त्याच्यापासून विणलंय हे. वेळ जात नाही म्हणून बसते करत काहीतरी."

"आई ! तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही किती मोठी कला जपताय ? " अवनीचे डोळे चमकले.

"आजकाल लोकांना हेच हवंय , इको-फ्रेंडली आणि हॅन्डमेड. तुम्ही साध्या साडीतून हे इतकं क्लासिक डिझाइन कसं बनवलं ? "

" अनुभव आहे ग, माझ्या आईने शिकवलं होतं. पण आता याला कोण विचारतंय ? हे तर फक्त घरातल्या घरात बरं दिसतं." मृणालिनीबाई निरुत्साहाने म्हणाल्या.

" नाही आई, याला आपण बाजार मिळवून देऊ शकतो. तुमचं हे ट्रेडिशनल ज्ञान आणि माझं डिजिटल डोकं एकत्र आलं ना, तर आपण काहीतरी भन्नाट करू शकतो. " अवनी उत्साहात सांगत होती. पण मृणालिनीबाईंना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर अवनीच्या आयुष्याला एक धक्का बसला. कंपनीच्या नवीन धोरणानुसार काही लोकांची कपात करण्यात येणार होती आणि त्यात अवनीचे नाव सर्वात वर होते. ज्या कंपनीसाठी तिने आपली रात्रंदिवस एक केली होती, त्यांनी एका क्षणात तिला पिंक स्लिप हातात दिली.

अवनी सुन्न होऊन घरी आली. तिला वाटलं आई ओरडेल किंवा चिंता व्यक्त करेल. पण मृणालिनीबाईंनी तिला शांतपणे बसवलं आणि म्हणाल्या,

" अवनी, ज्या झाडाची फांदी तुटते ना, तिथेच नवीन पालवी फुटते. तू काल काहीतरी म्हणत होतीस ना ? आपल्या कलेबद्दल ? विचार कर, कदाचित निसर्गाने तुला ही संधी दिली असेल."

पुढचे पंधरा दिवस दोघी माय-लेकींनी मिळून एक आराखडा तयार केला. अवनीने मार्केट रिसर्च केला. तिने पाहिलं की शहरातील मोठ्या मॉल्समध्ये आणि बुटीकमध्ये लोक अशा हाताने बनवलेल्या वस्तू शोधत आहेत. तिने सासूबाईंच्या हस्तकलेला आधुनिक रूप द्यायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या ब्रँडचं नाव ठेवलं , अविस्मृती.

अवनीने मृणालिनीबाईंना आधुनिक रंगांच्या संगती शिकवल्या, तर मृणालिनीबाईंनी अवनीला धाग्यांची गुंफण आणि नक्षीकामातील बारकावे शिकवले. अवनीने आपली तांत्रिक कौशल्ये वापरून एक आकर्षक इन्स्टाग्राम पेज आणि छोटीशी वेबसाइट तयार केली.

एके दिवशी अवनीला शहरातल्या एका प्रसिद्ध मॉलच्या मॅनेजरची भेट घेण्याची संधी मिळाली. हा मॉल शहरातील सर्वात पॉश मॉल होता. द रॉयल स्क्वेअर. तिथे स्थानिक कारागिरांच्या वस्तू प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी ठेवणार होते.
अवनी आणि मृणालिनीबाई आपले सँपल्स घेऊन तिथे पोहोचल्या. तिथे अनेक मोठे व्यापारी आणि डिझाइनर्स आले होते. अवनीच्या हातात साध्या कापडी पिशव्या होत्या, तर इतरांकडे मोठे चमचमते स्टॉल्स.

" मॅडम, आम्हाला आमची अविस्मृतीची काही डिझाईन्स दाखवायची आहेत. " अवनीने मॅनेजरकडे जाऊन धाडसाने विचारलं.

मॅनेजरने एकदा अवनीकडे आणि एकदा तिच्या साध्या कपड्यातल्या सासूकडे पाहिलं.

" बघा, आमची स्पेस खूप महाग आहे. आम्ही इथे फक्त प्रीमियम ब्रँड्सना जागा देतो. तुमचं हे घरगुती विणकाम इथे चालेल असं मला वाटत नाही."

मृणालिनीबाईंना थोडं अपमानित वाटलं, त्या अवनीचा हात पकडून निघू लागल्या. पण अवनीने हार मानली नाही. तिने चटकन आपल्या बॅगेतून एक सुंदर-क्लच काढला जो मृणालिनीबाईंनी विणलेला होता आणि ज्याला अवनीने एक छोटी एलईडी स्ट्रिप आणि चार्जिंग पोर्ट लावून आधुनिक टच दिला होता.

मॅनेजरने तो क्लच हातात घेतला आणि त्याची नजर विस्फारली.

" हे विणकाम... हे तर खूप जुनं आणि दुर्मिळ आहे. तुम्ही हे स्वतः केलंय ? " त्याने मृणालिनीबाईंकडे पाहून विचारलं.