अवजड अपेक्षांचे ओझे भाग 1
तिने बाजूला सारले
©️®️शिल्पा सुतार
श्रुती, रितेशच नुकतच लग्नं झालं होतं. सगळचं नवं... सासरची मंडळी, ते गाव. ती अजून रूळली नव्हती. शांत स्वभावाची श्रुती हुशार होती.
सुरवातीचे गुलाबी दिवस भर्रकन गेले. दोघं फिरून आले. तीच आणि रितेशच नातं छान फुललं होतं.
घरी सासू, सासरे, लहान नणंद होती आणि ते दोघं होते. श्रुती सगळं बघत होती. शिकत होती. कोण किती वाजता जातं येतं. कोणाची आवड काय आहे. त्याप्रमाणे ती करत होती.
आईने सांगितलं नीट वागायचं. दिसेल ते काम करायचं. उलट बोलायच नाही. त्यांच्या पद्धती शिकून घे. श्रुती त्याप्रमाणे वागत होती. ती दिवसभर बिझी असायची.
भेटणारे, पाहुणे यायचे सगळ्यांच ती खूप करत होती. तिला ही विशेष स्वयंपाक जमत नव्हता. तरी प्रयत्न करत होती. सवय नसल्याने वेळ ही लागत होता. विचारून काही रेसीपी बघून ती करत होती. तीच ही नुसतचं शिक्षण झालं होतं. सहा महिने नोकरी केली तेवढ्यात लग्न झालं .
श्रुतीचा दिवस सकाळी सहा वाजल्या पासून सुरू व्हायचा तर रात्री पर्यंत काम सुरू असायचं. रोज परीक्षा होती.
आजही श्रुती आवरत होती. तिला रूम मधे यायला अकरा वाजले. रितेश तिची वाट बघत होता.
" तुझं काय सुरू असत?" त्याने विचारलं.
"अहो इडलीच वाटत होती. मग त्याचे भांडे निघाले." श्रुती म्हणाली.
"थोड काम राहू द्यायचं. असे पदार्थ रविवारी करायचे. तू दमत नाही का?"
ती काही म्हणाली नाही. दमली तरी कोणाला सांगणार. घरचे काही म्हणायला नको म्हणून तिचा आटापिटा सुरू असायचा.
सकाळी ती उठली. रितेश, मीनुचा डबा केला. सगळ्यां साठी चहा ठेवला एका बाजूला इडली होत होती. लगेच चटणी केली.
रितेश आवरून आला. तिने नाश्ता दिला.
मीनु आली. "वहिनी सांबार नाही केल का?"
"अरे वाह मीनु बोलायला सोप आहे ना. जरा एकदा पहाटे सहा पासून उठून स्वयंपाक करून बघ. मग समजेल सांबार का नाही केला." रितेश म्हणाला.
"तिला का इतक बोलतो आहेस रितेश ?" आशाताई श्रुतीकडे रागाने बघत होत्या. ती घाबरली. हे लोक त्यांचे त्यांचे भांडतात सासुबाई माझ्यावर राग काढतात.
नाश्ता झाला. रितेश ऑफिसला गेला. श्रुतीने आईला फोन लावला. दोघी बोलत होत्या. हॉल पर्यंत आवाज येत होता.
" ही ना सकाळी सकाळी फोन धरून बसते." आशाताई आत आल्या
" श्रुती यांचे शर्ट हाताने धू. कॉलर निघत नाही."
"हो आई. पाच मिनिट करते."
त्या तिथे उभ्या होत्या. आता बोलणार तरी कस.
"आई तुम्ही माझ्या आईशी बोलता का?" शेवटी तिने विचारलं.
" नाही. मला सकाळचे काम लवकर झालेले आवडतात. "
"ठीक आहे. आई मी नंतर फोन करते." तिने फोन ठेवला. ती कामात होती. कपडे धुतल्या वर तिने स्वयंपाक केला. श्रुती, आशाताई, बाबा जेवायला बसले.
" घरातलं सगळं रितेशला सांगत बसायच नाही श्रुती. " आशाताई म्हणाल्या.
"हो आई. " आता मी मनातल्या गोष्टी यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? त्यांच्या शिवाय या घरात माझ्या जवळच कोणी आहे का?
"घरात खूप जाळं झाल आहे श्रुती. ते बघ जरा. दळण कर आणि जरा डबे नीट लाव. "
" हो आई. "
"आज माझ्या मैत्रिणी आपल्याकडे येणार आहेत भजना साठी आणि तुला ही भेटून होईल. " आशाताईंचा ग्रुप होता. त्या रोज सकाळी वॉक साठी जात होत्या. संध्याकाळी ही भजन, गेट टुगेदर असे कार्यक्रम असायचे.
"ठीक आहे आई. कटलेट करते आई नंतर चहा होईल."
" हो चालेल. तू साडी नेस त्यांच्या पाया पड. "
" हो आई मी नेहमीच नमस्कार करते. " दरवेळी काय सांगतात. मला माझ्या आईने चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. पण ती काही म्हणाली नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा