एकत्र राहण्याचा अट्टहास नको-1

मराठी कथा
"असंही ही आपली शेवटची भेट असेल त्यामुळे हे गिफ्ट तुझ्याजवळच असुदेत.."

असं म्हणत गौरवने तिने दिलेलं गिफ्ट तिच्याकडे परत सरकवलं. तिनेही हसत हसत ते परत घेतलं. दोघे कितीही दाखवायचा प्रयत्न करत असले तरी आतून दोघांनाही वाईट वाटत होतं.

मॅट्रिमोनि साईटवर दीप्ती आणि गौरवची ओळख झालेली. दीप्ती एका मल्टिनॅशनल कंपनीत बेंगलोरमध्ये कामाला होती आणि गौरवलाही तिथल्याच एका कंपनीत जॉब ऑफर आलेली. सगळं कसं सुरळीत सुरू होतं. दोघांच्याही घरच्यांची पसंती झाली होती, विशेष म्हणजे गौरव आणि दिप्तीचे विचार कमालीचे जुळत होते. अगदी आर्थिक बाबींपासून ते राजकीत मतांबद्दल दोघेही अगदी सारख्या विचारांचे होते. दोघांनाही साहसी प्रकार करायला आवडायचे..

याच गोष्टींमुळे दोघेही एकत्र भेटले की त्यांच्या गप्पाच संपत नसत. दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागलेला..प्रेम वाढत गेलं आणि दोघांनीही प्रेमाची कबुली दिली.

पण एक विषय निघाला आणि दोघांनीही वेगळं व्हायचं ठरवलं..

त्या विषयावर दोघांचं एकमत होतच नव्हतं, कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं...

गौरवच्या घरी त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी असायचे. गौरव आपल्या घरच्यांबद्दल भरभरून बोलायचा, दिप्तीलाही अश्या कुटुंबाचा भाग होण्यात मोठी उत्सुकता होती. मुळातच बोलका स्वभाव असल्याने त्याची आई आणि ती यांचं चांगलं जमायचं. आई आणि दिप्तीला असं एकत्र बघून गौरवच्या मनात गुदगुल्या होत. आई दिप्तीचं कौतुक करायची तेव्हा गौरव अगदी हवेतच उडायचा..

मॅट्रिमोनि साईट फक्त एक कारण होतं, दोघेही इतरत्र कुठे भेटली असती तर त्यांच्यात नक्कीच प्रेमविवाह झाला असता..

पण गौरवने एकत्र राहण्याचा निर्णय तिला सांगितला आणि तिने आपलं स्पष्ट मत मांडलं..

क्रमशः


🎭 Series Post

View all