Login

अव्यक्त-1

अव्यक्त प्रेम

"तुझ्याही मनात तोच विचार चालू आहे की जो माझ्या मनात आहे?"

आईने घाबरून वर पाहिलं...मावशीच्या या अनपेक्षित प्रश्नाने आई भांबावून गेली. काहीवेळ विचार केला आणि म्हणाली,

"नाही नाही...हिला वडील नाही म्हणून इतकेही लाचार नाही झालो की मुलीला दुसऱ्या जातीत देऊ.."

"जात? या जमान्यात काय जात घेऊन बसलीस तू?"

"पण...नातेवाईक, समाज..यांना तोंड द्यावंच लागतं गं. लोकं उद्या असंही म्हणतील की जातीबाहेरचा मुलगा केला म्हणजे नक्कीच यांचं अफेयर असणार.."

मावशीला कळेना काय उत्तर द्यावं.

कांचन घरातली मोठी मुलगी. एका चाळीत राहणारं ते कुटुंब. सुखी समाधानी कुटुंबाला नजर लागावी तशी त्यांच्या कुटुंबाला लागली आणि तिच्या वडिलांचं आकस्मित निधन झालं. या धक्क्याने पूर्ण घर कोलमडलं. वडिलांशीवाय आयुष्य काय असतं हे कांचनला आणि नवऱ्याशिवाय आयुष्य काय असतं हे तिच्या आईला समजलं होतं.

या धक्क्यातून सावरायला त्यांना वर्ष लागलं.

पण या काळात त्यांच्या कुटुंबाला सर्वात मोठा आधार कुणी दिला असेल तो परागने. पराग चाळीतच शेजारीच रहाणारा त्यांच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चाळीत सर्वांचा आवडता.

आवडता यासाठी की पूर्ण चाळीत तो एकटाच हुशार, समंजस, निर्व्यसनी होता. त्याचं नुकतंच इंजिनिअरिंग झालं होतं आणि एका मोठया कंपनीत तो कामावर होता.

लहानपणापासून त्याचं घरी येणं जाणं असायचं. जसे वडील गेले तसा पराग घरी चार चकरा मारे.

"मावशी काही हवंय का? मावशी बाजारात जातोय काही आणू का? मावशी कचेरीत काही काम असेल तर मला सांगा..."

घराची गरज ओळखून तो मदतीला कायम हजर असायचा. त्याला माहित होतं की घरातला आधार नसला की कोणकोणत्या गोष्टींची उणीव भासते....


0

🎭 Series Post

View all