Login

आयुष्य कसं जगायचं?

About Life

" अगं,मीरा का रडते आहे? किती मनाला लावून घेते तू? आतापर्यंत असे ऐकायची सवय करून घ्यायला हवी होती तू. मी बघं ...काही मनावर घेतो का?"

नवर्‍याच्या या बोलण्यावर, मीनाताईंना अजून रडू आले आणि रडता रडताच त्या बोलू लागल्या.

"अहो,एवढंस काचेच भांड माझ्या हातातून पडलं आणि तेही तनूचाच धक्का लागला म्हणून पडलं; पण सूनबाईला फक्त संधी हवी मला बोलण्यासाठी. तिच्याच मुलीचा धक्का लागला म्हणून भांड पडलं आणि फुटलं ना? हे सूनबाईला मी सांगितले,तनूने सांगितले; पण सूनबाईला फक्त माझीच चूक दिसते. एवढ्याशा भांड्यावरुन किती बोलली मला! मला तर बोलतेच;पण तुमचाही अपमान करत असते..त्याचेच जास्त वाईट वाटते. आपण दोघांनी संसाराची,सुखी जीवनाची किती स्वप्न पाहिली होती? लग्नानंतर संसार,मुले व इतर जबाबदार्‍या यात इतकी वर्षे,आयुष्य निघून गेले.हे कळालेही नाही.आता रिटायरमेंट नंतरचे आयुष्य सुखाचे जगू म्हटलं...तर सूनबाई अशी! आणि मुलगाही तिच्याच तालावर नाचणारा!"


"अगं,ते दोघे आपल्याशी कसेही वागो.आपण आहोत ना एकमेकांसाठी? आयुष्याची पहिली इनिंग आपण एकमेकांच्या सोबतीने चांगली पार पाडली ना? आता सेंकड इनिंगही एकमेकांच्या मदतीने,प्रेमाने चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करु या ना!"

मीराताईंचे मिस्टर त्यांना धीर देत म्हणाले.

नवर्‍याच्या प्रेमळ व धीराचे शब्द ऐकून, मीराताईंना थोडे बरे वाटले व त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले.

या दोघांचे बोलणे,बाजूच्याच बाकावर बसलेल्या कल्पनाताईंना ऐकू जात होते.

सूनबाईशी वाद नको,मनाला शांतता मिळावी म्हणून मीराताई व त्यांचे मिस्टर बागेत आले होते.

कल्पनाताई आपल्या नातीला घेऊन बागेत आल्या होत्या. नात इतर मुलांबरोबर खेळत होती व
कल्पनाताई बाकावर बसून तिच्याकडे लक्ष देत होत्या.

कल्पनाताईंना मीराताई व त्यांच्या मिस्टरांचे बोलणे ऐकल्यावर, त्यांच्या घरातील परिस्थितीचा अंदाज आला व त्यामुळे खूप वाईट वाटले.

' आयुष्याची सेंकड इनिंग...कुणाची सुखाची,आरामाची तर कुणाची दु:खाची,कष्टाची !

माझ्या आयुष्याची सेंकड इनिंग कशी आहे?
हे मला ठरवताच येत नाही.कधी सुखाची वाटते तर कधी खूप दु:खाची!
मीराताईंचे दु:ख समजून घेणारा त्यांचा लाईफ पार्टनर त्यांच्या सोबतीला आहे;पण मी माझे दु:ख कोणाला सांगू? माझा लाइफ पार्टनर तर गेला मला एकटीला सोडून...त्याच्याशिवाय आयुष्याची ही सेंकड इनिंग जगण्यात मला आनंद नाही...मजा नाही. त्याच्याविना आयुष्य कसं जगायचं?'

या विचारांनी कल्पनाताईंना आपल्या आयुष्याचा आजपर्यंतचा प्रवास आठवू लागला.

' मला शिक्षणाची खूप आवड होती;पण चांगले स्थळ आले म्हणून पुढे शिकू न देता,लग्न करुन मला सासरी पाठवले.माझी शिक्षणाची आवड पाहून नवर्‍याने मला पुढचे शिक्षण करू दिले. मी D.Ed. करून शिक्षिका म्हणून नोकरीला लागले.माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद झाला.यात माझ्या नवर्‍याचा खूप महत्त्वाचा वाटा होता. बायकोला समजून घेणारा, तिच्या स्वप्नांना बळ देणारा जीवनसाथी असला तर...जीवनाचा प्रवास सुखाचा होतो.

मलाही असाच जीवनसाथी भेटला होता. माझ्यावर खूप प्रेम करणारा,मला समजून घेणारा!

माझेही त्याच्यावर खूप प्रेम होते.मी पण त्याची सुखदुःखे समजून घेत होती.
दोघांनी एकमेकांना समजून घेतले; तरचं संसार सुखाचा होतो.

आम्ही दोघंही नोकरी करत होतो; पण तरीही संसारात आर्थिक अडचण यायची.सासरे शेती करायचे;पण शेतीचे उत्पन्न फारसे यायचे नाही. काही वेळेस तर खर्चही निघायचा नाही. लहान दीर व नणंद यांचे शिक्षण व नंतर त्यांचे लग्न यासाठी खर्च झाला. सासूसासरे यांचे लहानमोठे आजारपण यातही पैसा खर्च होई. पूजा व दीपक च्या जन्मानंतर त्यांचाही खर्च सुरू झाला. सर्व पैसा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच खर्च होत होता. कुठे हिंडणे-फिरणे नाही की कुठली हौसमौज नाही! फिरण्याची,हिंडण्याची माझ्या मनातील इच्छा मी नवर्‍याला सांगायची,तेव्हा तो म्हणायचा,

"थांब थोडे वर्ष..एकदा या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या,पूजाचे लग्न झाले,दीपक नोकरीला लागला आणि आपण नोकरीतून रिटायर्ड झालो की सर्व हौसमौज करू..आपल्या आयुष्याची सेंकड इनिंग मस्त एन्जॉय करू."

आम्ही दोघ संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता,रिटायर्डमेंट नंतरच्या आयुष्याची स्वप्ने पाहत होतो,वेगवेगळे प्लॅन्स ठरवत होतो.
नुसत्या विचारांनी देखील आम्हांला खूप आनंद होत होता.


पण आयुष्यात आपण ठरवतो...तसे होते का?

काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी नियती घडवून आणते.


रिटायर्ड होऊन एक वर्षही झाला नसेल,
रोजप्रमाणे नवरा माॅर्निग वाॅकसाठी गेला आणि रस्त्यात त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. हाॅस्पिटलमध्ये नेईपर्यंत सर्व संपले होते.
आमच्या सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांनी निदान पूजाचे लग्न तरी पाहिले. अशी दु:खी मनाची समजूत घालत होतो.
दीपकचे शिक्षण सुरू होते. माझी अजून पाच वर्षे नोकरी होती.

आपण सुखी भविष्याची स्वप्ने पाहतो, त्यासाठी पैशाची बचत करतो. जबाबदाऱ्या पूर्ण करताना हौसमौज बाजूला ठेवतो.
पण नंतरच्या आयुष्यात काय होईल? हे आपल्या हातात नसते.

मी व माझ्या नवर्‍याने पाहिलेली स्वप्ने,आखलेल्या योजना सर्वकाही त्यांच्याबरोबर चालल्या गेल्या.
मन तर कशातच लागत नव्हते.
नोकरी व दीपकचे शिक्षण,लग्न या जबाबदाऱ्या मला पूर्ण करायच्या होत्या.


दीपकचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरीला लागला. काही वर्षांत लग्नही झाले. पूजाला मुलगा झाला.
सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. तरीही अनेकदा मी मनातून नवर्‍याला म्हणायचे,'या क्षणी तुम्ही हवे होता.'

जावई ही चांगला भेटला होता व सूनही चांगली भेटली; त्यामुळे मुलीचा,मुलाचा संसार व्यवस्थित सुरू होता. पूजाच्या मुलाची व दीपकच्या मुलीची मी आजी झाली होती.
सर्वजण मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी मला भारतात व भारताबाहेरही छान हिंडून,फिरून आणले. माझा नवरा शरीराने सोडून गेला तरी मनाने माझ्याजवळ आहे. असे मला वाटत राहिले.

नोकरीतून रिटायर्ड झाल्यावर, नातीला सांभाळणे, घरातील काही कामे करणे, वाचन करणे यात वेळ घालवत असते.
आयुष्यात तक्रार असे काही नाही;पण माझा जीवनसाथी सोबतीला नसल्याने जीवन अपूर्ण वाटते आहे.
मीराताईंचा जीवनसाथी सोबत आहे; पण मुलगा व सून यांच्यामुळे त्या दु:खी आहेत.


माझ्याप्रमाणे व त्यांच्याप्रमाणे असे अनेक जण असतील, ज्यांची आयुष्याची सेंकड इनिंग कोणत्यातरी गोष्टीमुळे दु:खी असेल?
पण तरीही सर्वांना आयुष्य जगावचं लागत. दुसरी इनिंग संपेपर्यंत आयुष्याचा खेळ खेळावाच लागतो.
फक्त 'आयुष्य कसं जगायचं!' हे ज्याने त्याने आपआपलं ठरवायचं असतं.
रडतरडत की हसतहसत?
दु:खात की सुखात?
आयुष्याच्या खेळात हार मानून की जिंकून? '


"आजी..आजी मला खूप भूक लागली आहे. घरी चल ना."

नातीच्या आवाजाने कल्पनाताई विचारांतून बाहेर आल्या.आणि तिला मायेने जवळ घेत म्हणाल्या,

" हो,जाऊ या घरी.तुला भूक लागली आहे ना.. तुझ्यासाठी गरमागरम काहीतरी खायला बनवते."

आजीच्या प्रेमळ बोलण्याने,स्पर्शाने नातीला खूप आनंद झाला व ती हसतबागडत,आजीचा हात धरून घरी जायला लागली.
नातीचा हसरा चेहरा पाहून, कल्पनाताईंचाही चेहरा आनंदी झाला.


समाप्त
नलिनी बहाळकर