Login

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( दत्ता जोशी ) भाग दुसरा

नशिबाचा खेळ कोणाला कळला आहे बरं, नाहीतर एक वारांगना एका संन्याश्याच्या प्रेमात पडलीच नसती.

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग दोन )

महाराज दिर्घकाळ युद्धावर जाणार होते. तेंव्हा आजची रात्र त्यांना तिच्या सोबत घालवायची होती. अर्थात ही गोष्ट तिच्या साठी काही नवीन नव्हती. राजाला कसे सुखी करावे या कलेत ती निपुण होती.


राजाची जी मुख्य महाराणी होती तिची मात्र ईच्छा होती की आजची रात्र राजाने तिच्या सोबत घालवावी. पण हे व्हायचे कसे. राणीने मैथिलीला गुप्त पणं संदेश पाठवला की तिने कसंही करून आज राजाला टाळावं आणि आजची रात्र राणीच्या सहवासात घालवू द्यावी. राणीने आपल्याला विनंती करावी याचा मैथिलीला फारच अभिमान वाटला. आपल्या तारुण्यान मुसमुसलेल्या यौवनाकडे तिने अभिमानानं पाहिलं. कसलं दैव दुर्लभ सौंदर्य दैवाने तिला मुक्त हस्ताने दिलेलं होतं. की आज राज्याची महाराणी असलेल्या पट्टराणीला तिला विनंती करावी लागतं होती.

पण महाराजांना नकार देणं ही गोष्ट कठीण तर होतीच पण त्याच बरोबर त्या क्षणांना मिळणार असलेल्या मौल्यवान भेटींना देखील गमावण्या सारखे होते. काय करावं तिला समजत नव्हतं. तेवढ्यात एका दासीने स्वतः महाराणी तिला भेटायला आल्याचा निरोप दिला.

रत्नजडित आसनावर राणी बसली होती. पहिल्यांदाच ती या महालात आली होती. एका दासीने सुवर्णाच्या पेल्यात वाळा घातलेले थंडगार गुलाब पाणी राणीला प्यायला दिले. दोन दासी राणीला पंख्याने वारा घालत होत्या. मैथिली महालात येताच राणीने त्या दासींना बाहेर जाण्यास सांगीतले. आणि ती मैथिली कडे बघायला लागली. मैथिलीच अलौकिक सौंदर्य पाहिल्यावर तिने देखील मान्य केलं, की सौंदर्य कसं असावं याचा मैथीली म्हणजे मापदंड.

" हे बघ मैथिली, आज मी तुझ्याजवळ भिक्षा मागते आहे की आजची रात्र महाराजांना माझ्या शयनगृहात झोपू दे. त्या बदल्यात तू म्हणशील ते मी तुला देते. किंवा महाराज जे काही देणार असतील त्याच्या दुप्पट गोष्टी मी तुला देते. का कुणास ठाउक पण महाराजांनी आजची रात्र माझ्या सहवासात घालवावी असे मला वाटतं आहे. "

आपल्या अंगठ्यावर नजर ठेवून खाली मान घालून मैथीली म्हणाली,

" राणी सरकार, मी यत्किंचित क्षुद्र दासी. आपण मला विनंती नाही तर आज्ञा करावी. पण राणी सरकार आपण महाराजांना जाणता. त्यांना नकार देणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. कसे बरं करावे. आपणच सांगा."

खरं म्हणजे हा तिचा मानभावी पणा होता. आज का कुणास ठाऊक, त्या पुष्करणीवर स्नान करतांना महाराजांच्या आलेल्या निरोपामुळे तिच्या अंगात मदनाच्या ज्वाळा उसळल्या होत्या. केंव्हा एकदा रात्र होते आणि हा कोमल देह महाराजांच्या स्वाधीन करून टाकते असं तिला झालं होतं.

तिच्या प्रश्नाला राणीकडे उत्तर नव्हतं. दोघीही बराच वेळ बसून होत्या. अंधार हळूहळू वाढू लागला. दासींनी अत्तराचे दिवे लावले.

तेव्हढ्यात दूरवरून महाराज येत असल्याची ललकारी आली. राणी पराभूत झाल्या सारखी खाली मान घालुन दुसऱ्या रस्त्याने आपल्या महालात आली.

महाराज दमदार पावलं टाकत मैथिलीच्या महालात आले. अलगद तिच्या मंचावर बसून त्यांनी तिला जवळ ओढले. दासींनी समयीतल्या वाती विझवून अंधार केला. आकाशात असलेल्या पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचं टिपूर चांदणं तिच्या महालात पसरलं होतं.

तिच्या अंगाचा चंदनी सुगंध त्यांना वेड लावत होता. महाराजांनी तिला आपल्या जवळ ओढलं आणि तिचं लक्ष गवाक्षातून दिसणाऱ्या राजरस्त्या कडे गेलं. तिला कसलंच भान राहिलं नाही. डोळे विस्फारून ती बघतच राहिली.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all