चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)
(लघुकथा फेरी)
शीर्षक : बाप-लेकाचं गुपित
आशुतोष ऑफिसवरून घरी आले तेव्हा त्यांचा मुलगा प्रमोद नुकताच पाठ्यपुस्तक हातात घेऊन बसला होता. त्यांनी एक कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि चप्पल उंबरठ्याबाहेर काढून आत आले. हात-पाय धुवून झाल्यावर निवांतपणे सोफ्यावर बसले. प्रमोद चोरून त्यांच्या हालचाली टिपत होता, हे त्यांच्याही लक्षात आले होते.
"काय झालं? काय बघतोय? काही बोलायचंय का?" प्रमोदकडे पाहत आशुतोषने विचारले.
"काही नाही बाबा, असंच बघत होतो. खूप दमलेले वाटत आहात, पाय चेपून देऊ?" प्रमोदने निरीक्षण करत विचारले.
"नको. अभ्यास करतोय ना, तोच कर मन लावून. त्यातच माझा आनंद दडलेला आहे." आशुतोष म्हणाले; पण ते ऐकून घामाचा एक थेंब प्रमोदच्याही नकळत त्याच्या कपाळावरून घरंगळत खाली पडला.
"अं... हो." नजर चोरतच तो म्हणाला.
थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. तेवढ्यात आशुतोषला काहीतरी आठवले, "आज निकाल होता ना! काय आला निकाल?" त्यांनी विचारले.
प्रमोदने आवंढा गिळला. "बाबा... ते..." तो ततपप करू लागला.
"काय? चेहऱ्यावर बारा का वाजलेत? परीक्षा दिली होतीस ना? की गेलाच नव्हतास परीक्षेला? कारण त्याच दिवशी तुझी हॉकीची मॅच होती, असं म्हणालेलास तू..." आता आशुतोषच्या आवाजात कठोरपणा जाणवत होता.
ते धारदार नजर रोखून प्रमोदकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत होते आणि प्रमोद नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता.
"हो बाबा, होती मॅच पण मी... मी गेलो होतो परीक्षेला." बाबांचा धाक असल्याने तो बोलताना थोडा अडखळत होता.
"ह्म्म. दे मग गुणपत्रिका, बघू कसा आलाय निकाल!" ते गुणपत्रिकेसाठी हात पुढे करत म्हणाले.
"बाबा... ते... मी..." प्रमोद हातांची चुळबुळ करत तिथेच थांबत म्हणाला.
"निकाल!" ते चढ्या आवाजातच म्हणाले आणि प्रमोद पुरता दचकला.
पळतच दप्तरातून गुणपत्रिका बाहेर काढली आणि थरथरतच आशुतोषला सोपवली. त्यांनी गुणपत्रिका हातात घेत पाहिली आणि क्षणात त्यांचे हावभाव बदलले. प्रमोदने घट्ट डोळे मिटून घेतले, कारण पुढच्या क्षणी काय होईल याचा अंदाज त्यालाही आला होता.
"काय आहे हे प्रमोद?" कठोर आवाजातच त्यांनी प्रमोदला निक्षून विचारले.
"बाबा ते..." तो परत अडखळायला लागला. भीतीने त्याच्यातले होते नव्हते ते त्राण कधीच गळून पडले होते.
"काय बाबा ते? काय आहे हा निकाल त्याचं उत्तर दे. काय आहेत हे गुण? याला गुण तरी म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. एकाही विषयात उत्तीर्ण नाही झालास तू... खरं सांग, तू परीक्षेला नक्की गेला होतास ना? की खोटं बोललास माझ्याशी?" एका हातात गुणपत्रिका घट्ट पकडून ते प्रमोदला जाब विचारत होते.
"नाही बाबा, मी... मी खोटं नाही बोललो. मी खरंच गेलो होतो परीक्षेला. तुम्ही सगळ्या शिक्षकांकडून, माझ्या मित्रांकडून खात्री करून घेऊ शकता." तो घाबरला होता पण त्याची बाजू तीव्रतेने मांडत होता.
"मग एका तासात काहीच कसं सुचलं नाही तुला? चाचणी परीक्षेत हा प्रताप केला तर सहामाही आणि वार्षिक परीक्षेत किती मोठा पराक्रम करण्याचा विचार आहे तुझा? तुझ्यासाठी एवढी शिकवणी लावली, खेळायलाही विरोध केला नाही. चोवीस तासांपैकी फक्त एक तास मन लावून अभ्यास करायला सांगितला म्हणजे आठवड्यातून केवळ सात तासही देऊ शकत नाही का तू अभ्यासाला? आणि असंही नाही की अपेक्षांचं ओझं लादलं मी तुझ्यावर... तू फक्त उत्तीर्ण हो, एवढंच म्हणालोय. इतके गुण मिळालेच पाहिजे, इतकी टक्केवारी असायलाच हवी, असाही आग्रह केला नाही मी कधी... मग तू एवढंही करू शकत नाहीस का? कुठे माझं चुकलं ते सांग... की तुला खरंच माझं काही ऐकायचं नाहीये?" आशुतोष संतापून बोलत होते.
"असं नाहीये बाबा..." प्रमोद दचकून ओठांतल्या ओठांत बोलला.
"तुला मी इतर पालकांसारखा अभ्यास एके अभ्यास करायला सांगतो का? इतर पालकांप्रमाणे गुणांसाठी किरकिर केली का? माझ्या आवडी-निवडी लादल्या का? खेळायला, खोड्या करायला विरोध केला का? नाही ना? मग खरंच सांग, दिवसांतून एक तास अभ्यास करू शकत नाहीस का तू? निदान काठावर गुण मिळवून उत्तीर्ण होऊ शकत नाहीस का तू? मलाही कळतं या वयात ताण येतो, तुमचा अभ्यासक्रम, अभ्यासाची शैली बदलली आहे. अनेक विचार तुझ्याही डोक्यात असतील म्हणून मी कधीच तुझ्यावर कसल्याही बाबतीत दबाव आणला नाही. तुला तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं करायला परवानगी दिली, इथे चुकलो का मी?" आता मुठी घट्ट आवळून आशुतोष प्रमोदला विचारणा करत होते.
"बाबा... मी... मी प्रयत्न करतो हो पण नाही होत काहीच. तुमची कळकळ मलाही कळते; पण कितीही अभ्यास केला तरी ऐन परीक्षेला डोकं रितं झाल्यासारखं वाटतं. काहीच आठवत नाही. मी लिहिण्याचा प्रयत्न करतो पण शब्द जणू मुके होतात. प्रश्नपत्रिका वाचताना वाटतं येतं मला सगळं; पण जेव्हा उत्तरपत्रिकेत उत्तर लिहायची वेळ येते तेव्हा एक अक्षर आठवत नाही. मग पॅनिक होतो मी आणि जे साधे प्रश्न असतात जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा, चूक-बरोबर सांगा, एका वाक्यात उत्तरे लिहा यातही गफलत करून हातातले गुण गमावून बसतो. माझा खरंच तसा कोणताच हेतू नसतो पण घडत जातं आपोआप सगळं; पण हॉकी खेळताना सगळं सॉर्टेड असतं. म्हणजे कितीही मोठी मॅच आणि ताण असला तरी मी नर्व्हसनेसमुळे धांदल करत नाही. नवीन स्ट्रॅटेजीस अगदी क्षणात सुचतात. गोल करताना मी गफलत करत नाही. उलट हॉकी खेळताना कोणी चॅलेंज केले की स्वतःला सिद्ध करायला आवडतं मला! म्हणून मी... मी विचार केला आहे की, मी... मी हॉकी खेळणार. फक्त विरंगुळा म्हणून नाही तर मी हॉकीकडे करियरच्या दृष्टीकोनाने बघतोय. बाबा, सॉरी पण माझं अभ्यासात मन रमत नाही, मला हॉकी प्लेयर व्हायचंय." अडखळत, चाचरत, घाबरत, दचकत का होईना; पण अंततः प्रमोदने मौन सोडून मनातले विचार सादर केले.
"तुला हॉकीपटू व्हायचंय! बरं, घडव करियर त्यात, माझा विरोध नाहीच; पण मला सांग, उद्या तू हॉकीपटू झाल्यावर नावलौकिक मिळवले, प्रसिद्ध झाला तर स्वतःचा परिचय कसा देशील? तुझं मत प्रेक्षकांना, चाहत्यांना कसं समजावून सांगशील? तुझ्या स्ट्रॅटजीस तुझ्या समुहातील खेळाडूंसमोर कशा मांडशील? भविष्यात तुला एखाद्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं गेलं तर कशाप्रकारे मनोगत व्यक्त करशील? एक काम कर, माझ्यापुढे नमुना सादर कर बघू... बाकी सगळं राहू दे, तू तुझा परिचय दे. असं समज मी मोठा हॉकी कोच आहे आणि हॉकीबद्दल, तुझ्या ध्येयाबद्दल, हॉकीशी असणाऱ्या ऋणानुबंधाबद्दल तुला मला सांगायचं आहे व विनंती करायची आहे की मी तुला माझ्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण द्यावं." हाताची घडी घालत आशुतोष ताठ बसून बोलले.
सर्वकाही एकाएकी होते म्हणून प्रमोद आधी बावरलाच; पण हळूहळू धाडस करून तो व्यक्त झाला आणि त्याने त्याचा परिचय दिला.
"व्वा छान बोललास! पण बोलताना तू एवढं अडखळलास तर आपोआप तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांसमोर ठामपणे पडणार नाही." आशुतोष गंभीरपणे म्हणाले.
"तुम्ही एकाएकी म्हणालात म्हणून थोडा अवघडलो होतो मी." प्रमोद लगेच म्हणाला.
"अगदी बरोबर, मी तुझा बाबा असूनही तू ऐनवेळी असा बावरलास. मग ज्या लोकांशी तुझी पहिल्यांदाच भेट होईल, त्यांच्यासमोर तुझी किती तारांबळ उडेल? आणि मानवी स्वभावगुण आहे हा, अनोळखी लोकांपुढे आपण बहुतांशी गोंधळतो; पण खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व निर्भीड, रुबाबदार हवे व त्यासाठी गरजेचे आहे संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. शिवाय तुला फार इंग्रजी बोलता आली नाही तरी हरकत नाही; पण तुला काय म्हणायचंय ते इतरांना कळावं, निदान एवढी अस्खलित मराठी भाषा बोलता यावी. तसेच परदेशी दौऱ्यादरम्यान तू जे मराठीत बोलतोय ते इंग्रजी भाषिक प्रेक्षकांना, तुझ्या चाहत्यांना ट्रान्सलेटर योग्यपणे समजावत आहे की नाही, ही खात्री करण्याएवढं इंग्रजीचं ज्ञान मात्र तुला असायलाच हवं. म्हणजे कळत-नकळत ट्रान्सलेटरद्वारे क्षुल्लक चुका झाल्या सगळं व्यक्त करताना, तर तू ती चूक लक्षात आणू शकशील. साधे राहणीमान प्रभावी असतेच; पण तुझी खेळाडू म्हणून जी प्रतिभा असेल ती शाबूत राखण्यासाठी तुझ्या व्यक्तिमत्त्वात ठामपणा असायला हवा आणि हा ठामपणा, समजूतदारपणा शिक्षणाची प्राथमिक पातळी पार केल्याविना येत नाही. या बारीकसारीक गोष्टी आत्मसात करूनच खेळाडू त्यांची प्रतिभा वाढवतात." आशुतोष बोलत होते आणि प्रमोद लक्षपूर्वक ऐकत होता; कारण त्याला त्याच्या बाबांचे मुद्दे पटत होते.
"खरं सांगायचं तर, हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मला तुझा अभिमान आहे. आपल्या राष्ट्रालाही वाटेलच तुझा अभिमान! मग अशावेळी तुझं राष्ट्राला देणं आहे की तू प्रत्येक बाबतीत परिपूर्ण हवा. विद्यार्थी म्हणून, खेळाडू म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून! सगळंच कॅज्युअल असेल तर कसं चालायचं? तुझं मुख्य ध्येय हॉकीच असू दे; पण अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष नको करू. निदान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण कर. मी फक्त दहावी किंवा बारावी मुद्दाम म्हणालेलो नाही; कारण आजच्या युगात दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण असून काहीच होत नाही. स्पर्धेचं युग आहे हे, आमच्यासारखी सर्वसाधारण माणसं तर झुंज देत असतातच रोज; पण खेळाडूंची संख्याही कमी नाहीच आपल्या भारतात. त्यामुळे तुझ्या कमी शिक्षणामुळे भविष्यकालीन संधी हुकू नये, मला असं वाटतं; म्हणून माझं तुला कळकळीचं सांगणं आहे की आता आठवीत आहेस दोन वर्षांनी मॅट्रिकची परीक्षा असेल, तर आतापासूनच अभ्यासात मन रमत नसलं तरी उत्तीर्ण होण्याचा कल असू दे; कारण तुझ्या ध्येयाच्या वाटचालीत शिक्षण अडथळा नव्हे तर मुलभूत स्त्रोत ठरणार आहे. तुझ्या हॉकी खेळण्याला विरोध नाही माझा. तुला आणखी सोयीसुविधा उपलब्ध करून देईन आणि तुझ्यासाठी उत्तम हॉकी कोचसुद्धा शोधणार आहे मी, तू फक्त अभ्यासाला कंटाळून शिक्षणाचा तिरस्कार करू नको. करशील ना एवढं माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि तुझ्या ध्येयासाठी?" एकेक मुद्दा नीट समजावून सांगत आशुतोषने शेवटी आशेने पाहत प्रमोदला विचारले.
"हो बाबा नक्कीच करेन, वचन देतो. तुम्ही जे बोललात, जे समजवलंत ते मलाही पटलंय. म्हणून थोडी आणखी मेहनत घेईन; पण अभ्यास करेन. मी कोणतीही कसर सोडणार नाही, जेणेकरून माझ्या ध्येयपूर्तीत कोणताही अडथळा येणार नाही." प्रमोद ठाम स्वरात म्हणाला. त्याच्या शब्दांतून आत्मविश्वास झळकत होता.
"शाब्बास!" त्याची पाठ थोपटत आशुतोष म्हणाले.
"बाबा, खरंतर मी घाबरतो तुम्हाला म्हणून कधी नीट मनातलं बोलताच येत नाही; पण आज जेव्हा धाडस करून बोललो तेव्हा तुम्ही इतकं नीट सगळं समजावून सांगितलं की वाटतंय खूप आधीच तुमच्याशी चर्चा करायला हवी होती." प्रमोद त्याच्या मनात जे विचार आले तेच बोलून मोकळा झाला.
आशुतोषने प्रमोदला आपल्या बाजूला बसवले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले, "हे बघ, घाबरत जाऊ नकोस. आम्ही पालकसुद्धा तुमच्या भल्याचाच विचार करत असतो. तुमच्या वयातून आम्हीही गेलेलो असतो. चुका आम्हीही केल्या होत्या आणि करत असतो; पण त्याच चुका आपली मुले करताना दिसत असतील आणि नंतर पश्चात्ताप व्यक्त करणार असतील, तर ती गोष्ट सहन होत नाही; म्हणून आम्ही वेळीच सावध करतो. कदाचित पद्धत चुकू शकते, कारण आमचीही पालकत्व पार पाडण्याची पहिलीच वेळ असते, तर साहाजिकच काही गोष्टी अचूक घडतील आणि काहीत त्रुटी राहतील. प्रत्येक पालकांच्या आपल्या लेकरांकडून अपेक्षा असतात; पण तुमच्यावर दडपण आणण्याची आम्हालाही हौस नसतेच. शेवटी आम्हीही तुमच्यासारखंच चुका करून शिकत असतो. तुमच्या आनंदासाठी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काहीही करायला सज्ज असतो, तरीही सुपर पॉवर नसतात आमच्याकडेही! राहिला प्रश्न घाबरण्याचा, भीती वाटण्याचा तर आपल्या बाबांना सर्वच मुलं घाबरतात. मीही घाबरायचोच कारण घराला शिस्त लावतात ते बाबा आणि त्यांचा धाक! मोकळीक असावीच, त्यात दुमत नाही; पण कुठेतरी अंकुश असणेही गरजेचं असतं, मात्र व्यक्त होत राहा, यापुढे घाबरू नकोस. मोकळेपणाने चर्चा कर, गप्पा कर. चुकीचं बोलशील तर ऐकण्याचं धाडस असू दे आणि प्रामाणिक मत मांडणार असशील तर ठामपणे उराशी बळ असू दे. कळलं!"
"हो बाबा, तुम्ही ना जगातले सगळ्यात भारी बाबा आहात! सगळं कसं नीट समजावून सांगता, सविस्तर उकल करून..." प्रमोद हलकीशी मिठी मारत म्हणाला.
"हो मग, उगाच उत्कृष्ट समुपदेशक म्हणून ख्याती नाही काही माझी!" आशुतोष किंचित हसत म्हणाले.
"उत्कृष्ट समुपदेशक आणि उत्कृष्ट बाबाही!" तो डोळे मिचकावत म्हणाला.
"ह्म्म. तूप-लोणी लावून झालं असेल तर अभ्यास करा आता. मघाशी पुस्तक उलटं पकडून कोणता अभ्यास करत होतास बरं?" आशुतोष बारीक डोळे करून प्रमोदकडे पाहत म्हणाले आणि त्याने नजर चुकवली.
"बाबा ते... सॉरी." तो ओशाळून म्हणाला.
"ह्म्म. बरं. आता करतोय ना अभ्यास? सरळ पुस्तक पकडून कर हं!" ते त्याची फिरकी घेत म्हणाले.
"हो बाबा." प्रमोद ओशाळून हसत म्हणाला. आशुतोषही खळखळून हसले.
तेवढ्यात माधवी आणि श्रेष्ठा गरबा खेळून आल्या. त्या दोघांना हसताना पाहून भुवया आकसून माधवी म्हणाल्या, "काय सुरू आहे तुम्हा बाप-लेकाचं? स्वारी बरीच खूश दिसतेय. नक्की या खळखळत्या हसण्यामागे काय रहस्य आहे?"
"ते आम्हा बाप-लेकाचं गुपित आहे. तुमचा गरबा खेळून झाला असेल तर आता पानं वाढायला घ्या, खूप भूक लागली आहे." आशुतोष म्हणाले.
"बरं." माधवी नाक मुरडत म्हणाल्या.
"आई, त्यांना जपू दे त्यांचं गुपित. आपण आपलं गुपित जपू." मुद्दाम खोटे बोलून डोळे मिचकत श्रेष्ठा म्हणाली. माधवीला तिचा सूचक इशारा लगेच कळला होता.
"हो." माधवी ओठांचा कोपरा उंचावून किंचित हसून म्हणाल्या.
"तुमचं कोणतं गुपित?" आशुतोष आणि प्रमोदने एकत्रच बारीक डोळे करून विचारले.
"तेच तर गुपित आहे ना आम्हा माय-लेकीचं!" माधवी डोळे मिचकावत म्हणाल्या आणि श्रेष्ठा खळखळून हसायला लागली. त्यांना हसताना बघून आशुतोष आणि प्रमोदही काहीच माहिती नसताना त्यांच्यात सामील होऊन हसू लागले.
समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा