बाप नावाचं आभाळ
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“आई… बाबा… मी आलेय!”
गौरीे बंगल्याच्या फाटकापाशी पाऊल टाकताच तिच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिची चुक लक्षात आली. ‘आईबाबा तर आता नाहीत.’ डोळे पाण्याने भरले. बंगल्याचं फाटक आपोआप कर्कश्श आवाज करीत उघडलं. खूप रिकामं, शांत… जिथे कधी आईचा हसरा आवाज आणि बाबांचा कडक शब्द घुमायचा, तिथे आज फक्त पोकळी होती.. ती तशीच भरल्या डोळ्यांनी फाटकातून आत येत बंगल्याच्या दिशेने चालू लागली.
“आई असती तर फाटकापर्यंत धावत आली असती.. मला घरी आलेलं पाहून किती आनंद झाला असता तिला. म्हणाली असती, ‘आली, आली.. माझी गौरी आली.. माझी लेक आली! बघ बाप्पा, तुझी लाडकी लेक आलीय घरट्यात..”
आईच्या आठवणींनी तिचे डोळे बरसू लागले. दारासमोर येऊन ती उभी राहिली. इतक्यात गौरीची भाची सई बाहेर आली. तिच्याकडे पाहुन आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली,
आईच्या आठवणींनी तिचे डोळे बरसू लागले. दारासमोर येऊन ती उभी राहिली. इतक्यात गौरीची भाची सई बाहेर आली. तिच्याकडे पाहुन आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली,
“आत्ती आली… मम्मा, गौरी आत्ती आली.”
गौरीची वहिनी शुभदा आणि दादा बाहेर आले.
“अरे गौरी आलीस? ये, ये कधीची वाट पाहतोय तुझी.. ”
दादा तिच्या हातातली बॅग घेत हसून म्हणाला.
“कशा आहात ताई? ठीक आहात न?”
शुभदाने तिला विचारलं. गौरीने फक्त मंद हसून होकारार्थी मान डोलावली आणि ती वहिनीसोबत बैठकीच्या खोलीत शिरली. गणपती बाप्पा छान मखरात विराजमान झाले होते. भाच्यांनी सुंदर सजावट केली होती. बाप्पापुढे छान आरास मांडली होती. धूप, अगरबत्तीचा, गोड नैवद्याचा सुवास दरवळत होता. मंद स्वरात बाप्पाची गाणी वाजत होती. ती आतल्या आईबाबांच्या खोलीत आली. तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. भिंतीवर समोर आईबाबांचा फोटो होता. आईचा हसरा, आनंदी आणि बाबांचा नेहमीसारखा रागीट चेहरा, तीक्ष्ण नजर. ती फोटोसमोर थांबली.
“आई, बाबा किती मला रागवायचे! जास्त मोठ्याने बोलायचं नाही, मुलांशी चेष्टा मस्करी करायची नाही, वर मान करून चालायचं नाही. किती ती बंधनं! नेहमी म्हणायचे, ‘मुलगी म्हणजे शिस्त.. घराण्याची लाज.. तिने घरचं नाव राखायचं असतं.’ आई, बाबांना मी कधीच आवडले नाही.”
गौरीच्या डोळयांतून खळकन अश्रू ओघळले. इतक्यात वहिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या स्पर्शाने गौरी भानावर आली.
“या ताई.. चला बाहेर हॉलमध्ये.. चहा आणि नाष्टा आणलाय.. पटकन करून घ्या..”
गौरी येऊन सोफ्यावर बसली. चहाचा एक घोट पोटात जाताच तिला थोडी तरतरी आली. शुभदा वहिनी फुलांचे हार विणायला बसली. चहा संपवून गौरीही हार विणायला बसली; पण मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने धावू लागले. बाबांचं वागणं आठवून तिला त्रास होत होता. लहानपणापासून बाबांनी एकदाही मायेने जवळ घेतलेलं तिला आठवत नव्हतं.
“मला नेहमी वाटायचं, ते माझ्यावर प्रेमच करत नाहीत.”
ती स्वतःशीच पुटपुटली. बाबांचं तिच्याशी तुटक वागणं तिला आठवू लागलं.
“दहावीचा निकाल लागला. मी पास झाले. आईला किती आनंद झाला! आईने तिला मिठी मारून अभिनंदन केलं होतं. पण बाबा? ते म्हणाले, ‘नव्वद टक्के? अजून सुधारणा हवी. जगाशी लढायचं असेल तर अभ्यासात पक्की हो.. पोटभर खायला मिळालं नाही तरी चालेल पण मन भरून शिकून घे.”
हार ओवून झाल्यावर गौरी कापूस हातात घेऊन दिवाच्या वाती वळू लागली. तिला आठवलं,
“सोसायटीच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. मी नेहमी डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे. मी नाचायचे, गाणी म्हणायचे. आई टाळ्या वाजवून हसत राहायची. माझं कौतुक करायची पण बाबा नेहमी “अगं, अभ्यास केलास का?” असं विचारायचे. तेव्हा मला वाटायचं, आई माझी आहे, बाबा फक्त ओरडायला आहेत. त्यांचं प्रेम कधी जाणवलंच नाही.”
ती उठून पुन्हा आतल्या खोलीत आईबाबांच्या फोटोजवळ आली. तिला पुन्हा आठवलं,
“मी पहिल्यांदा शिक्षणासाठी घराबाहेर पडले. आई खूप रडली. ‘माझी पोर.. एकटी कशी राहील? काय खाईल? आजारी पडली तर तिची काळजी कोण घेईल? असं म्हणत होती; पण बाबा? ते म्हणाले होते, शिक्षणासाठी पाठवतोय.. मौज मज्जा करायला नाही.. तेंव्हा फक्त अभ्यास करायचा.. बाकीच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. घरच्या इभ्रतीला आणि आईवडिलांच्या नावाला काळिमा लागेल असं काही वागू नकोस.. याद राख, दूर असलीस तरी माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. मला त्यांच्या शब्दात फक्त धाक जाणवत होता.”
ती बाबांच्या करारी मुद्रेकडे एकटक पाहत होती. तिला आठवलं,
“नोकरी करत असताना बाबा म्हणाले होते, मालकाशी एकनिष्ठ रहा.. काही झालं तरी त्यांच्याशी बेईमानी करायची नाही. एकदा सिनियर उगीच माझ्यावर चिडले म्हणून आईला कॉल केला. आईला वाईट वाटलं होतं. पण बाबा? ते म्हणाले होते, ‘गौरी, डोकं शांत ठेव. ते काय म्हणताहेत ते सगळं ऐक. वाद करू नकोस. तू अजून लर्निंग स्टेजला आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या स्वाभिमानाला कोणी धक्का पोहचवला तर तडक निघून ये.. कोणाची हुजरेगिरी करायची गरज नाही. आपल्या स्वाभिमानापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही.”
आता मात्र आसवांनी डोळ्यांच्या पापण्यांचा काठ ओलांडला होता. तिला आईबाबांची खूप आठवण येऊ लागली. गौरीने फोटोला हळूच स्पर्श केला. गौरी फोटोसमोर बोलू लागली.
“बाबा, आईचं प्रेम दिसत होतं. तिची मिठी जाणवत होती. तिचे प्रेमळ शब्द ऐकू यायचे. तिची माया, काळजी डोळ्यांना दिसायची. पण बाबा.. तुमचं प्रेम मात्र शिस्तीत लपलेलं होतं. म्हणून मी तुमच्याकडे कधी धाव घेतलीच नाही. पण आता या तुमच्या रिकाम्या खोलीत पाऊल टाकलं आणि तुमच्या आठवणीने अंगावर गारवा पसरला. तुम्ही खरंच आभाळ होतात.. मोठ्ठं, गडद, जरा रागीट ढगांनी भरलेलं; पण त्या ढगांनीच कायम माझं रक्षण केलं.”
तिचा आवाज थरथरला.
“बाबा, खरं सांगू? तुम्ही आमच्यात नाहीत म्हणूनच आता तुमचं खरं अस्तित्व मला कळलंय. आता तुमची उणीव खूप भासतेय.. तुम्हाला समजून घेतलं नाही मी.. तुमचा धाक माझ्या पाठीशी होता म्हणून मी कधी घाबरले नाही. आता तुम्ही नाहीत तर सगळं कोसळल्यासारखं वाटतंय.”
गौरीचा हुंदका अनावर होऊ लागला.
“बाबा, तुम्ही म्हणायचात, माझ्या लेकीने घराचं आभाळ सांभाळायला शिकलं पाहिजे. आज मला जाणवतंय, माझं आभाळ तर तुम्हीच होतात. तुमच्या सावलीत मी सुरक्षित होते. आईची माया गोड होती, पण तुमचं मौन आभाळासारखं होतं. तुमच्या शब्दात मला राग दिसायचा पण त्या रागात दडलेली मोठी स्वप्नं आता मला जाणवताहेत.”
आईबाबांच्या आठवणींनी तिला रडू कोसळत होतं; पण त्या रडण्यात एक गोड समाधानही होतं. आता गौरीला कळून चुकलं होतं,
‘आई मायेची ऊब देते, पण वडील आभाळासारखी छत्रछाया देतात. आई सावली आहे, पण सावलीसाठी आभाळ लागतं आणि त्या आभाळाचं नाव आहे बाबा…आपल्याला कधी रागीट वाटणाऱ्या त्यांच्या शब्दांमागे, खरं तर गहिरं प्रेम असतं. आणि ते प्रेम निघून गेल्यावरच त्याची खरी किंमत जाणवते. वडिलांचं प्रेम शब्दांत नसतं, हसण्यात नसतं, पण त्यांच्या धाकात आणि न बोलण्यात दडलेलं असतं.’
गौरीने आईबाबांच्या प्रतिमेला मनोभावे नमस्कार केला आणि पुन्हा हॉलमध्ये आली. बाप्पाची मूर्ती तिच्याकडे पाहून मंद हसतेय असाच तिला भास झाला. तिने डोळे मिटून गणपतीसमोर मनोमन प्रार्थना केली.,
‘बाप्पा, आता मला माझं बाबा नावाचं आभाळ आता कळलंय. ते असतील तिथे त्यांना सुखी ठेव. आणि हो.. जर मला पुढचा जन्म मानवाचा लाभला तर हे बाबा नावाचं आभाळ पुन्हा अनुभवण्यासाठी, जे राहून गेलं ते देण्यासाठी मला पुन्हा त्यांच्याच पोटी जन्म दे..’
समाप्त
©अनुप्रिया
३१.०८.२०२५
©अनुप्रिया
३१.०८.२०२५