बापपणं
बापाचं आई पण
रश्मी सकाळी उठली. ती बाबाला विचारू लागली, हॉस्पिटल मध्ये दहा दिवसांपूर्वी कामासाठी गेलेली आई परत कधी येणार. तर बाप तिला मिठीत घेऊन ढसाढसा रडू लागली. कालच तो आपल्या पत्नीचा अंत्यविधी करून आला होता. आता त्याला आपल्या पिल्लू ची आई आणि बाबा दोन्ही व्हायचं होते.
-----------------------------------------------------------------------
सोबत
सागर आणि शमा सारखेच राजेशच्या मागे मागे होते. काल त्यांनी आई बरोबर बाबांचे बोलणे ऐकले होते. राजेशने धंद्यासाठी कर्ज काढलेले होते. पण, धंदाच नीट झाला नाही. बँकांचा तगादा मागे लागला. आता त्याला त्याचा जीवच नकोसा झाला होता. पण मुलांना बाप हवा होता. मुलांनी आपली पिगीबँक त्याच्यासमोर धरली व म्हणाले बाबा हे पैसे घ्या. पण, आम्हाला सोडून जाऊ नका. तो दोन्ही लेकरांच्या मिठीत विरघळला.
-----------------------------------------------------------------------
डॉक्टर मधला बाप
पंधरा दिवसांनी कोरोना ड्युटी संपवून समीर घरी आला होता. मुलांसोबत हसत-खेळत जेवत होता. तेवढ्यात त्याचा फोन खणखणला. तो हात धुवून तसाच उठला व तयार होऊन हॉस्पिटलला जाऊ लागला. तीन वर्षांची निशा बाबाच्या पायाला धरून म्हणू लागली, बाबा संध्याकाळी लवकर घरी ये आपण भरपूर खेळू. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. तो तिला हो म्हणाला. आज तो कोणाचा तरी बाप वाचवणार होता. पण, तो स्वतः कधी परत येईल हे तो सांगू शकत नव्हता.
-----------------------------------------------------------------------
आईतला बाप
समर्था नावाप्रमाणेच समर्थ होती. नवरा गेल्यावर मुलीला तिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. पण, आज तीच मुलगी कॉलेजमधून रडत घरी आली आणि हिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही मुलांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे समर्थाला कळताच तिच्या अंगात दुर्गात संचारली. दुसऱ्या दिवशी मुली सोबत कॉलेज मध्ये जाऊन, तिने सगळ्या कॉलेज समोर त्या मुलांच्या कानाखाली लगावली. त्यांना समज दिली. आज तिने बापाचे कर्तव्यही निभावले.
-----------------------------------------------------------------------
बापाची घालमेल
मुलीचं लग्न आठवड्यावर येऊन ठेपल होतं. पण पैशांची तजवीज काही होत नव्हती. कोणीतरी सांगितलं बँकेचं कर्ज काढा. आज तो बँकेच्या बाहेर उभा होता, हातात पैसे घेऊन. चेहऱ्यावर समाधान होतं. आता माझ्या पोरीचं लग्न धडाक्यात होईल. कर्जाच काय, फेडू की नंतर. पोरगी खुश, तर मी पण खुश.
-----------------------------------------------------------------------
खंबीर बाप
वडिलांनी कर्ज काढून मुलीचं लग्न केलं. मुलगी सुखात राहावी म्हणून सासरच्यांची सरबराई केली. पण जेव्हा मुलगी माहेरी आली आणि तिने सांगितलं नवऱ्याने तिच्यावर हात उचलला. तसा बापाने जावयाला निरोप पाठवला, माझी पोर मला जड नाही. ती तुमच्याबरोबर येणार नाही.
-----------------------------------------------------------------------
हळवा बाप
आज लेकीची शाळेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. अर्ध्या दिवसाची रजा टाकून, स्वप्नील शाळेत पोहोचला. स्पर्धा चालू झाली. मुलीने मागे वळून मानेनेच बाबांची संमती मिळवली. त्यानेही अंगठा उंचावून तिला पाठिंबा दिला. धावता-धावता लता अचानक पडली, जोरात गुडघ्यातून कळ आली. ती आईऽऽ ग... म्हणाली, पण इकडे स्वप्निलच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
-----------------------------------------------------------------------
हतबल बाप
आज मेधा आणि संतोष चा घटस्फोट झाला. रामराव यांनी आपल्या मित्राच्या मुलीला सून म्हणून घरी आणले होते. पण मुलाच्या वाईट सवयींमुळे आज तो संसार मोडला होता. रामराव हात जोडून मेधा समोर उभे होते. मेधा म्हणाली बाबा तुमचे काही चुकले नाही. तुम्ही मला कायम मुलीचीच माया दिलीत. रामराव म्हणाले मुली हा बाप संतोषच्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण, तुझ्या मागे कायम असेल.
-----------------------------------------------------------------------
बापातला मित्र
गौरव नोकरी करणारा तरुण. आज तो जरा अस्वस्थ होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय यार क्या बात है? तसा तो ढसाढसा रडू लागला.माझे सुहाना नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे. पण, तिचे लग्न ठरले आहे आणि ती तर धर्माची ही आहे. अरे! तो उस्मे क्या है? हा बाप तुझ्या पाठीशी असताना असा मुळमुळू काय रडतोस. चल तिच्या घरी.
-----------------------------------------------------------------------
आधारस्तंभ बाप
आज तो हॉस्पिटलमध्ये कॉटवर पडून छताकडे बघत होता. नाका - तोंडात नळ्या होत्या, तरी तो तग धरून होता.
डॉक्टर जेव्हा त्याला तपासायला आले त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर हास्य होते. आज तब्येत सुधारली आहे तुमची. त्यावेळी तो म्हणाला घरी माझी लेकरं, बाबा कधी येणार म्हणून वाट बघत आहेत. आता जरी यम सुद्धा आला तरी त्याला परत पाठवीन. माझ्या लेकरांचा मीच आधार आहे.
प्रिती महाबळेश्वरकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा