Login

बाबा sss कुठे काय करतो !!!

Importance Of Men In Home



आमचे "हे" ऑफिसमधून घरी आले ते त्यांची कॉन्फरन्स चंदीगढ ला आहे असं सांगतंच... ह्यांच्यासोबत ह्यांचे तीन मित्रही असणार होते आणि ही चौकडी चंदीगढ सोबतच हिमाचल दौरा करून थेट दहा दिवसांनीच परतणार होती.

"हो sss" मोठ्यानं होकार देत मी म्हटलं... "मी अगदी छान सांभाळेन सगळं! तुम्ही काही काळजी करूच नका ! तसंही घरातलं सगळं मीच तर बघते.. स्वैपाकपाणी, आला-गेला, साफसफाई, बाहेरची कामं !!! तुमचं कसं एकतर बाहेर मित्रांसोबत आणि घरी असलं की तो मोबाईल नाहीतर वर्तमानपत्र !!! हातात चहा अन् नाश्ता !!! तसंही तुमचं काँट्रीब्युशन काय असतं घरात? उलट आता घरातली कामं कमी होतील ! मला आराम दहा दिवस !! तुम्ही एन्जॉय करा..."

मीसुद्धा त्यांच्या अनुपस्थितीत कसं कसं एंजॉय करायचं ह्याचं प्लॅनिंग करायच्या तयारीला लागले.रोज रोज भाजी-पोळी नाहीच करायची... एक दिवस छोलेभटुरे, एक दिवस पावभाजी, इडली,नूडल्स, बिर्याणी मजाच मजा !!! ह्या बुवाला पोळी-भाजीच हवी सदानकदा! आता टोकणारं कोणी नाही. माझा पोरगा माझाच चेला... त्यालाही असंच लागतं चमचमीत अन् झणझणीत!! मी मधुराज रेसिपीच्या स्टाईलनं म्हणून बघितलं.


ह्यांचा निघण्याचा दिवस उजाडला. ह्यांची सकाळची ट्रेन म्हणून पालक-पराठे आणि बटाटा भाजी करून दिली अन् त्यांना टाटा-बायबाय करून आमच्या स्वातंत्र्य सप्ताहाला सुरुवात झाली.

दिवस तर अगदी मजेत गेला... रात्री झोपताना मात्र शेजारच्या म्हात्रेबाईंनी हाक मारली "तुमच्या गाड्या बाहेरच आहेत अंगणात घ्या" म्हणून...आम्ही तर दिवसभर गाड्या उडवून फाटकाच्या बाहेरच लावून ठेवतो.. त्या आतमध्ये घेऊन अंगणात व्यवस्थित
कोण लावून ठेवतं बरं??? आणि रोज फाटकाला कुलूप? ते कोण घालतं?" घरातली सगळी कामं तर मीच करते!

दुसरे दिवशी सकाळी-सकाळी दूधवाल्याच्या हाकावर हाका... "आज बाहेरून काय ओरडतोय हा?" पाहिलं तर फाटकाला कुलूप जसंच्या तसं!

"साहेब नाई वाटतं घरी! सकाळी फाटकाचं कुलूप उघडतात साहेब! केव्हाच्या हाका मारतोय!आता दार नसतं उघडलं तर परत जाणार होतो मी.." इति दूधवाला...

"बरं बरं! एक दिवस उशीरा उठलं तर एव्हढं काय बिघडलंय " मी धुसफूसत भांडं समोर केलं...

ब्रेकफास्टमध्ये रोज फळं खायचा नेम आमचा... पण फ्रीजमधली फळं संपलेली... चिरंजीवांना जिममधून आल्या-आल्या सफरचंद आणि दूध लागतं! आता ती फ्रिजमध्ये कोण भरून ठेवतं? सगळी कामं तर मीच करते!

दोन-तीन दिवस मस्त पार्ट्या केल्या आम्ही... पावभाजी काय.... छोले भटुरे काय... आलूटिक्की अन् पाणी पुरी!

चौथे दिवशी पहाटेपासूनच पोटात दुखायला सुरुवात झाली. एरवी बरं नसलं की "हे" च डॉक्टरकडे घेऊन जातात. आता मात्र मला स्वतः लाच जावं लागणार होतं. कारण चिरंजीवांचा एक्सट्रा क्लास नेमका दुपारी! डॉक्टरकडे गेले तर पोटाचा नगारा पाहूनच त्यांनी निदान केलं -"सतत जंकफूड खाण्याचा परिणाम!"

झालं! पुढचे दोन दिवस फक्त दहीभातावर काढायला लागणार! नवऱ्याने तर फोनवरच सल्ला दिला... काही तरी चटर-पटर खाल्लं असशील..खादाडपणा बंद करा ! आता स्वैपाकात साधं "वरण भात भाजी पोळी" कर!

डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घ्यायला मेडिकल स्टोअरमध्ये गेले तर तिथे ही गर्दी! एरवी मी आरामात कार मध्ये बसते आणि त्या गर्दीतून औषधं "हे" आणतात.


नेमकं गॅस सिलेंडर संपलं तर त्याचं ऍप ह्यांच्या मोबाईलमध्ये! सिलेंडरचा नंबर तेच लावतात... मी फक्त आज्ञा देते -"अहो sss सिलेंडरचा नंबर लावा बरं!"

फक्त तीन दिवस गाडी चालवली अन् गाडीतलं पेट्रोल तळाशी गेलं हो! आतापर्यंत कधीच असं नाही झालं... पंधरा -पंधरा दिवस गाडी उडवते मी पण पेट्रोल ची टॅंक म्हणजे जणू दौपदीचं अक्षयपात्र! कधीच पेट्रोल नाही टाकत मी गाडीत ... हम्म... "हे" बरेचदा गाडी घेऊन जातात बाहेर... मला वाटलं स्वतःची गाडी वापरायची नसते म्हणून!!!

काही कामासाठी घरच्या टॅक्स पावत्या हव्या होत्या त्या ह्यांच्या ताब्यात... सिंक तुंबली तर प्लम्बरला तेच बोलावतात! घराच्या बांधकामासाठी सिमेंट/रेती ची ऑर्डर तेच देतात. समोरची पाईपलाईन फुटली तर मनपा मध्ये तक्रार करायचीय .... तक्रार कुठे करायची हे त्यांनाच ठाऊक!  नेहमी "हे" च करतात...काम करवून घेतात.

चिरंजीवांना अभ्यास करताना केमिस्ट्री च्या difficulties होत्या... नेहमी हेच सोडवतात. मला विचारलं तर मी बापडी कला शाखेची पदवीधर! मला डोंबल कळतंय chemistry अन् biology!!!

बरं का! आमचे हे घरात एका कामाला हात लावत नाहीत. घरातली सगळी कामं  मीच तर करते!

त्यात दोन दिवस घरी पाहूणे आले. त्यांची झोपण्याची व्यवस्था, त्यांच्या बाहेरच्या कामाचं नियोजन, त्यांना अंबादेवीच्या दर्शनाला नेणं सगळं मलाच बघावं लागलं... म्हणजे "हे" घरी असले की पाहुण्यांसाठी अंथरुण घालणं, सकाळी त्यांचा बिछाना आवरणं सगळं तेच बघतात. स्वैपाक आणि जेवणं आटपून ओटा धुतला की माझं काम संपलं! आता मात्र सगळं मलाच करायला लागलं. कधी एकदा  "हे" येतात हिमाचल दौऱ्यावरून असं झालं मला!

**************************************

अखेर आमचे "हे" सिमल्याहून परतले... मला बाई अगदी हुश्श झालं! एकाच दिवसात सगळं कसं जागच्या-जागी लागलं... गाड्या अंगणात... फाटकाला कुलूप... फ्रिजमध्ये फळं -भाज्या, झाडांना खत अगदी व्यवस्थित! नाहीतर दहा दिवस इतकी सगळी कामं करता करता माझा अगदी पिट्ट्या पडला होता.



**************************************

दुसरे दिवशी सकाळी उठल्यापासून माझी कामाची घाई गडबड सुरु झाली. सकाळचा चहा, नाष्टा, घराची साफसफाई.... नुसती धांदल!!!

आणि आमच्या चिरजीवांचे बाबा.... बघा ना... बसलेत मोबाईल मध्ये डोकं खुपसून! एका कामाला हात लावतील तर शपथ!! घरातली-बाहेरची सगळी कामं मी एकटीच तर करते!!!

**************************************

कुठूनतरी त्या शीर्षक गीताचे सूर कानात गुंजत आहेत "आई sss कुठे काय करते!"

मी मनातच हसले अन गुणगुणू लागले " बाबा sss कुठे काय करतो!!!"

**************************************

ही सगळी  कथा एकदा सगळा परिवार एकत्र जमला असताना सांगितली तर धाकटे दीर म्हणाले - "बाबा कुठे काहीच करत नाही ते बरंय वहिनी! काहीतरी  करा म्हणून सारखं मागे लागलात तर त्या सीरिअल मधल्या बाबासारखं भलतंच करेल हं!!!"

आणि "बाबांसहित सगळं घर हास्यकल्लोळात बुडालं!!!