Login

बदलाचे शिल्पकार (अंतिम भाग - ४)

विजयने स्वच्छतेबाबत जनजागृती करायचा प्रयत्न केला. परंतु, त्याला अपयश आले. त्याच्या विद्यार्थ्यांनी मात्र वेगळाच मार्ग अवलंबून गावात अमुलाग्र बदल घडवून आणला. नक्की काय केले असेल त्या मुलांनी हे जाणून घेण्यासाठी वाचा - बदलाचे शिल्पकार.
चॅम्पियनशिप २०२५
जलद कथालेखन
कथा लेखन - अपर्णा परदेशी

बदलाचे शिल्पकार (अंतिम भाग ४)


अजाणतेपणी मुलांच्या हातून घडलेल्या ह्या कारनाम्याला आज प्रोत्साहन मिळाले तर मग भविष्यात अशा गोष्टी करायला ते अजून धजावतील. म्हणून विजयने त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देण्याचे ठरवले.

"मुलांनो, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण याचा अर्थ असा नाही की, मी तुम्हाला इतरांच्या भावनांशी खेळण्याचे स्वातंत्र्य देईल. तुम्ही कितीही उदात्त हेतूने कृती केलेली असली तरीही, चुक ती चुकच असते. त्यामुळे मला असे वाटत आहे की लवकरात लवकर तुम्ही त्यात सुधारणा करावी."

"सर, खरी गोष्ट सगळ्यांना कळाली तर आम्हाला घरून खूप मार बसेल. त्यापेक्षा दुसरा काहीतरी उपाय सांगा ना?" सचिन घाबरून म्हणाला.

"ठीक आहे. मी तुम्हाला यातून बाहेर काढायचा मार्ग सुचवतो."

"चालेल सर." सर्व एक सुरात ओरडले.

सरांनी यातून काहीतरी तोडगा शोधल्याचा मुलांना आनंद झाला.

"माझ्या मते तुम्ही यावर एक छोटीशी नाटिका सादर करा. त्या नाटिकेमार्फत योग्य संदेश पोहचायला हवा. नाटिका समाप्तीनंतर परिणामांचा विचार न करता सर्वांची मनापासून माफी मागायची. कारण तो दगड त्या जागी ठेऊन तुम्ही लोकांच्या भावनांशी कळत नकळत खेळला आहात. हे सर्व जर तुम्ही यशस्वीरित्या करू शकलात तर मी समजेल की तुम्ही मला गुरुदक्षिणा दिली."

सरांचे सांगून होताच सर्वांनी एका सुरात हो म्हटले. विजय सरांच्या कल्पनेतून सुचलेला मार्ग विद्यार्थ्यांना आवडला होता. शिवाय त्यांचे विजय सर त्यांच्या पाठीशी होते.

पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांनी विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली 'आरोग्याची गुरुकिल्ली' नावाच्या नाटकाची तालीम सुरू केली. तसेच गावात ठिकठिकाणी फलक, प्रसिद्धी पत्रक व मौखिक प्रचार करून नागरिकांना नाटकाला येण्याचे आवाहन केले. हा अभिनव उपक्रम पाहून गावात चर्चेला उधाण आले होते. शाळेतले विद्यार्थी आपल्यासमोर अभिनय करतील या कल्पनेनेच गावकऱ्यांची उत्सुकता ताणली गेली होती.

ठरल्याप्रमाणे नाटकाचा दिवस उजाडला. शाळेच्या प्रांगणात जवळपास सर्वच गाव आवर्जून हजर होता. इतकी सगळी गर्दी पाहून मुलांच्या मनात आपण केलेल्या कृत्याची थोडीशी धास्ती निर्माण झाली होती. परंतु, विजय सरांनी नाटकाच्या तालीमदरम्यान त्यांच्या मनात बराच आत्मविश्वास जागृत केला असल्याने त्यांनी हिमतीने तोंड द्यायचे ठरवले.

यथावकाश नाटक सुरू झाले. नाटकाच्या सुरुवातीलाच गलिच्छ गावाचा देखावा सादर झाला. त्यानंतर काही वेळातच गावात पसरणारी रोगराई व त्याचे होणारे दुष्परिणाम असे चित्र रंगवण्यात आले. पुढच्या दृश्यात शारीरिक अस्वास्थ्यामुळे आबाल वृद्धांचे होणारे हाल, रोगराईमुळे दगावणारी लहान लेकरे अशी हृदयाला चीर पाडणारी दृश्य दाखवण्यात आली. त्यानंतर दवाखान्यात रुग्णांवर होणारे तुटपुंजे उपचार व तिथे रुग्णांची होणारी आबाळ असे दृश्य साकारण्यात आले.

मुले आपल्या वाटेला आलेला अभिनय इतका उत्तम करत होती की त्याचा परिणाम गावकऱ्यांच्या मनावर खोलवर होत होता. नाटकात का होईना, कोणते पालक आपल्या मुलांना, परिचितांना इतके आजारग्रस्त पाहू शकतील? पालकांच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता.

नाटकाच्या उत्तरार्धात मुलांनी असे दाखवले की कितीही विनवण्या केल्या तरी लोक त्यांच्या वाईट सवयी मोडत नाहीये. जिकडे तिकडे परिसरात घाण पसरवत आहेत. त्याचा परिणाम म्हणून विजय सरांची प्रकृती ढासळली. त्यानंतर नाईलाजास्तव पुढील उपचारासाठी ते शहरात निघून गेले. समोर पडद्यावर मरणाला टेकलेले विजय सर पाहून सर्वांनी खाली माना घातल्या.

आपल्यामुळे आपल्या गुरूंना झालेला त्रास पाहून सर्व मुलांनी मिळून एक निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार मुलांनी आपण केलेल्या त्या दगडाची करामत सादर केली. सर्वच गावकरी इतके भावुक झाले होते की मुलांनी जे केले ते योग्यच केले असे त्यांना वाटू लागले. पालक साधे, सरळ, सोपे सांगितलेले ऐकत नाहीत म्हणून मुलांनी वाकडे पाऊल टाकले याची त्यांना खंत वाटत होती. सर्व चूक आपलीच असून आपण आपल्या व इतरांच्या आरोग्याशी खेळत होतो अशी भावना सर्वांच्या मनात राहून राहून येत होती. वातावरण अतिशय भावनिक झाल्याने पालक नाटकाचा शेवट न बघताच उठून जागेवर उभे राहिले.

नाटकाच्या शेवटी मुलांना माफीनामा सादर करायची गरजच उरली नव्हती. पालकांनी मुलांकडे धाव घेतली. त्यांचे गाल गुच्चे घेत त्यांना छातीशी कवटाळून घेतले. काही लोकांनी विजय सरांचे पाय धरले. आपण केलेल्या चुकीची शिक्षा सरांना विनाकारण भोगावी लागली होती, याचे त्यांना फार वाईट वाटत होते. ग्रामस्थांच्या भावना बघून विजयने त्यांना मोठ्या मनाने माफ केले.

तब्बल एका वर्षानंतर बद्रीपुराला सरकारतर्फे 'स्वच्छ गाव सुंदर गाव' पुरस्कार जाहीर करण्यात आला. अर्थात याचे सर्व श्रेय विजयला देण्यात आले. कारण विजयने तिथेच राहून गावात बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या.

समाप्त.
0

🎭 Series Post

View all