चॅम्पियनशिप २०२५
जलद कथालेखन
कथा लेखन - अपर्णा परदेशी
जलद कथालेखन
कथा लेखन - अपर्णा परदेशी
बदलाचे शिल्पकार (भाग - १)
सकाळी सकाळी विजयने नाकाला रुमाल लावला. समोरचे दृश्य पाहून त्याला किळस आली. रस्त्यावरून जाताना पुन्हा त्या कोपऱ्यावर उकिरडा साचला होता. परिसरातील रहिवाशांनी टाकलेले अन्न, पालेभाज्यांची देठे, प्लास्टिकच्या पिशव्या, कागदाची कपटे, कपड्यांच्या चिंध्या अशा बऱ्याच टाकाऊ गोष्टी उघड्यावर फेकलेल्या होत्या. त्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. पर्यायाने तिथला परिसर दुर्गंधीयुक्त झाला होता. विजयने खेदाने एक सुस्कारा सोडला.
गावातला एक जबाबदार शिक्षक म्हणून विजयने ही बाब तिथल्या सरपंचाच्या निदर्शनास आणुन दिली होती. भविष्याच्या दृष्टीने गावात रोगराई पसरू नये म्हणून, विजयने सरपंचाला गळ घालून गावात जागोजागी कचराकुंड्या ठेवायला लावल्या होत्या. तसेच गावात जिथे जिथे लोक उघड्यावर कचरा टाकत त्या ठिकाणी ग्रामपंचायततर्फे 'येथे कचरा टाकू नये.' असे सूचना फलकही लावण्यात आले होते. विजयने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ह्या गोष्टी अमलात आणल्या गेल्या होत्या.
परंतु, तो कचरा कुंडीत कमी आणि खालीच जास्त पडलेला दिसायचा. कुणीतरी महाभागाने सूचना फलकावर काड्या कोरत 'टाकू नये' च्या जागी 'टाकावे' असे करून ठेवले होते. काही लोक गुपचूप अंधारात जाऊन उघड्यावर कचरा टाकून येत. अशाने त्या जागी पुन्हा ढीग साचला होता. 'ये रे माझ्या मागल्या' ह्या उक्तीप्रमाणे एकंदरीत विजयच्या हाती निराशाच आली.
काही महिन्यांपूर्वीच विजय बद्रीपुरात शिक्षक म्हणून रुजू झाला होता. नुकत्याच बदली होऊन आलेल्या नवख्या मास्तरांचे स्वच्छतेचे उपदेश कोण इतके मनावर घेणार? म्हणून चुकीच्या सवयीचा गुलाम असलेले लोक त्याच्या म्हणण्याकडे सपशेल कानाडोळा करत होते. शहरापासून लांब कुठल्यातरी आडवळणी कोपऱ्यात वसलेल्या बद्रीपुरात सरकारी योजना व इतर सुखसुविधा पोहोचायला वर्षानुवर्ष लागायची. गावात अशिक्षित लोकांची गणना जास्त असल्याने झटपट सुधारणा होण्याची अपेक्षा करणे फार चुकीचे होते, हे एव्हाना विजयच्या लक्षात येऊन गेले होते.
गावकरी सुधारतील ही अपेक्षा फोल ठरल्याने त्याने त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'वैयक्तिक स्वच्छता व निरोगी आयुष्य' तसेच 'स्वच्छ परिसर, सुंदर परिसर' असे उपक्रम राबवून तो त्याच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेचे धडे गिरवू लागला. 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून निदान विद्यार्थ्यांमार्फत तरी गावात स्वच्छता अभियान सुरू होईल, अशी त्याला माफक अपेक्षा होती. पण कसले काय? 'सर्व मुसळ केरात' प्रमाणे पालकच आपल्या पाल्यांना निरुत्तर करून टाकत.
सहजासहजी हार न पत्करता विजयने 'अस्वच्छता व त्याचे तोटे' या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मदतीने निबंध लिहून आणायला सांगितला. इतके करूनही मुलांवर व त्यांच्या पालकांवर याचा कितपत परिणाम होईल याबद्दल तो जरा साशंकच होता. दुसऱ्या दिवशी मुलांनी एकाहून एक सरस निबंध लिहून आणले. परंतु ते सर्व फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले. प्रत्यक्षात परिणाम मात्र शून्यच होता. विजयने हतबल होऊन सर्वांपुढे हात टेकून दिले.
गावातल्या मोकळ्या जागेतील तो कोपरा आता कचरा टाकायची सार्वजनिक जागा म्हणून अलिखितरित्या जाहीर झाला होता. येता जाता विजयच्या नजरेत येणारा तो कोपरा जणु काही त्याला खिजवत असायचा.
"किती वेळा गावकऱ्यांना शिस्त लावायची? कचरा असा उघड्यावर टाकल्यानंतर आरोग्याची हेळसांड होणारच. साथीच्या आजारांना घरबसल्या आमंत्रण द्यायचे का? स्वतःच्या आरोग्याची नाही तर, निदान आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची तरी काळजी घ्यावी." मनातल्या मनात त्रागा करत विजय तिथून निघून गेला.
शहरी भागातून खेड्यात बदली होऊन आलेला विजयला इतक्या अस्वच्छतेत राहायची सवय नसल्याने काही दिवसातच खूप आजारी पडला. बद्रीपुरातील दवाखान्यात आवश्यक त्या सुखसोयी व आधुनिक अशी वैद्यकीय साधने उपलब्ध नव्हती. दवाखान्यातील उदासीनतेमुळे आपल्या आरोग्याशी खेळ नको म्हणून त्याने शहरात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे धाव घेतली. सक्तीचा आराम म्हणून काही दिवस तो वैद्यकीय रजा घेऊन तिकडेच राहिला.
पूर्णपणे बरा झाल्यावर साधारण महिन्याभरानंतर विजय बद्रीपुरात यायला निघाला. येताना तो दृढनिश्चय करून आला होता. तडक शाळेत जाऊन बदली संबंधित अर्ज द्यायचा व त्यानंतर पुन्हा ह्या गावाकडे ढुंकून सुद्धा बघायचे नाही. मनाशी पक्की खुणगाठ बांधून तो जड पावलांनी बद्रीपुरात दाखल झाला.
मधल्या काळात आजारी असताना त्याने शिक्षण खात्याकडे तब्येतीची तक्रार करून पुन्हा शहरात बदली मागून घेण्याची विनवणी केली होती. बराच खटाटोप केल्यानंतर त्याची मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे आता आपली इथून सुटका होणार याच आनंदात तो होता.
आधी आपला सर्व गाशा गुंडाळून ठेवू व मग नंतर शाळेत जाऊन अर्ज देऊ ह्या उद्देशानेच तो भाडे तत्वावर राहत असलेल्या घराकडे निघाला. तो तिथे एकटाच राहत असल्याने त्याच्याकडे मोजकेच सामान होते. त्यामुळे घर सोडताना त्याला फार काही त्रास होणार नव्हता.
त्याच्या घराकडे जाताना वाटेतच तो उकिरडा लागायचा. आधीच नाकाला रुमाल लावावे लागेल म्हणून त्याने खिशात हात टाकला. पण बघतो तर काय? लांबूनच ते दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. चक्कर येऊन पडतो की काय, अशी त्याची अवस्था झाली. अजून पुढे जात त्याने आश्चर्याने डोळे चोळले. तो पुन्हा पुन्हा समोरचे दृश्य निरखून पाहत होता. त्याचा त्याच्या डोळ्यांवर मुळीच विश्वास बसत नव्हता. सत्य आहे की भास हेच समजायला मार्ग नव्हता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा