Login

बदलाचे शिल्पकार (भाग - २)

विजयने स्वच्छतेबाबत जनजागृती करायचा प्रयत्न केला. परंतु, त्याला अपयश आले. त्याच्या विद्यार्थ्यांनी मात्र वेगळाच मार्ग अवलंबून गावात अमुलाग्र बदल घडवून आणला. नक्की काय केले असेल त्या मुलांनी हे जाणून घेण्यासाठी वाचा - बदलाचे शिल्पकार.
चॅम्पियनशिप २०२५
जलद कथालेखन
कथा लेखन - अपर्णा परदेशी

बदलाचे शिल्पकार (भाग - २)

विजयच्या खांद्यावर कुणीतरी हलका हात ठेवला. त्याने पाठीमागे वळून पाहिले. आठवीतला त्याचा विद्यार्थी सुभाष होता तो.

सुभाषच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. विजय मात्र संभ्रमात होता.

"चला सर, सांगतो तुम्हाला सगळं."
तो मिश्किल हास्य करत त्याच्याकडे पाहून म्हणाला.

"अरे, हे काय आहे. हा आमूलाग्र बदल झालाच कसा?" विजय डोकं खाजवत विचारू लागला.

त्याने पुन्हा एकदा त्या जागेवर नजर फिरवली.

त्या जागेवर एक पंचकोनी आकाराचा मोठाच दगड रंग फासून तिथे ठेवण्यात आला होता. त्यामुळे तिथे कोणीच कचरा टाकत नव्हते. ती जागा आता लख्ख चमकत होती. विजय ते पाहून चक्रावला होता.

गावातील एक जागा जिथे लोक येता-जाता कचरा टाकत होते. त्याच जागेत रंग लावलेला दगड ठेवला म्हणून लोकांनी तिथे कचरा टाकण्याचे बंद केले होते. हे सर्व पाहून त्याला त्या लोकांच्या बुध्दीची कीव आली. किती हा अशिक्षितपणा. लोकांना यातून बाहेर काढायला हवे असेही त्याला वाटून गेले. त्याच्या इच्छेप्रमाणे ती जागा स्वच्छ तर झालीच होती. पण ती अशा प्रकारे होईल, हेच त्यांच्या पचनी पडत नव्हते.

सुभाष मात्र विजयी मुद्रेने विजय सरांची मुद्रा निरखत होता. आपल्या सरांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य मिश्रित भाव पाहून तो अत्यंत आनंदित झाला होता.

"सर, तुम्ही घर उघडा. हातपाय धुवून आरामात बसा. तोपर्यंत मी आलोच."  असे म्हणून तो पळाला पण.

विजय गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या घरी गेला. त्याच्या डोक्यात विचारचक्र वेगाने फिरत होती. पडलेल्या कोड्याचा उलगडा त्याला होत नव्हता. तो घरी आल्यावर हातपाय धुऊन बसत नाही तोवर त्याच्या आठवीतल्या वर्गातली पाच-सहा मुलांचा घोळका त्याच्या घराकडे येताना दिसला. त्यांच्यात सुभाष देखील होता. सर आल्याचे सांगून सुभाषनेच त्यांना गोळा करून आणलेले दिसत होते.

सरांना पाहून खुश झालेली ती मुले गलका करतच आत शिरली. दोन-तीन व्यक्तींसाठी राहायला पुरेसे असलेले ते दोन खोल्यांचे घर त्या मूठभर पोरांनी गजबजले.

"शांत व्हा. शांत व्हा. एक एक करून सांगायला सुरुवात करा. सगळेच एकदम बोलतील तर मला कसे कळेल की, तुम्हाला काय सांगायचे आहे ते." सरांनी आपल्या दमदार आवाजाने मुलांना गप्प केले.

"आधी आपण बसून घेऊ. गोंधळ करू नका. आपले गुपित बाहेर पडायला नको."

सुभाषने पुढाकार घेत सगळ्यांना पुढची सूचना केली. त्या सरशी मुले शांत झाली. ती मुले त्या एवढ्याशा खोलीत मिळेल ती जागा पकडून आसनस्थ झाली.

"कसले गुपित?" विजयला काय गौडबंगाल आहे ते समजेना.

पुन्हा दबक्या आवाजात त्या मुलांची कलकल सुरू झाली. उत्साहाच्या भरात त्याला सर्वच एकत्र सांगत असल्याने कोण काय बोलतय तेच त्याला समजत नव्हते.

एक तर आधीच त्या कोपऱ्यावरच्या मोकळ्या जागेचे रहस्य उलगडले नव्हते. त्यात ह्या मुलांनी अजून काय पराक्रम वाढवून ठेवला होता देव जाणे. विजय दुविधा मनस्थितीत सापडला होता.

"अरे शांत बसा रे, उगाच बाहेर कळलं ना तर आपल्याला बेदम मार मिळेल. एका कानाची खबर दुसऱ्या कानाला मिळता कामा नये. कुणीतरी एकानेच बोला." गर्दीतून कोणीतरी एक जण ओरडले. पुन्हा सगळे शांत झाले.

"सुभाष या प्रकरणाचा सूत्रधार तू आहे. त्यामुळे तूच काय ते सविस्तर सांग. काय मित्रांनो बरोबर बोलतोय ना मी." रघु तिथे जमलेल्या सर्वांना उद्देशून म्हणाला.

सर्वांनी माना डोलवत त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. सुभाषने देखील होकारार्थी मान हलवली.

तो बोलण्यासाठी त्या खोलीच्या मध्यभागी उभा राहिला.

"आता मध्ये कुणीच काही बोलू नका."

सुभाषने सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वाँना तोंडावर बोट ठेवत गप्प बसायची सूचना दिली.

सर्वजण उत्साही चेहऱ्याने तिथे बसले होते. सरांना सत्य कळल्यावर सर आपल्याला शाबासकी देतील अशी सर्वांना आशा होती.

विजय मात्र त्या सर्वांना विस्मयाने पाहत होता.

"चल बाबा, सुभाष. माझा जीव टांगणीला लागला आहे. सांगून टाक एकदाचे." विजयने त्याच्याकडे अपेक्षेने पाहिले.

सुभाषने अत्यंत आनंदाने सांगायला सुरुवात केली.

"सर, तुम्ही शाळेत येत नव्हता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटली. प्राचार्यांना विचारल्यावर कळले की तुम्ही आजारी असल्याने सुट्टी घेतली आहे. तुमच्या घरी येऊन पाहिले तर घराला कुलूप होते. इथे शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर कळले की तुम्ही उपचारासाठी आपल्या शहरातल्या घरी निघून गेलात, हे ऐकून आम्हाला तुमची फार काळजी वाटली."

"हो ना सर, किती घाबरलो होतो आम्ही."

मुलांच्या गर्दीतून एक जण बोलला.

"सर तुम्ही काही दिवस नव्हता तर आम्हाला करमत नव्हते." दुसऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"गप्प बसा रे. सुभाष बोल तू पुढे." तिसऱ्या मुलाने आपल्या जाड आवाजात त्यांना गप्प केले.

मुलांनी आपल्या भावना आवरत्या घेतल्या. परंतु, त्या मुलांचे पोटतिडकीचे बोलणे ऐकून विजय क्षणभर गहिवरला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all