Login

बदलाचे शिल्पकार (भाग -३)

विजयने स्वच्छतेबाबत जनजागृती करायचा प्रयत्न केला. परंतु, त्याला अपयश आले. त्याच्या विद्यार्थ्यांनी मात्र वेगळाच मार्ग अवलंबून गावात अमुलाग्र बदल घडवून आणला. नक्की काय केले असेल त्या मुलांनी हे जाणून घेण्यासाठी वाचा - बदलाचे शिल्पकार.
चॅम्पियनशिप २०२५
जलद कथालेखन
कथा लेखन - अपर्णा परदेशी

बदलाचे शिल्पकार (भाग ३)

सुभाष पुढे बोलू लागला.

"सर, तुम्ही शिकवले होते की, आपण राहतो तिथला परिसर गलिच्छ असला तर रोगराई पसरते. आजार बळावतात. त्या कोपऱ्यावरच्या घाणीमुळे तुम्ही पण आजारी पडलात. त्याचे आम्हाला खूप दुःख झाले."

"जाऊ दे रे सुभाष. जे झाले ते झाले." विजयच्या बोलण्यातून निराशा झळकत होती.

"सर, तुम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले. पण तरी तुम्हाला अपयश आले. म्हणून आम्हीच एक आगळीवेगळी योजना आखली." गर्दीतून एक जण आनंदाने उद्गारला.

"कसली योजना?" विजय प्रश्नार्थक नजरेने त्या सर्वांकडे पाहत म्हणाला.

सुभाष पुढे सांगू लागला.

"सर, गावकरी तुमचं ऐकत नव्हते. तर आमचं कुठून ऐकणार? म्हणून आम्ही एक कल्पना लढवली. ग्रामपंचायतमध्ये जाऊन ती कोपऱ्यावरची जागा स्वच्छ करण्याची विनंती केली. त्यांनी आम्हाला दोन-तीन दिवसात साफ करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही गावच्या नदीकिनारी जाऊन एक मोठा दगड शोधला. हा सचिन आहे ना, त्याचे वडील रंगारी आहेत. सचिनने त्याच्या घरून रंग लावण्याचे सामान आणले. ह्या रुपेशच्या शेतातल्या झोपडीत जाऊन आम्ही त्या दगडाला रंग लावला. दोन-तीन दिवसात तो रंग सुकला. आमच्या योजनेप्रमाणे सर्व तयारी झाली होती. बस आम्ही योग्य वेळेची वाट बघत होतो." सुभाष हसतच आपण केलेल्या पराक्रमाची गाथा सांगत होता.

हे सर्व ऐकून विजयच्या चेहऱ्यावरील रंग उडाला.

"काही दिवसांनी ग्रामपंचायतीचे लोक येऊन ती जागा स्वच्छ करून गेले. आम्हाला तेच हवे होते. आम्ही अर्ध्या रात्री गुपचूप जाऊन तो दगड आणला व तिथे ठेवला." उर्वरित गोष्ट रुपेशने पूर्ण केली.

हे ऐकून विजय चिडला.

"अरे काय केलं तुम्ही? हा कसला वेडेपणा? खूप चुकीचे वागलात सर्व." विजय रागात उठून उभा राहत तावातावाने बोलला.

त्याला चिडलेले पाहून सर्व मुले घाबरून उभी राहिली. त्यांना वाटले की सर आपल्या कामगिरीवर खुश होऊन शाबासकी देतील. परंतु, हे मात्र उलट झाले होते.

"अहो सर, तुम्हाला हेच तर हवे होते ना?" सुभाषने कसे तरी सावरायचा प्रयत्न केला.

"अरे, पण मी असे कुठे म्हटले की तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळा. तुम्ही पूर्णपणे चुकीचे केले. मला हे अजिबात आवडलेले नाहीये." विजयचा पारा चढलेलाच होता.

"सर, आम्ही हे तुमच्यासाठी केलं. तुम्ही आजारी पडलात ते आम्हाला नाही आवडले." गर्दीतून एक जण म्हणाला.

"सर, तुमची तब्येत बिघडण्याचे कारण तो उकिरडा होता. आम्ही ते कारण समूळ नष्ट करायचा प्रयत्न केला. तुम्हाला काही झाले असते तर मग आमचे काय झाले असते?" रुपेश खूप भावूक झाला होता.

"ते काही नाही. तो दगड तिथून उचला आणि आत्ताच्या आत्ता सर्व रहिवाशांची माफी मागा." विजय शांत होतच नव्हता.

"ठीक आहे सर. जसे तुम्ही म्हणाल. पण मला एक सांगा. आमच्या खरे बोलण्याने पुन्हा ती जागा तशीच झाली तर त्याचा परिणाम काय होईल?" सुभाषने प्रश्न विचारला.

"गावात रोगराई पसरली तर तुम्हाला चालेल का ते? आज पर्यंत तुम्ही आम्हाला स्वच्छतेचे धडे दिले. त्यातले फायदे तोटे सांगितले. आम्ही त्यावर अनुकरण करायचा प्रयत्न केला तर आमचे काय चुकले?" सचिनने प्रश्न उपस्थित केला.

"सर, तुम्ही शहरात जाऊन उपचार घेतले. कारण तिथे तुमचे घर आहे. तुमच्या जागी जर आम्ही किंवा आमचे आई-वडील इतके आजारी पडलो असतो तर?" रुपेशने आपल्या मनातली सल बोलून दाखवली.

यावर विजय निरुत्तर झाला.

"सर, आमच्यात आमच्या आई-वडिलांना गमावण्याची ताकद नाहीये." सुभाषने भावूक होऊन सांगितले.

आपल्या बाबतीत जे घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून मुले अशी वागली हे विजयला समजून चुकले होते.

"हे बघा बाळांनो, तुम्ही जे केलं ते अजिबात चूक नाहीये. पण तुमची पद्धत चुकली. तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या भावनांशी नकळतपणे खेळत आहात."

"सर, आमचे आई-वडील फार शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना यातले गांभीर्य समजत नाही. आम्हाला तर कळतंय ना? मग आम्ही फक्त निमुटपणे बघत बसायचे का?" एका विद्यार्थ्याने आपले दुःख सांगितले.

"सर, आम्हाला देखील त्यांच्या भावनांशी खेळून आनंद होत नाहीये. तुम्ही सरळ मार्गाने गावासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यातून साध्य काय झाले? जो मार्ग तुम्ही दाखवला तो असफल झाला. म्हणून आम्ही वेगळ्या मार्गाने जायचे ठरवले. तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच तो दगड उचलून पुन्हा नदीवर टाकून येतो. आम्ही तुमच्या शब्द बाहेर नाही. पण त्यानंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या.' होईल. तुम्हाला चालणार आहे का ते?" सुभाषने विजय पुढे आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.

विजय हताशपणे खाली बसला. मुलांचे बोलणे त्याला पटत होते. तो विचारात पडला. मुलांनी चूक केली तरी त्यांचा हेतू वाईट नव्हता.

"सर, असे म्हणतात ना अज्ञानात सुख असते. आमच्या आईवडिलांच्या अज्ञानात आम्हाला त्यांच्या आरोग्याचे सुख दिसत आहे. आमच्या चुकीच्या वागण्याने कुणाचे अहित होणार नाहीये." रघु समजावण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता.

विजयला सर्व मान्य असले तरी मुलांनी केलेले कृत्य त्याला मुळीच पटलेले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all