"हे बघ, मी सगळा स्वयंपाक आणि ओटा आवरत जाईन..तू झाडझुड, भांडी आणि पसारा आवरण्याचं काम कर.."
थोरल्या जावेने नवीनच आलेल्या धाकल्या जावेसोबत कामं वाटून घेतली. सासूबाईंनी अस्ताव्यस्त केलेलं घर सावरायचं काम आता दोन्ही सुनांनी हातात घेतलं.
"अहो ताई काय सांगू, प्रकाश त्याचे कपडे अजिबात जागेवर ठेवत नाही.. पाहावं तेव्हा पलंगावर नाहीतर दाराच्या मागे.. कपड्यांची घडी करून ते कपाटात ठेवावे हे त्यांना माहीतच नाही जणू.."
धाकलीने आपल्या नवऱ्याची तक्रार थोरलीकडे केली, थोरलीला हसू आलं आणि ती म्हणाली..
"आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?"
"म्हणजे??"
"चल माझ्यासोबत.."
थोरली धाकलीला सासूबाईंच्या खोलीत घेऊन गेली. सासूबाई बेडवर लोळत पडल्या होत्या, दोघींचा बघून लगबगीने उठल्या आणि म्हणाल्या,
"काय गं पोरींनो?"
"आई हिला तुमची ती पिस्ता रंगाची साडी दाखवायची आहे, तिला म्हटलं तशीच घे..खूप सुंदर आहे ती साडी.."
सासूबाई खुश होऊन लगेच साडी दाखवायला लागल्या, त्यासाठी त्यांनी कपाट उघडलं आणि थोरलीने धाकल्या जावेला कोपराने इशारा केला..धाकली बघतच राहिली..
कपाट उघडताच चार कपडे खाली पडले. एकही साडीची घडी नव्हती, ब्लाउज एका कोपऱ्यात कोंबलेले, एवढं मोठं कपाट असूनही दोन प्लास्टिकच्या बास्केट बेडवरच आणि त्यात सासूबाईंच्या रोजच्या साड्या आणि कपडे भरलेले. धाकली बघतच राहिली.
सासूबाईंनी साडी दाखवली, थोरली बळेबळेच म्हणाली..
"छान आहे ना?"
"हो हो..मस्तच.."
साड्या बघून दोघी बाहेर आल्या. धाकली तोंड दाबून थोरलीकडे बघू लागली, थोरली म्हणाली..
"आता समजलं??"
"हो ना ताई, सासूबाईंनाच सवय नाही नीटनेटकं राहायची तर मुलांनाच कुठून येणार?"
"यांनी बिघडवलेली मुलं पडली की आपल्या पदरात, आता आपण नव्याने घडवायचं त्यांना.."
"कठीण आहे बाई, तीस तीस वर्षांच्या मुलावर नव्याने संस्कार करावे लागणार आता.."
दोघीजणी हसू लागल्या आणि आपापली कामं उरकू लागल्या. सगळी कामं वेळेत झाल्याने कुणाचीही धावपळ होत नसे आणि दोघींनाही पुरेसा वेळ मिळत होता.
दोघींची चांगलीच गट्टी जमली होती. थोरली धाकलीला घरातल्या एकेक गोष्टी शिकवत होती, समजवत होती. त्यांच्या बऱ्याच गप्पा चालायच्या, बोलता बोलता धाकलीला समजलं की थोरल्या जाउबाईंना नोकरी करायची फार ईच्छा होती, पण घराच्या जबाबदारीमुळे त्यांनी टाळलं. धाकली आपल्या थोरल्या जावेला म्हणाली,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा