बहर प्रीतीचा भाग -१

कर्तव्य निभावताना श्रद्धेवरचा विश्वास न ढळू देता ऐका अनपेक्षित वळनावर दोन भाव वेडी माणसं भेटतात कशी अन त्यांच्यातली प्रेमाची कळी फुलतेय कशी त्या उमलणाऱ्या कळीचीच ही प्रेम कहाणी.
भाग -१

“काय हो, काय कट्टी घेतलीये का माझ्यासोबत तुम्ही? ”

“बोलले होते ना मृण्मयीच्या फिच्या पैशांची तितकी जमवाजमवं करण्यात मला मार्ग दाखवा पण नाहीच झालं ना ते पण तुमच्याकडून? ”

“आता फक्त हसून बघा असे म्हणजे झालं, हो ना? पण यावेळेस मी बिलकुल फसणार नाहीये तुमच्या ह्या हसण्याला, आधीच सांगून ठेवते. ”

“चला बाय मी पळते ऑफिस ला उशीर झाला तर सुट्टी लागायची माझी. ”
अशी बडबड करत सावी मागे वळते तर तिला गुरुजी उभे दिसतात.

गोंधळलेल्या सावीला बघून ते बोलू लागतात,
" काय मग आजही झालं का भांडण स्वामीं सोबत?"

सावी उत्तर देते," काय हो गुरुजी मला काय हौस आहे का स्वामीं सोबत भांडायची? "

" ते ऐकतच नाहीत माझं तर मी तरी काय करू? "

" तरीही त्यांच्यासाठी न चुकता चाफ्याची फुलं आणतेस? " गुरुजी विचारू लागतात.

" आमचं भांडण एकीकडे पण त्यांच्यासाठी चाफ्याची फुले आणण्याचा आनंद तुम्हाला नाही कळणार, बर चला मी निघते, उशीर होतोय. " असं म्हणतच ती गुरुजींच्या पाया पडते आणि धावपळ करत निघून जाते.

आज नेमकी तिची नेहमीची बस चुकते, ऑफिस ला उशीर होतो त्यामुळं बॉस चा ओरडा ऐकावा लागणार हे नक्की असतं.

घाबरतच ती केबिन मध्ये जाते आणि बोलू लागते ,"सुप्रभात सर. "

"हम्म मिस सावी बोला, शनिवारी जो अहवाल प्रस्तुत करायला सांगितला होता कुठवर झालंय ते काम. "

"झालंय सर,फक्त काही कागदपत्रांवार वर तुमच्या सह्या लागतील मग लगेच प्रस्तुत करते. "सावी उत्तरते.

"बरं ठीक आहे कामाला लागा आता आणि शक्य तितक्या लवकर काम आटोपतं घ्या ."बॉस सावीला सांगतात.

"हो सर ", इतकं बोलून सावी आपल्या टेबल कडे जाण्यासाठी वळते, आणि स्वतः शीच बोलू लागते.

"वाह स्वामी म्हणजे ओरडा ऐकल्या शिवाय तुम्ही सुद्धा काम नाही करत हम्म?, चक्क सर काहीच बोलले नाही ही आपलीच कृपा महाराज."
असं बोलून आपल्या कामाला लागते.

दिवसभर तिचं डोकं फक्त कामात अडकलेलं असतं, एव्हाना चार वाजायला आले असतात तितक्यात तीला तिच्या लहान बहिणीचा फोन येतो.

"ताई अगं काय झालं माझ्या फि चं? उद्या शेवटचा दिवस आहे ठाऊक आहे ना तुला?" समोरून मृण्मयी फोनवर बोलत असते.

"हो मृनू थांब मला थोडा वेळ दे, मी प्रयत्न करतेय.घरी येऊ दे मला मग बोलू." असं म्हणून ती फोन ठेवते आणि कामाला लागते.

दिवसभराच्या कामानंतर आता जेव्हा निघण्याची वेळ येते तेव्हा आजही परत एकदा स्वामींच्या भेटीला जायचं सावी ठरवते.

आपल्या सामानाची आवरा सावर करताना तिच्या गळ्यातल्या चैन कडे तिचं लक्ष जातं आणि फीस चे पैसे कसे उभे करायचे याचं उत्तर तिला सापडतं म्हणून ती आनंदून जाते.

आज जरा लवकर ऑफिस मधून निघण्याची परवानगी घेऊन ती निघते आणि थेट स्वामींचा मठ गाठते.

"खूप खूप धन्यवाद स्वामी, तुम्ही परत एकदा मार्ग दाखवलात. उगाचच चिडले हो मी सकाळी तुमच्यावर. पण मी तरी काय करू ओरडल्याशिवाय आजकाल तुम्ही माझं काही ऐकता तरी कुठे? बघा सकाळी ओरडले आणि तुम्ही माझा सगळा अडथळाचं दूर केलात, आता ही चैन विकली कि झाले उभे राहतील मृनू च्या फि चे पैसे. म्हणून परत एकदा धन्यवाद आणि चला आता उद्या बोलते ". असं म्हणत नमस्कार करते आणि कानाला हात लावत परत बडबडू लागते,"माफ करा हं, उद्या सकाळी चाफ्याची फुलं नक्की आणेल, ठीक आहे चला बाय बाय मी निघते,"असं म्हणत लगेच नाहीशी होते.

ही तिची बडबड, तिचा गोंधळ दुरून मंदिरातच उभा असलेला एक तरुण टिपत असतो.
तो गुरुजींजवळ येतो आणि त्यांना विचारु लागतो,"कोण होती हो गुरुजी ही मुलगी, अगदी असं बोलत होती जणू आता स्वामी बोलतीलच तिच्यासोबत."

तेव्हा गुरुजी सांगू लागतात..
"ही सावी देसाई, कोपऱ्यावरच जे घर आहे ते त्यांचं. वडिलांच्या गाडीला चार वर्षांपूर्वी अपघात झाला तेव्हापासून ते कोमात आहेत, आधी परिस्थिती भरपूर चांगली होती पण सगळा होता नव्हता तितका पैसा ह्या मुलीनं वडिलांना लावला. आणि आता आई आणि बहिणीची जवाबदारी स्वतः घेतेय."

"अच्छा आणि करते काय ही सावी?" तो तरुण विचारतो.

"बी. एस. सी झालीये पुढचं शिक्षण सुरुये, एका छोट्या कंपनी मध्ये तिला नौकरी आहे त्यावर घर चालतं. स्वतः च घर असल्यामुळे ती एक काळजी नाही इतकंच. तिची आई शिलाई चे काम घेते आणि लहान बहीण बारावी ला आहे, तिच्याच फी चे पैसे जमवण्यासाठी स्वामींसोबत तिची बडबड सुरु होती".

"असं ही नेहमीच करते का? म्हणजे इथं येऊन अशी स्वामींसोबत बडबड." तो तरुण विचारतो.

"हो, तिची आणि स्वामींची अजब दुनिया आहे. रोज सकाळी न चुकता ती चाफ्याची फुले घेऊन येते. आणि मग थोडावेळ मनातलं सांगून परत आपल्या कामाला लागते.“ गुरुजी सांगत राहतात.

"आणि मग आज संध्याकाळी कशी?" तो विचारतो.

"धन्यवाद म्हणायला स्वामींना, बहिणीच्या फीस साठी गळ्यातली चैन विकण्याचा मार्ग त्यांनी दाखवला म्हणून. तिची स्वामींवर अमर्याद श्रद्धा आहे. ते कायम तिला तारून नेतील हा अढळ विश्वास आहे तिचा त्यांच्यावर. स्वतः साठी कधीच काही मागत नाही, येते मनातलं सगळं मोकळं करते आणि जाताना रोज फक्त माझी हिंमत तुटू देऊ नका इतकंच बोलते. तुम्हाला सांगतो, अहो रोज इथं शेकडो लोक येतात, आपली रडगाणी सांगतात आणि देवालाच दोषी ठरवून निघून जातात. ही एकटी पोरगी आहे, येते आणि जो ही मार्ग ते दाखवतील त्यावर विश्वास ठेऊन पर्याय उभे करण्यासाठी त्यांचे आभार मानते".

"हम्म असतात अशी निस्वार्थी माणसं आणि ती आहेत म्हणून हे मंदिरात असा हसरा चेहरा घेऊन आरामात बसू शकतात." असं म्हणत तो स्वामींच्या चरण पादुकांवर त्यानं आणलेला सोनचाफा अलगद ठेवतो.

गुरुजी परत बोलू लागतात, "योगायोग बघा तुम्ही दोघंच अशी आहात जी रोज न चुकता स्वामींना आवडणारा सोनचाफा त्यांच्यासाठी आणता.ती सकाळी येते आणि तुम्ही संध्याकाळी."

तो ते ऐकतो आणि स्वामींना नमस्कार करून बाहेर पडतो. आणि त्याच्या गाडीकडे वळतो तोच त्याला ती दिसते एका सोनाराच्या दुकानातून बाहेर पडताना, तो तसाच गाडीचं उघडलेलं दार बंद करतो आणि तिच्या दिशेने धाव घेतो आणि अगदी तिच्या समोरच जाऊन थांबतो.
ती गोंधळते, जरा घाबरते, तिला काहीच कळत नाही.
धावत गेल्यामुळे तोही धापा टाकत असतो, अगदी टोंगळ्यावर हात ठेवून वाकून उभा असतो, मोठे मोठे श्वास घेत.

ती विचारते, "कोण तुम्ही? असे धावत का आलात? कुणी लागलंय का तुमच्या मागे?आपण एकमेकांना ओळखतो का? मी काही मदत करू का?"

धापा टाकतच तो बोलू लागतो, "जरा थांबा, हॅलो मी वृषभ,माझ्या मागे कुणीही लागलेलं नाही, ना आपण एकमेकांना ओळखतो ना मला तुमची मदत हवी आहे.“

"मग झालंय काय?" ती विचारते.

"मला तुमची मदत करायची आहे, तुम्ही आधी परत त्या सोनाराकडे चला आणि आधी पाणी असेल तर मला प्लीज पाणी द्या".असं तो बोलतो.

पाण्याची बॉटल बॅग मधून काढत ती बोलू लागते,"पण तुम्ही आहात कोण आणि मी का घेऊ तुमची मदत?"

पाणी पिऊन झाल्यावर तो सरळ तिचा हात धरून तिला सोनाराकडे नेतो. आणि तिची चैन वापस मागतो आणि तिला ही पैसे परत करायला सांगतो.

तिला काहीही कळत नाही, की नेमकं काय चाललंय ह्या व्यक्तीचं? ती दोन मिन फक्त बघतच उभी राहते.

क्रमशः
©®भाग्यश्री हर्षवर्धन.

🎭 Series Post

View all