बहर प्रीतीचा भाग -२

कर्तव्य आणि निस्सीम श्रद्धा ह्या दोन्ही भावना जपणाऱ्या दोन जीवांच्या बहरणाऱ्या प्रीतीची कहाणी
भाग -२


जितकी गोंधळलेली सावी असते तितकाच धक्का त्या सोनारालाही बसलेला असतो, नेमकं काय सुरु आहे हे तिथं उपस्थित असलेल्या कुणालाही उलगडण्यासारखं नसतं.

एक अनोळखी माणूस येतो काय ? कुण्या अनोळखी मुलीने विकलेली गळ्यातली साखळी वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करतो काय?आणि इतकी मोठी मदत कुणी सहज करायला तयार असताना ती मुलगी नकार देते काय? सगळं सगळंच साधारण माणसाच्या साध्या बुद्धीला समजण्या सारखं नसतंच.

"दादा तुमचं जे ही काही संभाषण असेल कृपया तुम्ही माझ्या दुकानाच्या बाहेर जाऊन करता का? सगळ्या गिऱ्हाईकांना त्रास होतोय." तो सोनार सावी आणि त्या माणसाच्या जवळ येऊन बोलू लागतो.

"हो, माफ करा माझ्या लक्षातच आलं नाही आम्ही जातो बाहेर बस मला एक पाच मिन द्या हं ". त्यांना विनवणी करत तो माणूस सावीला समजवन्यासाठी वेळ मागतो.

"ऐका नं आपण बाहेर जाऊन बोलूया का?", तो सावीला विनवणी करू लागतो.

"हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी तुमच्यासोबत कुठेही बाहेर वगैरे येणार नाही."
सावी अगदी लहान मुलीसारखा हट्टीपणा करू लागते.

"बाहेर म्हणजे कुठे फिरायला चला म्हणत नाहीये मी, फक्त ह्या दुकानाच्या बाहेर चलायला सांगतोय". तो सावी ची समजूत घालू लागतो.

"मी म्हंटल ना,नाही म्हणजे नाही." सावी आता हट्टाला पेटलेली असते.

"तुम्हाला हे विचित्र नाही का वाटत आहे? की इथली सगळी माणसं आपल्याकडे किती वेगळ्या नजरेने बघत आहे. म्हणून फक्त एकदा, एकदा म्हणजे एकदा माझं ऐकून घ्या, मला एक संधी तरी द्या बोलण्याची."तो ही काही कमी जिद्दी नसतो.

"पण का?आधी मला सांगा एकतर आपण एकमेकांना ओळखत नाही, मला तुमच्याबद्दल काहीही ठाऊक नाही आणि मुळात मी तुम्हांला मदत मागितलेलीच नाहीये मग हा गोंधळ कशासाठी?"सावी विचारते.

"म्हणून च म्हणतोय ऐकून घ्या एकदा."तो परत समजवन्याचा सूर लावतो.

हे त्यांचं सगळं संभाषण, त्या दुकानातले सगळे आश्चर्याने बघत असतात आणि तो सोनार सुद्धा पुरता गोंधळून जातो.

"तुम्ही आधी त्यांना पैसे परत करा आणि आपली चैन परत घ्या, आपण बाहेर पडलो कि मी सांगतो." वृषभ परत तिला समजवतो.

शेवटी एकदा काय ते ती त्याचं ऐकते आणि तिच्या बॅग मधले त्या सोनाराकडचे घेतलेले सगळे पैसे परत करते आणि त्याचसोबत आपली गळ्यातली साखळी सुद्धा परत घेते आणि ती दोघे सोबत बाहेर पडतात.

"आता सांगा, तुम्ही का करायला लावलत मला असं? तुम्हाला ठाऊक आहे का मला पैशांची किती गरज आहे?" सावी बोलू लागते.

"हो माहितीये मला". असं बोलत तो काही कॅश खिशातून बाहेर काढत सावीच्या समोर धरतो.

तेवढी मोठी रक्कम बघून ती एकदम अचंबित राहते आणि बोलू लागते,"हे काय आहे आणि तुम्ही मला का देत आहात? मी का घेऊ हे एवढे पैसे ? अगदी इतक्या पैशांची गरज नाही आहे मला ".

तो उत्तरतो,"समजा कि तुमच्या अडचणीसाठी स्वामींनी केलेली मदत आहे ही."

सावी पुरती गोंधळते, तिला कसलीच उकल होत नाही.

तोच परत बोलू लागतो,"मी स्वामींच्या मठात तुमचं आणि स्वामींच बोलणं ऐकलं आणि ते ऐकलं यासाठी मी मनापासून तुमची माफी मागतो. तुम्ही तिथून निघून गेल्यावर गुरुजींजवळ तुमची चौकशी केली आणि त्यासाठी मी परत एकदा तुमची माफी मागतो. पण मला तुमची परिस्थिती समजलीये आणि तुम्ही खऱ्या वाटल्या म्हणून मला ही मदत करायची आहे."

"आणि मी ही मदत का म्हणून घ्यावी असं तुम्हाला वाटतं?" सावी विचारते.

"कारण ही मदत तुम्हाला मी नाही तर खुद्द स्वामी करत आहेत म्हणून." अगदी क्षणाचाही विलंब न करता वृषभ उत्तर देतो.

गोंधलेली सावी फक्त बघत राहते त्याच्याकडे.

तोच बोलू लागतो,"तुमचा गोंधळ साहजिक आहे मला फक्त एकदा समजवायची फक्त एक संधी द्या."

"बरं बोला", सावी ऐकून घ्यायचं ठरवते.

"मी वृषभ सरपोतदार.... माझं इंजिनीरिंग नुकतंच झालंय आणि मी आमचीच कंपनी सांभाळायला सुरवात केली आहे, मी जवाबदारी घेतल्या घेतल्याच मला एक प्रोजेक्ट मिळाला आणि त्या आनंदात स्वामींचे आभार मानायला मी आज त्यांच्यासाठी काही करायचं ठरवलं."

"हो मग ह्याचा माझ्याशी काय समंध?"सावी विचारते.

"आधी माझं बोलणं तर पूर्ण होऊ द्या.." वृषभ बोलू लागतो.

"मला गुरुजींकडून माहित झालं कि तुम्ही रोज सकाळी स्वामींसाठी सोनचाफा घेऊन येता. आणि मला सवयी आणि सवडी प्रमाणे रोज संध्याकाळी हिच सोनचाफ्यांची फुलं स्वामींसाठी घेऊन यायची सवय आहे. मग तुम्हाला हा योगायोग नाही का वाटत कि आज आपली बरोबर मठात भेट झाली .चुकून का होईना तुमचं आणि स्वामींच बोलणं माझ्या कानावर पडलं. आणि मला तुम्हाला मदत करण्याची बुद्धी होणं हा स्वामींनी दिलेलाच संकेत आहे, असं किमान मी तरी समजतो कारण जी मदत मी दानपेटीत टाकणार होतो ती त्यांनी मला तुम्हाला द्यायला सांगितली आहे असाच या संकेताचा अर्थ होतो ."

"ऐका नं तुमचं सगळं खरं असेल ही पण कृपया मला जाऊदे मला नको आहे तुमची मदत. स्वामींच्या कृपेनें माझे हात पाय बुद्धी अगदी नीट आहेत मी उभे करेन मृनू च्या फीस चे पैसे पण खरंच मला नको आहे तुमची मदत, मला माफ करा." असं बोलत सावी तिथून निघून येते.

आणि वृषभ ही तिच्या मागे मागे बोलत जात राहतो."ऐका मला ही सगळं मान्य आहे तुम्ही धड धाकट आहात, तुम्ही पैसे जमवू शकता पण आता ही मदत घेऊन घ्या. ह्म्म्म हवं तर तुम्ही मला व्याजासहित घेतलेली मदत परत करा आपण परत ती स्वामींच्या मठात अर्पण करूया. पण कृपया आता ऐका माझं."

सावी ते ऐकून थांबते आणि वळते, "बरं.."इतकंच काय ते उत्तर देते.

"बघा तो दागिना तुमच्या अजून कुठल्या गरजेच्या वेळी कामात येऊ शकतो. आता जो मार्ग स्वामींनी तुमच्या समोर उभा केलाय तो त्यांचीच इच्छा मानून स्वीकार करा, वाटल्यास मला तुम्ही व्याजासहित तुमच्याकडून जसं जमेल परत करा, हे माझं कार्ड आणि हे पैसे सध्या असू द्या."असं बोलत तो पैसे असलेलं पाकीट तिच्यासमोर धरतो .

"ना आपली ओळख ना पाळख आणि तरीही इतकी मोठी मदत मी घेऊ. आणि व्याज वगैरे देऊन घेतलेलं कर्ज फेडण्या इतकं वगैरे मी कमवत नाही हं ", सावी तिची बाजू मांडते.

"बरं मग असं करूया तुम्ही फक्त घेतलेले पैसे परत करा आणि व्याज स्वामींना द्या" वृषभ उपाय सुचवतो आणि ती मदत घेण्यास एकदाची तयार होते.


"इथे जवळच माझं घर आहे,तुम्ही केलेल्या ह्या मदतीसाठी एक चहा तर व्हायलाच पाहिजे नं?"

"आता नको तुम्हाला मदत घेण्यासाठी तयार करता करता असाच भरपूर वेळ निघून गेलाय. आता मला निघावं लागेल पण पुढल्या वेळी नक्की घेईन चहा. आता ह्या मदतीसोबत हा चहा सुद्धा उधार आहे तुमच्यावर."असं बोलून तो निरोप घेतो.

"बरं चालेल, मी लक्षात ठेवेन." सावी उत्तरते.

दोघंही निरोप घेत आपापल्या मार्गी लागतात.

तितक्यात वृषभ वळून परत एकदा तिला हाक मारतो, "मिस सावी रात्री शांतपणे झोपा, काही शंका असतील तर सकाळी चाफा घेऊन जाल तेव्हा स्वामी आणि गुरुजींसोबत माझ्या बदल बोलून घ्याल, ते दोघेही मला ओळखतात."असं म्हणत हसतो.

"हो ते मी करणारच आहे."असं सावी हसत हसत उत्तर देते आणि घरी जाण्यासाठी चालू लागते.

🎭 Series Post

View all