बहर प्रीतीचा भाग -३

कर्तव्य आणि श्रद्धा जपत दोन जीवांची बहरू पाहणारी प्रेमकहाणी.
भाग -३


घरी आई आणि मृण्मयी दोघीही तिची वाट बघतच असतात. सावी ला दारात बघून तिची आई विचारू लागते, "काय गं बाळा आज उशीर खूप झाला तुला?"

"अगं हो ऑफिस चं काम होतं आणि बाईसाहेबांच्या फीस चं ही बघायचं होतं ". सावी उत्तरते.

तिचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच मृण्मयी आतल्या रूम मधून बाहेर येत बोलू लागते,"ऐ ताई झाली न गं पैश्यांची सोय ?"

"आधी तिला श्वास तर घेऊ दे, पाणी दे, फ्रेश झाली कि मग विचार ". आई मृनू ला समजवते.

"ठीक आहे गं आई", आणि मृण्मयी कडे बघत सावी बोलू लागते "मॅडम झालीये तुमच्या फीस ची सोय, हे घे पैसे आणि उद्या वेळेवर कॉलेज ला जाऊन ऍडमिशन करून ये आणि आता अभ्यासाला लागा कारण आता मी कुठलंही कारण ऐकून घेणार नाहीये." असं म्हणत सावी मृनू ला त्या पाकिटातले काही पैसे देते.

तेवढे पैसे बघून खरं तर तिच्या आईला आश्चर्य वाटतं पण सध्या काही टोकायचं नाही असं त्या ठरवतात.

"चला गं मुलींनो पानं वाढलीत पटकन जेवायला या ", दोघीना त्या आवाज देतात आणि तिघीही मिळून जेवण सुरु करतात.

"काय गं आई काय बोलले डॉक्टर काका काही इम्प्रोव्हमेन्ट आहे का बाबांच्या तब्बेतीत?"सावी विचारते.

"अजून तरी नाही, पण बघू म्हणाले अजून एक दोन महिने मग ठरवू पुढे काय करायचं ते "त्या सावीला सांगत असतात.

"पुढे काय करायचं म्हणजे?त्यांना म्हणावं जोवर आपल्याला आशा आहे तोवर बाबांची गैरसोय होता कामा नये आणि सहा सहा महिने कोमात राहून शुद्धीवर आलेली माणसं आहेत अगं, चमत्कार होतात फक्त आपण हरायचं नाही."सावी आईला समजवते.

गप्पा गोष्टी करत जेवण कधी आटोपतं कळतही नाही. सावी सवयी प्रमाणे सगळं आवरायला घेते, मृण्मयी स्वयंपाकघर आवरते आणि आपल्या अभ्यासाला लागते. सावी तिचं आटोपून शतपावली साठी अंगणात येते, तर तिला आई अंगणातल्या पाळण्यावर बसलेली दिसते. ती लगेच आईजवळ जाते.

"काय गं आई झोप नाही का येत आहे?"ती बोलू लागते.

"अगं थोडावेळ मोकळ्या हवेत बसावं म्हंटल, तशीही झोप येत नव्हतीच म्हणून येऊन बसले "आई उत्तरते.

"बरं तू बस मी थोडं दोन चार फेऱ्या मारते तितकेच पाय मोकळे होतील "असं आईशी बोलून सावी चालू लागते.

तोच आई तिला हाक मारते,"सावी जरा इकडे ये राजा, मला बोलायचं आहे."

"काय गं आई?"सावी गुणी बाळासारखं आईच्या हाकेला उत्तर देते.

"मला सांग तू इतक्या पैशांची सोय कुठून आणि कशी केलीस बाळा?"मुलीला आपल्यावर आईचा अविश्वास आहे असं ही वाटायला नको ही काळजी सांभाळून त्या सावीला प्रश्न विचारतात.

"माते तुम्ही विसरता कि मी आपल्याच पोटी जन्म घेतलाय, तु जेव्हा अशी इथे एकटी बसलेली दिसलीस तेव्हाच मला कळलं होतं की कुठलं विचारचक्र सुरु आहे तुझ्या मनात ते..."सावी थोडसं गमतीत जरा गंभीरपणाने आईशी बोलू लागते.

"तसं नाही रे राजा, पण अगदी ऐका दिवसात इतके पैसे! म्हणजे कुठून कसे ?"

आई बोलतच असते तितक्यात त्यांना मधेच थांबवत सावी बोलू लागते -
"तुझा माझ्यावर विश्वास आहे नं मग जराकाळ थांब मी तुला सगळं सांगेन. सध्या फक्त इतकंच की पगारातले थोडे थोडे करून एकाजणाचे पैसे मला चुकवायचे आहेत म्हणून पगार थोडा कमी येईल तूझ्या हातात."

"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा, पण नियती फासे च असे टाकत राहते आपल्या समोर, की वेळ निभावून नेण्यासाठी माणूस फार लाचार झालेला असतो." आई त्यांच्यातला संवाद सुरु ठेवत बोलत राहते.

"मातोश्री काळजी कशाला करता?तुमचे तारणहार स्वतः ब्रह्माण्डनायक असताना निश्चिन्त रहा आणि आता झोपायला चला, बराच उशीर झालाय मग परत उठायला ही उशीर होतो." असं बोलून ती आईला जरा दिलासा देते,आणि मग दोघीही आत जातात.

पलंगावर पडल्या पडल्या सावी आपल्याच विचारात मग्न होते, तिला कळत नसतं की थोडावेळापूर्वी ती नेमकी कुणाची समजूत घालत होती?ती खरंच आईला समजावत होती का स्वतःला सांगत होती पुन्हा पुन्हा की होईल सगळं चांगलं, ही सुद्धा वेळ निघून जाईल.त्यात परत आज वृषभ च्या रूपात अचानक उभ्या राहिलेल्या मदतीने ती खरं तर धक्क्यातच होती, मदत घेऊन चूक केली का बरोबर हे ही तिला कळत नव्हतं, पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची तर उद्याची वाट बघण्या शिवाय गत्यंतर नव्हतं, आणि ह्या सगळ्या विचारात असताना तिचे डोळे कधी मिटल्या जातात तिचं तिलाही कळत नाही.

सावीच्या आईला मात्र काही केल्या झोप येत नाही.एकतर वडिलांच्या अपघातामुळे खूप कमी वयात सावी वर घराची जवाबदारी येऊन पडली होती. त्यात ती दिसायला सुंदर, गोरीपान अगदी चुणूकदार,म्हणून त्यांना सारखी काळजी लागून राहायची, आपल्या अडलेल्या वेळेचा फायदा कुणी घेऊ नये आणि त्याची किंमत आपल्या लेकीला चुकवायला लागू नये, त्या सतत याच विचारात असायच्या आणि त्यात आज सावी नं घरी पैश्यानी भरलेलं आणलेलं ते पाकीट त्यामुळं त्यांची काळजी आणखीनच वाढते.

सावी वर त्यांचा पूर्ण विश्वास असतोच पण लेकीच्या काळजीचं पारडं जरा जास्त जड असतं , ह्याच काळजीत त्यांची पूर्ण रात्र जाते , पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागतो आणि त्या आरामाखुर्चीतच बसल्या बसल्याच झोपी जातात.

पहाट उजाडलेलीच असते तितक्यात सावी पाणी पिण्यासाठी म्हणून उठते, तर स्वयंपाक घरात जाताना तिचं सोफ्याकडे लक्ष जातं. तेव्हा आईला बसल्या बसल्या तिथेच झोप लागल्याचं तिच्या लक्षात येतं.

आईला उठवण्याचं तिला ही जीवावर येतं म्हणून ती आतल्या खोलीतून पांघरून आणते आणि आईला पांघरते, आणि परत आपल्या रूम मध्ये जाऊन झोपते.
पण काही केल्या तिला आता परत झोप लागत नाही. बराच वेळ या कडावरून त्या कडावर बाजू बदलून झाल्यावर शेवटी ती उठायचं ठरवते. आणि रोजच्या कामाला सुरवात करते.

थोड्यावेळाने आई आणि मृण्मयी दोघीही उठतात, सकाळची दिनचर्या आटोपून आई स्वयंपाक घरात जाते तेव्हा सकाळची न्याहारी तयार असते ते बघून हे सगळं सावी ने केलंय हे त्यांच्या लक्षात आल्या वाचून राहत नाहीच शिवाय त्यांना कौतुक सुद्धा वाटतं.

मृण्मयी आणि आईची न्याहारी सुरूच असते तोच सावी अंघोळ वगैरे आटोपून येते.

"काय गं कसा झालाय उपमा?"सावी विचारते.

"मस्त लागतोय मटाराचे दाणे घातल्यामुळे अजूनच छान चव येतेय ". आई बोलू लागते.

"हो पण तायडे दही वापरला असतंस लिंबा ऐवजी तर अजून आवडला असता मला आणि..." मृण्मयी बोलू लागते.

तिचं बोलणं मधेच तोडत आई बोलू लागते,"आपण ही कधी लवकर उठावं आणि असा आश्चर्याचा धक्का द्यावा आईला मग समजेल दही किंवा लिंबू नाही मनापासून केल्याने पदार्थात चव उतरते ते".

"असू दे गं आई, लहान आहे ती. काय तु पण ना? आणि मृणू पुढल्या वेळेला दही च वापरेल आंबटासाठी यावेळेस हा खाऊन घे आणि तयार हो, आज प्रवेश प्रक्रिया आहे महाविद्यालयाची हे विसरू नकोस "आई आणि मृणू कडे बघून ती बोलणं पूर्ण करते.

"हो गं ताई आहे माझ्या लक्षात, सारखं सारखं काय तेच सांगतेस "मृण्मयी वैतागवाणा सूर लावत बोलते.

मृण्मयी चं बोलणं ऐकून आईला कमाल वाटते, एक साऱ्या घराची जवाबदारी घेते आणि दुसरी अगदी अविचारी म्हणून त्या जरा काळजीतचं जातात, आणि दुसरीला समजूतदार पण यावा म्हणून स्वामींना मनोमन विनंती करतात.

🎭 Series Post

View all