Login

बहु बिती थोडी रही(बोधकथा)

बोधकथा
एक राजा होता. त्याचे आता वय झाले होते म्हणजे तो म्हातारा झाला होता तरी ही त्याचे मन भोग विलासातून मुक्त झाले नव्हते. तो रात्रंदिवस नर्तन आणि मधुरसपण यात मग्न असायचा. एकदा त्याच्या राज्यात एक सुंदर आणि नर्तन- गायनात निपुण अशी नर्तकी आली होती. तिची कीर्ती सगळीकडे पसरली होती. राजाने तिची किर्ती ऐकून तिला राज्य सभेत बोलावलं. नर्तकीला म्हाताऱ्या राजाला पाहून खरं तर जरा आश्चर्य वाटलं होतं आणि राजाची फिरकी घेण्याची तिला हुक्की आली

“ देवी तुम्ही खूप सुंदर नर्तन आणि गायन करता असं ऐकलं आहे.आज आमच्यासाठी तुम्ही नर्तन करा.” राजाने आदेशच दिला.

“ हो महाराज का नाही पण माझी एक अट आहे. मी माझे नृत्य- गायन सादर करेन पण ते रात्रंभर चालेल आणि त्यावेळी कोणी झोपता कामा नये.” तिने मुद्दामच अशी अट घातली कारण म्हातारा राजा जास्त जागू शकणार नाही आणि आपली अट मोडली तर तो जास्त बिदागी देईल असं तिला वाटत होते.

“ ठीक आहे. तुमची अट मान्य आहे देवी. आजच रात्री आमच्या रंग महालात तुमच्या नर्तन-गायनाचा कार्यक्रम होईल.” राजा म्हणाला.

रात्री राजाने त्याचे राजगुरू, त्याची पुत्री आणि त्याचा पुत्र यांना कार्यक्रमाला बोलावलं. नर्तकी ही वेळेवर हजर झाली. राजगुरूचा सन्मान करण्यासाठी राजाने एक मोहरांची थैली त्यांना दिली. सगळे रंग महालात बसले आणि नर्तकीने नर्तन- गायन सुरू केले. रात्र चढत होती तसे नर्तन आणि गायनाला देखील रंग चढत होता. राजा आणि बाकी सगळे मंत्रमुग्ध होऊन गेले होते.

नर्तकी ही न थकता गाणे गात नृत्य करत होती. मध्य रात्र उलटून पाहाट व्हायला लागली आणि तिचा तबला वादक पेंगायला लागला. तिचा नाच, गायन आणि तो वाजवत असलेला तबला याचा ताळमेळ बसेना. नर्तकी मात्र मनातल्या मनात वैतागली.

‛ या तबला वादकामुळे जर माझा ठेका आणि गाणे चुकले तर माझी बदनामी होईल. इतकी वर्षे कमावलेले नाव मातीमोल होईल. पण आता याला सांगू तरी कशी?याला सतर्क कशी करू? हा हे योग्य आहे.’ तिने नाचतच विचार केला आणि गाऊ लागली.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।”

म्हणजे रात्र सरत आली आहे आता थोडीच रात्र बाकी आहे पण तू आता डोळे झाकलेस तर एका क्षणामुळे आपल्याला कलंक लागेल. तिचे हे बोल ऐकून तबला वादक सतर्क झाला. आणि नीट तबला वाजवू लागला पुन्हा तिने तोच दोहा गायला.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।”


आणि राजगुरूने उठून नर्तकीच्या हातात मोहरांची थैली दिली. राजाला खूप आश्चर्य तर वाटलेच पण आता त्याला राजगुरूचा राग देखील आला.

‛ मी या नर्तकीला बिदागी देणारच आहे की, मग मी सन्मान म्हणून दिलेल्या मोहरा राजगुरूंनी हिला का दिल्या?’ मनात हा विचार करून तो चरफडला आणि गप्प बसला.


पुन्हा नर्तकी नाचू लागली तिला वाटलं की या दोह्यात काही तरी खास आहे म्हणूनच राजगुरूंनी मला मोहरा दिल्या ना. आता पुन्हा हा दोहा गावा म्हणून तिने थोड्या वेळाने नाचत पुन्हा तोच दोहा गायला.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

तिने दोहा गायला आणि राजकुमारीने तिच्या गळ्यातील हिऱ्यांचा हार उठून नर्तकीला दिला. नर्तकी खूप खुश झाली. आणि पुन्हा नाचायला लागली. राजा मात्र मनातून अजूनच चिडला.

‛ वेडे झाले आहेत का हे लोक आज?’ तो मनातच म्हणाला.

नर्तकीला आता कळले होते की ती गात असलेल्या दोह्यात काही तरी खास आहे म्हणून तर हे लोक मला अशी महागडी बक्षिसे देत आहेत. ती पुन्हा नाचायला लागली आणि थोड्या वेळाने पुन्हा तोच दोहा गायला.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

आता राजकुमार उठला आणि त्याने खुश होऊन तिला त्याच्या बोटातली नौरत्न अंगठी दिली. नर्तकी पुन्हा नाचू लागली.

आता मात्र राजा चिडला आणि म्हणाला

“ बास करा हे नृत्य! देवी आहात कोण तुम्ही? आणि या माझ्या माणसांवर तुम्ही काय जादू केली? तुम्ही असच नाचत आणि गात राहिलात तर माझे राजपाठ लुटणार तुम्ही. आणि तुम्हा तिघांना झाले काय आहे?”

राजगुरू,“ राजन या नर्तकीने आज माझे डोळे उघडले आहेत.तिने गायलेल्या दोह्याने मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

अर्थात अर्ध्याहून अधिक आयुष्य निघून गेलं माझं मी भोग-विलासात रमलो नाही पण आज नर्तन-गायन ऐकायला आलो म्हणजे या माझ्या एका कृत्याने माझ्या आयुष्यभराच्या सन्मानाला धक्का पोहोचेल म्हणजेच कलंक लागेल. याची जाणीव मला या नर्तकीने करून दिली म्हणून मी हिला मोहरांची थैली दिली.आज देवी तुम्ही माझ्या गुरू झालात. मी राजगुरू पदाचा त्याग करून संन्यास घेत आहे. आज्ञा असावी राजन.” ते म्हणाले आणि निघून गेले.

राजा,“ तुला काय झालं की तू हिऱ्यांचा हार या नर्तकीला दिला?” त्यांनी राजकुमारीला विचारलं.

राजकुमारी,“ तात तुमचं इतकं वय झालं तरी तुम्ही भोग-विलासात रत आहात. माझ्या तारुण्या सुलभ भावनांचा विचार तुम्ही केला का? माझ्या लग्नाचा विचार तुमच्या मनात आला नाही. मला आता हे सहन होत नव्हते म्हणून आपल्या राजवाड्यातील एक पाहारेकरी मला खूप आवडतो. मी पुढच्या दोन दिवसात त्याच्याबरोबर पळून जाणार होते पण या नर्तकीच्या तोंडून हा दोहा ऐकला

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

आणि अचानक मला मुलगी म्हणून माझ्या कर्तव्याची जाणीव झाली. अर्थात आत्ता बरेच दिवस निघून गेले आहेत आणि थोड्याच दिवसात माझ्यासाठी कुठून तरी स्थळ येईलच. पण एका क्षणासाठी मी जर पळून गेले तर आयुष्यभराचा कलंक आपल्या घराण्याला आणि मला ही लागेल म्हणून मी खुश होऊन हिला माझा हार दिला.”

राजा,“ बाप रे! मी माझ्याच भोग- विलासात इतका रमलो की माझ्या तरुण मुलीचा विचार केला नाही.आज या नर्तकीच्या या दोह्यामुळे तू थांबलीस नाही तर माझी आणि या राज्याची अब्रू देखील धुळीला मिळाली असती. अर्थात चूक तर माझीच आहे.मी माझ्या कर्तव्याला चुकलो आहे. राजकुमार तुही सांग तू का हिला अंगठी दिलीस?” राजाने विचारलं.

राजकुमार,“ मी कोणत्या तोंडाने सांगू तात? तुम्ही वयोवृद्ध झाला आहात तरी देखील राजपद सोडायला तयार नाही. उलट भोग-विलासात रमला आहात. पण मी माझे काय? मी तरुण आहे शक्तिशाली आहे. आत्तापर्यंत मला तुम्ही राजा बनवायला हवं होतं. असे विचार माझ्या मनात घोळत होते आणि मी माझ्या काही विश्वासू सैनिकांना घेऊन बंड करून तुमचा वध करून राजा होण्याचा विचार करत होतो पण या नर्तकीच्या दोह्याने माझे डोळे उघडले.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

अर्थात खूप काळ लोटला आहे. तुम्ही आता वयोवृद्ध झाला आहात अजून किती दिवस राज्य चालवणार एक ना एक दिवस थकणार किंवा मग तुमचा मृत्यू होणार. पण त्या आधी मी जर असं काही केलं तर वडिलांना मारल्याचा कलंक माझ्या माथी कायमचा लागेल.या विचाराने मी या सगळ्यापासून परावृत्त झालो.” तो म्हणाला. राजा मात्र विचारात पडला.

राजा,“ बाप रे मी माझ्याच भोग-विलासात इतका रमलो की मला माझ्या कुटुंबा प्रति असलेल्या कर्तव्याचा विसर पडला. देवी तुमच्या हा दोह्याने या तिघांचेच नाही तर माझे ही डोळे उघडले. आज तुम्ही आला नसता तर केवढा अनर्थ घडला असता. तुम्ही मला गुरुस्थानी आहात.मी राजकुमारीचे लग्न करून. राजकुमार तुमचा राज्याभिषेक करून संन्यास घेणार आहे मला ही या दोह्याचा एक वेगळा अर्थ कळला आहे आज.

‛बहु बिती थोड़ी रही पल पल बिती बिहाय
एक पलक के कारने ना कलंक लग जाए।’

अर्थात आयुष्य संपत आलं मी भोग-विलासात रमलो. आता आयुष्याचे काहीच क्षण उरले आहेत तेही असेच घालवले तर मी कलंकीत होईल.त्यापेक्षा वेळीच मी सावरून माझी संसारिक कर्तव्य पूर्ण करून संन्यास घेतोय.”

खरं तर किर्तनाने समाज घडत नसतो आणि तमाशाने तो बिघडत देखील नसतो. कोणत्या साध्या घटनेतून कोणाला काय ज्ञान प्राप्त होईल हे सांगता येत नाही कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते.

स्वामिनी चौगुले
एका हिंदी कथेचा स्वैर अनुवाद आहे ही कथा