Login

बाईपण भारी देवा.. भाग २

बाईपणाच्या विविध छटा दाखवणारी सुंदर कथा
भाग २  

     "काकू तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आहे जे मला खूप भावते.ज्यामुळे तुमचे सौंदर्य आपोआपच खुलते." रेखा काकूंच्या सौंदर्यावर भाळते.
"हो ग.. माझा गोरापान रंग,चेहऱ्यावरचे तेज,सरळ रेषेत असलेले नाक आणि काळेभोर लांब केस ह्यामुळे तर हे माझ्या प्रेमात पडले.माझं म्हणशील तर मला हे उंचपुरे,गोरेपान,पिळदार मिशी,छान शरीरयष्टी ह्यामुळे  खूप आवडले होते.आजही आम्ही एकमेकांना खूप जीव लावतो." काकू अगदी लाजून रेखाला सांगत असतात.

"किती छान! नाहीतर आजकाल ऑफीसच्या आणि घरच्या कामाच्या व्यापात माझ्या आहोंना आणि मला नीट थोडावेळ बसून बोलायला देखील वेळ मिळत नाही." रेखा कंटाळवाण्या स्वरात सांगते.   

"होते ग असेही नवरा बायकोच्या नात्यात, ती एक फेज असते.आमचे लग्न झाले तेव्हा नवीन नवीन संसाराला गावी अगदी चुलीवर स्वयंपाक करणे,शेणाने घर आंगण सारविणे,वीस पंचवीस माणसांचे जेवण बनविणे सगळे आनंदाने केले.नंतर आम्ही नवरा बायको नोकरीनिमित्त इकडे शहरात आलो.तेव्हा काही काही जवळ न्हवते.अगदी शून्यातून संसार आम्ही केला.खूप काटकसर केली आणि हलाखीतून प्रपंच केला.तेव्हा असेच सतत जबाबदार्या पार पाडण्यात व्यस्त असायचो.त्यातच जमवाजमव करत कष्टाने स्वतःचे एक घर घेतले.पाहता पाहता काही वर्षांत छान दोन मुले झाली. त्यानंतर घर माझे जणू गोकुळ झाले होते.पण हळू हळू मुले मोठी झाली.नोकरीला लागून सेटल झाली.पाखरे भुर्र उडून जातात तशी आपापल्या संसारात व्यस्त झाली.एवढ्या मोठ्या घरात कधी-कधी खूप एकटे वाटते.
सगळे सण-समारंभ आपल्या माणसांच्या सानिध्यात आनंदाचे सोहळे व्हावे.घर कसे माणसांनी भरलेले असावे असे मला वाटते.पण सगळेच मनासारखे होत नसते ग हेच खरे. संपूर्ण घरात दिवसभर एकटीने बरेच दिवस काढले.त्यानंतर आता पाच वर्षांपूर्वी ह्यांची रिटायरमेंट झाली.तेव्हापासून सोबतीला हे घरात असतात." काकुंचे बोलणे रेखा मग्न होऊन ऐकत होती.

  "मी मध्ये-मध्ये मुलांच्या किंवा नातवंडांच्या आठवणीत उदास झाले की हे नेहमी मला समजावतात.तुम्ही बायका ना संसारात प्रत्येक गोष्टींमध्ये तुमचे मन गुंतवता.एवढे गुंतणे चांगले नव्हे लक्ष्मी.त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर देखील होऊ लागला हे मलाही जाणवू लागले.मग मी स्वतःच्या मनाला समजावले की मुलांना जन्म देणे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून त्यांचे योग्य पद्धतीने पालनपोषण करणे,त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे आपल्या हातात आहे.ते आपण लक्ष देवून केले. बाकी त्यांना त्यांचे करियर,त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत आपण त्यांना त्यांच्या वाटेने जावू द्यावे.त्यांना आपण आपल्यासाठी,आपल्या प्रेमापोटी थांबवू नये.हेच आम्ही दोघांनी केले."
रेखाला काकूंच्या पाण्याने ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा त्यांनी अनुभवलेल्या अनुभवाचे दुःख जणू सांगत होत्या.

"मानलं पाहिजे काकू तुमच्यातील आईला, बाईपणाला .आयुष्याच्या उत्तरार्धात आलेले एकटेपण कठीण असते.पण तुम्ही त्यावर मात करत आयुष्य छान व्यतीत करत आहात हे शिकण्यासारखे आहे."रेखा काकूंचा हात हातात घेऊन बोलते.
ह्यांच्या गप्पा सुरू असतानाच आज गार्डनमध्ये काकूंच्या ओळखीच्या श्रेया आणि रेवा ह्या दोघी जणी त्यांना भेटतात.
त्या काकूंची विचारपूस करतात.."कश्या आहात काकू तुम्ही? माझा खूप कंपनीत वर्कलोड वाढल्याने एवढ्यात वॉकला किंवा खाली गार्डनमध्ये येणे झालेच नाही." रेवा सांगते.
"हो ना काकू माझ्याही मुलांच्या परीक्षा आणि माझे काम ह्यात मीही व्यस्त होते म्हणून आपली काही एवढ्यात भेट झाली नाही." श्रेया म्हणते.

"आता आम्ही पुन्हा येणार आहोत रोज वॉकला तेव्हा भेटत जावूया.तेवढाच थोडा आपल्याला विरंगुळा मिळतो नाही का?" त्या दोघीही एकत्र काकूंना बोलतात.
"हो ग नक्की, असा व्यस्तपणा सुरूच राहतो ग मुलींनो .कारण तुमचे आता उमेदीचे आणि कामाचे दिवस आहेत.बाकी छान वाटले तुम्हाला भेटून.
हि बघा माझी नवीन मैत्रीणचं म्हणू शकता...रेखा
आपल्या ह्याच सोसायटीमध्ये राहते."
त्यावर त्या तिघीही पुढे थोडक्यात तोंड ओळख करून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेत उद्या भेटूया असे एकमेकींना म्हणतात.

आता रोज सायंकाळी ह्या चौघीहि आपापली कामे,मुलांचे आटोपून न चुकता गार्डनमध्ये वॉकला भेटू लागतात.बोलता बोलता रेखा तिच्याबद्दल श्रेया आणि रेवाला सांगते.तेव्हा तिने आता स्वतःला आणि तिच्या तब्येतीला वेळ द्यायचे ठरविले आहे हे तिला ऐकून खूप बरे वाटते.
तुमच्या घरी कोण असते? तुम्ही काय करता?तेव्हा रेखा त्यांना त्यांच्याबद्दल विचारते.तेव्हा रेवा तिला सांगते मला दोन मुलगे आहेत.एक आत्त्ता फर्स्टमध्ये आहे आणि मोठा थर्ड स्टँडर्डमध्ये शिकत आहे.मी सिंगल मदर आहे आणि आम्ही तिघेच घरी असतो.

सिंगल मदर हे ऐकताच रेखाला तिच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या किती असतील आणि कसे ती सगळे हाताळत असेल असे प्रश्न पडतात. चला तर मग रेवाच्या आणि श्रेयाच्या आयुष्यातील त्यांचा बईपणाचा आणि आईपणाचा प्रवास जाणून घेऊया पुढील भागात...