Login

बाईपण भारी देवा.. भाग ३

बाईपण आणि आईपण दोन्हीचे भारीपण दाखवणारी कथा
भाग ३

      रेखा,श्रेया,लक्ष्मी काकू आणि रेवा ह्यांची पाहता पाहता रोजच्या भेटीतून चांगलीच मैत्री होते.सगळ्याजणी आपली सुख आणि दुःख,चांगले - वाईट प्रसंग बोलून मोकळ्या होत असतात.ती सकारात्मक ऊर्जा घेऊन आपापल्या आयुष्यातील बाईपणाचे भारीपण जगत असतात.

   असेच भेटल्यावर बोलता बोलता रेखा तू एकटी कसे काय आई आणि वडिलांची भूमिका साकारतेस? किती कठीण जात असेल तुला हे सगळे असे विचारते.तेव्हा रेवा रेखाच्या प्रश्नाला पुढे उत्तर देत स्वतःबद्दल सांगू लागते.
    माझे आणि रामचे बारा वर्षांपर्वी अरेंज मॅरेज झाले.आमचा राजा राणीचा अगदी मजेत संसार सुरू होता.आम्ही दोघेही आयटी कंपनीत जॉबला होतो.संसारात आम्हाला आमच्या कशाचीही कमी भासत नव्हती.काही वर्षात आमच्या संसार वेलीवर दोन छान फुले उमलली ती म्हणजे माझी दोन मुले.

हे ऐकून रेखाला रेवाची आणि रामची स्टोरी म्हणजे अगदी एखाद्या रोमँटिक हिरो हिरोईनची स्टोरी वाटली."पण मग असे काय झाले? आज तू एकटी कशी काय?" रेखा कुतूहलाने तिला विचारते.

    "पण म्हणतात ना की कधी कधी सगळं छान सुरू असले की त्याला दृष्ट लागते.अगदी तसेच काही झाले.आम्ही चौघेही एकदा ट्रीपवरून घरी येत होतो तेव्हा आमच्या गाडीला एक ट्रक जोरात येऊन आदळला.त्यात आम्हा तिघांना गंभीर दुखापत झाली पण राम मात्र त्यामध्ये आम्हाला सोडून कायमचा गेला.
तो दिवस माझी जीवनातील काळा दिवस होता." रेवा सांगता सांगता रडू लागली.

   सावर स्वतःला त्या तिघीही तिला समजावू लागल्या.
ती थोडे शांत होत पुढे बोलू लागते..
"जवळपास एक दीड वर्ष मी डिप्रेशनमध्ये होते.आयुष्य सगळं संपल्यासारखे वाटत होते.शेवटी हळूहळू माझ्या दोन मुलांकडे पाहून  माहेरच्या माणसांच्या साथीने मी पुन्हा उभी राहिले.
पुन्हा स्वतःचा जॉब सुरू केला.मुलांना चांगले शिक्षण आणि कशाची कमी पडू नये म्हणून सतत धडपडत असते.एका स्त्रीला आई आणि वडील दोन्ही जबाबदाऱ्या पेलणे सोपे नाही.त्यात आजूबाजूच्या माणसांच्या बेकार नजरा तुमच्यावर असतात.परिस्थितीनुसार स्वतःला खंबीर बनवत गेले.आता मुलेही मोठी होत आहेत.ती दोघेही माझी काळजी घेत असतात.आयुष्य कधी एका क्षणात बदलेल सांगता येत नाही.त्यांच्यासाठी मी स्वतःची तब्येत आणि स्वतःला जपत असते." भरल्या काळजाने ती रेखाला आपला अनुभव सांगत असते.

   हे सारे ऐकून रेखाला तिचे खूप कौतुक वाटते.तिला स्वतःचे दुःख खूप छोटे आणि आयुष्य खूप सुखकर वाटते.ती तिला म्हणते की "तुझ्यासारख्या खंबीर स्त्रीकडून खूप काही शिकले पाहिजे."

   त्यावर रेवा म्हणते.."तुम्हा सगळ्यांना भेटून मी सगळे विसरून रोज खूप खुश होते.मला तुमच्या सगळ्यांचा आधार वाटू लागला आहे.प्रत्येकीच्या आयुष्यात काहीना  काही प्रॉब्लेम्स असतात.त्याकडे आपण कसे पाहतो आणि कसा मार्ग काढत जातो ते महत्वाचे ठरते.हे मी माझ्या आयुष्यात शिकते आहे."

   हेच बघ ना आता तू एक गृहिणी आहे तुझ्या वेगळ्या समस्या आहेत.तसे काकूंच्या आणि श्रेयाच्या आयुष्यात देखील वेगळे प्रश्न आहेतच.

   "मी तर दिवसभर नोकरी करते.घरी आल्यावर मुलाचे,सासु-सासऱ्यांचे,नवऱ्याचे सगळे पाहायचे.नोकरी करते म्हणून घराच्या कामांपासून मोकळीक मिळते असेही काही नाही.सगळ्यांची मने जपण्यात स्वतःला मात्र वेळ मिळत नाही.शिक्षण झाले आहे आणि चांगली नोकरी आहे.त्यामुळे घरात पैशाचीही मदत होते आणि मानसिक समाधान मिळते म्हणून नोकरी सोडवत नाही.छोट्या रोहनला वेळ पुरेसा देता येत नाही म्हणून आई म्हणून मनाची घालमेल मात्र सुरूच राहते." श्रेया बोलू लागते.

"मला आपण कमवत नाही म्हणून आपल्याला घरात तितकी किंमत नाही असेच जाणवते." रेखा म्हणते.

      "प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.त्यामुळे आपण आपल्या मुलांना,आपल्या आई- वडिलांना, स्वतःला कधी काही घेऊ वाटले तर हक्काने घेता येते.चार पैसे पाठीशी असले की नेहमी त्याचे पडत्या वेळेत पाठबळ राहते.असे मला नेहमी वाटते." श्रेया रेखाला सांगते.

"हो ग पटते आहे मला ते म्हणून मी एक दोन कॉम्प्युटरचे कोर्स करून जॉबसाठी प्रयत्न केले.एका ठिकाणाहून जॉबची ऑफर आली होती.पण घरचे म्हंटले की ह्या घरातील सुनेने जॉब करायचा नाही.घर,मुले,संसार आपला व्यवस्थित सांभाळायचा." रेखा म्हणते.

ह्यावर काय असेल श्रेयाचे म्हणणे आणि काय असेल रेखाच्या मनात अजून साचलेले तिच्या बाईपणाच्या प्रवासातील अजून पैलू जाणून घेऊया पुढील भागात..