Login

बाईपण भारी देवा.. भाग ४

किती सुंदर असते ते बाईचे बाईपण
भाग ४-

  रेखाच्या घरच्यांचे विचार ऐकून श्रेयाला खूप राग येतो.ह्या लोकांना आपल्या घरची सून म्हणजे काय फक्त हक्काची मोलकरीण वाटते का?असे तिला त्यावरून जाणवते.ते ती रेखाला रागातच बोलून दाखवते.

     "हे असे विचार करणारे लोक आणि त्यांची मानसिकता काही मला बरोबर वाटत नाही.समाजात आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि आपण तेच जुने विचार काय धरून बसायचे.ह्यात बदल कुठेतरी व्हायला हवा."

"होना अगदी बरोबर आहे तुझे म्हणणे, पण एका पातळी नंतर मलाही त्यांच्या विरोधापुढे थांबावे लागले.शेवटी संसारात बाई माणसाने थोडे पडते घ्यावे हेच माझ्यावर झालेले संस्कार."रेखा म्हणते.

   "माझ्याकडे प्रत्येक सण साजरे करणे, पै-पाहुण्यांचे आदरतिथ्य करणे,घर टापटीप ठेवणे आणि मुलाचा अभ्यास हे सगळे मी नोकरी करत व्यवस्थित करावे हि सासूबाईंची नेहमीच अपेक्षा असते.त्यात कधी वर्कलोड वाढला की घरातील कामे करण्यात थोडेफार इकडे तिकडे होतेच मग चिडचिड,गैरसमज,भांडणे ठरलेली असतात.
त्यात नवऱ्याला काही म्हणायला गेले की तू तुझ्यात बदल कर माझ्या घरचांचे काही चुकत नाही.हे त्याचे उत्तर ठरलेले असते.मग माझा मानसिक ताण वाढतो आणि परिणामी मी आजारी पडते.मी माझ्या अनुभवातून आता थोडे थोडे सोडून द्यायला शिकत आहे.तरी अजून तितकेसे जमत नाही.असे आहे एकंदरीत माझे आत्तापर्यंतचे सगळे आयुष्यमी जगले." श्रेया तिच्या जीवनातील चढ उताराबद्दल रेखाला सांगते.

   "मला नेहमी नोकरी करणाऱ्या बायकांचा हेवा वाटतो की त्यांना किती छान छान आवरून रोज घराच्या बाहेर ऑफिसमध्ये जाता येते.तिथे त्या स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतात.जे काही पैसे कमावतात त्यात स्वतः काही निर्णय सक्षमपणे घेऊ शकतात.नाहीतर आम्ही दिवसभर नुसते राबत राहायचे.तरी कुणाला किंमत नाही.पण आता तुझे सारे ऐकून असे जाणवत आहे की नोकरी करून घर आणि मुलांचे करायचे म्हणजे चांगलीच तारेवरची कसरत असते."

श्रेया त्यावर तिला म्हणते की.."शेवटी बाई ही गृहिणी असो की नोकरी करणारी,तरुण असो की थकलेली तिला ही सगळी कामे आणि जबाबदाऱ्या काही चुकल्या नाहीत."

     बघता बघता रोजच्या भेटीतून,बोलण्यातून त्या चौघीही खूप चांगल्या एकमेकींच्या मैत्रीणी बनतात.सगळ्यांच्या आयुष्यातील बाईपणाचा आणि आईपणाचा प्रवास पाहता,त्या सगळ्यांना कळून चुकले होते की आपले अर्धे आयुष्य काहींचे त्याहून जास्त हे घरच्यांची मर्जी सांभाळण्यात आणि घड्याळाच्या काट्यावर कामांमागे पळण्यात गेले आहे.तरीही अजूनही जीवाला म्हणावी तशी कधी उसंत नसते की स्वतःकरिता गरजेचा असा "मी टाईम" नसतो.कुणी अजूनही तूही दमतेस थोडी विश्रांती घे असे हक्काने म्हणत नाही.म्हणूनच त्या आता ठरवतात की ह्यामध्ये बदल हा आपणच करायला हवा.आपल्यासाठी आपणच वेळ द्यायला हवा.त्याची सुरुवात त्या रोजच्या वॉक झाला की योगा क्लास जॉईन करून करतात.

     नियमित चालणे आणि योगा केल्याने त्यांच्यातील पॉजिटिव्ह हार्मोन्स सक्रिय होऊन त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळू लागते.आरोग्य जपण्यासोबतच थोडा बदल हवा म्हणून पुढे जाऊन त्या त्यांची भिशी सुरू करतात.आपल्याला ज्या महिन्यात भिशी लागेल तेव्हा आपण मिळून किटी पार्टी करत जाऊ शिवाय आपल्याला हवी ती गरजेची वस्तू त्यातून स्व घेऊया हा उपक्रम त्या सुरू करतात.

    लक्ष्मी काकूंना पहिल्याच महिन्यात भिशी लागते.तेव्हा त्या ठरवतात की आपण सगळ्या जणी एखाद्या रिसॉर्टला जाऊन माझी किटी पार्टी साजरी करुया.रेखा,श्रेया आणि रेवा ह्यांना ही कल्पना मनापासून आवडते.खूप दिवस रोजच्या धावपळीतून बदल न मिळाल्याने त्या जाण्यासाठी तयार होतात.लक्ष्मी काकू काकांना सांगून चौघींचेही एका छान निसर्गरम्य अश्या रिसॉर्टला बुकिंग करतात.

सगळ्यांना आपल्या पहिल्या सोबतच्या ट्रिपची खूपच उत्सुकता वाटते.ह्यावेळी लग्नानंतर पहिल्यांदा त्या एकट्या आपल्या मैत्रिणींसोबत एक उनाड दिवस घालवणार असतात.सगळ्या जणी आपल्या आपल्या घरी तसे एक दिवसाच्या ट्रिपचे सांगून देतात.रेवा तिच्या आई बाबांना तिच्या घरी मुलांना सांभाळायला बोलवून घेते.
लक्ष्मी काकू त्या तिघींनाही सगळी तयारी झाल्यावर मनापासून म्हणतात की,"बाईपणाचे भारीपण म्हणजेच कठीण काळ,जबाबदाऱ्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत.पण आता वेळ आहे ती त्या बाईपणाचे भारीपण अनुभवायची."

   "काकू तुम्ही हे किती प्रत्येकीला समर्पक असेच बोललात आणि तुमचे वय विसरून तुम्ही नेहमीच आमच्यातील एक होऊन जाता हि तुमची खासियत खूप भारी आहे.धकाधकीच्या रोजच्या जीवनात थोडा ब्रेक घ्यायला हवाच नाही का?"
रेवा काकूंना मिठी मारून बोलते.

  पाहूया ह्या चौघींचाही बईपणाचा भारी प्रवास पुढच्या भागात..