Login

बाईपण देगा देवा.. भाग - २

बाईच मन...

मी आपल्या विचारात गुंतले होते. अचानक दरवाज्यावरची बेल वाजली. मी माझ्या विचारांच्या तंद्रितून बाहेर आले आणि घड्याळाकडे पाहिले तर दुपारचे चार वाजले होते. मी गेले दोन तास इथे अशीच बसून होते. दरवाज्याची बेल सारखी वाजत होती. मी जाऊन दरवाजा उघडला इतक्या दुपारी सहसा कोणी येत नाही. दरवाजा उघडला तर समोर वडील उभे होते, दारूच्या नशेत त्यांना उभ राहण्याची सुद्धा शुद्ध नव्हती. मी त्यांना धरून बेडरूम मध्ये नेऊन झोपवले. आई गेल्यापासून बहुतेक वेळा हे असच सुरू असायचं. विचारायचा प्रयत्न खूप केला पण कधीच उत्तर मिळालं नाही. एक स्त्रीचं घरात असणं, घराला किती घरपण देत हे तिच्या गैरहजेरीतच समजतं. दिवसा मागून दिवस जात होते. मी तर श्वास चालू आहे म्हणून फक्त जिवंत होते. जगण्याची इच्छा फार काही उरली नव्हती. 

                 दिवसा मागे दिवस जात होते. वडील दारूच्या आधीन होत चालले होते. एक दिवस एका बाईला घरी घेऊन आले. आज पासून ही इथेच राहणार आहे. आज पासून हीच तुझी दुसरी आई आहे. माझ्या पाया खालची जमीन सरकली. मला काय बोलू, काय करू काहीच कळतं नव्हत. मी तसचं माझ्या खोलीत गेले. मी काय व्यक्त झालं पाहिजे, हे मला कळतच नव्हत. मी तसचं आईच्या आठवणीत रडत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठून मी माझ्या कामाला लागले. मी उठण्या अगोदरच नाष्टा तयार होता. मी चहा ठेवला. चहा घेऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसले. त्या बाईंनी माझ्या समोर नाष्ट्याची प्लेट आणून ठेवली. मी मान वर करून त्यांच्याकडे पाहिले आणि पुन्हा चहा घेऊ लागले. 

                त्यांनी मला नाष्टा घ्यायला सांगितलं. मी तरी सुद्धा काहीच बोलले नाही. मी काहीच बोलत नाहीय हे बघून थोड्या वेळाने त्यांनीच बोलायला सुरवात केली.

                " मला माहित आहे. तुला तुझ्या वडिलांचं वागणं आवडलं नाहीय. हे असे तुझी आई म्हणून मला अचानक घरी घेऊन येणं तुला पटलं नाहीय. तुला राग येणं स्वाभाविक आहे. मी तुझ्या जागी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. तुला राग येणं, तुझं दुखावलं जाण हे सहाजिक आहे. मी ते नाकारत नाही पण राग नक्की कसला हे तरी सांग. तुझे वडील, मला तुझी आई बोलले ह्याचा की मी एक परकी स्त्री अचानक तुझ्या वडिलांचं हात धरून ह्या घरात आले ह्याचा आणि ही दोन्ही कारणं असतील तर असे का हे तरी एकदा विचार तुझ्या वडिलांना तेवढा हक्क आहे ना तुला. तेवढं मजबूत नातं आहे ना तुमचं. मग तिसऱ्या व्यक्तीला तुमच्यामध्ये बोलायची गरज का लागली पाहिजे? जा एकदा त्यांना मिठी मार आणि बोल त्यांच्यासोबत, नाही ऐकले तर ओरड, भांड पण बोला एकमेकांसोबत. न बोलून काहीच होत नाही आणि बोलण्याने खूप प्रश्न सुटतात."

                  मला त्या बाईंचं बोलणं पटत होत पण एवढं समजून सुद्धा ह्या बाई का आल्यात आपल्या घरी हे मला कळत नव्हत. मी चहा झाल्यावर तिथून उठले आणि पुन्हा माझ्या रूममध्ये जाऊन बसले. मला आज आईची खरचं खूप आठवण येत होती. तसे ती गेल्यापासून एक दिवस असा नव्हता की मी तिच्या आठवणीत रडले नाहीय पण आज मी तिला खूप जास्त मिस करत होते. ती असे अचानक सगळे अर्ध्यात सोडून का गेली. आता हे सगळे कोण पूर्ण करणार. त्यात हे पप्पा असे का वागत आहेत हे मला नव्हत कळतं. मला त्यांचा खूप जास्त राग येत होता आणि तेवढेच प्रश्न माझ्या मनात होते. त्या प्रश्नांची उत्तर मिळतं नाहीत तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा शांतता मिळणार नव्हती. पण मला त्यांच्याशी बोलायची इच्छा सुद्धा होत नव्हती. 

🎭 Series Post

View all