मी वडिलांसोबत बोलणं टाकलं होत. आम्ही एकमेकांसोबत खूप मोजक बोलत होतो. असचं दिवस लोटत होतो. घरात आता पहिल्यापेक्षा खूप शांतता होती. वडिलांचं दारू पिणे सुद्धा कमी झाले होते. मला आता थोडा फार वेळ रायडिंग करता सुद्धा मिळत होता. अबोला ठेवल्यामुळे आमच्यातला दुरावा अधिकच वाढत चालला होता. पण आता वडील पहिल्यापेक्षा खूप चांगलं वागत होते. त्यांनी खूप वेळा माझ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण मला काही केल्या बोलायची इच्छा होत नव्हती. कदाचित माझे हे वागणं चुकीचं होत पण तरी माझा स्वभाव काही मानत नव्हता.
एक दिवस आम्ही एकत्र जेवायला बसलेलो असताना वडिलांनी बोलायला सूरवात केली. " बाळा, मी कधी एवढ्या वर्षात तुला विचारलं नाही , कारण तुझी आई होती म्हणून गरज पडली नाही. तू पाळीच्या वेळेस कोणते सॅनिटरी पॅड वापरतेस म्हणजे ते सेफ आहेत ना. आजकाल बाजारात नवनवीन कंपन्या आल्या आहेत. त्यांचे नवनवीन प्रोडक्ट्स आले आहेत. ते काही तरी सवलती देतात किंवा मग कॉटन पॅड आहे, दुर्गंधी येत नाही असे काही सांगतात. तू नीट बघून वाचून घेतेस ना सगळे , कोणतेही नवीन प्रोडक्ट्स वापरू नकोस. अगोदर बघ ते शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही ते."
मला आता पप्पांचा राग आला होता. एकतर इतक्या दिवसांनी बोलतायत आणि हा काय विषय काढला आहे. मी त्यांना आज उत्तर द्यायचं ठरवलं. "पप्पा, मी तेवढी मोठी झाली आहे. मला कळतं आता काय चांगल आणि काय खराब आहे ते. आई नंतर तुम्ही दारूच्या आहारी जात होतात तेव्हा मी घर सांभाळाची आणि नंतर अचानक तुम्ही ह्यांना माझी आई म्हणून आणले तेव्हा सुद्धा मी स्वतःच स्वतःची समजूत काढली. त्यामुळे तुम्ही नका माझी काळजी करू. मी घेईन स्वतःची काळजी. पप्पा तुम्ही स्वतःच वागणं योग्य आहे का, हे बघा." तेवढं बोलून मी तिथून उठून माझ्या खोलीत गेले.
पुन्हा नेहमी सारखं रूटीन चालू झालं होत. मी माझ्यातच व्यस्त होते. मला घरात कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नव्हता आणि वेळ काढून द्यायचा ही नव्हता. एकदा घरून कॉल आला. घरी ये पप्पांनी तब्येत थोडी खराब आहे. त्यांना तुला भेटायचं आहे. किती ही राग असला तरी वडील होते ते माझे मला काळजी वाटली, मी लगेच घरी जायला निघाले. मी तशीच पळत घरी गेले. घरी जाऊन बघते तर डॉक्टर नुकतेच येऊन वडलांना बघून गेले होते. मी काय झालं विचारलं तर त्यावर म्हणाले." काही नाही बाळा धावपळीत आणि कामामुळे थोडा अशक्तपणा आला आहे. काळजी करू नकोस, मी बरा होईन लवकर. " त्यांना जेवण आणि औषध दिली. त्यांना झोप लागली तसे मी पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले.
संस्कृती , मला तुझ्यासोबत थोड बोलायचं होत. तुझ्याकडे वेळ आहे का? त्या बाईंनी मला विचारलं.
" हा बोला." मी मोजक्याच शब्दात उत्तर दिलं.
"संस्कृती ,तुला मी ह्या अगोदर सुद्धा सांगितलं होत. तू भांड, ओरड पण एकदा तुझ्या वडिलांसोबत बोल. तु बोलली नाहीस म्हणून आज मी तुझ्यासोबत बोलायचं ठरवलं आहे. संस्कृती, जसे तू म्हणतेस तू मोठी झाली आहेस. तर तोच मोठेपणा तू तुझ्या वडलांना समजून घेण्यासाठी का नाही दाखवत आहेस. जे काही राग किंवा गैरसमज , मतभेद असतील ते बोलून संपवले जाऊ शकतात.असा अबोला धरून एक दिवस तो माणूसच नसेल तर मग बोलणार कोणासोबत तू. त्या दिवशी त्यांनी तुला कोणते पॅड वापरते. असा प्रश्न केला तर त्यावर तू उलट उत्तर केलंस. मी तरी काही बोलले नाही कारण मला हक्क नाही, तुम्हा दोघा बापलेकिमध्ये बोलण्याचा, पण आज मला बोलणं गरजेचं वाटतं आहे. नाहीतर तुमच्यातील अंतर कधीच संपणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा