बाळंतपणं भारी देवा...भाग 3 अंतिम
©® ऋतुजा वैरागडकर
"तीला तीच्या बाळंतपणाचे दिवस आठवले."
"म्हणजे?"
"तिच्या बाळंतपणाला तिला झालेला त्रास आठवला. तिने तुम्हाला माझं असं करताना बघितल आणि तिला आश्चर्य वाटलं की अशीही सासू असू शकते? तिचा विश्वास बसेना. तिला तिचे दिवस आठवले तिच्या सासूने तिच्या बाळंतपणावेळी तिला खूप त्रास दिला, त्यामुळे नकळत तिच्या डोळ्यात अश्रू आले. खरंच आई मी खूप नशीबवान आहे तुम्ही माझ्या सासू आहात. तुमच्यासारख्या प्रेमळ सासू सगळ्यांनाच नाही मिळत. मला वाटतच नाही की मी माझ्या सासरी आहे, आईची कमी तुम्ही मला कधीच भासू दिली नाही. आई जेवढे करेल त्यापेक्षा जास्त तुम्ही माझ करता, इतकी माया लावता. खरच खूप नशीबवान आहे मी की या घरात लग्न होऊन आले.
लग्नाआधी मी पण खूप खूप काही ऐकलं होतं लग्नानंतर असे दिवस येतात, असं वागाव लागत, हे करावं लागतं, ते करावं लागतं, अशी सासू असते, तशी सासू असते, सासू आपल्याला त्रास देते असं काय काय खूप काही ऐकलं होतं मी. पण पहिल्यांदा जेव्हा या घरात पाऊल टाकलं ना आणि तुम्ही प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिलात ना त्यावेळेस मला जाणवलं की मी सासरी नाही माझ्या दुसऱ्या माहेरी आली.
हे माझं सासर नाही तर माहेरच आहे. तुम्ही इतकी माया लावता खरंच कोणी बघेल ना तर सासू सून म्हणणारच नाही आणि मुलगी आईच म्हणतील."
"मी माया लावते आणि तू नाही मला माया लावली. तू एका सुनेसारखी नाही तर मुलीसारखीच वागली. मला सांग तुझ्या जागी माझी मुलगी असती तर मी केलं असतं ना मग सून आणि मुलगी हा भेद का करायचा? मी जे मुलीसाठी केलं असतं तेच मी तुझ्यासाठी करते आणि मला वाटते प्रत्येक सासूने आणि प्रत्येक आईने सुनेच्या आणि मुलीच्या बाळंतपणा वेळी चांगलच वागायला हवं. हा काळ खूप कठीण काळ असतो. बाईचा पुनर्जन्म होतो अस समज. सगळ्या स्त्रियांच्या जीवनात हा काळ येतो.
या काळात तिला मानसिक गरज असते, तिला आनंदी ठेवण्याचा काम आपलं असतं. तिचा त्रास कमी व्हावा, तिला अजून काही त्रास होऊ नये हे सगळं करण्याचं काम तिच्या घरच्यांचं असतं. ते दिवस पुन्हा येत नाहीत म्हणून ह्या दिवसात घरच्या सुनेला आनंद कसा देता येईल हे सगळ्यांनी बघावं याचा सगळ्यांनी विचार करावा."
"माझ्याजवळ तुम्ही आहात ना म्हणून माझं बाळंतपणं अगदी भारी झालंय. थँक्यू आई."
नीलिमाने रमाताईला मिठी मारली.